तू अथांग सागर
तू अथांग सागर


आज मज भासशी तू त्या अथांग सागरापरी
पसरलास जेथवरी माझी दृष्टी जाईल तेथवरी...
प्रेम आपुले जसे तू लाट अन् मी किनारा
तू येण्याची वाट बघत उभी घेऊन आठवणींचा सहारा...
माहित आहे मला ओढ आहे तुला माझ्या प्रेमाची
म्हणूनच तर डोळे पाहती वाट तुझ्या येण्याची...
तसा तू मनाच्या किनाऱ्यावर सदैव येशी बनून लाट
मग साठवण्या तव मिटले डोळे तर दाटे अंधार दाट...
डोळे उघडताच दिसते ती लाट गेली निघून दूर
परतून येण्या माझ्या भेटीला घेऊन नवा सूर...
तू मला मारलेल्या हाकेची खूण पटते लाटेच्या गाजेतून
आणि त्या हाकेची साद उमटते सख्या माझ्या लाजेतून...
मिटले डोळे, शांत मन, असे मनी फक्त तुझा वावर
माझ्याशी तू बोलशी मग बनूनी हा अथांग सागर...
सागर रुपी तुझ्याशी मग चाले हितगुज तास अन् तास
मग वाटे या शांत किनाऱ्यावर फक्त आहे तुझाच वास...