Sanjay Ronghe

Children Stories Inspirational Children

4.5  

Sanjay Ronghe

Children Stories Inspirational Children

बलून

बलून

5 mins
551


सनी आणि निलू यांचा संसार अगदी सुखात सुरू होता. सनीला चांगली नोकरी मिळाली. पगारही बऱ्यापैकी होता. नवीन संसाराची सुरवात छान थाटात सुरू झाली. संसार नवा असल्याने घरात सामान , वस्तू यांची जमवाजमव सुरू हाती. नोकरी शहरापासून लांब असलेल्या भागात होती. त्यामुळे त्यांचे राहणेही त्याच भागात छोटयाशा गावात होते. गावात सुख सुविधा थोड्या कमीच होत्या. पण कुठलेच काम असे अडत नव्हते. छोट्या मोठ्या गरजेच्या वस्तू आजूबाजूच्या गावात पूर्ण व्हायच्या. पण काही मोठी खरेदी करायची म्हटले तर मात्र शहरात जावे लागायचे.


अशातच सईचा जन्म झाला आणि घरात सगळे आनंदी झाले. सईचे आगमन सनी आणि निलू साठी खूपच शुभ ठरले. सनीचे ऑफिस मधे प्रमोशन झाले. पगारात वाढ मिळाली.  आणि मग घरात आनंदाचे वातावरण पसरले. पगारात वाढ झाली आणि मग त्यानुसार घरात गरजाही वाढल्या. हे हवे ते हवे असे वाटायला लागले. सई आता दीड वर्षाची झाली होती. तिच्या पायांना चाके लागल्यागत ती ठुमकत ठुमकत इकडे तिकडे फिरायला लागली. स्वस्थ अशी ती कधी बसताच नव्हती. दिवसभर घरभर फिरत असायची. समोरच्या घरी तिच्याच वयाचा वरद होता. दोघांची खूप गट्टी जमली. मग दोघेही ठुमकत ठुमकत येकमेकाच्या घरी अगदी स्वैपाक खोली पर्यंत जाऊन पोचले. दोघांनाही एकमेकांशिवाय करमतच नसे. दिवसभर त्यांचे भटकणे सुरू असायचे.


एक दिवस तर दोघेही खेळता खेळता जिना चढून घराच्या गच्ची वर पोचले. गच्ची ला भिंतच नव्हती. आणि त्यामुळे गच्ची वरून वाकून बघता बघता सईचा तोल गेला. पण तिच्या हातात स्लॅब ची सळाक आल्याने ती तिने घट्ट धरून ठेवली. आणि मग ती त्या सळाकीला धरून लटकून राहिली. ते समोरच्या काकांच्या लक्षात आले आणि ते धावत पळत गच्चीवर पोचले. त्यांनी सईला आधार देऊन खाली उतरवले. सईला कपाळाला थोडे खरचटले , पण खूप मोठा अनर्थ होता होता टाळला होता. सनी आणि निलु साठी ते काका देव म्हणूनच धावून आले. आणि त्यांनी सईला वाचवले होते . नाहीतर काय घडले असते ते काहीच सांगता येत नव्हते. त्यांच्या सजगते मुळे सईला काहीच झाले नाही. त्यांनी काकांचे खूप आभार मानले. आणि एक प्रण केला की या पुढे सईला कुठेच एकटे सोडायचे नाही. त्यानंतर निलू सईला खूप जपायची. सारखी तिच्या मागे पुढे असायची. पण मुलं ती मुलचं असतात. गडबड करणार नाहीत तर ती मुलं कसली. आई बाबांचा डोळा चुकवून काहीतरी वेगळं करण्याचा जणू त्यांनी विडाच घेतला असतो. 


अशातच  दिवाळी अगदी तोंडावर आली होती. यंदा दिवाळी छान थाटात साजरी करायची सनी निलुचे ठरले. नवीन कपडे, घरात लागणारे काही सामान व इतर काही खरेदी करायचा प्लान झाला. दिवाळीचा बोनस हातात आला आणी मग सनी आणि निलुचे खरेदीला शहरात बाजारात जायचे ठरले. मोठ्या खरेदीसाठी शहरात जावे लागायचे. कारण गावात मोठया वस्तू मिळणे शक्य नव्हते. 


सनी निलू आणि सई तिघेही तयार होऊन दुपारीच बाजाराला निघाले. बाजारात पोचले तर तिथे अफाट गर्दी लोटली होती. बाजाराला जणू उधाण आले होते. ठिकठिकाणी विक्रेते, खरीदादार यांचे घोळके जमा होते. दुकाने हाऊसफुल भरलेले होते. कपडे आणि भांडाच्या दुकानात तर पाय ठेवायला पण जागा नव्हती.

सनी सई चा हात धरून तिला चालवत होता. तर निलू हे घेऊ की ते घेऊ या अविर्भावात तिची खरेदी करत होती. खरेदी करता करता सायंकाळ झाली. खूप सारी खरेदी झाली होती. आता सनीच्या हातात समानाने भरलेल्या पिशव्या पण होत्या. त्यात तो कसा तरी सईचा हात धरून तिला चालवत होता. दिवसभर चालून चालून आणि उभे राहून आता तिघेही थकले होते. कुठे तरी बसून चहा नास्ता करावा म्हणून ते समोरच्या एका हॉटेल मध्ये घुसले. चहा नास्ता आटोपला आता थोडे बरे वाटत होते.

ते हॉटेल च्या बाहेर निघाले तर समोर एका भांड्याच्या दुकानापुढे मिक्सर ग्राइंडर चा डेमो सुरू होता. तिघेही तो डेमो पाहण्यात व्यस्त झाले. तितक्यात निलुला काही तरी आठवले आणि ती भांड्याच्या दुकानात गेली. आता सनी आणि सई दोघेच तिथे उरले होते. बाजूला एक फुग्गेवाला फुग्गे विकत तिथे आला. सईचे लक्ष तिकडे गेले. आणि तिने बलून बलून करत आपला हात सनीच्या हातातून सोडवून घेत तिकडे धावली. सनीला ते कळलेच नाही. तो डेमो पाहण्यात अगदी मग्न झाला होता. निलू दुकानातून खरेदी करून परत सनी कडे आली. तर तिला सई दिसेना. म्हणून तिने सनीला सईबद्दल विचारले. सनी बाजूला सई नसल्याचे पाहून घाबरला. तो इकडे तिकडे तिला शोधायला लागला. पण सई तिथे कुठेच नव्हती. आता सनी आणि निलू दोघेही खूप घाबरले. त्यांच्या पायातले त्राणच निघून गेले. काय करावे , कुठे शोधावे काहीच कळत नव्हते. सनीने आपल्या हातातल्या पिशव्या निलूच्या हातात देऊन तो इकडे तिकडे सई सई करत पाळायला लागला. पण सई कुठेच दिसत नव्हती. तो लांब पर्यंत जाऊन परत आला. निलू तर सई सई करत रडायलाच लागली होती. कुणालाच काही कळत नव्हते.

परत सनी सईला शोधायला निघाला. गर्दीचे घोळके घोळके शोधू लागला. आता त्याला ती गर्दी नकोशी वाटायला लागली. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. काय करावे काहीच कळत नव्हते. त्याला खूप जोरजोराने सईला आवाज द्यावा वाटत होते. पण आता तोंडातून आवाज पण निघत नव्हता . त्याला खूप अपराधी पणा जाणवत होता. मनात अनेक विचार घोळ करत होते.

तेवढ्यात, तो राहत होता तिथलेच शेजारी त्याला तिथे दिसले. तो त्यांच्याकडे धावला. आणि त्यांचा हात धरून त्यांना सांगू लागला अहो सतिशराव सायली हरवली हो या बाजारात ती कुठेच दिसत नाही आहे. तेवढ्यात सतिशरावांची पत्नी कडेवर सईला घेऊन तिथे हजर झाली. सनीला काहीच कळत नव्हते. त्याने ओढून सईला आपल्या कडेवर घेतले. आणि रडायला लागला.

मग थोडे शांत होताच सतिशरावच सांगायला लागले. अरे सनी ही सई पुढच्या चौकात रडत रडत चालली होती. तिला बघून पोलिसांनी तिला जवळ घेतले. आम्ही नेमके त्याच वेळी तिथून जात होतो. तर सई दिसली. सकाळी तुम्ही खरेदीला इकडे आलात ते आम्हाला माहिती होते, आणि आमच्या लक्षात आले की ही इथे हरवली आहे. मग आम्ही पोलिसांना ही आमचीच मुलगी असल्याचे सांगून तिला जवळ घेतले. आता आम्ही तुम्हालाच शोधत होतो.

चला निलू कुठे आहे म्हणत, ते सारे निलू जवळ पोचले. सईला बघून निलुचे आता रडणे थांबले होते. तिला सई आणि माझ्या सोबत सतिशराव बघून थोडे आश्चर्य वाटले. तिने सईला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत म्हणाली, "अरे बिट्टू कुठे गेली होती बेटा ".

सतीश रावानी परत सई कशी मिळाली ते निलुला सांगितले. सतिशराव देव रूपानेच तिथे अवतरले होते. आणि सई परत मिळाली होती. सगळयांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसत होती. आज मोठा अनर्थ टळला होता. दिवाळीची गेलेली हौस आता चेहऱ्यावर साफ दिसत होती. सगळा गोंधळ त्या बलून साठी झाला होता.बलून मात्र दुरून सगळ्यांकडे बघून हसत होता.



Rate this content
Log in