कुंडली...
कुंडली...
मी लहान असताना फारच विज्ञानवादी होतो कारण खूप हुशार होतो . सर्वगुण संपन्न होतो . मला वाटत होत मी माझ्या बुद्धीच्या जोरावर जग जिंकेन ! पण तस काहीच झालं नाही. परिस्थितीने मला प्रत्येकवेळी नतमस्तक व्हायला लावलं तरी मी लढत राहिलो . माझ्या विचारांशी तडजोड केली नाही. मला माझं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं .नवीन काही शिकता आलं नाही. अंगात सर्वगुण असताना आणि बाजारात त्या गुणांना किंमत असतानाही मला माझ्या गुणांची किंमत कधीच मिळाली नाही . मी भौतिक जगात यशस्वी का झालो नाही म्हणजे माझ्याकडे घर गाडी आणि संपत्ती का जमा झाली नाही ? मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत संन्याशी नसताना सन्याश्याच जीवन का जगतोय ? माझ्या आयुष्यात डझनभर मुली आल्या असताना त्यातील एकीनेही मला माझ्याशी लग्न करतोस का ? म्हणून मला का विचारले नाही ? चित्रकार होण्याचे माझे स्वप्न असताना मी लेखक का झालो ? जिच्यावर माझं प्रेम होत तिच्याच सोबत लग्न करण्याची स्वतःहून चालत आलेली संधी मी का कोणासाठी नाकारली ? मी पैशाच्या मागे का धावलो नाही ? माझा विश्वासघात करणाऱ्या लोकांना मी माफ का नाही करत ? माझ्या समोर कोणाचाही चढलेला आवाज मला सहन का होत नाही. लोक माझ्याशी बोलायला का घाबरतात? मी कमालीचा विनोदी खेळकर आणि संवेदनशील असताना लोक मला जमदग्नी का समजतात ?
मी फुकट केलेल्या कामाला जगात प्रचंड किंमत आहे त्याचे कौतुकही फार होते लोक मला मानसन्मान देतात पण भौतिक जगात ज्यामुळे माणसाची किंमत आज ठरविली जाते तो पैसा काही केल्या माझ्याकडे का टिकत नाही ? मला माणसांचे डोळे वाचता येतात त्यांचे भविष्य स्पष्ट दिसते मी तर्काचा पलीकडे जाऊन विचार करतो. माझ्या वाकड्यात जाणारा आजपर्यंत कोणी सरळ राहिलेला नाही . ज्याने ज्याने माझी किंमत लावली त्याला मी त्याची किंमत दाखवलीच ! मी जोपर्यत स्वतःची ओळख सांगत नाही तोपर्यत मला ओळखणे कोणालाच शक्य होत नाही. मी ज्याच्या सोबत असतो तो कधीच अयशस्वी होत नाही. क्षणात अचूक निर्णय घेण्याची माझी क्षमता लोकांना तोंडात बोट घालायला लावते. आज मोठ मोठे विचारवंत माझे विचार समजून घेत असताना माझा बाप मला गाढव का म्हणतो ? हे असं का होत ? मी संसारात का रमत नाही ? जेव्हा रमण्याचा विचार करतो तेव्हा माझ्यावर संकट का येत? माझा जन्म नक्की कोणत्या कार्याच्या पूर्ततेसाठी झाला आहे ? माझ्या आयुष्यात स्त्रिया महत्वाची भूमिका बजावतात पण त्या माझ्या आयुष्याचा भाग का होऊ शकत नाही ? माझ्याकडे काही अलौकिक शक्ती आहेत ज्या जागृत होण्याची वेळ आता जवळ आली आहे असे मला आतून जाणवतंय ! माझ्या कधीही मनात नसणाऱ्या गोष्टी माझ्या मनात येता आहेत. आता जग मला कोणत्याच बंधनात गुंतवून नाही ठेऊ शकणार ? मला मुक्त व्हावस वाटतय ! भौतिक जगातील सारे हिशेब पूर्ण करण्याची मला घाई झाली आहे. माझ्या आयुष्यात यापुढे घटणाऱ्या घटना असाधारण असणार आहेत असे संकेत मला मिळता आहेत. माझे भविष्य मला स्पष्ट दिसत आहे माझा प्रवास येत्या काही दिवसात महान व्यक्ती होण्याच्या दिशेने सुरु होणार आहे ...असे विचित्र विचार माझ्या मनात येत होते पण त्याला कारणही तसेच आहे . काही वर्षापूर्वी एक जगप्रसिद्ध ज्योतिषी महिलेला मी माझी पत्रिका पहायला सांगितले होते . तिने माझी पत्रिका पाहिली आणि काही दिवसांनंतर तिने केलेले भाकीत वाचून मी सुन्न झालो . तिने म्हटले होते तुझा विवाहच होणार नाही आणि झाला तरी तो टिकणार नाही. तेव्हा मी सहज उत्सुकता म्हणून तिला पत्रिका पाहायला सांगितले होते पण तेव्हा मी तसे नको करायला हवे होते असे मला आता वाटत आहे. तेव्हा माझ्या आयुष्यात काही तरुणी होत्या म्हणजे त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या . माझ्या मनात विचार होता लग्न करायचंच झालं तर त्यांच्यापैकी कोणा एकीशी करू पण पुढे परिस्थिती अशी बदलत गेली कि मला लग्नाचा विचारच पुढे ढकलावा लागला. माझ्या सर्व मैत्रिणींची लग्ने झाल्यावर माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व स्त्रिया या सामान्य सर्वसाधारण अशा होत्या, तरीही स्त्रियांचे माझ्या प्रेमात पडण्याचे थांबले नव्हते, पुढे पुढे माझ्या मनात आपण अविवाहित राहून समाजकार्य करावे हा विचार अधिक प्रबळ होत गेला. पण माझे आई - बाबा माझ्या लग्नासाठी उद्योग करत राहील्यामुळे माझे मन माझ्या मनात नसणाऱ्या स्रीसोबत लग्न करण्याच्या फक्त कल्पनेने अस्वस्थ होत राहिले, ज्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम नाही अशा व्यक्तीसोबत लग्न करण्याची मला कल्पनाच करवत नव्हती. फक्त पत्रिका जुळली म्हणून मन जुळत नाहीत. मुळात पत्रिकेतील गुण जुळवून लग्न करणे फारच घातक आहे पत्रिकेचा सखोल अभ्यास करून लग्ने जुळायला हवी ! कोणतेच ग्रह कोणत्याच शांतीने शांत होत नसावेत बहुदा ! डुबत्याला काडीचा आधार असा तो प्रकार आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो ! मी इतका सत्याने वागतो तरी माझ्या वाट्याला इतके खडतर आयुष्य का आले ? मी इतरांच्या आयुष्याचे सोने केले, करत आहे मग माझे स्वतःचे आयुष्य इतके आस्थाव्यस्थ का ? या साऱ्या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे मला सापडत नव्हती म्हणून मी कुंडली हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला . तो प्रयत्न मी फार पूर्वीच करायला हवा होता म्हणजे मला माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची उकल झाली असती. आतापर्यत मी माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांसाठी इतरांना दोष देत होतो पण माझ्या दुर्दैवाने म्हणा अथवा सुदैवाने माझा जन्मच ज्यावेळी झाला होता ती वेळ माझे भविष्य ठरवून झाली होती. माझे शिक्षण पूर्ण झाले नाही मी त्यासाठी आमच्या परिस्थितीला दोष देत होतो पण त्यांनतर मी माझे भौतिक जग
ातील शिक्षण पूर्ण करण्याचा बऱ्याचदा अट्टहास केला पण ते काही केल्या जमलेच नाही . या प्रयत्नात मला फार विचित्र अनुभव आले आता लक्षात येतंय माझ्या जन्मकुंडलीत पाचव्या भावात असणारा केतू याला कारणीभूत आहे.
मी माझ्या लहानपणी माझ्या वडिलांसोबत अनेक छोटे - छोटे धंदे केले त्यातील एकही तोट्यात गेला नव्हता पण मी नोकरी पत्करली आणि माझा खिसा कधी जड झालाच नाही. मी माझ्या वडिलांसोबतच उद्योग करत राहिलो असतो तर खूप यशस्वी झालो असतो कारण माझ्या कुंडलीतील मंगल - बुध युती तेच सूचित करते आणखी एक गोष्ट सूचित करते पण मुलगा म्हणून ते जग जाहीर करणे मला योग्य वाटत नाही पण ते सत्य आहे जे मला माहीत आहे जग त्यापासून अनभिज्ञ आहे. मी लहान असल्यापासून मला स्त्रियांचा सहवास जास्त लाभला मला त्यांनी एकदा वाचवलेही आहे . माझे जीवन हे त्या स्त्रियांच्या उपकाराची देंण आहे ज्यांनी मी लहान असताना ओढ्यात वाहत जात असताना मला वाचवले होते, स्त्रिया आजही माझ्याकडे आकर्षित होतात माझ्याशी बोलल्यावर माझ्या प्रेमात पडतात त्याला कारणीभूत आहे माझ्या कुंडलीतील सहाव्या भावात मीन राशीत असणारा उच्चीचा शुक्र ! कित्येक तरुणींना मी मोबाईलवर माझा फोटो पाहताना पाहिले आहे मला स्वतःला कळत नाही मी दिसायला इतका सामान्य असताना त्या स्त्रियांना मी का आवडतो ? तरुणी माझ्याशी बोलायला धडपडत असतात. मी मुलींशी पोपटासारखा बोलतो माझं बोलणं त्यांना ऐकत राहावस वाटतं. मी खरं म्हणजे एक व्यवसायिक म्हणून खूप यशस्वी होत असताना शिक्षण अर्धवट झालेले असताना मी लेखक का झालो आणि मी पत्रकारितेकडे का ओढलो गेलो याचे उत्तर मला माझ्या कुंडलीत दहाव्या भावात कर्क राशीत असणारा गुरू देतो. मी प्रकाशन क्षेत्रात उतरलो पण त्यात मला यश आले नाही कारण तेव्हा माझी शनीची साडेसाती सुरु झाली होती आणि याच काळात एस आर ए मुळे आम्हाला आमचे राहते घर सोडून भाड्याच्या घरात राहावे लागले होते , ज्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास नव्हता. माझ्या कुंडलीत सहाव्या भावात असणारा शुक्र माझ्या आईबाबत काही भाकीत करतो त्याचा तथ्य आहे त्याचा त्रास मला आजही होतो. माझ्या लहानपणी मी कधी चुकून कोणताही झुगार खेळलो तर माझं यश ठरलेलं हे सत्य मला ज्ञात असल्यामुळे मी झुगार खेळत नाही माझ्या नावाने गुंतलेले पैसे कधीच डुबत नाहीत. माझ्या कुंडलीत एकादश भावात असणारा राहू याला कारणीभूत आहे त्याच भावात असणारी राहू शनी युती मला विलासी जीवन जगण्याचे संकेत देते. माझ्या कुंडलीत सातव्या घरात सूर्य मंगल आणि बुध हे तीन ग्रह एकत्र आहेत जे मला भविष्यात काय टाळायचे आहे याबाबत सूचित करतात. मला भविष्यात उद्योगच करावा लागणार याचे संकेत देतात त्या सोबत मी लग्न केलं तर मी माझ्या बायकोचा गुलाम असणार आहे पण मला गुलाम करून ठेवण्याची क्षमता असणारी ती कशी असेल याची कल्पना न केलेलीच बरी ! असे आता मला वाटू लागले आहे.
माझ्या कुंडलीत प्रथम भावात तुला राशीत असणारा उच्चीचा हर्षल आणि नीचीचा चन्द्र मला फार स्फोटक विचारवंत, अभ्यासू आणि संशोधक वृत्तीचा बनवितो म्हणूनच मी लेखक असताना इतरांचे ते साहित्य वाचत नाही कारण त्याने माझ्यातील साहित्यिक प्रभावित होईल आणि माझ्या साहित्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसेल . माझ्या कथा , कविता आणि लेख इतर लेखकांपेक्षा वेगळे आहेत कारण मी सामान्य वाचकांच्या नजरेतून लिहितो. माझ्या साहित्यावर कोणाचाही प्रभाव नाही त्यामुळे माझे साहित्य नक्कीच भविष्यात स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणार ! मी यशस्वी होणे , मला प्रसिद्धी मानसन्मान मिळणे हे माझ्या पत्रिकेत स्पष्टच आहे पण त्यासोबत सातव्या भावात असणारी हर्षल आणि चंद्र यांची युती माझ्या विवाहावर प्रश्न चिन्ह लावते ? ते का या प्रश्नाचे तर्कसंगत उत्तर मला येत्या काळात सापडेलच ! माझ्या कुंडलीत दुसऱ्या भावात असणारा नेपच्यून मला विदेशवारीचे संकेत देत आहे पण ते अभ्यासासाठी ! शनीची साडेसाती हा माझ्यासाठी नेहमीच अभ्यासाचा विषय होता आता माझी साडेसाती सपंत आली असताना मला व्यक्तिगत साडेसातीचा आलेला अनुभव फारच भयावह होता ! असं म्हणतात साडेसातीत माणसाला प्रचंड पायपीठ करावी लागते त्याच्या चपला प्रचंड झिजतात त्याला निर्बुद्धी लोकांचे सल्ले ऐकून घ्यावे लागतात. नवीन कपडे विकत घेता येत नाहीत आणि घेतले तर ते टिकत नाहीत त्याच्यात वैराग्याची लक्षणे दिसू लागतात, संसारातील मोह कमी होतो ,त्याला संन्याशी जीवन जगावेसे वाटू लागते आणि त्याची या काळात देवावरील श्रद्धा दृढ होते. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार बळावतात पण तो आत्महत्या करत नाही. असे काहीसे अनुभव मला आले ते कदाचित माझ्या इतर ग्रहांच्या प्रभावामुळेही झाले असेल सर्वाना इतके कठोर अनुभव येत नसावेत कारण ती सामान्य माणसे असावीत. असामान्य माणसांच्या आयुष्यातच असामान्य घटना घडतात. शनी शनीची साडेसाती ही कदाचित अंधश्रद्धा असेलही पण मला आलेला साडेसातीचा अनुभव मी अभ्यासला तेव्हा मला व्यक्तिगत असे वाटते की त्यात काही प्रमाणात तथ्य असावे ! या जगात बऱ्याच तर्कसंगत नसणाऱ्या गोष्टी घडत असतात. कुंडलीतील ग्रह आपले भविष्य वर्तवत असल्या तरी आपले भविष्य घडविण्यात ग्रहांचा सहभाग २५% असतो . उरलेला २५ % सहभाग आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूचा असतो. त्या वास्तूत असणाऱ्या सकारात्मक अथवा नकारात्मक ऊर्जेचा असतो. आणखी २५% सहभाग आपल्या गतजन्मातील संचिताचा असतो आणि उरलेला २५% सहभाग आपण या जन्मात करत असलेल्या चांगल्या वाईट कर्मावर आधारलेला असतो. यात किती तथ्य आहे हे अभ्यासायला आवडेल माझ्यातील लेखकाला...