एक रस्ता
एक रस्ता
एक रस्ता शहरामधला
नेहमी सारखाच गजबजलेला
बाजारातल्या गर्दीमध्ये
माणसासारखा हरवलेला
एक रस्ता शहरामधला
माणसांच ओझं वाहणारा
मोठया गाडीने चिरडलेले
छोटे प्राणी पाहणारा
एक रस्ता शहरामधला
खड्ड्यामध्ये बरबटलेला
वेगवेड्या गाड्यांमधल्या
भ्रष्टाचाऱ्यांनी सडवलेला
एक रस्ता शहरामधला
दडपशाहीने बडवलेला
दोन वेळच्या अन्नासाठी
कित्येकांनी तुडवलेला
एक रस्ता शहरामधला
त्याला महापुरुषाचे नाव
रस्त्यालाही ठाऊक आहे
हा राजकारणाचा डाव
एक रस्ता शहरामधला
त्याच्या चौकामध्ये पुतळे
कर्कशणाऱ्या भोंग्यांमध्ये
फसले बिचारे सगळे
एक रस्ता गावाकडचा
डोळ्यात पाणी आणणारा
ओबडधोबड असून सुद्धा
नेहमीच आपला वाटणारा
एक रस्ता गावाकडचा
वटवृक्षाच्या साव
लीचा
सावलीमध्ये झोपाळ्यावर
बागडणाऱ्या बाहुलीचा
एक रस्ता गावाकडचा
खडकाळलेल्या दगडांचा
गावपाऱ्यावर बसलेल्या
अंधश्रद्धेच्या घुबडांचा
एक रस्ता गावाकडचा
टेकडीवरती जाणारा
टेकडीवरच्या मंदिराचा
घंटानाद ऐकणारा
एक रस्ता गावाकडचा
गुलमोहराच्या फुलांचा
त्याच फुलांना चेंगरणाऱ्या
बैलगाडीच्या चाकांचा
एक रस्ता डोंगरामधला
नागमोडी वळणाचा
धुक्यामध्ये हरवलेल्या
उंच उंच शिखरांचा
एक रस्ता नदीकाठचा
प्रवाहाला थोपवणारा
काठावरच्या माणसांनाही
प्रतिबिंब दाखवणारा
एक रस्ता मनामधला
नेहमीच ओस पडलेला
एकटेपणाचा प्रवास त्याच्या
नशिबी मात्र घडलेला
वेगवेगळ्या रस्त्यांवरती
वेगवेगळा ध्यास आहे
स्वप्नांमधल्या रस्त्यावरती
आयुष्याचा प्रवास आहे