आली दिवाळी
आली दिवाळी
अश्विन-कार्तिक मासाच्या सुगी काळात
आली दिवाळी हो आली दिवाळी
जीवनातील दुःख, अंधःकाराला
यशरात्री दीपोत्सवाने जाळी...१
घरा-दाराची आणि मनाची
साफसफाई मिळून करू
आकाशकंदिल, दिव्यांची शोभा
अंगणी रंगावलीत सप्तरंगी स्वप्न साकारू....२
वसुबारस शुभदिवस पहिला
घरच्या गोधनाचे आभार मानायचे
पूजन करून मनोभावे वंदू या
गोड घास मुखी त्यांच्या भरवायचे ....३
धनत्रयोदशीस करू दीपदान
वस्त्रालंकाराची खरेदी करून
वैद्य करती धन्वंतरीचे पूजन
साजरा करती आयुर्वेद दिन....४
चतुर्दशीला कृष्ण करी वध नरकासुराचा
सांगे दुष्ट वासनांना नष्ट करा
लावून उटणे मंगल अभ्यंगस्नान
पवित्र सणाचा शुभारंभ खरा....५
अमावस्येला करुनी लक्ष्मीपूजन
चंचल लक्ष्मीला स्थिर ठेवू
धन,अलंकार,केरसुणी,चोपडी पुजनाने
आनंद,सौख्य,समृद्धीला घरात स्थैर्य देवू....६
बलिप्रतिपदेला दिपावली पाडवा
विक्रम संवत्सराच्या शुभेच्छांचा
करुन पतीचे प्रेमाने औंक्षण
शुभ मुहूर्ताला आरंभ व्यापाराचा....७
भाऊबिजेला म्हणती यमद्वितीया
भावा-बहिणीच्या प्रेमसंवर्धनाचा
लाडू,करंजी,चिवडा,चकली संगे
मायेने संस्कृती जोपासण्याचा....८
नको फटाके,नको ध्वनी प्रदूषण
संदेश हाच मोठा दिपावलीचा
रोशनाई आनंदाची आणि आरोग्याची
जपूया ठेवा स्नेहपूर्ण गाठीभेटीचा...९
दीन-दुःखी नि वंचितांसंगे चला
आनंदाचा थोडा वाटा वाटू या
दुःखाच्या तिमिराला त्यांच्या
दीपतेजाने उजळून टाकू या...१०
