Nilesh Bamne

Others Tragedy

3  

Nilesh Bamne

Others Tragedy

भ्रम ...

भ्रम ...

10 mins
1.6K


दुपारची वेळ होती . विजय आपल्या कार्यालयात संगणकावर काम करत असताना त्याचा मोबाईल खणखणला मोबाईलच्या स्क्रीनवर यामिनी हे नाव झळकत होते. यामिनी हे नाव वाचताच विजयच्या मनात एकाचवेळी अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याने एक दीर्घ श्वास घेऊन फोन उचलून कानाला लावला...

विजय :- हॅलो !

यामिनी :- हॅलो ! मी यामिनी बोलतेय !

विजय :- यामिनी तू ? तू कसा काय मला फोन केलास ??

यामिनी : - जरा बोलायचं होत.

विजय :- हा! बोल ना !! मी फ्री आहे !!!

यामिनी :- तुम्ही लग्न का करत नाही ?

विजय :- हे विचारायला तू मला फोन केलास ?

यामिनी :- हो ! हेच विचारायला फोन केलाय ! काही दिवसापूर्वी मी माझ्या एका लांबच्या बहिणीसाठी तुमचं स्थळ सुचवलं होत पण तुम्ही तर तिला न पाहताच नकार दिलात ! कारण काय तर ती कमी शिकली आहे.

विजय :- पहिली गोष्ट ती तुझी लांबची बहीण आहे हे मला माहीत नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं स्थळ सुचविण्यापूर्वी तू मला विचारलं नव्हतस !

यामिनी :- मला एक सांगा तुम्हाला खरचं तुमच्या योग्यतेची मुलगी मिळत नाही की तुम्हाला लग्नच करायचे नाही ?

विजय :- यामिनी तू मला किती वर्षे ओळखतेस ?

यामिनी :- दहा वर्षे !

विजय : - मला जन्म देणारे माझे आई- बाप पण मला अजून ओळखू शकले नाही तू काय ओळखणार ? तुझ्या त्या बहिणीला मी पाहायला गेलो असतो तरी आमचं लग्न जुळलं नसत कारण एक ती मांसाहारी आहे मी शाकाहारी, कारण दोन मी पर्मनंट कामाला नाही, कारण तीन माझं स्वतःच घर नाही म्हणजे मी माझ्या बाबाच्या घरात राहतो, कारण चार माझी उंची कमी आहे , कारण पाच मी खूप संस्कृती प्रिय व्यक्ती आहे, कारण सहा माझे विचार तिला पटलेच नसते, कारण सात मला समाजसेवेची आवड आहे, कारण आठ मला नोंदणी पद्धतीनेच विवाह करायचा आहे, कारण नऊ मी खूपच गबाल्यासारखा राहतो आणि सर्वात महत्वाचे तिची आणि माझी जन्मकुंडली लग्नासाठी जुळलीच नसती ...

यामिनी :- तुम्ही असाच विचार करत राहिलात तर या जन्मात तुमचं लग्न होणार नाही.

विजय :- मी कधी कोणालो म्हणालो आहे का ? मला लग्न करायचेच आहे ??

यामिनी :- हो ! हे खरं आहे लग्नाबाबतची उत्सुकता कधी तुमच्या चेहऱ्यावर दिसली नाही उलट दुसऱ्यांच्या लग्नाचे विषय ऐकतानाही तुमच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात. तुमच्यासमोर कोणाच्याही लग्नाचा विषय काढल्यावर तुम्ही इतके अस्वस्थ का होता ? हे मला कधी कळलेच नाही.

विजय :- हे सारे माहीत असतानाही तू मुलींना माझं स्थळ सुचवतेस ?

यामिनी :- नाही ! मी तुमच्यासाठी नाही स्वतःसाठी ते करते ! मला कोठेतरी वाटलं की मी तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही लग्न करत नाही. मी तुमच्या सोबत लग्न करू शकत नाही कारण मी एक सामान्य मुलगी आहे मला सामान्य मुलीसारखच जीवन जगायला आवडेल, मी,माझा नवरा, माझी मुलं, माझे कुटुंब, माझे नातेवाईक आणि माझ्या सभोवतालचा माझा गोतावळा ...यापलीकड मी विचारच करू शकत नाही. त्यात तुमच्या आणि माझ्या वयात असणार अंतर !

विजय :- तू मला आवडतेस हे तुझ्या लक्षात आले हे माझे नशीबच म्हणावे लागेल. आता तूच विषय काढला आहेस म्हणून संगतो हे खरं आहे की तू मला आवडतेस पण तू मला आवडणे हे मला इतर मुली ज्या कारणाने आवडतात त्या कारणाने नाही. मला कोठेतरी आतून वाटले कि तुझ्या माझ्यात एक वेगळंच नात आहे म्हणून मी तुझ्याकडे आकर्षित झालो होतो. माझ्या आयुष्यात आता कोणी स्त्री नाही, माझे लग्नाचे वय उलटून गेले आहे मला माझ्या आयुष्यात माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक स्त्री हवी आहे ती स्त्री मी तुझ्यात शोधतोय असं जर तुला वाटले असेल तर तो तुझा गैरसमज आहे. मला कोठेतरी वाटले की तुझेही माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्याकडे अधिक लक्ष देऊ लागलो पण तुझ्या मनात माझ्याबद्दल तसे काही भाव नाहीत हे कळल्यावर मात्र मी स्वतःला सावरले... मला तू हवी होतीस याचा अर्थ मला एक स्त्री हवी होती असा होत नाही.एका स्त्रीचे शरीर ही माझी गरज कधीच नव्हती , नाही आणि भविष्यातही असणार नाही.

यामिनी:- म्हणजे तुमच्या लग्न न करण्याला मी कारणीभूत नाही ?

विजय :- नाही ! अजिबात नाही...

यामिनी :- म्हणजे मी लग्न केले तरी तुम्हाला त्याचे वाईट वाटणार नाही, तुम्हाला दुःख होणार नाही ?

विजय :- मला दुःख का होईल ? तुझ्या नशिबात असणारी गोष्ट घडत असताना मी दु:खी व्हावेच का ?

माझ्या आयुष्यात आलेली तू काही पहिली मुलगी असणार नाहीस जिचे लग्न होणार आहे. तुझ्यात तरी काय वेगळे आहे तेच त्या पंचमहाभूतांनी बनलेले तेच शरीर ! तुझ्या शरीराला तुझ्या नकळत माझा स्पर्श झालेला आहे पण स्त्रियांचा सहवास मी खूप अनुभवला आहे फक्त तू माझ्या आयुष्यात आलीस आणि नशिबाचे फासे उलटे पडू लागले. पण तसे का झाले या प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय ?

यामिनी :- मी तुमच्या प्रेमकथा वाचल्या आहेत ? म्हणूनच मी तुमच्या प्रेमात पडले नाही कारण तुमच्या कथेतील प्रत्येक नायिका माझ्यापेक्षा दिसायला सुंदर होती, मादक होती, हुशार होती, तिचा आवाज गोड होता आणि ती श्रीमंतही होती. तुम्ही मला नेहमीच एखाद्या साधुसारखे दिसत राहिलात, एक वेळ मी तुमची दासी होऊन आयुष्यभर तुमची सेवा करू शकेन पण तुमच्याशी लग्न करून मी जगू शकेन का ? याबद्दल शंका वाटते.

विजय :- तू तुझ्या ज्या बहिणीशी मी लग्न करावं अशी अपेक्षा धरून होतीस ती कसं जगणार होती ?

यामिनी :- एक गोष्ट खरी सांगाल ? तुमच्या आयुष्यात इतक्या मुली आल्या मग एकीनेही तुमच्यासोबत लग्नाचा आग्रह का धरला नाही ?

विजय :- गेली कित्येक वर्षे मी या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे. तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी पर्यत माझे आयुष्य मजेत चालले होते. तुझी आणि माझी नजरा नजर झाली आणि माझे हिरवेगार जग वाळवंट झाले.

यामिनी :- काहीही काय ? तुमची आणि माझी पहिली भेट झाली तेव्हा मी बारा - तेरा वर्षाची होते. इतक्या वर्षात एकमेकांची साधी विचारपूस करण्याव्यतिरिक्त आपण एक शब्द बोललो नव्हतो कोणत्याच विषयावर आज पहिल्यांदा आपण इतकं जास्त बोलतोय !

विजय :- आपण बोललो असतो तर आपल्यातील नाते आज आहे तसे नसते. तू माझी शिष्य झाली असतीस आणि मी तुझा गुरु ! मी तुझ्याशी कधी फार बोललो नाही पण तू का बोलली नाहीस ?

यामिनी :- तुमच्या जवळ बोलायला मला कधी तसा कोणता विषयच सापडला नाही . आणि तुम्ही माझ्या प्रेमात आहात याची जाणीव मला हल्लीच एकदोन वर्षातच झाली जेव्हा मी माझ्या लग्नाचा विचार करू लागले. मला नेहमीच वाटायचे तुम्ही एक आदर्श पुरुष आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी व्हावेत अशी माझी इच्छा होती. माझी सुखाची व्याख्या लग्न, संसार, मुलं, घर, संपत्ती आणि प्रतिष्ठा याच्याशी संबंधीत आहे पण तुमची ती तशी नाही. ज्याकारणाने स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होतात ती कारणे तुम्ही नेहमी नाकारलीत.

विजय : - तुला आठवते का पहिल्यादा आपली भेट झाली तेव्हा माझ्यासोबत माझी एक मैत्रीण होती ?

यामिनी : - हो ! चांगलीच आठवते , सारखी तुमच्या मागेपुढे घुटमळत होती मांजरीसारखी ! ती दिसायलाही मादक होती सर्वाना वाटले होते की ती तुमची प्रेयसी आहे आणि लवकरच तुम्ही तिच्याशी लग्न कराल ?

विजय :- हो ! मी तिच्या प्रेमात होतो आणि माझी तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती पण नियतीला ते मान्य नव्हते मी फक्त पंधरा दिवसासाठी बाहेर गेलो आणि त्याकाळात तिचे लग्न ठरून ते झाले ही ! मला तिच्याजवळ माझे प्रेम व्यक्त करण्याची संधीच मिळाली नाही . पण तिच्याही अगोदर माझी एक मैत्रीण होती जिचे माझ्यावर जीवापाड प्रेम होते पण ती अशिक्षित असल्यामुळे मी तिच्याशी लग्न करण्याबाबत थोडा संभ्रमात होतो पण तू ज्या दिवशी मला पहिल्यादा पाहिले होतेस आपली प्रत्यक्ष ओळख होण्यापूर्वी त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्याही लग्नाची पत्रिका माझ्या हातात पडली होती त्यांनतर तू माझ्या आजूबाजूला अधून मधून वावरू लागलीस आणि माझ्या आयुष्यातील मी जिच्या जिच्याशी लग्न करण शक्य होतं त्या प्रत्येकीच मी तिच्याशी लग्न करण्याचा मनात निश्चय करता क्षणी तिच्या लग्नाची बातमी माझ्या कानावर आली. मी मुलींना घाबरतो त्यांच्याजवळ बोलत नाही वगैरे तुला वाटते स्वानुभवाने पण तसे नाही त्यांनंतरचे माझे सर्व प्रयत्न फसले. तू माझ्या आजूबाजूला अल्लड मुलीसारखी वावरत होतीस पण तुझ्याबद्दल माझ्या मनात दोन वर्षांपूर्वी पर्यत काहीच भावना नव्हत्या मग या भावना अचानक का निर्माण झाल्या हे मलाही न उलगडलेले कोडे आहे. तुझे लग्न झाले असते तर हे काही घडले नसते कदाचित पण तू ही कोणाच्या प्रेमात पडली नाहीस ? पण माझे प्रेमात पडणे थांबले नव्हते आजही थांबले नाही आजही मला बऱ्याच सुंदर तरुणी आकर्षित करतात माझ्या कथा वाचून अनेक गोड तरुणी मला फोन करतात पण त्यांच्याशी अधिक जवळीक वाढवावी असे मला मनातून नाही वाटत. तू माझ्याशीच लग्न करावे हा माझा आग्रह कधीच नव्हता कारण मुळात मला कोणावर ओझं होण आवडत नाही. तू तुझ्या आयुष्यात सुखी व्हावीस हीच माझी इच्छा आहे. माझं प्रेम मी तुझ्यावरच काय कोणावरही कधीच लादणार नाही. माझ्या आयुष्यात कोणत्याही स्त्रीचे महत्व फारच कमी असेल कारण माझ्याकडे स्वतःसाठीही वेळ नाही तिला कोठून देणार ?

यामिनी :- आता यापुढे कोणी तुमच्या प्रेमात पडेल असे नाही वाटत! त्यामुळे तुम्हाला तडजोड करावीच लागेल ! कोणी तुमच्याशी जे पाहून विवाह करावा असे तुमच्याकडे सध्या काहीच नाही, तुमच्याकडे एकमेव गोष्ट होती ती म्हणजे तुमचा सुंदर आणि मादक चेहरा जो आता विद्रुप झाला आहे. मला जर कधी मोह वाटला असेल तर तो तुमच्या चेहऱ्याचा होता .

विजय :- मी ज्या दिवशी तुझ्या प्रेमात पडलो त्या दिवसापासून माझा चेहरा विद्रुप व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळेच मी दुसऱ्या कोणत्याच मुलीला माझ्या प्रेमात पाडू शकलो नाही. मी विद्रुप होण्याला तू कारणीभूत आहेस तुझी माझ्यावर पडलेली नजर कारणीभूत आहे. मला वाटत मी तुझा होणार नाही याची तुला खात्री होती पण मी दुसऱ्या कोणाचा होऊ नये ही तुझीच सुप्त इच्छा नव्हती ना ? मला नेहमीच वाटत आलं की कोणतीतरी अदृश्य शक्ती मला नियंत्रित करते आहे. मी सर्वगुण संपन्न, करोडपती लोकांशी माझी मैत्री, विद्वान मंडळी माझे चाहते असतानाही मला काही गोष्टीत यश मिळत नाही कारण ते मिळाले तर पुन्हा माझ्या आयुष्यातील वाळवंटाचे हिरवळीत रूपांतर होईल. माझी प्रगती तू तर अडवून धरली नाहीस ना असा प्रश्न पडतो कधी-

कधी मला .

यामिनी :- काहीही ! हा भ्रम आहे तुमचा, असं काही नसत ! स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष उगाच मला देऊ नका ! अजूनही वेळ गेलेली नाही सावरा स्वतःला आणि योग्य जोडीदार शोधून लग्न करून मोकळे व्हा !

विजय :- तू माझी काळजी करू नकोस ! तू लग्न करून मोकळी हो ! सुखी हो !! आनंदी रहा !!! माझी तुझ्या बाबतीत कोणतीच तक्रार नाही .

यामिनी :- हे सारं इतकं सोप्प असत तर मी तुम्हाला फोन केला असता का ? खरं सांगा तुम्हाला असं काही गुपित माहीत आहे का जे मला माहीत नाही ?

विजय :- एक सांगतो मनापासून मी तुझ्यासारख्या सामान्य असणाऱ्या सामान्य दिसणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडण्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. पण कोणतीतरी अज्ञात शक्ती आहे जी मला नियंत्रित करते आहे माझ्या पायात बेड्या घालते आहे. ज्या मुलीशी माझा विवाह होण्याची शक्यता निर्माण होते त्या मुलीच ताबडतोब विवाह ठरतो , तुझ्या बहिणीचाही ठरला असेल ?

यामिनी : - हो आता काही तासापूर्वीच तिने तिचा विवाह ठरल्याची बातमी दिली. फारच अकल्पित आणि अविश्वसनीय आहे हे सारे. मग आता माझाही विवाह ठरेल कारण माझ्या मनातही तुमच्याशी लग्न करण्याचा विचार येऊ लागला आहे...

विजय :- तसे झाले तर कदाचित माझे जग बदलेल, माझे सौंदर्य मला परत मिळेल, माझ्या यशाचे मार्ग मोकळे होतील, पण हे इतके सोप्पे होणे नियतीच्या मनात नसावे बहुतेक ! नियती कोणता खेळ खेळतेय देव जाणे पण हा खेळ माझ्यासाठी जीवघेणा होता. तू तर हल्ली तो खेळायला लागली आहेस तुझ्यापुढे काय वाढून ठेवले आहे ते त्या नियतीलाच ठाऊक ! कदाचित भविष्यात तुझ्या आयुष्यात तुलाही अप्रिय वाटणाऱ्या घटना घडतील...

यामिनी :- आता मलाही काही कोडी उलगडू लागली आहेत माझ्या बाबतीत घडणाऱ्या घटनांची ! आपण एकमेकांच्या प्रेमात पडणं नव्हे पण एकत्र येण ही नक्कीच एक सामान्य घटना नाही. तिची योजना फार पूर्वीच झालेली आहे कदाचित आपल्या जन्मापूर्वी !

विजय :- गेली कित्येक महिने मी या सर्व घटनांचा अभ्यास करतो आहे . पण एक कोड उलगडत न उलगडत तोवर दुसर कोड समोर उभ राहत. नियतीला नक्की काय हवंय तुझं माझं एकत्र येणं की आणखी काही ? काही कळत नाही ! आपल्या मनात नसतानाही नियती आपल्या एकत्र का आणू पाहतेय हे कोड लवकरात लवकर उलगडायलाच हवं !

यामिनी :- आता मी हे कोडे सोडविण्याचा प्रयत्न करणार नाही तर नियतीला सामोरं जाणार आहे तुम्ही ही जा ! नियतीने जर खरोखरच आपल्याला एक होण्यासाठी समोरासमोर उभं केलंच तर मी त्याचा आनंदाने स्वीकार करेन...

विजय : - मला ही तुझं माझ्या आयुष्यात येण नक्की का होत ते समजून घ्यायचे आहे !

यामिनी :- मलाही ! चला मी आता फोन ठेवते

मोबाईल कानापासून वेगळा होताच विजयने एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वतःशीच म्हणाला, " तुला कसं सांगू तुझ्यामुळेच तुझ्या हट्टापाईच मला पुन्हा जन्म घ्यावा लागला, तुझा ही पुनर्जन्म झाला आहे या जन्मात तुझे आणि माझे मिलन व्हावे म्हणून नियती एक खेळ खेळत आहे. मी पहिल्यादा तुला पाहिले तेव्हाच माझ्या मनात तुझ्या प्रेमात पडण्याचा नाही तर लग्नाचा विचार आला होता अनायास माझ्या सोबत माझी प्रेयसी असतानाही ! त्यांनतर ती अचानक दुरावली माझ्यापासून मी सर्वगुण संपन्न असतानाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या एकीचीही माझ्याशी लग्न करणार का म्हणून विचारण्याची हिंमत झाली नाही, जेव्हा जेव्हा मी मनापासून लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तेव्हा मला आर्थिक नुकसान झाले माझ्याकडे धनसंचय झालाच नाही , त्यांनतर माझा चेहरा नव्हे तर माझ्या शरीरावरील त्वचा एका आजाराने ग्रासली गेली आणि माझ्या मनात लग्न न करण्याचा विचार पक्का होत गेला. माझ्याशी लग्न करण्याचा विचार जोपर्यत तुझ्या मनात पक्का होत नाही तोपर्यत आता तुला काय काय भोगावे लागेल ते नियतीच जाणे ! माझे जगणे आता सोप्पे झाले आहे कारण माझा विवाह झाला तर तो तुझ्याशी होईल अथवा कदाचित होणारच नाही . तुझे लग्न दुसऱ्या कोणाशी झालेच तर मात्र भविष्यात घडणाऱ्या घटना अकल्पित असतील... मी कधीच या गोष्टीच्या पलीकडे गेलो असल्यामुळे आता मी स्थिर आहे पण कदाचित यापुढे तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना तुझ्यासाठी अप्रिय असतील. तू जे शरीर कवटाळून बसली आहेस त्याचा मोह मला कधीच नव्हता . पण दुर्दैवाने नियती मला माझा खेळ खेळून देत नाही. जो तिने यामिनीला खेळू दिला आहे. हा मी जो काही विचार करतोय तो जर माझा भ्रम असेल तर ?


Rate this content
Log in