STORYMIRROR

Shubham Nikam

Others

2  

Shubham Nikam

Others

कुलस्वामिनी स्तवन

कुलस्वामिनी स्तवन

2 mins
50


दिप भास्करा अर्घ्य गंगेसी तेथ लज्जेसी स्थान कुठे ।

 बुद्धी अगम्या शब्दा अगोचरी कसे आर्जवू ते न कळे ।

 परी स्फुरण तुझे वरदान तुझेची घेई गोड समजूनी ।

 येई सत्वर अनंत महिम्ने दीन लीन मी तव चरणी || १ ||


चाप शुलादिक दिव्य आयुधे विनोदास्तव ती धरली का ।

 तव संकल्पाधीन विश्वे सारी ईच्छातीत कधी होतील का ।

 माया तुझी ती तुलाच ठावी तुझाच रोष अन् तुझीच करणी ।

 येई सत्वर अनंत महिम्ने दीन - लीन मी तव चरणी ||२||


केदार प्रतापि दक्षिण काशीश्वर- भैरव नेता वीर खरा ।

 दैन्यपणाने हाक मारिता त्राण करशी तू रणतत्परा |

 पामर अल्पज्ञ मी तुझे लेकरू , आळवीतसे तुज निशीदिनी ।

 येई सत्वर अनंत महिम्ने दीन लीन मी तव चरणी ॥३ ॥


 गोसावीसुत जो अंश ढुंढीचा , आळविले त्यानेही नानापरी | न्यूनासही करशी पूर्ण चिंतामणी वरदा अशापरी | 

अयाचकासी जर देसी भरपूर , याचकांची मग कोण वाणी । 

येई सत्वर अनंत महिम्ने दीन लीन मी तव चरणी ||४ ||


 भिक्षुक स्वारी परतूनी जाता ,भेट दत्तांची सुलभ कशी | 

वात्सल्यमिषे राहे निरंतर , आदिगुरुही तुज पाशी । 

परमधन्या आदिकौमारी , मान्या एकचि त्रयजननी ।

 येई सत्वर अनंत महिम्ने दीनलीन मी तव चरणी ||५ ||


मानसरोवरी हंसपक्षिणी तलगांसह अति शोभे तशी |

बालक यात्रेकरु आळविती , केदार विजयी बहुवशी |

परात्परा न तुजवीण कोणी, देई प्रेरणा तव भक्तीची ।

येई सत्वर अनंत महिम्ने दीन लीन मी तव चरणी ||६ ||


सर्ववर्णात्मिका एकचि तदर्थी झालीस मयुरवाहिनी |

मंत्रसिद्धीही नोहे तुजवीण, तूच शाबरी वृद्धेश्वरमोदिनी |

सातशे ओवींत रणचण्डिका एकच तू कनकेश्वर कामिनी |

येई सत्वर अनंत महिम्ने दीनलीन तव चरणी ||७||


मूळतत्त्व अन् मूळ कारण , मूळमाया, तूच मूळध्वनी |

रक्ष रक्ष मूळपीठवासिनी, शरण शरण मी तव चरणी |

दत्त हृदयातील चिरंतन ज्योति, गुह्य गर्जन स्कंदपुराणी |

येई सत्वर अनंत महिम्ने दीन लीन मी तव चरणी | ॥८॥


स्वामी असता प्रज्ञापुरीला, ईतिसंकट¹ ते आले कसे !

अनन्य प्रतापी नाम जाणूनी, तुलाच पुजिली दत्ताने |

अवधूत चिंतन नगरासी त्या,³ भवा शांभवी तूच शिवानी | ⁴

येई सत्वर अनंत महिम्ने दीन लीन मी तव चरणी ||९||

{ १)ईति- आपत्ती/पूर दुष्काळ

३) सर्वच अवधूत (नित्यानंदी) ज्या नगराचे चिंतन करतात ते प्रज्ञापुर. अथवा दुसऱ्या अर्थाने स्वामी चिंतन करणारे नगर.

४) भवा- विश्वरुप शिव म्हणजे भव. तशी भवा/भवानी म्हणजे विश्वव्यापिनी माया.

शांभवी- (आनंदाचा स्रोत म्हणजे शं+भु). शंभुची अभिन्न अर्धांगिनी म्हणजे शांभवी‌‌. 

शिवानी- परम कल्याण म्हणजे शिव. शिवानी म्हणजे कल्याण रुपिणी.}


दहाव्या पदी रवळनाथासी, मागतो ओंजळ पसरुनी |

श्रद्धा, प्रचिती, ज्ञान, विरक्ती दे मज अनुज समजूनी |

आत्मज असशी जमदग्नींचा अन् प्रतिबिंब यमाई दर्शनी |

येई सत्वर अनंत महिम्ने दीन लीन मी तव चरणी ||१०||


पावलीस झणी त्र्यंबकासी, अन् बावी गावच्या भक्तासी |

तशीच पावे सर्वाना मग, जननी जशी तू जगताची |

यमाई-जमदग्नीस बाळ - शुभमने अर्पण केली स्तुतीसुमने |

उणे दुर्लक्षून स्वीकारोत जन, माय बापुड्या कौतुकाने ||११||


साहित्याला गुण द्या
लॉग इन