पाऊस पडून गेल्यावर...
पाऊस पडून गेल्यावर...


पाऊस पडून गेल्यावर.........
तुझी चाहूल लागते, झाडाखाली रुसून बसलेलं माझं मन मग, आणखीनच फुगून बसतं,
तुझ्या चेहऱ्यावर पडलेल्या, टपोऱ्या थेंबांना त्याला, स्पर्शायचं असतं,
पण, गालावरच्या माझ्या लाल रागाकडं पाहून ते तिथेच थांबतं
पाऊस पडून गेल्यावर.........
एक नवा गारवा फुललेला असतो, पक्षी पंखावरचे चिंब पाणी फडफडतात,
माझं मनही मग एक कटाक्ष तुझ्यावर टाकते,
पण, माझ्या चिंब शरीराकडं पाहून, माझं मन हसत मात्र नाही
पाऊस पडून गेल्यावर.........
इंद्रधनू आकाशात सजतं, आकाश पण खुश होऊन, त्याचे रंग फुलवतं,
हळुवार पावले टाकत, तू माझ्यासमोर कान पकडून हसतोस,
मी आणि माझं मन मात्र एकदम तटस्थ असतं
पाऊस पडून गेल्यावर.........
सूर्य पण हात पसरवतो, फुले पण मग ओलीचिंब असूनही, फुलापाखरांना साद देतात,
तुझ्या हसऱ्या ओलसर, चेहऱ्याकडे पाहून मग, माझाही राग वितळून जातो
पाऊस पडून गेल्यावर.........
रुसलेलं माझं मन,
पावसानंतरच्या गारव्यात, विलीन होऊन जातं