STORYMIRROR

AnjalI Butley

Children Stories

3  

AnjalI Butley

Children Stories

मी शिकणारच नाही!

मी शिकणारच नाही!

3 mins
334

फेसबुकवर अमरावतीच्या 'शिव टेकडी' ची सफर करणारा एक व्हिडिओ बघितला. शिव टेकडी म्हणजे आमची मालटेकडी.. मालटेकडीवरचा शिवाजी महाराजांचा पुतळा नसतांनाची मालटेकडी पाहिलेली व १९७७-७८ला पुतळा बसवत असलेला पाहिलेला, आजोबांबरोबचा फेरफटका, घरी पाहुणे मंडळी आली की फिरायला घेऊन जायचे एकदम जवळचे ठिकाण! शाळेची सहल पण येथे गेलेली आठवते! घर व शाळेच्या जवळच होती मालटेकडी! आता टेकडी एकदम हटके झाली आहे!! हा व्हिडिओ बघत असतांना आपली शाळा दिसते का? आता कशी दिसत असेल हे शोधत असतांनाच जुन्या ब्रिटिशांनी शिक्षक महाविद्यालयातील शिक्षकांना सरावासाठी पहिली ते सातवी अशी सरावपाठ शाळा काढली होती! त्या शाळा आता बंद करणार असे वाचले. वाचुन वाईट वाटले!

अमरावतीच्या ह्याच शाळेत पहिली ते चौथी शिक्षणाचे धडे गिरवले आहे. प्रशस्त वर्ग, ओसरी, खेळाचे मैदान, एकदम मोठा प्रार्थना हॉल, कौलारू छत असलेली बसकी इमारत... शाळेचे गॅदरींग, गणपतीचा उत्सव, बुलबूल-गाईड, शाळेच्या सहली, बाईंनी म्हणून - अरे घोकवून घेतलेले पाढे व कविता, डबा खातांना म्हटलेले 'वदनी कवळ', भांड्यांचा अॉर्केस्ट्रा, वर्गात कापडी पट्टया टाकुन त्यावर बसुन शिकायचे, दगडी पाटी, खडूची लेखनी!!...

परीक्षेला ओसरीत असलेल्या प्रत्येक खांबाजवळ एक विद्यार्थी बसवायचे, माझा नंबर ह्या खांबाजवळच असायचा मज्जा यायची मस्त रमत गमत, रस्ताने येणार्या जाणार्यांकडे बघत पेपर लिहायचा! तसेही परीक्षेचे टेंशन नव्हतेच. 'टेंशन' हा शब्दच माहित नव्हता! 

आता आठवतात काही बाईचे नाव - धंडारे बाई नववारी साडी नेसायच्या, गोल चेहरा, काळासावळा रंग, आंबाडा घालायच्या, गोल सोनेरी काड्यांचा चष्मा! तर  बेंद्रे बाई सहावारी बुटक्या, गोर्या, घारे डोळे, जवळच टोपे नगरला रहायच्या!  बाईच्या पांढर्या साडीला नाजुक जांभळ्या रंगाचे काठ अशी साडी हा त्यांचा गणवेष! तर आमचा निळा रंगाचा स्कर्ट व त्यावर पिवळ्या रंगाचा शर्ट टाईप टॉप! पायात बाटा स्लिपर, कधी बुलबूचा कार्यक्रम असेल तर चॉकलेटी रंगाचे कॅनव्हॉसचे बुट! 

शाळा घराच्या जवळच होती, जवळ म्हणजे शिक्षकांच्या प्रसाधनगृहा जवळचा कोपऱ्यावरच शाळेच तारेच कुंपण व आमच्या घराच्या इमारतीच तारेच कुंपण एकच होत!  शास्री नगर, मांगीलाल प्लॉटच्या बाजूचं! पायी जाणे येणे! शाळा भरायच्या आधी व सुटल्यावर ही शाळेच्या आवारात खेळणे!!!

लहानपणीच्या आठवणी मनात पिंगा घालत होत्या! चौथी झाल्यावर आमची शाळा बदलावयाचे बाबांनी ठरवले! व मोठी बहिण शिकत असलेल्याच 'होली क्रॉस मराठी मुलींच्या शाळेत नावपण टाकले.  मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे गावाला गेली होती.. सुट्टी संपल्यावर घरी आल्यावर हा शाळा बदल मला समजला. मला ह्या शाळेत जायचे नव्हते! बालमनात कुठेतरी कोरले गेले होते ही ख्रिचनांची शाळा आहे, ते धर्म बदलवतात, चर्चमध्ये प्रार्थना करण्यास सांगतात, वैगरे!! मला ते नको होते...

अमरावतीला 'मनीबाई गुजराती' शाळा नावाजलेली होती. ती लांब होती, शाळेत जायला सायकल रिक्षा लावावा लागला असता. लांब शाळेत बाबांना मला टाकायचे नव्हते! रडून रडून मी शाळेतच जाणार नाही, मला शिकायचेच नाही म्हणुन गोंधळ घातला. मला समजावण्यासाठी एक दिवस बाबा मला मनीबाई गुजराती शाळेत घेऊन गेले, तिथल्या मुख्याधपाकांशी भेटपण घालुन दिली!त्यांनीपण मला समजावले, लांब आहे शाळा, शाळा सुरू झाली आता, जागा शिल्लक नाही, नाव टाकण्यासाठी उशीर झाला वैगरे!! मला माहित होत ते नाहीच म्हणणार, बाबांनी त्यांना आधीच सांगुन ठेवले असेल, माझी समजुत काढण्यासाठी घेऊन गेले होते! शेवटी त्या शाळेचे दरवाजे आमचे बंद झाले... 

मी शिकणारच नाही, शाळेतच जाणार नाही ह्यावर ठाम होते, आधी शाळेत एक पण सुट्टी न घेतलेली मी, शाळेत नाही जाणार म्हणत होती... पाचवीसाठी शाळेला लागणारे सर्व साहित्य आणले होते. आईने कसेबसे मला जाळेत जाण्यासाठी तयार केले. माझ एकच पालुपद चालू असायचं 'मी शिकणारच नाही', शाळेत गेले तरी मी शिकणारच नाही...मोठ्या बहिणी बरोबर शाळेत मन नसतांनाही जावेच लागले. 

त्याच वर्षी बाबांची नाशिकला बदली झाली, व कशीबशी पाचवी पास झाले व ह्या शाळेचा संबंध तुटला! हायसे वाटले!

नाशिकच्या शाळेत कौलारू बसकी छोटी इमारत पहिल्या दिवशी दिसली, व जवळच सिमेटची बांधकाम चालू असलेली शाळेची इमारत दिसली, शाळेचे 'रचना विद्यालय' मराठमोळ नाव आवडल. सहावीचा वर्ग कौलारू शाळेच्या बसक्या इमारतीच्या एका खोलीत भरला, नविन गाव, शाळा मित्र मैत्रिणी हळुहळू भेटत गेल्या व शिक्षकपण चांगले होते , शाळेला दहावर्ष पूर्ण होत होते म्हणून शाळेत वर्षभर खुप सांस्कृतिक कार्यक्रम झाले, योगासनांच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात विषेश म्हणजे नेतृत्वाची भुमिका बजावता आली, व शाळा शिकता शिकता 'आपली' कधी झाली हे कळलेपण नाही! पुढचे शिक्षण आपोआप होत गेले, उच्च शिक्षणपण झाले! 

शाळेचा विषय निघाला की, 'मी शिकणारच नाही' ह्या माझ्या हट्टाची आठवण होते व  तुम्ही माझा हट्ट पुरवलाच नाही 'मी शिकणारच नाही'चा असे म्हणत बाबांना चिडवत ही असे! 

काळानुरूप आई-बाबांनी नकळत शिक्षणाचे महत्व पटवुन दिलेच होते! शाळेतले शिक्षक व मित्रमैत्रिणींच्या साथीने शिक्षण प्रक्रिया सहज सोपी कशी झाली हे कळलेपण नाही! आता मागे वळून पाहतांना माझीच मला गंमत वाटते 'मी शिकणारच नाही' ह्या हट्टाचा!

आता लॉकडाऊन मध्ये, बरेचजण आॉनलाईन शिकायला तयार नाही, शाळेत जायची गंमत अनुभवता येत नाहीन, ते पण म्हणतच असणार 'मी शिकणार नाही'!

बदल आपलासा करत शिक्षण केले की आपोआप शिक्षण होत! 


Rate this content
Log in