ग्रीक दंत कथा
ग्रीक दंत कथा
कुशल कारागीर
ग्रीकमधील अथेन्स हे भरभराटीला आलेल शहर. सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण तेथील जनता खूप कष्टाळू होती. पोटापुरतं मिळवायचं हा इथला नियम नव्हता. यापेक्षा ही वेगळं काहीतरी करून दाखवायचं, राजाकडून सन्मान मिळवायचा, नाव लौकिक मिळवायचा म्हणजे जीवनाचं सार्थक झालं, असं येथील जनतेला वाटायचं.
ह्याच नगरात डीडलस हा एक कुशल कारागीर राहत होता. आपल्या धंद्यात त्याने बराच नावलौकिक मिळवला होता. तरीही त्याचे समाधान होत नव्हते. काहीतरी आगळे वेगळं करून दाखवावे व राज्याकडून मानाचा मुकुट मिळवावा असे त्याला वाटायचे. नवीन - नवीन प्रयोग करण्यात तो नेहमी गुंतलेला असायचा. घरात मात्र त्याचे दुर्लक्ष व्हायचे. त्याची पत्नी अशा संसाराला कंटाळली होती तिला वाटायचं डीडलसने चारचौघांसारखा संसार करावा. आपला मुलगा इकरसला कलानिपूण करावे, उरलेले आयुष्य समाधानाने घालवावे पण डीडलसला ते मान्य नव्हते तो त्याच्या प्रयोग शाळेत मग्न असायचा, त्याचा मुलगा इकरस सुद्धा त्याला मदत करायचा.
एकदा निसर्ग दर्शन करत असताना पक्षाचा थवा चाललेला डीडलसने पाहिला. त्या छोट्या पक्षांनी पंखाच्या साह्याने आकाशाला घातलेली गवसणी त्याला मोहरून गेली. आपल्यालाही उडता आले तर हा एक आगळावेगळा प्रयोग होईल, असे त्याला वाटले. ह्या विचाराने त्याला एवढे झपाटले की तो त्यावर सखोल संशोधन करू लागला. त्याने पक्ष्यांची पिसे इकरसच्या मदतीने गोळा केली. मेणाच्या साह्याने ती पिसे शरीराला विशिष्ट पद्धतीने जोडून आकाशात उड्डाण करायचे ठरविले. इकरसनेसुद्धा ह्या अद्भुत साहसात भाग घेण्याचा हट्ट धरला. डीडलस तयार झाला, आणि एके दिवशी दोघांनी ही पिसांनी सज्ज होऊन आकाशात भरारी मारली.
पिसांच्या साहाय्याने दोघेही हवेवर तरंगू लागले. आपला प्रयोग यशस्वी होईल हे पाहून डीडलसला आनंद होत होता. पण जस जसे ऊन तापू लागले तस तसे मेण वितळून एक एक पीस गळत होते. हे धोक्याचे चिन्ह पाहून डीडलसने इकरसला परत फिरण्यास सांगितले. पण तो बेभान होऊन आकाशात झेप घेत होता. थोड्याच अंतरात आपण आकाशाला स्पर्श करू शकू असे त्याला वाटत होते. त्याला लवकर परतण्याची सूचना देऊन डीडलस जमिनीवर परत आला. तो परत आलेला पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले. डीडलस खूप आनंदात होता. आपल्याबरोबर मुलाचेही अभिनंदन होणार असल्यामुळे त्याच्या वाटेकडे लक्ष देऊन होता. त्याची आईसुद्धा देवाचा धावा करत होती.
बराच वेळ झाला सर्वजण वाट पाहून थकले. पण इकरस परत आला नाही. शोधाशोध सुरू झाली. शेवटी तो उष्णतेने पूर्ण पीस गळून पडल्यामुळे समुद्रात पडला. त्याची आई शोकाकुल झाली. डीडलस होरपळून गेला. राजाकडून आलेलं मानाचं आमंत्रणाचं सुख तो या परिस्थितीत उपभोगू शकला नाही.
तात्पर्य - 1 - कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करावी.
2 मोठेपणाच्या हव्यासापायी कोणताही उपद्व्याप करू नये.