STORYMIRROR

Nisha Thore

Others

4  

Nisha Thore

Others

मी एक स्त्री

मी एक स्त्री

1 min
587

गर्भातली कळी मी रोज 

आई ऐकवायची रामायण, गीता

तिथेच उमगत गेली मज

सत्यवती द्रौपदी सीता


त्याग अन सोसणं हेच 

असतं ब्रीद स्त्री जाती

गर्भारपणातच शिकवते आई

कला जपायची नाती


कामना वंशाच्या दिव्याची 

आजी देवाला नवस बोललेली..

आली पणती मिणमिणत कशी 

म्हणत मनात हिरमुसलेली..


बालपणीची भातुकली माझी

आईसोबत रंगायची

रांधा...! वाढा...! उष्टी काढा...! 

मी तिथेच गिरवायची.. 


दादा कायम मित्रांसोबत 

रात्रीचाही होऊन वात

मलाच का मग होता कायदा

घरात यावे सातच्या आत


आहे लेक मी म्हणून नेहमी

बाबांचं ऐकायची..

बहीण म्हणून सदा मी

दादाच्या धाकात राहायची..


डॉक्टर इंजिनिअर होण्याचं

स्वप्नं फक्त दादाने पहायचं..

परक्याच धन म्हणून मी

 बी.ए. बी. कॉम व्हायचं..


सप्तपदीचे फेरे घेत सासरी

माहेर सोडून यायचं..

पत्नी म्हणून मग कायम

नवऱ्याचंच ऐकायचं..


आई म्हणून नेहमी 

मुलांसाठी झटत राहायच..

सासू सासऱ्यांची सेवा

करताना कमी नाही पडायचं..


काळ्याभोर केसांत हळूच

मग रुपेरी कडेने डोकवायचं..

तृप्त नजरेने अलवार कसं 

मुलांच्या संसारात रमून जायचं..


सासूच्या भूमिकेत शिरताना

सुनेला सांभाळून घ्यायचं..

चिऊ काऊ चा घास भरवत

नातवंडांना अलगद जपायचं..


प्रवास माझा हा असा

मी पासून माझ्यापर्यंतचा..

जीवनसंध्यासमयी तो 

असाच संपून जायचा..


एकच आशा कधी असावे

माझ्याही लोचनी स्वप्न नवे

प्रवास संपण्याआधी पूर्णत्व लाभावे

माझ्याही कर्तृत्वाचे कधी दीप उजळावे


Rate this content
Log in