मोरांची माता ...ललिता ताई
मोरांची माता ...ललिता ताई
सातारा शहराला तसे प्रचंड नैसर्गिक वरदान लाभलेले आहे. साताऱ्याचा अर्थच सात तारा. तारा म्हणजे डोंगर . खरंतर कित्तेक शतके विशाल असा संरक्षक असलेला अजिंक्यतारा साताऱ्याचे पेहचान आणि शान आहे. अजिंक्यतारा चढणे जरी इतर अनेक किल्ल्यांच्या मानाने सोपे असले तरी एकेकाळी तो जिंकता येणार नाही असा तारा म्हणूनच म्हणूनच अजिंक्यतारा होता. असे इतिहास सांगतो. या किल्ल्यावर आजही प्रचंड झाडी आणि पक्ष्यांचे अस्तित्व अबाधित आहे. प्राण्यांनाही हा किल्ला आणि तो परिसर आपलासा वाटतो. म्हणूनच बऱ्याचदा या किल्ल्याच्या भोवती बिबट्या व त्याच्या बछडे यांचे दर्शन झालेले आहे. शहरांमध्ये चोहोबाजूने अजिंक्यतारा पर्यंत पोहोचण्याकरिता रस्ता ,पाय वाट असल्याने साताऱ्यातील बरेच लोक सकाळी संध्याकाळी फिरण्या करिता पहिली पसंती अजिंक्यतारा ला देतात. फिरायला आलेला माणूस मात्र निव्वळ काही वेळापुरता याठिकाणी शुद्ध हवा घेऊन पुन्हा घरची वाट धरतो. बरेचसे ग्रुप अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतात. मोर, घुबड, ककूबुरा, पारवे, तीतर ,घार असे अनेक प्रकारचे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळत असतात.
याच ठिकाणी ललिता केशव नामक सातारा रहिवासी एक महिला मात्र नेटाने पंधरा वर्ष येथील अनेक मोरांची आई झालेली आहे. महिलांना असणाऱ्या अनेक अडचणी शारीरिक मानसिक व्यथा याने ग्रासलेल्या ललिता ताई यांना फिरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला होता. तरी मानवी स्वभावाचा गुणधर्म असलेल्याने ललिता ताई मात्र कानाडोळा करत होत्या. अशातच त्यांच्या मुलीने त्यांना अजिंक्यतारा परिसरात फिरायला जाण्याचा सल्ला दिला. बऱ्याच वेळेला कंटाळा करत त्या कशा बशा अजिंक्यतारा परिसरात फिरायला जाऊ लागल्या. त्यांना तेथील परिसर आवडू लागला मन रमू लागले. आणि अशातच त्यांना त्या परिसरात मोर दिसू लागले. या मोरांना चारा पाणी घालण्याच्या इच्छेने त्या रोज न चुकता अजिंक्यतारा वरती फिरायला जाऊ लागल्या. सोबत धान्याची पिशवी आणि पाण्यासाठी घागर हे घेऊ लागल्या. आश्चर्य म्हणजे मोरांना त्यांनी मारलेली हाक हळूहळू परिचयाची होत गेली. चारा पाणी घेऊन येणाऱ्या ललिता ताई त्यांचा आजार काही दिवसातच मोरांच्या सहवासाने आणि निसर्गाच्या सान्निध्याने पळून गेला. पंधरा वर्षे त्या आजही या अजिंक्यताऱ्यावरती चारा आणि पाणी घेऊन मोरांकरिता जातात त्यांनी मारलेली "बाळांनो या..." ही हाक त्या मोरांना आईची हाक वाटते. त्यामुळे या परिसरात मोरांचे तर प्रमाण वाढले आहेच पण पक्षांवरील प्रेमाचे अनोखे उदाहरण ललिता ताईंनी जगाला दिले आहे. सातत्याने धान्य खाऊन मोरांना कंटाळा येतो हेही या माऊलीच्या लक्षात यायचे चुकले नाही त्यामुळे त्यांनी या ठिकाणी फळझाडांची लागवड केली आहे. याच सार्वजनिक ठिकाणी त्यांनी गांडूळ खताची ही निर्मिती केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये प्रचंड कडाक्याच्या ऊन्हाची दखल घेत त्यांनी या ठिकाणी छोट्या-छोट्या तळ्यांची मागणी केली आहे. जी गोष्ट कोणाच्या ध्यानीमनी आली नाही ती गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी अशी छोटी छोटी तळी पाण्यासाठी निर्माण करणे आणि त्या माध्यमातून या पक्षांना जीवनदान मिळावे म्हणून शासनाकडे मागणी करणे म्हणजे खरोखर माता ही उपाधी सार्थकी लावणे आहे.
आयुष्य एकदा येते आणि तेही जर फक्त स्वतःसाठी जगून संपणार असेल तर त्या आयुष्याचा काय उपयोग. केवळ समाजसेवेचे खोटे मुखवटे घालून प्रसिद्धीसाठी हपापलेल्या लोकां करिता प्रसिद्धीच्या झोतापासून अलीप्त असणारे ललिता ताईंचे उदाहरण म्हणजे सणसणीत चपराक आहे. सातत्याने चालू असणारी त्यांची ही सेवा भूतदयेचे खूप चांगले उदाहरण आहे. साध्या सोप्या आणि सरळ गोष्टीतूनही बरेच काही साध्य करता येते. एखाद्या स्त्री कडे असलेली मातृत्वाचे भावना केवळ स्वतःच्या मुलां पुरती मर्यादित न राहता ती प्राणी आणि पक्ष्यांच्या करिता ही असू शकते हे या उदाहरणाने सिद्ध केले आहे.
अशा या माऊलीला आणि त्यांच्या पक्षांकरिता च्या मातृत्वाला मनापासून सलाम...
