विकासाची व्याख्या
विकासाची व्याख्या


परवा गणपतीच्या सणासाठी कोकणातल्या आपल्या गावी जायला निघालो होतो. प्रवास हा मुंबई-गोवा महामार्गानेच करायचा ठरवला होता. कारण रेल्वेला प्रचंड गर्दी होती, कशीबशी एक विंडो-सीट भेटली आणि प्रवास सुरू झाला. प्रवास रात्रीचा असल्याकारणाने चांगली झोप लागली होती. इतक्यात एका खड्ड्यातून गाडी गेली आणि सगळी झोप उडाली. नंतर झोप येत नाही म्हणून हळूच काच उघडली आणि बाहेर पाहू लागलो. सुंदर अशी सकाळ होत चाललेली आणि जिकडे बघावं तिकडे हिरवेगार डोंगर, सुंदर असा सूर्योदय होत होता, इतक्यात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका राजकीय जाहिरातीकडे लक्ष गेलं.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होणार होत्या त्यामुळे एका राजकीय पक्षाच्या संभाव्य उमेदवाराच्या प्रचाराची जाहिरात होती. त्यांनी म्हणे मतदारसंघात विकासकामे केली. ती काय कामे केली हे पाहण्यासाठी म्हणून जाहिरात वाचू लागलो तर धक्काच बसला. विकासकामं कोणती तर अमक्या गावात रस्ता बांधला, साकव बांधला, पक्का पूल बांधला इ. ही जाहिरात पाहतापाहता गाडी पुढे निघून गेली.
अशाप्रकारची जाहिरात पाहून जरा आश्चर्यच वाटलं. कारण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून आज ६८ वर्षे पूर्ण झाली आणि आजही आपण गावागावांमध्ये रस्ते, साकव, पूल हेच बांधत बसलो आहोत; नाही म्हणजे हे करणं चुकीचे नाही परंतु आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की हे मुद्दे निवडणुकीच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आजही आहेत.
रस्ते बांधले की ते ठराविक काळानंतर खराब होणारच त्यामुळे ते सदैव बांधत रहावेच लागणार. परंतु इतर इतके महत्वाचे विषय आज कोकणात असताना केवळ हेच मुद्दे आजही प्रचाराचा विषय बनतात ही एक प्रगत देशाला फार लाजीरवाणी गोष्ट आहे.
खरंतर आज आपल्या देशामध्ये असे राजकारणी जन्माला येताहेत जे राजकारणाला एक व्यवसाय म्हणून बघतात. जेव्हा की आपल्याला अशा राजकारण्यांची गरज आहे ज्यांच्याकडे दूरदृष्टी असेल, जे राजकारणाला समाजकारण सुधारण्याचा मार्ग म्हणून बघतील.
हल्ली राजकारणात स्वार्थापोटीच लोक येतात ज्यांची विकासाची व्याख्या म्हणजे निवडणुका आल्या की काहीतरी कामं केल्यासारखी दाखवायची, दहा-बारा उद्घाटनं करायची, जमलंच तर मंजुरी आणायच्या की झाला विकास. झाला आपल्या मतदारसंघातला विकास आणि मग स्वतःच्या नावापुढे विकासपुरुष असे बिरूद लावून घ्यायचे.
खरंतर खरा विकास अजून ह्या महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशाला व्हायचा आहे. उदाहरणार्थ कोकणचंच घ्या ना. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या नेत्याने अमकीतमकी विकासकामं केली आणि म्हणून मला निवडून द्या, असं त्याचं म्हणणं आहे, परंतु खरंच ही कामं म्हणजे विकास म्हणायचा का? असा प्रश्न पडलाय.
आज कोकणात बरीच मुलं विविध विद्यापीठातून पदवी किवा पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण करून अशीच बेरोजगार बसली आहेत. काहीतर घरच्या परिस्थितीमुळे शिकूही शकत नाहीत, त्यांच्या रोजगाराचं काय? असा प्रश्न ह्या स्वतःला विकासपुरुष म्हणवून घेणाऱ्यांना कसा पडत नाही. आज अनेक कंपन्या ह्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे कर असल्यामुळे ते त्यांना भरणं शक्य नसल्यामुळे इथून इतर राज्यात जात आहेत, त्यांना कोकणात का आणू शकत नाहीत हे लोक.
आज काही कंपन्या तर मुंबई-बंगलोर असा बाय – रोड (ज्याला मुंबई बंगलोर कॉरिडॉर असं म्हणतात) व्यवसाय करतात मग आपण आपल्या कोकणातून अशाप्रकारचा व्यवसाय का करू शकत नाही. ज्या मुलांना शक्य होतं किंवा ज्यांचे कोणी नातेवाईक मुंबई, पुणे अशा शहरात स्थायिक आहेत अशी मुलं जातात ह्या शहरांमध्ये नोकरी करायला, परंतु ज्यांचं कोणीच ह्या शहरात स्थायिक नाही ते मात्र शिकून बेरोजगाराचं आयुष्यच जगताहेत. यांच्यासाठी का कोणी आवाज उठवत नाही.
आज खरंतर ग्रामीण भागातील आमदार असतील नाहीतर खासदार असतील, ह्या सगळ्यांची विकासाची व्याख्या ही आपला मतदारसंघ देशातच नव्हे तर जागतिकदृष्ट्या कसा महत्वाचा ठरेल ह्याचा विचार करणारी असली पाहिजे. साकव, पूल, रस्ते इ. कामं करण्यासाठी त्या–त्या तालुक्यातल्या पंचायती, जिल्हापरिषदा आहेत. त्यातूनच जर ह्या संस्था कामं करत नसतील तर तुम्ही निश्चितच त्यात लक्ष घाला. परंतु इतर वेळा आपल्या मतदारसंघातल्या तरुणाची बेरोजगारी कशी दूर होईल, किंवा पाण्याचा प्रश्न कशाप्रकारे सोडवता येईल, गुन्हेगारी कशी थांबवता येईल ह्या प्रश्नांकडे जास्त लक्ष देऊन ते सोडवले पाहिजेत. तर तो खरा विकास असेल.
विकासाची खरी व्याख्या जाणून घ्यायची असेल तर हल्ली ज्यांच्या नावाने राजकारण केलं जातंय त्यांची कामे जरा अभ्यासली पाहिजेत. तेव्हाच तुम्हाला उकल होईल की राजकारण हे नेमकं कशासाठी आहे ते.