मृत्युंजय कर्ण
मृत्युंजय कर्ण


तेजस्वी कुळात जन्मलेला "सूर्यपुत्र"...
हिणवला गेला म्हणौनि "सूतपुत्र"...
जन्मतःच मातेने केले जलस्वाधीन...
गंगामाईने केले अधिरथाच्या आधीन....
ऋण जिचे फिटायचे नाहीत जन्मात साता....
निर्भेळ करणारी लाभली राधामाता.....
अंगावर कवच अभेद्य... कानात तळपती कुंडले....
अपमानित जीवनाभोवती त्याच्या अवहेलने ची मंडले....
दुर्योधन सखा म्हणुनी लाभला...
सूतपुत्राचा अंगराज जाहला....
पत्नी होऊन आयुष्यात प्रवेशली वृशाली....
वाळवंटी त्याच्या जीवनात कारंजी फुलवली.....
त्रुतीय भाग्यशाली पत्नी सुप्रिया.....
प्रथम प्राणप्रिय ती धनुर्विद्या....
द्रौपदीकडून विटंबना....द्रोणाचार्यांकडून उपमर्द.....
कुरुंनाही लाजवेल अशी गाजवली कारकीर्द.....
कानातील प्रकाश वलयांकित कुंडले भासती सूर्यचंद्र....
दानशूरता पाहून त्याची वरमला साक्षात देवेंद्र......
ब्रम्हास्त्रप्राप्ती मध्ये झाला मंत्रमुग्ध....
असत्य बोलण्याने परशुरामां कडून झाला शापदग्ध.....
एका शापाने ब्रम्हास्त्र हिरावले... दुजाने रथचक्र धरणीत रूतवले.....
तरीही दैदिप्यमान पराक्रमापुढे त्याने साक्षात मृत्युलाही झुकवले....
कुंतीमातेला दिले पाच पुत्रांचे अभयदान....
लढला कौरवबाजूने नाकारून ज्येष्ठ पांडवाचा मान.....
जीवनात त्याच्या संभ्रम कि संभ्रम हेच जीवन त्याचे....
अखेरपर्यंत नाही उलगडले कोडे हे त्यालाच त्याचे....
महाबाहो भिष्मांनी दिला" महारथ्यांचा महारथी" बहुमान...,.
शेवटच्या घटकेलाही केले अखेरचे दान.....
श्रीकृष्णाचे स्पर्शून चरण.....
समाधानाने कवटाळले कुरुक्षेत्रावर मरण.....
पांडव वृक्षाचा गळून गेला सुवर्णपर्ण....
त्याचेच नाव "मृत्युंजय कर्ण"
त्याचेच नाव "मृत्युंजय कर्ण"