Rohit Surve

Others

3  

Rohit Surve

Others

गप्पा

गप्पा

6 mins
9.5K


रात्रभरच्या दमलेल्या प्रवासाचा थकवा घेऊन शांत झोपलेलो, अर्थात मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून मी काल कोकण रेल्वेच्या त्या भर गर्दीतनं गावी पाउल ठेवलं होतं... एरवी मुंबईत जवळपास बाराही महिने असलेल्या गर्मी मुळे डोळे लवकर उघडत असे. पण आज सकाळच्या त्या गारव्याने लवकर जाग आली. प्रयत्न करूनही पुन्हा काही झोप लागेना त्यामुळे म्हटलं आता लोळत पडण्यापेक्षा एक कप चहाचा घ्यावा आणि पडवीत जाऊन बसावं.

चहाचा कप घेऊन अंगणात आलो आणि घराच्या आजूबाजूला असलेल्या धुकाने लक्ष वेधून घेतलं... पावसाळा संपून हिवाळा चालू होता, त्यामुळे शेजारचं ही घर ह्या जबरदस्त अश्या धुक्याने दिसेनासं झालेलं. त्यात पायाला लागणारं थंड आंगण, रात्रभराच्या कडकडत्या थंडीने ही जमीनही गारठून गेली होती, अंगणाच्या शेजारी आलेल्या गवतावरच्या दवाने तर त्याच्या सुंदरतेवर आणखीनच बहार आणली होती. त्यामुळे नकळत त्या गवतावर हात फिरवला गेला...

हा सगळा निसर्गाचा आनंद घेत होतो, इतक्यात समोरून कोणी तरी त्या धुक्यातून टॉर्च घेऊन येताना दिसलं. ती व्यक्ती जवळ येत होती पण नेमकी कोण हे काही केल्या लक्षात येईना... शेवटी ती व्यक्ती माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि माझ्याकडे अगदी डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत त्या व्यक्तीने टॉर्च दोन – तीन वेळा फिरवला, काही क्षणासाठी ही नजर उतरवण्याची आधुनिक पध्दत उत्पन्न झाली आहे की काय असा प्रश्न मला पडला आणि त्या प्रश्नाला वाट मोकळी करून देणार इतक्यात समोरून एक प्रश्न आला “तू आप्पांचा रोहित ना रे?” आपण ओळखू न शकलेल्या व्यक्तीने आपल्याला आपल्या रक्त्याच्या नात्याच्या नावासकट ओळखावं ही गोष्ट, अभिमानाची वाटून घ्यावी का लाजिरवाणी हा प्रश्न मला पडला, परंतु फारसा विचार न करता “हो मी आप्पांचा धाकटा मुलगा रोहित, पण तुम्ही ?” मग त्यांनी माझ्या दिशेने असलेली टॉर्च ही स्वतःच्या हनुवाटीच्या खाली धरली आणि “ओळखलं मला ?” असा विध्वंसक प्रश्न केला. ज्याच उत्तर अर्थातच नाही असं होतं. शेवटी रहस्य उलगडल गेलं आणि “ अरे मी काका, दोन घरं सोडून राहतो तो, रघुनाथ काका...”

मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला, रघु काका. आमच्या वाडीतले साधारण ऐंशीच्या आसपास वय असलेले, पण अजूनही तब्येतीने तंदुरुस्त असलेले रघु काका. मैदानी खेळात तर त्यांचा हातखंदा प्रचंड होता. त्यांच्या काळी कबड्डी ह्या खेळात संपूर्ण पंचक्रोशीत नावजलेले एक अष्टपैलू खेळाडू. आजही पंचक्रोशीतले आमच्या वयातले कबड्डीपटू त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला जातात. माझ्यासकट माझ्या वयाच्या सर्व मुलांच्या बारश्याचे पेढे खाल्लेली ही लोकं त्यामुळे त्यांना डी. एन. ए. तपासून हा कोणाचा हे सांगायची गरजच नाही, त्यामुळे “ तुम्ही मला कसं ओळखलंत ?” असा बेमतलबी प्रश्न विचारण्याच्या फंदात न पडता त्यांना आत बोलावलं. त्यांना बोलवत असतांना आकाशाकडे लक्ष गेलं आणि आनंद झाला की, काहीच क्षणात सूर्य त्या धुक्याच्या चादरीतून बाहेर डोकावणार आणि सकाळची कोवळी किरण ही अंगावर, घरावर पडणार...

काकांना घराच्या पडवीत एक खुर्ची दिली बसायला, आत जाऊन आईकडून आणखीन एक चहाचा कप आणून काकांना दिला आणि आमच्यात वेगवेगळ्या गप्पा रंगू लागल्या. काकांचा मुळातच हसरा आणि खेळकर स्वभाव त्यामुळे त्यांच्या बरोबर कोणीही फार काळ चेहरा पाडून राहू शकत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मैदानी खेळातले खेळाडू असल्याने त्यांना कोणता विषय शांतपणे आणि कोणता विषय आक्रमकपाणे तडीस न्यायचा ह्याचं उत्कृष्ट कौशल्य त्यांच्याकडे होतं, त्यामुळे ते नव्या पिढीचेही चाहतेच होते...आणि माझ्या बाबतीत तर त्यांना जास्त माहिती न्हवती कारण लहानाचा मोठा मी मुंबईत झालेलो, कधी काळी येऊन जाऊन गावी असायचो पण तरी सुध्दा आमच्या वेगवेगळ्या विषयांच्या गप्पांवरून त्यांनी एक शेरा लावला “तू खूप उत्तम वक्ता आहेस, तेव्हा राजकारणात जायला हरकत नाही...” त्यांच्या ह्या निरीक्षणावर आम्ही दोघेही मनसोक्त हसलो.

आमच्या गप्पा रंगत असतांना माझ्या नजरा सतत आकाशाकडे जात होत्या, कधी एकदाचा तो सूर्य बाहेर येतोय ह्या विचाराने, पण ऐंशीत असलेल्या त्या डोळ्यांनी माझ्या त्या नजराही टिपल्या, आणि “ अरे मी इथून बाहेर पडल्याशिवाय सूर्य उगवणार नाही.” एवढं बोलून स्वतःच हसू लागले आणि मी मात्र त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो... मग त्याचं हसून झाल्यावर, अत्यंत मार्मिक प्रश्न त्यांनी मला विचारला, “ लग्नाचा काही विचार केलायस का नाही ?” अनपेक्षित आलेल्या ह्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न मी केला “ आता, इतक्या लवकर अजून मी फार कोवळा आहे हो...” माझा हा प्रयत्न कश्या पद्धतीने फसला ह्याचं उत्तर “हम्म , म्हणजे प्रेमात पडलायस तर...” मी “नाही, नाही, असं काही नाही” असा केविलवाणा प्रयत्न करत होतो त्यांना समजावण्याचा पण “अरे असुदेत रे, होतं ह्या वयात प्रेम काही हरकत नाही, तुला सांगतो मी एकदा तालुक्याला कबड्डीच्या स्पर्धेला गेलो होतो....” इथपासून त्यांची स्वताची प्रेम कहाणी शुरू झाली....अर्थात त्यांच्या काळातली प्रेमकहाणी ऐकायला मजाच येत होती म्हणा...

शेवटी एकदाच्या आमच्या गप्पा संपल्या आणि ते स्वताहून निघू लागले, गप्पा फार रंगत होत्या पण , गप्पांच्या ओघात त्यांना कुठे तरी जायचं होतं ,ते विसरून गेले. मी आमच्या दोघांचा संपलेला चहाचा कप आत न्हेला, बाहेर पडवीत आलो, खुर्च्या बाजूला करत असतांना ,मला जमिनीवर दोन थेंब पडलेले दिसले. एका क्षणाचाही विलंब न लावता माझी नजर त्या हळू हळू चालणार्या देहाकडे गेल्या. मी लगेचच अंगणात गेलो , त्यांना हाक मारली, मागे वळून पाहण्या आधी त्यांचे दोन्ही हात हे त्यांचे डोळे पुसण्यासाठी डोळ्यांच्या दिशेने गेले. डोळे पुसून झाल्यावर त्यांनी माझ्या कडे बघितलं. पण त्यांचे डोळे हे अजूनही पाणावलेलेच होते. न राहता “ काका तुम्ही रडताय ?” असा भेटल्या पासूनचा दुसरा प्रश्न केला.

काका उत्तरले “आज बर्याच दिवसांनी मन मोकळं करून कोणाशी तरी बोल्लो ,मोठ्याने हसलो...आता बरं वाटतंय. तू मला नीट ओळखतही नाहीस , तरी सुद्धा माझ्या बरोबर गप्पा मारल्यास...देव तुला सदैव सुखी ठेवो.” असं बोलून ते निघून गेले. पण त्यांच्या ह्या शब्दांनी ते दृष्टी पलीकडे जाई पर्यंत माझ्या नजरा त्यांच्यावर रोखून धरल्या होत्या.

रघु काका दृष्टी पलीकडे निघून गेले, आणि इथून सूर्याची सकाळची कोवळी किरणं माझ्या देहावर पडू लागली. पण रघु काकांच्या शेवटच्या शब्दांत मी इतका गुंतून गेलो होतो, कि ज्या सूर्य किरणांची मी मगापासून आतुरतेने वाट बघत होतो , त्यांचा स्पर्शच जाणवत न्हवता.

हे सगळं घडत असतांना आतून आईचा आवाज ऐकू आला “आंघोळीचं पाणी तापलय, जातोयस ना रघु काकांच्या वर्ष श्राद्धाला ?” हा आवाज कानावर पडताच भानावर आलो. आणि रघु काका आता आपल्यात नाहीत. हे लक्षात आलं.

रघु काका. संपूर्ण पंचक्रोशीत आजही ज्याचं नाव सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून घेतलं जातं, आजही पंचक्रोशीतल्या तरुणांचा कबड्डी मध्ये हाच रोल मोडल असलेला व्यक्ती. रघुनाथ बाप्पाजी सुर्वे.

आयुष्याची सोबतीण काकांच्या वयाच्या साठीतच गेली. चार मुलं. चारही मुंबईला स्थाईक. वर्षातून गणपती आणि शिमगा ह्या सणांमध्ये हौशेने उगवणारी हि मुलं. लग्नानंतर आपलं एक गाव आहे तिथे एक वृद्ध पिता आहे, हेच बहुदा विसरूनच गेले होते. त्यामुळे आयुष्याची सोबतीण हि गेल्या पासून गेली वीस वर्ष ते एकटेच होते. सरकारी बॅंकेत असल्यांमुळे, निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मुळे त्यांना मुलांपुढे हात पसरवण्याची कधी गरजच पडली नाही. शिवाय लहान पाणी गायी- म्हशीचं कच्च दुध पिऊन मोठे झालेले, त्यामुळे रघु काकांना आजारपण शिवलेलही नाही.

अशे हे आमचे रघु काका. आज आमच्यात नाहीत. आणि मी एवढ्या गर्दीतनं मुंबईहून गावी आलो ते ह्याच रघु काकांच्या वर्ष श्राद्धाला.

आणि मग लक्षात आलं कि, मगाशी झालेली आमची भेट हि ताजी न्हवती किवा त्याचं भूत वगैरे न्हवत, तर दोन वर्षांपूर्वीची ती आमची शेवटची आणि इतकं दीर्घकाळ चाललेली भेट होती. त्यांच्या ह्या भेटीमध्ये त्यांना मी एक प्रश्न न राहता विचारला होता “काका तुम्ही आता एकटे असता, मग तुमचा वेळ कसा जातो हो ?” त्याचं उत्तर “कोण बोललं तुला मी एकटा असतो ते. माझं शेत, माझी कलमाची झाडं, काजूची झाडं हे सगळे आहेत कि माझ्या सोबतीला. मुलांची देखभाल करण्यात आयुष्य गेलं पण, मला मिळालं काय? एकटेपणा. पण माझी हि मुलं मात्र मला सांभाळून घेतायेत. अगदी कडक उन्हातही त्यांच्या सावलीत बसलो ना कि तुमच्या त्या मुंबईतल्या ए .सी. ला हि लाजवेल अशी हवा घालतात हि मुलं माझी. हा आता फरक फक्त एवढाच कि ज्यांना मी जन्म दिला ते शब्दाने बोलतात आणि ज्यांना माझ्या पूर्वजांनी जन्म दिला ते शब्दाने बोलत नाहीत, हा पण भावना मात्र समजतात.” त्यांचे हे शब्द ऐकून आपली पिढी कि किती क्रूरपणे वागतेय हेच जाणवलं.

तयार होऊन श्राद्धाला गेलो आणि बघतो तर काय अक्खी पंचक्रोशीच तिथे जमा झालेली. त्या गर्दीने एक गोष्ट शिकवली, कमवलेली गोष्ट ही एक दिवस जाते ,पण मिळवलेली गोष्ट ही आपल्या नंतरही टिकून राहते.

सगळं आटपून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो; हा प्रश्न मनात घेऊन, की आपण आपल्या आयुष्यात कमवतोय का काही मिळवण्याचा प्रयत्न करतोय? एक असा प्रश्न ज्याचं उत्तर हे कदाचित मी नसल्यावर, माझं वर्ष श्राद्धच देऊ शकेल......


Rate this content
Log in