हिरवी झाडी,पिवळा डोंगर.
हिरवी झाडी,पिवळा डोंगर.
1 min
12.1K
हिरवी झाडी, पिवळा डोंगर,
निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे
वार्याची पावरी.
कभिन्न काळ्या खडकांमधुनी
फुटति दुधाचे झरे
संथपणे गिरक्या घेती
शुभ्र शुभ्र पाखरे !
सोनावळिच्या सोनफुलांचा
बाजुस ताफा उभा
तलम धुक्याची निळसर मखमल
उडते, भिडते नभा.
हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ
अंग झाडतो भिजला वारा
त्यात नवा दरवळ.
डूल घालुनी जळथेंबांचे
तृणपाते डोलते
शीळ घालुनी रानपाखरु
माझ्याशी बोलते !
गोजिरवाणे करडू होउन
काय इथे बागडू ?
पाकोळी का पिवळी होउन
फुलांफुलांतुन उडू ?
