शब्दांचा विग्रह
शब्दांचा विग्रह
अपशब्द बोलू नये
कधी रागाच्या भरात,
आजीवन तिच जखम
सलत राहते उरात !
चालती आहे म्हणून
वाटेल तसे बोलू नये,
दुसऱ्यांचा कमीपणा
शब्दांमध्ये तोलू नये !
दोन शब्द आपुलकीचे
प्रेम निर्माण करते,
द्वेषालाही वाईट शब्द
नेहमी कारणीभुत ठरते !
कोणास काय बोलतो
याचे असावे भान,
खात्री होण्यापुर्वी उगाच
करू नये अपमान !
हाच अपमान वारंवार
मनात राहतो रूजत,
प्रेम निर्माण होत नाही
घोंगडे राहते भिजत !
आपले पारडे जड आहे
म्हणून फायदा घेवू नये,
निसर्ग सर्व बघून घेतो
हाती कायदा घेवू नये !
शस्रांचे मोठे घाव
कधी तरी भरतात,
शब्दांच्या जखमा मात्र
तशाच कायम उरतात !
नम्रपणा घेण्यामध्ये
काय आहे लहानपणा,
चुकांशिवाय व्यक्ती नाही
यातच आहे शहाणपणा !
कोणी उत्तर देत नाही
म्हणून नसतो अपराधी,
वाईट शब्द बोलू नये
चुक सिध्द होण्याआधी !
तोलून, मापून शब्दांचा
करावा जपून विग्रह,
तोच आपल्या आयुष्याचा
एकमेव आहे संग्रह !
