Swapna Wankhade

Others

2  

Swapna Wankhade

Others

२३ मार्च १९३१ - शहीद दिवस

२३ मार्च १९३१ - शहीद दिवस

3 mins
158


   मागील पाच हजार वर्षांपासून आपल्या भारत वर्षावर कित्येक परकीय आक्रमणे झाली.त्यात आशिया खंडातील व इतर खंडांतील परकीय अाक्रांता सामील होते. त्यांचा अंमल शेकडो वर्षे भारतीय भूमी व जनतेवर होता. साहजिकच भारतीय जनतेमध्ये आणि त्या अाक्रांतांमध्ये खडाजंगी वा घनघोर युद्धांचे कित्येक प्रसंग आले. जय- पराजय, शौर्य, बलिदान, शरणागती, मांडलिकत्व, गुलामगिरी, पलायन, रक्तपात, जौहर,अत्याचार, आपआपसांतील कुरघोडी, फंदफितुरी असे कितीतरी क्लेशदायक, दुःखदायक क्षण दोन्ही पक्षांच्या वाट्याला आले. 


   भारतावर शेवटचे परकीय अंमल युरोपीय खंडातील इंग्रजांचे होते. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांच्या काळापासून इंग्रजांनी मसाल्याचा व्यापार करण्याचे निमित्त करून ईस्ट इंडिया कंपनीच्या नावावर आपले बस्तान भारत भूमीवर मांडले. नंतर हळू हळू इंग्रजांनी आपला युनियन जॅक अखंड भारतावर फडकवला. ओघाने मातृभूमीला स्वतंत्र करण्याकरिता भूमिपुत्रांनी एकजुटीने असंख्य लहान - मोठे लढे दिले. १८५७ चा उठाव जरी स्वातंत्र्याच्या दृष्टीने अयशस्वी ठरला, तरीही लक्षणीय घटनांमध्ये गणला गेला. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. झाशीची राणी,मंगल पांडे,खुदीराम बोस ,चंद्रशेखर आजाद यांच्या बलिदानाच्या घटनांबरोबरच २३ मार्च १९३१ या दिवशी झालेले भगतसिंह संधू,सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य चळवळीला नवीन वळण आणि धार दिली.


   भगतसिंह , सुखदेव आणि राजगुरू हे तीघे हुतात्मे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चे सदस्य होते. भगतसिंह कार्ल मार्क्स यांच्या विचारांने प्रभावित होऊन मार्क्सिस्ट चळवळीत सामील झाले.राजगुरू यांची स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जवळीक होती. मार्क्सिस्ट आणि आरएसएस या दोन्ही विचारधारा अगदी परस्परविरोधी मानल्या जातात. तरीही देशभक्ती आणि स्वातंत्र्याकरिता कळकळ तिघांना एकत्र घेऊन आले. तिघेही आपले आडनाव लावीत नव्ह्ते, कारण त्यांना आपला धर्म,जात , प्रांत इत्यादी कोणालाही दर्शवायचे नव्हते. यावरून असे लक्षात येते की, स्वातंत्र्यपूर्व भारतात जात,धर्म, प्रांत, विचारधारा यांचा अडसर स्वातंत्र्य लढ्यात डोकावला नाही. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र सगळे विभागले गेले याची खंत वाटते. 


   लाला लजपतराय यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लाठीमराचे आदेश देणाऱ्या स्कॉटचा सूड घेण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात चुकीने सौंडर्स मारला गेला. हा गोळीबार भगतसिंह आणि राजगुरू यांनी केला होता.आठ एप्रिल १९२९ रोजी पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल या शोषणकारी कायद्यांच्या विरोधात भगतसिंह आणि बटूकेश्र्वर दत्त यांनी असेंबली मध्ये बॉम्ब हल्ला केला. १८ डिसेंबर १९२८ रोजी घडलेल्या लाहोर कटाचा म्होरक्या म्हणून सुखदेव यांना अटक झाली. तिघांवरही इंग्रजविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन २३ मार्च १९३१ रोजी मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.ऐन उमेदीच्या वयात तिघा हुतात्म्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदाना नंतर स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी वणव्याचे रूप घेईल ही अाशा मनात घेऊन ते गेले. आपल्याला स्वतंत्र भारताचा उगवता सूर्य बघायला मिळाला नाही, स्वतंत्र श्वास घेता आला नाही याची खंत त्यांच्या मनात अजिबातही नव्हती. उलट आपल्या पश्चात समस्त देशवासीयांना स्वातंत्र्य उपभोगता यावे हीच इच्छा ते उरी बाळगून होते. 


   भगतसिंहांबद्दल असे ऐकिवात आहे की, एकदा त्यांचे आजोबा त्यांना तुरुंगात भेटावयास गेले होते. आजोबांनी भगतसिंहांना विचारले,"" तुला त्या देशवासीयांनासाठी का बरे बलिदान द्यायचे आहे ज्यांनी तुझा चेहरादेखील बघितलेला नाही?'' या प्रश्नावर भगतसिंह उत्तरले,"" कोण्या आजाराने असेच मरण्यापेक्षा, देशासाठी बलिदान देणे कित्येक पटीने बेहेत्तर आहे.'' अवघ्या तेवीस वर्षांच्या वयात इतकी प्रगल्भता, इतका मोठा विचार आश्चर्यकारक वाटतो. 


   एकविसाव्या शतकात असा विचार करणारा तरुणवर्ग क्वचितच बघायला मिळतो. या पिढीने पारतंत्र्य अनुभवले नाही म्हणून त्यांना स्वातंत्र्याची तितकीशी किंमत नाही.स्वातंत्र्यप्राप्तीकरिता आदल्या पिढ्यांनी केलेले अपार कष्ट व त्यागाची जाण अभावानेच कोणाला असेल. धकाधकीचे गतिमान जीवन, आत्ममग्नता, गरजेपेक्षा कित्येक पट भौतिक सुखसोयींच्या विळख्यात अडकलेल्या हल्लीच्या मानवी जीवनात हा विचार करण्यासाठी वेळ मिळणे दुरापास्तच आहे. स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान स्वातंत्र्य सेनानींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोसलेले दुःख आणि हौतात्म्य प्राप्ती नंतर त्यांच्या विरहात कुटुंबीयांनी भोगलेल्या वेदनांची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्या सर्व थोरांचे आपण सर्वांवर खूप मोठे ऋण आहे. जे आपण कधीही फेडू शकत नाही. कमीतकमी त्याची जाण आपल्या मनाच्या कोपऱ्यात तरी ठेवायला हवी.


Rate this content
Log in