STORYMIRROR

sunil sawant

Others

3  

sunil sawant

Others

निवडणुक

निवडणुक

1 min
212

एक बकरी आणि कोकरू चरत होते एका शेतात

चरत चरत वाट चुकून शिरले एका रानात

सुर्य मावळला आणि काळोखाचं राज्य सुरू झालं

प्राणभयाने दोघांच्याही काळजाचं पाणी पाणी झालं


ओरडून ओरडून दोघांच्याही कोरड पडली घशाला

काय करावे काही सुचेना जावे कुठंच्या दिशेला

त्याचवेळी अंधारात दोन लाल ठिपके चकाकले

संकटाच्या जाणीवेने बकरी आणि कोकरू शहारले


डोळे ताणले बकरीने, संकटाचा घेण्या अंदाज

त्याचक्षणी जंगलात घुमला डरकाळीचा आवाज

खुनशी डोळे वाघोबाचे पुढे पुढे सरकू लागले

जीवाच्या भितीने ती दोघं जागच्या जागी थिजले


वाघाने उगारला पंजा घास कोकराचा मटकावया

धीर एकवटून धावले, कोकरू पडले वाघाच्या पाया

भीक मागू लागले दयेची आणून डोळयांत पाणी

"जाऊ द्या आम्हांला घरी, नाही फिरकणार पुन्हा कोणी"


काय झालं कळलं नाही अचानक वाघाने केले स्मित

'शतायुषी भव' आशीर्वाद देऊन शिरला तो वनराईत

वाघाच्या अशा वागण्याने कोकरू गोंधळून गेलं

"वाघ असा का वागला?" बकरीला विचारू लागलं


तीही धक्क्यातून सावरत होती, विचारचक्रं सुरू झाली

मग काहीतरी आठवून हसत ती कोकराला म्हणाली

"तोंडचा घास सोडून वाघ देतो अभय उंचावून हात

एकच अर्थ याचा, होणार निवडणुका या जंगलात."


Rate this content
Log in