STORYMIRROR

Rohit Surve

Others

2  

Rohit Surve

Others

आयुष्य - बस

आयुष्य - बस

6 mins
1.2K


एक बस होती. ज्यात चालक आणि वाहक हे अनेक वर्षे तीच बस चालवत होते. त्यामुळे त्यांच्या मुलाप्रमाणे त्यांनी ती बस जोपासली होती. सुरुवातीला प्रवासी कमी होते. पण त्यांनी हार मानली नाही. 'काहीही झालं तरी, सेवेच्या गुणवत्तेत बदल करायचा नाही.' असं दोघांचंही ठरलं होतं.

 

ठरल्याप्रमाणे दोघेही मेहनत करत राहिले. प्रवासी वाढवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत राहिले. कधी यशस्वी व्हायचे, तर कधी अपयशी. पण खचून न जात पुन्हा उभे राहत होते. शेवटी वेळ बदलली. चांगले दिवस आले. प्रवासी वाढू लागले. दोघांच्या चांगल्या स्वभावामुळे काही प्रवासी नेहमीचेही झाले. सगळ्या गोष्टी नीट होताना दिसत होत्या. बसचालक नवनवीन मार्ग शोधण्यात व्यग्र असे तर, वाहक हा प्रवाशांशी नाती जपण्यात.

 

एके दिवशी अचानक बसचालकाला लक्षात आले की 'आपण रस्ता चुकलोय.' त्याने वाहकाला बोलावलं आणि म्हणाला "अरे, आपण मार्ग चुकलोय. तेव्हा जरा खाली उतर आणि मला बस मागे घ्यायला मदत कर."

वाहकाने विचार न करता लगेच उत्तर दिलं "मला वाटतं, की आपण आपल्या प्रवाश्यांची मदत घ्यावी. कारण आता फक्त आपण दोघेच ह्या बसमध्ये नसून हे नेहमीचे प्रवासीसुद्धा आपल्या बरोबर आहेत."

बस चालकाला काही सुचेच ना की नेमकं काय चाललंय. त्याने समजावण्याचा प्रयत्न केला. "हे बघ, भले ही हे प्रवासी आपल्या सोबत आहेत. परंतु आपण दोघे सुरुवातीपासून ह्या बसचे सर्वस्व आहोत. असं अचानक इतरांना आपल्यात सामावून घेऊ नकोस. कारण त्यांना ह्या रस्त्यावरचे ना खड्डे माहित, न रस्त्याची रुंदी माहित, न रस्त्यावरचे गतिरोधक

आणि महत्वाचं म्हणजे पुढे जसे दोन डोळे असणं हा जसा निसर्गाचा नियम आहे, तसंच मागेसुद्धा दोनच डोळे असायला हवेत. पण ते आपल्या विश्वासाच्या व्यक्तीचे. चालकाचा विश्वासू साथीदार हा त्याचा वाहक असतो, प्रवासी नाही."

वाहक काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने उलट त्यालाच प्रतिप्रश्न विचारला "तू ह्या चालकाच्या केबिनच्या बाहेर कितीवेळा पडलायस?, जे तुला कळेल की आपल्याला किती विश्वासाची माणसं भेटली आहेत?"

बसचालक वाहकाच्या ह्या प्रश्नरूपी अवतारावर थक्क झाला आणि काहीही न बोलता "ठीक आहे. जशी तुझी इच्छा." असं म्हणून बस मागे घ्यायला लागला.

 

इथे सगळेच जण त्याला मार्गदर्शन करू लागले. सुरुवातीला एक-दोघे होते. नंतर वाढत गेले. गोंधळ वाढत गेला. चिवचिवाट सुरु झाला आणि एक मोठा आवाज आला. बस एका खड्ड्यात आपटली होती. हा आवाज ऐकून सगळे घाबरून बसमधून उतरले. वाहकही त्यांच्यासोबत उतरला. सगळे उतरताच बसचालकाने वेगाने बस पुढे नेली आणि एका अज्ञात स्थळी थांबवली जिथून दोन वळणं दिसत होती. बसचालक निवांत बसला होता. इतक्यात त्याला कसला तरी आवाज ऐकू आला. त्याने दचकून मागे पाहिलं. तर एक लहान मुलगा त्या बसमध्ये होता.

 

बसचालकाला त्या मुलाचं आश्चर्य वाटलं. तो विचार करू लागला. हा मुलगा पहिला प्रवासी होता बसमध्ये चढणारा आणि अजूनही आहे. सगळे खाली उतरले, पण हा लहान मुलगा न घाबरता अजूनही बसमध्येच आहे.

कुतूहलाने त्याने विचारलं "काय बाळा, तू चुकून राहिलास का बसमध्ये? म्हणजे तुझे आई - बाबा तुला घेऊन नाही उतरले का?"

तो मुलगा नम्रपणे उत्तरला, "नाही काका, मी स्वतःहून राहिलोय बसमध्ये आणि विसरलात का? मी एकटाच चढलो होतो. तेही तुमच्यासोबत?" तो एवढं बोलून गोड हसू लागला. बसचालक मात्र गोंधळलेला होता. त्याला काहीही कळत नव्हतं. तो तिथेच विचार करत बसला. त्या लहान मुलाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्याजवळ जाऊन, बसचालकाला विचारलं 

"काका, एक विचारू का?" बसचालक त्याच गोंधळलेल्या अवस्थेत "विचार."

 

तो लहान मुलगा "काका, एवढा चिवचिवाट होता, सगळे घाबरून बस सोडून पळून गेले. सगळ्यांनी बघितलं होतं की खड्ड्यात बस आपटली होती. पण तुम्हाला तर माहीतही नव्हतं कसला आवाज आलाय तो. मग तरी तुम्ही निवांत कसे काय होतात?" 

त्या लहान मुलाच्या प्रश्नाने बसचालकाच्या डोळ्यात अश्रू आले, ते लपवत, पुसत तो म्हणाला, "बाळा, ते सगळे चिवचिवाट करत होते. पण मी मात्र त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतो. कारण मी ह्या बसचा चालक आहे. मला सगळे रस्ते आणि त्या रस्त्यातले खड्डे, गतिरोधक माहित आहेत. थोडीशी डुलकी लागली म्हणून माझ्याकडून डावीकडचं वळण घेतलं गेलं

आणि आपण रस्ता चुकलो. पण मला लगेच लक्षात आलं आणि मी मागे बस घ्यायचा निर्णय घेतला. आजवर माझ्या मागचे डोळे हे ह्या बसचा वाहक होता. पण तो प्रवाशांमध्ये इतका गुंतून गेला की जिथे थांबायचं आहे, तिथली बेल वाजवायची विसरूनच गेला. मी माणूस आहे, मला फक्त माझ्या डोळ्यांवरच विश्वास असू शकतो, असंख्य डोळ्यांवर नाही. माझे मागचे डोळे माझे राहिले नाहीत म्हणून शेवटी मला स्वतःवर विश्वास ठेवावा लागला आणि जेव्हा आपला आपल्यावर विश्वास असतो तेव्हा आपण निवांत असतो." हे बोलत असताना बसचालक मावळत्या सूर्याकडे बघत होता.

 

त्या मुलाने लगेच दुसरा प्रश्न विचारला "आणि काका, तुम्ही लगेच बस कशाला पळवलीत?" बसचालकाने त्या लहान मुलाकडे बघितलं, आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला "बाळा, वाहक ज्या पद्धतीने माझ्याशी वाद घालत होता, की हे सगळे विश्वासू आहेत, त्यांचा विचार आपण घेतला पाहिजे. ते किती योग्य होतं ते एका छोट्याशा धडकेने दिसून आलं. त्यामुळे जे पळून गेले त्यांनी परत चढू नये म्हणून मी बस पळवली."

त्याने पुन्हा प्रश्न विचारला "पण तुम्हीतर वाहक काकांसाठीही नाही थांबलात?" चालक चेहऱ्यावर स्मितहास्य आणून बोलला, "कारण बस खड्ड्यात गेल्यानंतर मी पाहिलं, पहिला बसमधून उतरणारा वाहकच होता." त्याचं हे उत्तर ऐकून तो लहान मुलगा चालका

च्या मांडीवर डोकं ठेवून बसला.

 

थोड्या वेळाने बसचालकाला काहीतरी सुचलं आणि त्याने लगेच त्या लहान मुलाला विचारलं "अरे पण तू का नाही उतरलास? तुला पळावं असं नाही वाटलं?"

तो लहान मुलगा "नाही." एवढंच म्हणाला.

आता बसचालकाला प्रश्न विचारायची घाई झाली "का?"

"कारण मला तुमच्यावर विश्वास होता आणि आहे." उत्स्फूर्तपणे त्या लहान मुलाने उत्तर दिलं.

बसचालक "अरे पण तुझा माझ्यावर विश्वास असायला, तू मला कितीसा ओळखतॊस?"

एवढ्याश्या मुलाला खोचकपणे त्याने विचारलं. तो लहान मुलगाही तितक्याच तत्परतेने "चालकावर विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा?" असं म्हणाला.

शेवटी वैतागून बसचालकाने त्याला विचारलं "अरे आहेस तरी कोण तू?"

लहान मुलगा नम्रपणे उत्तरला "मी तुमचा आत्मविश्वास आहे."

"अजूनही एवढासाच?" चालकाने मिश्किलपणे विचारलं.

"आत्मविश्वास हा नेहमी छोटाच असतो, पण विचार आणि काम मात्र मोठं करतो."

लहान मुलाने एकाएकी शब्दाने गारद करून टाकलं. बसचालक आता चक्कर येऊन पडायचा तेवढा बाकी होता. तोच लहान मुलगा पुढे म्हणाला "अहो काका, मी तुमचा आत्मविश्वासच  आहे. जो तुमच्या ह्या बसचा अगदी पहिला प्रवासी. ही बस जेव्हा खड्ड्यात आपटली, तेव्हा सगळे उतरले आणि मी राहिलो, तुमचा आत्मविश्वास. मी ह्या बसमध्ये अजूनही आहे ते तुमच्यामुळे." बस चालकाला काहीही कळेना.

 

लहान मुलगा पुढे म्हणाला "काका, प्रसंग कसाही असला तरी तुम्ही मला कधी जाऊ दिलं नाहीत. आताही तेच करताय ना? पुढे कसं करायचं हाच विचार करताय ना?"

ह्या एवढ्याश्या मुलाने आपल्या मनातलं ओळखलं हे जाणवताच त्याला रडू आलं आणि "हो मी तोच विचार करतोय. पण काही सुचत नाहीये."

तो लहान मुलगा "त्यात सुचायचं काय आहे. नीट बघा ह्या बसमध्ये, आता तुम्हीच आहात... होल एन सोल… आणि त्यात भर म्हणजे प्रदीर्घ अशा अनुभवाच्या इंधनाची. आधी ह्या बसमध्ये अनुभवाचं इंधन नव्हतं, पण आता आहे. तेव्हा काका, विचार करू नका, कारण कृती करण्याची वेळ आली आहे. त्यातही अनुभवाशिवाय सर्वोत्तम शिक्षक दुसरं कोणीही नाही. हे माहितीये ना? मग उठा, चला उठा आधी. चालकाच्या जागेवर बसा चला."

त्या लहान मुलाने हट्टाने त्याला चालकाच्या जागेवर बसवलं. पण चालकाची काही बस चालू करण्याची हिम्मत होत नव्हती. हे त्या लहान मुलाच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला "काका एक सांगू का?, कोणत्याही गोष्टीच्या अंताच्या पलीकडे, एका नव्या गोष्टीची नवी सुरुवात होणार असते. आता नव्याने सुरुवात करा... नव्या प्रवासाची आणि हो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ह्या बसमध्ये चढला होतात, तेव्हाही मी सोबत होतो आणि आजही आहे. तेव्हा करा सुरू बस आणि न्या नव्या मार्गावर, हे जग उगाच एवढं मोठं नाही बनवलंय परमेश्वराने. असंख्य प्रवासी असेही निश्चिंत आहेत, जे कदाचित तुमच्या बसची वाट बघत आहेत. त्यांचा विचार करा."


त्या मुलाचं बोलणं ऐकून बस चालकामध्ये पुन्हा जोश आला आणि तो बस सुरु करून पुन्हा बस चालवायला लागला.

थोड्या वेळाने त्या लहान मुलाने त्याला विचारलं "काका एक शेवटचा प्रश्न विचारू का? मी पाहिलं, ते वाहक काका जेव्हा तुम्हाला म्हणाले "तू ह्या चालकाच्या केबिनच्या बाहेर किती वेळा पडलायस?, जे तुला कळेल की आपल्याला किती विश्वासाची माणसं भेटली आहेत?" तेव्हा तुम्ही शांत बसलात. का असं? म्हणजे तुमचं त्यावेळी उत्तर काय असणार होतं?"

बसचालक "हेच की, मी जरी ह्या केबिनच्या बाहेर नाही निघालो असलो तरी ह्यातल्या प्रत्येक प्रवाशाने पुढून एंट्री घेतली आहे आणि पुढून एंट्री द्यायची की नाही हा निर्णय बस चालकाच्या हातात असतो, आणि तो निर्णय घेऊन एंट्री देताना मी प्रत्येकाला पारखून घेतलं आहे."

तो लहान मुलगा "शाब्बास काका, अहो माणसाचं आयुष्य हे एका बससारखं असतं. प्रवासी चढतात आणि उतरतात पण म्हणून चालकाची किंमत कमी होत नाही. कारण तो डोळ्यात तेल घालून गाडी चालवत असतो. म्हणून तर प्रत्येक

जण आपल्या निश्चित स्थळी पोहचू शकतो ना... चला आता मी माझ्या जागेवर जाऊन बसतो. तुम्ही चालवा निवांत बस. चालकाशेजारी बसून बडबड करू नये काय?... आणि हो आता दुसरा वाहक भेटेपर्यंत, मी वाहकाच्या भूमिकेत असेन बरं का?"

एवढं बोलून तो लहान मुलगा जाऊन आपल्या जागेवर बसतो.

 

थोड्या वेळाने चालक त्या लहान मुलाला बोलावतो आणि "बाळा, मला वाटतं आता मला वाहकाची गरज नाही. मीच ठरवीन

कुठे बस थांबवायची आणि कुठे नाही ते." तो लहान मुलगा चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणून सहमती देतो आणि "काका, ह्याला काय म्हणतात माहितीये का?"

चालक "काय?"

लहान मुलगा "अनुभवातून शहाणं होणं आणि असं करण्यात एक फायदा पण आहे बरं का..."

चालकाला काही समजत नाही. 

तो लहान मुलगा "अहो विनावाहकाची बस, ही सुसाट धावत सुटते आणि वेळेत इच्छित स्थळी पोहचते."  

चालकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं. ते पाहून, लहान मुलगा म्हणाला "ऑल द बेस्ट."

आणि तो जाऊन आपल्या जागेवर पुन्हा बसला. बसचालकाने समोर दिसत असलेल्या दोन वळणांपैकी उजवीकडे बस वळवली, त्याला नवीन मार्ग सापडला आणि त्याचा 

नव्याने प्रवास सुरु झाला...


Rate this content
Log in