पाऊस... पाऊस
पाऊस... पाऊस
आला पाऊस पाऊस, खेळ मांडला झडीचा
थेंब थेंब नाचताना, घुमे पारवा गढीचा...
रानपाखराच्या पंखी, आले आभाळाचे रंग
रान पेरल्या सरीत, कसा नाचतो श्रीरंग...
येतो नाचत पाऊस, चाले पालखी आभाळ
झाडं मृदंग वाजती, माती वाजविते टाळ...
चिंब भिजतो पाऊस, तिच्या मनाला न्हाऊन
येतो जांभूळ बनात, थेंब टपोरा होऊन...
ओल्या हाताने सोडीतो, तिच्या अंबाड्याची गाठ
रानोरानीचा पाऊस, त्याची ओढाळच वाट..
आला पाऊस पाऊस, आला मनाच्या अंगणी
चिंब भिजूनच गेलो, झाला जीव आबादाणी...