STORYMIRROR

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

3.4  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Others

वादळातील दीपस्तंभ

वादळातील दीपस्तंभ

4 mins
363


   ज्यांच्या मनात काहीतरी मिळविण्याची आस आहे ते जीवनात काहीच गमावत नाही. नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित केल्यास ज्या गोष्टी प्राप्त होतात त्यातून एक नवी आशा कशी निर्माण करता येईल आणि समाजातील विविध पैलूंची उकल *वादळातील दीपस्तंभ* या काव्यसंग्रहातून सामाजिक दृष्टी असलेले कविवर्य अरुण हरिभाऊ विघ्ने (रोहना) यांनी केली आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले विघ्ने यांनी नितीवान पिढी घडवीत असतानाच सामाजिक बांधिलकीतून बरे-वाईट आलेले अनुभव आणि समाजातील विविधता वादळातील दीपस्तंभात शब्दबद्ध केली आहे. पक्षी या काव्यसंग्रहानंतर तब्बल १९ वर्षांनी वादळातील दीपस्तंभ हा त्यांचा प्रगल्भ चिंतनातून आलेला दुसरा काव्यसंग्रह. परिस पब्लिकेशन,पुणे,यांनी प्रकाशित केला आहे. त्यात एकूण ११० कविता समाविष्ट असून क.वि. नागराळे यांनी काव्यसंग्रहातील अंतरंग उलगडणारी प्रस्तावना मांडलेली आहे.प्रख्यात चित्रकार अरविंद शेलार यांनी काव्यसंग्रहाला जिवंत करणारे असे मुखपृष्ठ रेखाटले आहे.

    

बालपणापासूनच दुःख, विवंचनेत आणि परिस्थितीच्या चटक्याने होरपळून निघालेल्या कवीअरुण विघ्ने यांनी ग्रामीण जीवनशैली, बळीराजाची दैनावस्था, माता-पित्याची महती,स्त्री भ्रूणहत्या, महिला चा संघर्ष, गरीबाचे जीने, बालकामगार, स्वच्छता मोहीम,प्रदूषण मुक्तता,पर्यावरण संवर्धन,प्रेम कविता,अंधश्रद्धा इत्यादी काव्यसंग्रहातील बहुआयामी कविता मनाला भिडणाऱ्या आहेत.अंतर्मुख करणाऱ्या आहेत आणि नवी आशा आणि नवी दिशा देणाऱ्या आहेत शिवाय समाजातील वास्तव जिवंत करताना सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या परिवर्तनवादी समाजाचे प्रेरणास्त्रोत आणि भारत भूमीच्या रक्षणार्थ सीमेवर लढणाऱ्या सैनिका प्रती असलेली कृतज्ञता विविध कवितेतून या संवेदनशील कवीने विषद केली आहे. एकंदरीत हा काव्यसंग्रह समाजातील विविध घटकांशी संवाद साधणारा आहे.

   माता-पिता गरीब असो वा श्रीमंत असो आपल्या पाल्यांना तितक्याच पोटतिडकीने जपतो. पोटाला चिमटा बांधून बाहेरच्या जगातील स्पर्धेसाठी त्यास तयार करण्यास कसलीच कसर सोडत नाही.यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी स्वतः उपाशी राहतो अन पाल्याच्या गरजांची पूर्तता करतो. बापाची हीच तळमळ कवितेतून कविवर्य मांडतात. 


" *पंखाची आभाळमाया*  

*पांघरती त्यांच्यावरी*

*दोन घास भरवूनी*

*लेकराची पोटभरी!* "


   श्रीमंतीचा माज चढलेल्या वासनांध लोकांची गरिबा घरच्या पोरी बायका वर नेहमीच वाईट नजर ठेऊन असतात. जणू ती उपभोगाची वस्तू समजून ऐनकेन प्रकारे श्रीमंतीच्या जोरावर लाडी-गोडी लावून परिस्थितीने मजबूर बायकांना चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपल्या प्राणाहुन प्रिये शिलाला/ईभ्रतीला शाबूत ठेवण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या इज्जतदार महिलांचा संघर्ष *धाडस* या कवितेत मांडतांना म्हणतात ..!


  " *किती येवूदे संकटे*

    *भीक घालणार नाही*

   *अब्रू लांडग्या हातून*

   *खुडू देणार मी नाही* !"


    भारताने सर्वच क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवीत विकसित राष्ट्राच्या पंक्तीतील आपले स्थान मजबूत केले आहे. मात्र विकासाची ही प्रक्रिया कवींना सर्वव्यापक वाटत नाही. आजही कित्येकांना पोटभर अन्नाची तजवीज करण्यासाठी वणवण भटकावे लागते.ज्याचा कोणी वाली नाही अर्थात अनाथाची तर भयानक आणि विदारक अशी स्थिती आहे.इतराप्रमाणे जगण्यासाठी त्यांचीही धडपड असते मात्र परिस्थितीच्या मर्यादा त्यांना अवकुंठित करते. त्याबाबतचे जिवंत चित्र कविवर्य अरुण विघ्ने लिहितात की,


  " *जाव वाटते शाळेत*

   *खूप घ्याव ते शिक्षण* 

   *कोण देईल भाकर?*

   *पाटी-पुस्तक लेखन* !"


   भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषिक्षेत्राला बळकट करण्यासाठी बळीराजा राबराब राबतो.जिवाचे रान करतो. मात्र त्याच्या कष्टाला बळ मिळत नाही.याउलट चौफेर बाजूंनी त्यांचीच मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. पर्यायाने तो आर्थिक संकटात सापडतो.परिस्थितीशी झुंज आणि अतोनात कष्ट उपसनूही परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत जात असल्याने आत्महत्या सारखा मार्ग तो पत्करतो. बळीराजाच्या विदारक स्थितीचे वर्णन कवींनी दैना बळीची,कैफियत बळीराजाची,बँकेचे कामकाज, निसर्ग, कवडसा,

हरितक्रांती,उध्दवस्त वावरातले रस्ते,पाऊस इत्यादी कवितेत मांडलेले आहे. बळीराजाच्या अपार कष्ट नंतरही सावकारी पाश कसा कायम राहतो याबाबतची व्यथा मांडताना कविवर्य म्हणतात ...!


  " *येता सावकार घरी*

   *सर्व मिळकत नेतो*

   *नाही हातात काहीच*

   *कर्ज त्याचा जीव घेतो* !"


     महाराष्ट्र ही संतांची तसेच प्रबोधनकाराची भूमी आहे. अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्याना बाहेर काढण्यासाठी अनेक संतमंडळी तसेच प्रबोधनकारांनी आपले उभे आयुष्य वेचले आहे. मात्र आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा कवींना प्रकर्षाने दिसून येते.मनगटा पेक्षा माथ्यावर विश्वास ठेवणार्याची संख्या कमी नाही.म्हणून कविवर्य अंधश्रद्धेवर प्रहार करताना म्हणतात ..!


    " *शिक्षितांनी पडू नये*

    *व्यर्थ या अंधश्रद्धेत*

    *होई विकास तुमचा*

    *जोर ते मनगटात* !"


   साहित्याच्या सर्वच प्रकारात जगाने आईची महती वर्णिली आहे.संबंधित कवी सुद्धा त्यास अपवाद नाही. मात्र मायेच्या सागरात बाप हा नेहमीच उपेक्षित राहिला आहे. कवीं अरूण विघ्ने यांनी आई बरोबरच बाप स्वाभावणे कठोर आणि मनाने तितकाच हळवा असलेल्या बापालाही तितकेच महत्त्वाचे स्थान दिले आहे.

   

" *वेळ पडल्यास स्वतः*

    *लेकराची माय होतो*

    *आयुष्यात चालताना*

   *लंगड्याचा पाय होतो !*"

  

    पौंगडावस्था म्हणजे जीवनातील महत्त्वाचा संक्रमण काळ होय.शारीरिक वाढ व भावनिक संघर्षाचा हा काळ असतो. सखा-सखी एकमेकांप्रति आसुसलेले असतात. मुला-मुलींच्या या भावना व्यक्त करण्याच्या हेतूने कविवर्य विघ्ने यांनी प्रीत तुझ्यावर जडली, फक्त तुझी साथ हवी, पारध,मेहंदीच्या पानावर, काय पाहिलत माझ्यात, तुझा गंध,वाटा,मोरपंखी स्पर्श,सखे,तू पुन्हा येऊ नकोस, प्रेमा तुझा रंग कसा,प्रेम,तू तिथे मी इत्यादी कवितेच्या माध्यमातून प्रीतीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सखा-सखीच्या प्रेमासाठी आसूसलेल्याना सावधानतेचा इशारा देण्यास मात्र ते विसरले नाहीत.


   *जगावे तसे बिनधास्त* "

  *पण हा बिनधास्तपणा आयुष्य उध्वस्त* *करणारा नको-------!*"


    स्त्री आणि पुरुष ही समाज रथाची दोन चाके आहेत. सुदृढ आणि निरोगी समाजाच्या जडणघडणीसाठी स्त्री-पुरुष प्रमाणाचा समतोल नैसर्गिक रित्या राखणे आवश्यक आहे. मात्र अलीकडच्या पुढारलेल्या काळात मुलीचे घटते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे.त्यातच स्त्रीभ्रूणहत्या सारखा घृणास्पद प्रकार अधिकच गंभीर बनला आहे. म्हणून समाजाने चिंतन करावे यासाठी कवी म्हणतात ...!


   " *नका करू भ्रूणहत्या गर्भि तिची*

  *करा सुरक्षा जन्माला येताच तिची* ! "


   डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक,आर्थिक,राजकीय अशा विविध क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणली आहे. हजारो वर्षे दारिद्र्य व विवंचनेत खितपत पडलेल्या उपेक्षित वर्गांना नव्या ऊर्मीने जगण्याचे बळ दिले.सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासाची द्वार खुले केले आहे.म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आंबेडकरी विचाराचे पाईक असलेले कवी लिहितात ...!


  " *तुम्हीच आमच्यात माणूस पेरला*!

   *तुम्हीच आमच्यात निखारा हेरला*!

   *तुम्हीच दिला बुध्द आणि धम्म*!

   *तुम्ही अंधारातल्या प्रकाशवाटा झालात!*

  *तुम्हीच दिला पेन आणि कागद!*

  *तुम्हीच पंख देऊन उडायला* *शिकविलत !* "


   एकंदरीत हा समग्र काव्यसंग्रह समाज प्रबोधन करणारा आहे. समाजातील विविध अंगांना हात घालताना त्यातील केवळ उणिवा दाखवून थांबले नाही तर त्यावर उपाय सुद्धा सुचविले आहेत. निकोप आणि समृद्ध समाजव्यवस्था घडविण्यासाठी/ समाजाशी संवाद साधण्यासाठी वादळातील दीपस्तंभ निश्चितच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. परिवर्तनाची आस आणि समाज प्रबोधनासाठी पेटलेल्या कविवर्य अरुण विघ्ने यांच्या कार्याला सलाम! आणि भविष्यातील समृद्ध वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


Rate this content
Log in