ग्रीक दंत कथा
ग्रीक दंत कथा


अपोलो हा देवांचा राजा झ्यूस चा अत्यंत देखणा पुत्र होता. तो धनुर्वेद, आयुर्वेद, संगीत यांचा देव होता. कितीतरी देवता त्याच्या सौंदर्यावर मोहित झाल्या होत्या. त्याला मात्र ट्रायची कॅन्स्वाल्ड नावाची मुलगी खूप आवडली. तिच्या सौंदर्याने तो भारावून गेला. त्याने तिला खूष करण्यासाठी भविष्यवाणी चा वर दिला. तिला देव अपोलो चा आदर वाटू लागला.
कॅन्स्वाल्ड ला पुढे घडणाऱ्या गोष्टी अगोदरच कळत, त्यामुळे ती घडणाऱ्या वाईट घटनांची माहिती अगोदरच द्यायची त्यामुळे बरेच विघ्न टळत असत. कॅन्स्वाल्ड च्या या वैशिष्ट्यामुळे तिला बरेच महत्त्व प्राप्त झाले सर्वजण तिला आदराने वागवू लागले.
तिच्या जीवनात या अदभूत वराबद्दल बरेच परिवर्तन झाले.ती अपोलोची मनःपूर्वक आभारी होती. जेव्हा अपोलो ने तिच्यासोबत लग्नाची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा मात्र तिला दुःख झाले . तिने त्याच्याकडे त्या दृष्टीने कधीच पाहिले नव्हते तिची अपोलो वर भक्ती होती, श्रद्धा होती,पण प्रेम नव्हते. तिने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला.
कॅन्स्वाल्ड चा नकार ऐकून अपोलो क्रोधित झाला. त्याने तिची खूप समजूत काढली पण ती तटस्थ होती. तेव्हा रागाने अॅपोलो ने तिला शाप दिला की तिने केलेल्या भविष्यवाणीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कॅन्स्वाल्ड चे पूर्ण जीवनाचं बदलून गेले होते. तिने केलेल्या भविष्यवाणी वर आता कोणीही विश्वास ठेवेनासे झाले. तिचे समाजात असलेले मानाचे स्थान ही नष्ट झाले ती खूप दुःखी झाली.
ट्राय वर ग्रीक चे आक्रमण होणार असे तिने भाकीत केले. पण दुर्दैव की सगळ्यांनी तिच्या या भाकिताकडे दुर्लक्ष केले, लवकरच ग्रीक सैन्य ट्राय वर चालून आले. ट्राय ने युद्धाची कोणतीही तयारी केली नव्हती, अखेर ग्रीक सैन्याने ट्रायचा पराभव केला. ग्रीक सैन्याचा सेनापती एगमेन चे लक्ष कॅन्स्वाल्ड कडे गेले. त्याने तिला आपल्या घरी नेले आपले दुःख विसरण्यासाठी ती सुद्धा जाण्यास तयार झाली.
एगमेनच्या पत्नीला सुंदर कॅन्स्वाल्ड चा हेवा वाटला. तिने मत्सराने तिच्या सरबतात विष टाकले. भविष्यवाणी वरामुळे कॅन्स्वाल्ड ला हे माहीत झाले. तिने एगमेन ला ह्यात विष आहे, हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याने ते हसण्यावर नेऊन ते सरबत तीला आग्रहाने प्यायला लावले. बिचाऱ्या कॅन्स्वाल्ड ला मरण समोर दिसत असूनही अगतिकपणे ते सरबत प्राशन करावेच लागले व प्राणाला मुकावे लागले.
तात्पर्य--१) वरदान ही कधी कधी शाप ठरते.
२) मत्सर जीवन उद्ध्वस्त करतो.
मीना महिंद्रकर
देवगाव रंगारी
औरंगाबाद