ओळख
ओळख
1 min
181
सगळं संपलं वाटलं तरीही
श्वास सोबतीला असणार आहे
अंधार आज दाटला तरीही
उद्या सूर्य हसणार आहे
थंड हातांमध्ये आता
वाहू दे गरम रक्त
शरीराने मान टाकली तरी
मन होऊ देऊ नकोस पोक्त
सुकलेल्या चेहऱ्यावर पडू दे
आशेचा चिंब पाऊस
निराशेच्या ढगांकडे आता
पुन्हा नको पाहूस
डोळ्यांच्या डोहात साचू दे
आनंदाचे अवखळ पाणी
ओलसर किनाऱ्यावर फुलू दे
नवीन स्वप्नांची गाणी
तिथे सापडतील रंगीबेरंगी
शंख अन् शिंपले
मागे कधी होते जे
वेचायचे राहीले
बेधुंदपणे ते आकाशात उडवून
मग अनवाणी चालत राहशील
किनाऱ्यवरील लाटाही मग
जुन्या पाऊलखुणा पुसतील
ओंजळीत पाणी घेऊन
नीट निरखून बघशील जेव्हा
स्वतःच्याच प्रतिबिंबात स्वतःला
नव्याने सापडशील तेव्हा
