STORYMIRROR

Shubham Nikam

Others

3  

Shubham Nikam

Others

गुरुप्रेमाष्टक

गुरुप्रेमाष्टक

2 mins
69

तुजवीण आणिक ठाव नसे मज , द्वारी पातलो नरहरी |

काळरात्र ही घोर कलीची , उदया यावे तिमिरारी | 

टाहो फोडूनी वाट पाहतो , अंत न पहा घ्या पदरी ! 

वळवूनी कटाक्ष प्रेमदान द्या , क्षण न दवडा लवभरी || १ || 


धीर , आमोद , प्रमोदही खचले , उघड आत्रेया बंद कवाडे | 

नको निष्ठूर अशी होऊ गे जननी , बहु ऐकले मी तुझे पवाडे ।

मातृरूपेण वेदश्रुती ती , सार्थक करी तू आज घडी | 

वळवूनी कटाक्ष प्रेमदान द्या , क्षण न दवडा लवभरी || २ || 


नेत्रही द्रवले का बा दयाळा , नरसावधानी द्वेष्ट्यापरी । 

मग उपेक्षा घडता माझी जर , भेद न शोभे तव अंतरी |

 विद्वान शिष्यांच्या गर्दीमध्ये , दुर्लक्षित मी मूढ जरी | 

वळवूनी कटाक्ष प्रेमदान द्या , क्षण न दवडा लवभरी || ३ || 


विरहभक्तीचे वरदान देई मज , प्राणांतही मग आला जरी | 

तव द्वारीच मज मृत्यू यावा , अन् परोक्ष तव मूर्ती गोजिरी |

अविलंब मग तेव्हा येशी वेगी , ईच्छा आणिक नाही उरी |

वळवूनी कटाक्ष प्रेमदान द्या , क्षण न दवडा लवभरी | ||४||


झिडकारूनी जरी देशील नाथा , तुजवीण कणव कोण करी । 

धिक्कारील मज त्रिभुवन सारे , जाता कुणाच्या दरबारी । 

सहस्रार्जुन मी नसे थोर गा , कसोटी न माझी पाही खरी । 

वळवूनी कटाक्ष प्रेमदान दया , क्षण न दवडा लवभरी || ५ ||


सद्गुणकिर्ती पुत्र कित्येक ते , असले तुजसी खूप जरी |

 धन्य जो मी एक द्वाड लेकरु , जननी तयाच विशेष ध्यानी धरी |

 लौकीकातील जननीगुण हा , सत्य करूनी मज उद्धरी | 

वळवूनी कटाक्ष प्रेमदान द्या , क्षण न दवडा लवभरी ||६||


रुसण्या झगडण्या मंदमती मी , चातुर्य मज ते नसे जरी | 

तरीही रिझावे स्वामी आता , हृदय फार हे गहीवरी | 

तारकहस्त जसा विप्रमातेसी , अनाथा मजही हो कैवारी |

वळवूनी कटाक्ष प्रेमदान द्या , क्षण न दवडा लवभरी ||७||


कोढी , शुद्र , भास्करादीक , कथा ऐकली त्यांच्या निष्ठेची |

काकुळतीने लाज राखसी , प्रमाणे° धेनु वात्सल्याची |

लोकोपहासही गोड उमजे मज , व्याकुळता जव* तू चित्ती धरी |

 वळवूनी कटाक्ष प्रेमदान द्या, क्षण न दवडा लवभरी ||८||

{प्रमाणे°= (पाठ)पुरावा/ testimony,  जव* = ज्यामुळे}


गुरुप्रेमाष्टक नामे स्तव हा , अर्थानुसंधाने पढता कुणी | 

भुक्तीमुक्ती करतली तयाच्या, संशय, विकल्प न येवो मनी |

परमएकांतीनिष्ठापूर्णशा दुर्लभ भक्तीस तो अधिकारी |

वळवूनी कटाक्ष प्रेमदान द्या , क्षण न दवडा लवभरी ||ॐ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन