उंची
उंची
आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात माझी देवाकडे एकच तक्रार होती की त्याने मला उंची दिली नाही. ती जर त्याने मला दिली असती तर कदाचित माझ जीवन आता आहे त्यापेक्षा खुपच वेगळ असतं. त्या उंचीचा माझ्याकडून दुरुपयोग झाला असता म्ह्णूनच कदाचित देवाने मला उंची न देण्याची काळजी घेतली असावी. शेवटी प्रत्येक माणसाची एक नाडी देवाच्याच हातात असते यावर त्यामुळेच तर माझा विश्वास बसला आहे. भुतकाळात मागे वळून पाहिल्यावर माझ्या लक्षात आले मी उंचीमुळे काय काय गमावले आहे ते. एखादया मुलीने एखाद्या मुलाच्या प्रेमात पडायला आवश्यक असणार्या जवळ - जवळ सर्व उंच्या माझ्याकडे होत्या फक्त एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे उंची ! आतापर्यंतच्या माझ्या अभ्यासाअंती एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे ‘भुतकाळात मी ज्यांच्या ज्यांच्या प्रेमात पडलो होतो त्या सर्व तरुणींनी माझ्यापेक्षा उंच असणार्या तरुणांशी विवाह केला होता. माझ्याकडे जर उंची असती तर त्यापैकी एकीच्या नवर्याच्या जागी कदाचित मी उभा असतो. आमचं दुर्दैव आणखी काय ? देवाने आम्हाला सारंच भरभरून दिल त्यात गरिबीही आलीच ! दिली नाही ती फक्त उंची ! खिशात पैसे जड झाल्यावर बाजारातून कोणती गोष्ट प्रथम विकत घ्यावीशी वाटली असेल तर ती होती उंची ! पण आमच्या दुर्दैवाने ती बाजारात विकत मिळत नाही. सायकल चालवून उंची वाढते असा उपदेश कोणीतरी केला होता म्हणून मी फारपूर्वी सायकल चालविण्याचा प्रयत्न केला होता पण त्या प्रयत्नांचा फारसा उपयोग झाला नाही कारण त्यामुळे उंची तर वाढली नाही पण अंगाची सालंच जास्त निघाली. त्यानंतर सायकल चालवण बंद झाल ते कायमच त्यानंतर मोटार घेण्याची ऐपत असतानाही ती विकत घेऊन चालविण्याची हिमंत काही आमच्याच्याने अजूनही झालेली नाही.
बहुसंख्य मुली ( भारतातील ) आपल्यापेक्षा उंचीने जास्त असणार्या मुलाच्या प्रेमात अगदी सहज पडतात कारण त्यांना प्रेमात पडून लग्न करायचं असतं म्ह्णून असेल कदाचित ! त्यामागील शास्त्रीय कारण शोधण्याच्या मी भानगडीत अजूनतरी पडलेलो नाही आणि त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटतही नाही. घरात उंचावर ठेवलेल्या वस्तू स्टूलावर उभा न राहता काढणारा नवरा भारतीय तरूणींना कदाचित हवा असतो. उंच मुली आमच्या उंचीची चेष्टा करतात त्याचे काही वाटत नाही पण आमच्यापेक्षा उंचीने कमी असणार्या मुली पण करतात. त्याचे काय ? कधी – कधी या उंचीच्या न्युनगंडातून माझ्या मनात विचार येतो की माझा जन्म जर अशा एखाद्या अशा देशात झाला असता जेथे सारेच पुरुष टेंगू आणि बायका उंच असतील ? आज बाजारात उंची विकत मिळत नसली तर ती वाढविण्याची बरीच साधने आणि औषधे मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांची जाहिरातही भरमसाट केली जाते. तेंव्हा लक्षात येते की जगभरात या उंचीच्या न्युनगंडाने किती लोक पछाडले असतील याची. माझ्या लहानपणी लोक मला सुकड्या म्ह्णायचे कारण तेंव्हा मी काटी सारखा सडपातल अर्थात आजच्या भाषेत ‘झीरो फिगर’ होतो. मुलगी असतो तर नक्कीच मॉडेल झालो असतो. पुढे आमचं कुटुंब सदन झाले आणि त्या गोष्टीतील म्हातारीसारखा मी तुप – रोटी खाऊन जाडजुड झालो. आता पूर्वीपासून मला सुकड्या बोलण्याची सवय आहे त्यांच्यावर लोक हसतात. लहानपणी उंची बाबतच न्यूनगंड माझ्या मनात नव्हता कारण त्यावेळी माझ्या जीवाला जीव देणार्या माझ्या बर्याच मैत्रीणी होत्या. त्या सारख्या माझ्या मागे – पुढे घुटमळायच्या कारण शारिरीक उंच
वगळता इतर कोणत्याच उंचीत त्या माझी बरोबरी करू शकत नव्हत्या. उंचीबाबत माझ्या मनात खर्या अर्थाने न्यूनगंड तेंव्हा निर्माण झाला जेंव्हा माझी उंची न पाहता माझ्या प्रेमात पडलेल्या माझ्या प्रेयसीचे लग्न माझ्यापेक्षा उंच असणार्या तरूणासोबत झालं. मी तिच्यासोबत लग्न न करणार्या माझ्या शारिरीक उंची व्यतीरीक्त असणार्या इतर उंच्या कारणीभूत होत्या हे वेगळे ! लग्नाच्या बाजारात स्वतःला विकायला काढल्यावरच मला खर्या अर्थाने उंचीची किंमत लक्षात आली. प्रेमाच्या बाजारात मी अनेक वेळा विकला गेलो होतो पण तेंव्हा मला माझी उंची कधीच आडवी आली नव्हती. माझ्याबाबतीत असं बर्याचदा होत की माझ्यापेक्षा उंच असणारी मुलगी माझ्या प्रेमात पडते पण पाऊल पुढे टाकायला घाबरते माझ्या उंचीमुळे ! मला कळत नाही एखादा मुलगा आपल्यापेक्षा कमी म्ह्णजे निम्म्या उंचीच्या मुलीच्या प्रेमात पडला तरी चालतो पण एखादी उंच मुलगी आपल्याकडे एखाद्या उंचीने कमी असणार्या मुलाच्या प्रेमात पडली की लोकांच्या भुवया उंचवतात. लग्न ठरविताना आजही वधू – वरांच्या उंचीला प्रथम प्राधान्य दिल जात हे चित्र आतातरी कोठेतरी बदलायला हवं ! वर वधूपेक्षा किंचीत उंचच असावा हा अट्टहास आता समाजाने सोडायला हवा ! खासकरून तरुणींनी ! तस नाही झालं तर आमच्यासारख्या कमी उंची असणार्यांची लग्ने कशी होणार ? स्वर्गातून येईलही कदाचित कोणी आमच्याशी लग्न करायला पण तोपर्यंत आम्ही म्हातारे झालेलो नसलो म्ह्णजे मिळवली. कमी उंचीच्या न्यूनगंडाने पछाडलेल्या तरुणांची संख्या आपल्या देशात फार असावी असं मला वाटत कारण आपल्या देशात पुरुषांच्या कमी उंचीवर अक्का चित्रपटही तयार होतो. माझी उंची सोडून मी आता जगाच्या उंचीचा विचार करू लागलो इतकी माझ्या विचारांची उंची आता वाढलेली आहे. माझ्या विचारांची उंची इतकी जास्त होती की ती आता कोणाला दिसतही नाही.
कित्येक दिवसांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडलो. हल्ली विद्रुप मुलीच्या प्रेमात पडण्याइतके मोठे काळीज कोणाकडे नसते शक्यतो ! इतरवेळी मी प्रेमात पडण्यासाठी माझ्यापेक्षा उंचीने कमी असणार्या मुली शोधत असे पण यावेळी नवीन प्रयोग करून पाहावा म्ह्णून मी माझ्यापेक्षा उंचीने जास्त असणार्या मुलीच्या प्रेमात पडलो. मुलगी सर्वगुणसंपन्न वैगरे होती म्ह्णजे जीन्स आणि टी - शर्ट ऐवजी नेहमी सलवार कमीज परिधान करत होती. अधून – मधून प्रवासात, रस्त्यात, बाजारात आणि येता - जाताना ती माझ्याकडे चोरून पाहात होती. आमची रोजची नजरा – नजर तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आली होती. त्यामुळे तिने तिला माझ्यावरून चिडवायला ही सुरुवात केली होती. पण तरीही आमच्या दोघांच्या मधे एक अदृष्य भिंत उभी होतीच उंची नावाची ! तिचा प्रेम स्वीकारायला मी केंव्हाही तयार होतो कारण मला माझ्याहून सर्वच बाबतीत उंच असणारी प्रेयसी चालणार होती म्ह्णजे मला ती तशी हवी होती. माझ्यावरील तिचं प्रेम प्रथम तीने व्यक्त करावं असं मला वाटत होत कारण उंचीबाबत माझ्या मनात जो काही थोडा न्यूनगंड होता तो त्यामुळेच दूर झाला असता. माझ्या मनातील उंची बाबतच्या न्यूनगंडावर तिच्याकडे औषध होते. ते औषध तिच्याकडून मला मिळेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. तरी मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की माझी होणारी पत्नी माझ्यापेक्षा किंचित का होईना पण उंचच असेल कारण मला झालेल्या उंची नावाच्या आजारावर तिची उंची हेच औषध असणार आहे.