Swapna Wankhade

Others

2  

Swapna Wankhade

Others

महिला दिन आणि महिलांची सामाजिक स्थिती

महिला दिन आणि महिलांची सामाजिक स्थिती

5 mins
174


   जर्मनी या देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी ८ मार्च १९१४ रोजी पहिल्यांदा महिला दिन साजरा करण्यात आला. त्या लढ्याचे फलित १९१८ मध्ये झाले. जागतिक इतिहासात डोकावल्यास असे प्रकर्षाने जाणवते की, अर्धी लोकसंख्या व्यापणाऱ्या स्त्रीवर्गला प्रत्येक वेळी आपल्या अधिकार मिळवणे आणि अस्तित्व टिकवणे यासाठी लढावे वा झटावे लागले. सहजासहजी ते स्त्रिवर्गला मिळण्याचे प्रसंग फार दुर्मिळ आहेत. नैसर्गिकरीत्या असलेल्या शारीरिक मर्यादा, सामाजिक जबाबदाऱ्या यांचे दडपण वा ओझे स्त्रियांना कायमचे वागवावे लागते. परकीय आक्रमणे ,युद्ध या सर्व प्रसंगांमध्ये स्त्रीला शारीरिक आणि भावनिक पातळीवर वेदनादाकरित्या फार मोठी किंमत चुकवावी लागली. पुराणग्रंथ ,ऐतिहासिक दाखले,इतर साहित्यात अगदी राणीपासुन ते दासिपर्यंत सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरातील महिलांना काय सोसावे लागले हे कळते. 


    जागतिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरण,पुनर्वसनासाठी अनेक योजना, चळवळी उभारण्यात आल्या. भूक, व्यक्तिस्वातंत्र्य, मानवाधिकार, माध्यम स्वातंत्र्याप्रमाणेच महिलांविरुध्द होणाऱ्या अत्याचाराबाबतही जगभरातील देशांची क्रमवार यादी वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते. आकडेवारीसहित, अत्याचाराचे स्वरूप, कारणे आणि उपायंचाही अशा अहवालांत अंतर्भाव असतो. खेदाची बाब अशी की महिलांवरील अत्याचाराच्या जागतिक क्रमवारीत भारत देश अग्रणी आहे. हे भूषणावह नक्कीच नव्हे. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी राबवलेल्या उपाय योजना आणि त्याकरिता करण्यात आलेले सक्तीचे कायदे तोकडे पडत आहेत हेच म्हणावे लागेल. 


   जन्मापासूनच मुलगा मुलगी भेदभावापोटी भ्रूणहत्या या क्रूर प्रकरणे स्त्रीवर्ग आजही ग्रस्त आहे. गर्भलिंग निदान चाचणीवर कायदेशीररीत्या निर्बंध आणूनही कित्येक अवैध चाचण्यांचे प्रकार उघडकीला आले. जन्मलेली मुलगी कचराकुंडीत टाकणे,मारून टाकणे हे प्रकार आजही दररोज कानावर पडतात. बालविवाह, देवदासी, कौमार्य चाचणी हे मानसिक आणि शारीरिक छळही अती मागास काही समाजांत आजही आहेत.हुंडा विरोधी कायदा अंमलात असूनही ती कुप्रथा दोन्ही पक्षांच्या संगनमताने चालूच आहे. अविवाहित तरुण स्त्री किंवा मुलबाळ नसलेली तरुण विधवा मालमत्तेत वाटेकरू म्हणून सासरच्यांना नको असते. तिला चेटकीण ठरवून वा तिच्या चारित्र्यावर खोटे संशय घेऊन तिची घरातून हाकलून देण्यात येते. वडिलांच्या मालमत्तेत कायदेशीर हक्क असूनही मुलीला सहसा तो मिळत नाही. कायदेशीर लढा देऊन, माहेरचे संबंध तोडून वेळप्रसंगी महेरच्यांच्या हाती जीव गमावूनही मुलींना वाजवी हक्क मागण्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. या सर्व समस्यांमध्ये अगदी रक्ताच्या नात्यातील स्त्रियाही पीडित स्त्रीच्या बाजूने तर दूरच उलट तिच्या विरोधातच भूमिका घेताना आढळतात. नवरा वा घरातील इतर पुरुषांच्या दबावाखाली वा आपले घरात वर्चस्व पीडित स्त्रीला खाली खेचूनच स्थापित होऊ शकते या गैरसमामुळे वा पीडित स्त्रिप्रती वाटणाऱ्या आकसामुळे स्त्रिया स्त्रिविरोधी भूमिका घेतात. 


    "Woman thy name is jealousy'' या म्हणीप्रमाणे विचार केल्यास असे लक्षात येते की,  गर्भश्रीमंत, उच्चविद्याविभूषित स्त्रियाही आपल्यापेक्षा बुद्धिमान वा कर्तृत्ववान स्त्रीप्रती आकस वा इर्षा मनात बाळगतात. एकाच घरातील लेकी वा सूना काहीही ठोस कारण नसतांना फक्त न्यूनगंडापोटी एकमेकींना उगाच पाण्यात पाहतात. फक्त आपल्यातल्या गुणांबद्दलच नव्हे तर नवरा, मुलं,अगदी माहेरच्या मंडळींची आर्थिक स्तरावर तुलना करून एकमेकांना हिणवले जाते. शारीरिक त्रास दिसतोही मात्र मानसिकरीत्या केलेले खच्चीकरण वा छळ सहसा लक्षात येत नाही. तेही फार वेदनादायक असते हे ही तितकेच खरे. घरातील एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याच्या अपघात वा आजारपणात तिला आणि तिच्या अपत्यांची कोणतीही मदत करणे तर सोडाच त्यांना धिरही देण्याचा समंजसपणा अगदी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मिरवणाऱ्या स्त्रियांमध्ये नसलेले मी बघितले आहे. उलटपक्षी त्यांना टोचून बोलणें,त्यांची मदत करणारी एखादी व्यक्ती पुरुष असल्यास त्याच्याशी नाव चिकटवून बदनामी करण्याचा हिडिसवाणा प्रकार साधारण म्हणवणाऱ्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या दोन्ही प्रकारच्या महिला करतांना सर्रास आढळतात. अल्पभूधारक,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या माहेरी अठरा विश्वे दारिद्र्य भोगलेल्या लेकींना शिक्षण आणि घरकामात निपुण असूनही सासरी अपमानच सहन करावा लागतो. अगदी पुढारलेल्या आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून गळा काढणाऱ्या, भाषण झोडणाऱ्या सोंगाड्या लोकांच्या घरातही शेतकऱ्यांच्या लेकीचा इतका मानसिक छळ केला जातो हे जळजळीत वास्तव आहे.तिला मुलगा न होता मुलगी झाली तर मग तिचा आणि तिच्या मुलीचा एकटे पाडून,कटकारस्थान रचून हकलवण्याचा प्रयत्न करणे, तिची तिच्या माहेरच्या जीवित आणि अगदी मृत सदस्यांचा उद्धार करणे, मुलीची समाजकंटांकरवी पैसे देऊन लग्नाच्या अफवा पसरवून बदनामी करणे हे सर्व प्रकार सामाजिक कार्याचा मुखवटा धारण करणाऱ्या स्त्रियांनी केलेले आहेत.


   आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मध्यमवर्गीय जोडप्यांच्या मुलींच्या विवाहविषयक समस्या वेगळ्याच आहेत. त्यांना आई वडिलांच्या जाती धर्मातील लोकांसकट इतर समाजातील लोकही सहजरित्या स्वीकारत नाहीत. श्रीमंत गरीब अशा दोन्ही स्तरांतील मुलींना ती झळ सोसावी लागते . शिक्षण, घरकाम आणि इतरही आघाड्यांवर कर्तृत्वशून्य असूनही सद्भग्याने कर्तृत्ववान नवरा मिळाला तर आपल्यापेक्षा कित्येक पट कर्तृत्ववान मुलींना उशिरा विवाह झाल्याबद्दल,तितकासा कर्तृत्ववान नवरा न मिळाल्याबद्दल वर्षानुवर्षे टोमणे मारले जातात. "" काही मुली शिकलेल्या असतात. पण त्यांच्यात निर्णयक्षमता नसते. वय वाढले की कसाही नवरा गाठतात.तडजोड करतात.'' असे खोचक शेरे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या, कर्तुत्वशून्य पण कर्तृत्ववान नवरा मिळाल्याने कानात वारे शिरल्यागत वागणाऱ्या स्त्रियांच्या श्रीमुखातून गरीब घरातील उच्चशिक्षित, सरकारी नोकरी करणाऱ्या कर्तृत्ववान मुलींबद्दल निघतात.कोणताही गुणदोष नसतांना आईवडिलांच्या आंतरजातीय/धर्मीय विवाहामुळे वा गरिबीमुळे नाकारलेल्या लेकींचे सासरच्या स्वतः आंतरजातीय विवाह केल्याबद्दल सत्कार स्वीकारत फिरणाऱ्या आणि लेकीची आई असलेल्या स्त्रियाही उगाच त्यामुद्द्यावर हिनविल्याचा अनुभव आहे. त्याच कारणामुळे आपल्या लेकीला नाकारण्यात आले तर मात्र अशा महाभाग स्त्रिया आपल्या लेकीच्या विवाहाच्या छुप्या हेतूने सामाजिक कार्याच्या नावाखाली आंतरजातीय/धर्मीय विवाह मेळाव्याचे घाटही घालतात. बाबा बुआंनी धर्माच्या नावाखाली कुकृत्य करून समाजाच्या डोळ्यांत धूळ झोकली. त्याचप्रमाणे अगदी सुनेला छळल्याच्या ,जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ४९८ अ अंतर्गत मुलासकट तुरुंगवास भोगलेल्या स्त्रियाही सामाजिक कार्यकर्त्या आणि सत्यवादी,अहिंसावादी सतपुरुषाच्या विचारांचे प्रचारक वा परीक्षक पद भूषवित अक्षरशः ढोंग करीत आहेत. महिला आयोग सारख्या संस्थांची आणि त्यातील स्त्री सदस्यांची प्रतिमा समाजात तितकीशी चांगली नाही ही खेदाची बाब आहे. अर्थात याला अपवाद आहेतच हे ही तितकेच खरे.


     सत्ताधारी पक्षातील पुरुषांकडून बलात्कार, आत्महत्येला प्रवृत्त करणे,खून असे अत्याचार महिलांवर होतांना दिसत आहे. कित्येक प्रकरणे अक्षरशः दाबली ही जात आहेत. हे दुर्दैवी आहे. विपक्षयील महिला प्रवक्त्या या प्रकरणांत राळ उठवत असताना सत्ताधारी पक्षाच्या महिला प्रवक्त्या मात्र गप्प वा अळीमिळी गुपचिळी ची भूमिका घेताना दिसत आहेत. हे सामाजिकदृष्ट्या घातक आहे. राजेशाही, मोगलाईच्या काळातील घटना लोकशाहीच्या राज्यात राज्यकर्त्यां कडून घडत आहेत याला काय म्हणावे. 

    

सावित्रीबाई फुलेंच्या विधानानुसार ज्याची समस्या आहे त्यानेच लढा दिल्याशिवाय त्या समस्येचे निराकरण होणे अशक्य आहे. कित्येक पुरुषही महीलांसंबंधी चळवळीत सामील आहेत. पण महत्त्व समास्थ्रस्त आणि धडाडीच्या प्रामाणिक महिलांच्या चळवळीत सहभागी होण्याला. त्यात नेमकी कुठे कमतरता आहे हे शोधून काढण्याची नितांत आवश्यकता आहे. सासरच्या लोकांकडून अपेक्षा करण्याआधी माहेरच्या मंडळींकडून समानतेची आणि सन्मानाची वागणूक स्त्रीला मिळणे अपेक्षित आहे. पुरुषांकडून मान आणि पाठिंबा मिळवाच पण स्त्रियांनीच एकमेकींना मानाने वागणूक द्यायला हवी. एकमेकींच्या अडचणीत पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. ८ मार्चला एक दिवस साजरा करण्यापेक्षा निरंतर स्त्रीवर्गाच्या उद्धारासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 


Rate this content
Log in