बांधावरचं झाड!
बांधावरचं झाड!
खुणावतय ओसाड पडीताच्या
बांधावरचं वाळलेलं झाड,
शोधतय त्याच्या एकटेपणाचं कारण
प्रेम अपुरं झालं की पुरवलेले लाड ।।
पुरतच कोरडं पडलय आता
आसवांचं पाणी खोडातच आटलंय,
अंगावरची सालही आता गळून पडतेय
राग धरणारही कुणी नाही म्हणून
आता ते स्वतःवरच रुसलय ।।
होती तेव्हा मुळं घट्ट, झाडही बहरलेलं
फांद्यावर खेळायची पाखरं, सावलीखाली पोरं,
अंगावरती लगबग किड्यामुंग्यांची
बुंध्याभोवती पहुडलेली गुरं ढोरं ।।
आता अंगाला बिलगून वाहतो वारा
पाऊसही पडतो कधी कधी गारा,
नाही बहरत आता ते या बदलत्या ऋतूंनी,
आपल्या माणसाच्या स्पर्शासाठी तडफडतंय
शिवलं सुद्धा नाही बऱ्याच दिवसाचं कुणी ।।
उभं आहे तरी अजूनही धीर धरून
सरपणाकरिता का होईना येईन कुणीतरी,
कुऱ्हाडीचा घाव घालताना का होईना होईन स्पर्श
मिटेल मग डोळे आनंदाने तेही कधीतरी ।।
