STORYMIRROR

Anil Patil

Others

3  

Anil Patil

Others

"आयुष्यातले कप्पे...!"

"आयुष्यातले कप्पे...!"

2 mins
176

दोन मोठे मुख्य कप्पे असतात आयुष्यात. कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा. कामाच्या कप्प्यात ऑफिस, करियर, सहकारी, कॉम्पिटीशन असं काय काय असतं. तर कुटुंबाच्या कप्प्यात आपला जोडीदार, मुलंबाळं, आई-वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, घरदार, गाड्या-घोडे वगैरे असतं...!

जगण्यासाठी दोन्ही कप्पे महत्वाचे. कामाच्या कप्प्यातून पैसा, यश, प्रसिद्धी आणि समाधान मिळतं. कुटुंबाच्या कप्प्यातून प्रेम, स्थैर्य, आधार आणि आनंद मिळतो. 

एका कप्प्यात जे मिळतं त्यामुळे दुसऱ्या कप्प्यात जगता येतं. यातला कामाचा कप्पा हा आपल्याला अजिबात न आवडणारा कप्पा. इथे कष्ट असतात, नियम असतात, भीषण स्पर्धा असते, करत असलेल्या कामाचं कोणाला कौतुक नसतं, आपल्या लायकीपेक्षा आणि कष्टांच्या मानानं खूप कमी मोबदला आपल्याला मिळत असतो, म्हणजे हे सगळं असं असतंच असं नाही. पण हे असं आहे असं आपल्याला सतत वाटत असतं...!

कुटुंबाचा कप्पा तसा आपल्याला आवडतो. पण त्यातही डोक्याला शॉट्स असतात! पार्टनरशी भांडणं होत असतात. मुलं ऐकत नसतात. आई-वडील हट्टी बनत जात असतात. नातेवाईक तऱ्हेवाईकपणा करत असतात. मित्र झगडत असतात. एक ना अनेक भानगडी असतात याही कप्प्यात,

म्हणजे हे सगळं असं असतंच असं नाही. पण हे असं आहे असं आपल्याला सतत वाटत असतं...! 

म्हणून ना एक तिसरा कप्पाही असावा आयुष्यात आपला स्वतःचा, स्वतःसाठीचा कप्पा! पहिल्या दोन कप्प्यांमधून उद्वेगानं बाहेर पडावंसं वाटलं किंवा हे कप्पे अफाट बोअर झाले तर या तिसऱ्या, स्वतःच्या, कप्प्यात शिरता यायची सोय करून ठेवायला हवी. 

या कप्प्यात काहीही किरकोळ, फुटकळ गोष्टी आपल्या आवडीनं जमा करून ठेवाव्यात. आपल्या निरागस लहानपणीचा एखादा निरागस छंद. उधाणलेल्या तारुण्यातला एखादी अफलातून पॅशन. स्वप्नाळू हृदयानी बघितलेली छोटी छोटी स्वप्नं. आवडीचे कपडे, आवडीचे पदार्थ किंवा निवांत झोप. काहीही... या कप्प्यात काय ठेवावं याला काही नियम नाहीत, काही मर्यादाही नाहीत.

आणि जेंव्हा इच्छा होईल तेंव्हा या तिसऱ्या कप्प्यात जाऊन जगता यायला हवं. तशी स्वतःला आणि इतर दोन कप्प्यांना सवय लावता यायला हवी. मग पहिल्या दोन्ही कप्प्यांचा जाच होत नाही आणि त्यांच्यातही आनंदानं जगता येतं.

आणि असंही होतं की हा तिसरा, स्वतःचा, स्वतःसाठीचा कप्पा करून जगणं जमायला लागलं की कधीतरी पहिले दोन कप्पे आपसूकपणे या तिसऱ्या कप्प्यात सामावले जातात. 

हे होणं, हे जमणं, हा खरा योग, हा खरा मोक्ष...!


Rate this content
Log in