माय बाप सरकार
माय बाप सरकार


माय बाप सरकार
सांग करून ईच्चार,
कुना कुना म्होरं मांडू
कुना कुनाची तकरार.
आला सुगीचा महिना
जीव हारखून गेला,
घामाच्या थेंबावानी
दाना टरारून आला.
पिकं आलं कापनीला
आन घात कि रं झाला,
रातीचाच मेघराजा
डोळं भरून रडला.
दोन सालं झालं तरी
पैका नाही पडला हाती,
आन व्याजावारी माझी
आख्खी गेली की रं शेती.
आता आलया पॅकेज
कर्ज झाली समदी माफ,
बाप कूटनं जित्ता करू
ज्येनं घेतला रं फास.
काय सांगू माझी व्येथा
त्येची निराळीच कथा,
कुनी बसलं लिव्हाया
तर व्हईल त्येची बी एक गाथा.
जवा बाप माझा मेला
तवा ईच
्चर ह्यो आला,
दोन दिस तरी
घास लेकरांच्या पोटा.
लेकरी ती माझी
हायती लई व गुनाची,
कोरं भरातला तुकडा
करत्यात वाटनी बापाची.
त्येंची खपाटीची पोटं
बघून व्हती घालमेल,
आनि उमगत मग
कशापाय म्हाताऱ्यानं इस्कुटलं त्येचं रान.
आता जमीनबी नाई
आन पैसा बी नाई,
आरं पैसा तर सोड
खायाला माती उरली नाई.
आता तूच रं सांग राजा
दोस त्यो काय माझा,
कुणब्याच्या पोटचा गोळा
हि त्येचीच काय रं सजा?
तुला तरी काय बोलू
जवा देवचं कोपला,
तुझ्या राज्यातून राजा
आता शेतकरी रं संपला.
तुझ्या राज्यातून राजा
आता शेतकरी रं संपला.