शब्दाक्षरे
शब्दाक्षरे
शब्द आणि अक्षरांची जमली होती मैफल
कोण उचलेल धनुष्य आणि कोण होईल सफल
शब्दांच्या या प्रश्नाने चकित झाली अक्षरे
सफल आणि धनुष्य आता हे नवीन काय बरे
शब्द म्हणाले अक्षरांनो धीर थोडा धरा
करावे म्हणतो मी आता व्याकरण दुरुस्त जरा
काना आणि मात्रा जागा बदलून बसले
अनुस्वाराचे ढगुळे पाहून फिदीफिदी हसले.
चिडलेल्या अनुस्वाराने केली बाबा कट्टी
आणि इथेच चूक झाली सर्वात मोठ्ठी.
अनुस्वार आता अक्षरांवर रुसला
चिंटूचा निबंध म्हणूनच फसला.
वेलांटीची वेगळीच होती कथा
चिंटू पुढे होती फोडत माथा.
माझी कंबर मोडली रे चिंटू गधड्या
दुखतय खूप म्हणून आराम करते घेऊन गोधड्या.
उकार तर चिंटूच्या पेनमध्येच फसलाय
एकदा इकडे एकदा तिकडे उड्या मारत बसलाय.
स्वल्पविराम, पूर्णविराम आणि अवतरण
बिचारे कसा करतात अन्याय सहन.
म्हणून मीच ठरवले करायची दुरुस्ती
एकत्र मिळून घालू दंगा मस्ती .
