टुरिस्ट
टुरिस्ट
सकाळी सातच्या सुमारास मुंबईहून येणारी ट्रेन औरंगाबादला पोहोचली. जेम्स आणि अॅना दोन्ही हातात बॅगा घेऊन रेल्वेतून उतरले. गर्दीतील लोटालोटीमुळे त्यांचा चेहरा त्रासिक झाला होता. ती दोघे भारताच्या संस्कृतीचा गेली अनेक वर्षांपासून अभ्यास करीत होती. दोघेही भारतीय संस्कृतीचे निःस्सिम चाहते आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ग्रामीण भारताविषयी त्यांचे मत आजही कायम आहे. `इव्हन रुरल पीपल आर रफ बट कल्चरली व्हेरी गूड’ देशातील विविधता हा जेम्स व अॅनाच्या कुतूहलाचा, कौतुकाचा आणि उत्सुकतेचा विषय आहे. भारतातील लोकांच्या भाषा व सांस्कृतिक वैविध्याचे, राहणीमानाचे आणि जीवनशैलीतील वैविध्याचे कुतूहल औत्सुक्य चेहऱ्यावरुन स्पष्ट जाणवत होते. कुतूहल आणि किंचीत भिती या भावना जेम्स आणि अॅनाच्या नजरेतून तरळत होत्या. चाळीस वर्षीय जेम्स निकोलस आणि पस्तीस वर्षीय अॅना निकोलस यांचा उत्साह मात्र विशीतील तरुण – तरुणींसारखा सळसळत होता. जेम्स आणि अॅना रेल्वे स्टेशनातून बाहेर आले. त्यांच्या जवळील मोबाईल फोनवरुन हॉटेलमधील राहण्याच्या व्यवस्थेविषयी चौकशीकरुन खात्री करुन घेतली. सर्व काही ठरल्याप्रमाणे होत आहे, याची खात्री झाल्यावर एकमेकांकडे पाहून समाधानाने विशिष्ट स्मित केले. स्टेशन समोरील हातगाड्यांवरील चहा विक्रेता आणि त्याच्या भोवतीची ग्राहकांची तसेच, चहाच्या चाहत्यांची गर्दी त्यांच्या कुतूहलाचा विषय ठरला होता.
`लेटस् हॅव ए टी’ म्हणत ती दोघे त्या चहाच्या गाड्याकडे गेली. चहावाल्याने `टेन रुपीज् वन ग्लास बादशाही स्पेशल’ सांगून दोन ग्लास जेम्स आणि अॅनाच्या पुढे धरले. `ओह ! नाईस !’ असे पुटपुटत त्यांनी चहाच्या गोड व गरमपणाला दाद देत भुवया उंचावत चहा घेतला. दरम्यान जवळपास थांबलेल्या अॅटोवाल्याला `रामा इंटरनॅशनल’ सांगून चार बॅगा कशाबशा ठेवून अॅटोत बसले. चालू अॅटोतून ती दोघेही कुतूहलाने बाहेरचे विश्व पाहत होते. ऑगस्टचा महिना असल्यामुळे पावसाची अचानक रिमझिम सुरु व्हायची अन् लख्ख ऊन पडायचे. त्यामुळे त्यांच्या तोंडून `ओह ! नाईस !’ हे शब्द अलगद बाहेर पडायचे. शाळेला जाणारे युनिफॉर्ममधील विद्यार्थी, पेपरवाले, दुधवाले, भाजीवाले यांच्याशिवाय रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. क्रांतीचौकातील शिवाजी महाराजांच्या रुबाबदार पुतळयास वळसा घालून अॅटो रामा इंटरनॅशनल हॉटेलसमोर थांबला. जेम्स आणि अॅना सामानासह दोघेही अॅटोतून उतरले. सहा फुटावरील जेम्सने वाकुन अॅटोचे मीटर पाहिले. अॅटोवाल्याने हसून रेटचार्ट दाखवून किराया घेतला. पैसे देऊन त्याने गुडघ्याइतक्या पँटमधील खिशात पाकीट व्यवस्थित ठेवले. त्या दोघांनी विशिष्ट समाधानाने एकमेकांकडे पाहून स्मित केले. बॅगा घेऊन हॉटेलात प्रवेश केला. प्रवासाचा थकवा घालविण्याकरिता त्यांनी दिवसभर हॉटेलात विश्रांती घेतली.
ठरल्याप्रमाणे ते दुसरे दिवशी एलोरा केव्हज् पाहण्याकरिता जाणार होते. सकाळ खूपच प्रसन्न उगवली होती. दोघांनीही आपला विशिष्ट पोशाख परिधान केला होता. गुडघ्यापर्यंतच्या हाप पँटस् आणि त्यावरील बिना कॉलरचे जॅकीटसारखे शर्ट, अॅनाने लिपस्टीक जरा जास्तच भडक लावली होती. तिच्या गोऱ्या रंगास आणि भुरभुरणाऱ्या सोनेरी खांद्यावर रूळणाऱ्या केसांना तिचा पेहराव खूपच आकर्षक वाटत होता. त्यांच्या डोळ्यांवरील सनगॉगल, पाठीवरील खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटल्यांनी भरलेली प्रवासी बँगज्...... काखेतील फोटो कॅमेरा .... या सर्वांमुळे अस्सल विदेशीपण उठून दिसत होते. `विदेशी पर्यटक’ या दोनच शब्दांनी त्यांचे पुरेपुर वर्णन करतांना कुणालाही आवडेल असेच दिसत होते ते ! अॅटोने ते बसस्टँण्डवर पोहेचले.
बसमध्ये सीटच्या साईझमध्ये दोघेही हात – पाय आखडून बसले. सर्व काही व्यस्थित होत आहे, याचा आनंद त्या दोघांच्याही चेहऱ्यांवरुन ओसंडून वाहत होता. दोघांनी समाधानाने एकमेकांकडे पाहून विशिष्ट स्मित करुन पुटपुटले `इटस् ओके !’
आजचा दिवस पोळ्याच्या सणाचा होता. वेरुळच्या वाटेवरील छोट्या गावातून सणांचा उत्साह दिसत होता. साचलेल्या पाण्याच्या तात्पुरत्या तलावात काहीजण बैलांना धुत होते. जेम्स आणि अॅना दोघेही कुतूहलाने बाहेरील दृश्य पाहत होते. वळणदार चढाचा रस्ता, हिरवीगार गर्द हिर
वळ, एका बाजूला दिमाखदार भव्य देवगिरी किल्ला जेम्स आणि अॅना श्वास रोखून वाकुन पाहत होते.
`इटस् फोर्ट... नाईस..... अॅनसेस्ट्रल इंडिया’ असे जेम्स सांगत होता.
बस कंडक्टरने `देवगिरी फोर्ट’ असे त्यांच्या जोरदार आवाजात त्यांनी माहिती दिली.
`ओह यस ! ओह यस !’........म्हणत दोघेही कृतज्ञतापूर्वक कंडक्टरकडे पाहत होते.
वेरुळ आले. जेम्स आणि अॅना बस मधून उतरले. वेरुळच्या दिसणाऱ्या लेण्यापाहून दोघेही त्या दिशेने जाऊ लागले. वाटेत त्यांनी वीस रुपयांचे खुरमुरे घेतले. खुरमुरेवाल्याने त्यांना शेकहॅण्ड केला. त्यांनी खुरमुरेवाल्याचा फोटो काढला. जेम्स आणि अॅना या दोघांनाही खूपच उत्साह वाटत होता. त्यांनी आनंदून परिसराचे व निसर्गाचे फोटो काढण्यास सुरुवात केली. खुरमुरेवाल्याने जेम्स व अॅनांना सोबत गाईड दिला. गाईड म्हणजे २०-२२ वर्षाचा चुणचुणीत तरुण होता. प्रत्येक लेणी जेम्स आणि अॅनाने खूपच अभ्यासपूर्वक निरखून पाहण्यास सुरुवात केली. प्रचंड शिल्पकलेबद्दल ती दोघे आश्चर्यचकित होऊन लेणी पाहत होती. स्कल्पचरस् स्टॅच्युज ऑफ बुध्दाज् , महावीराज् , कैलास टेंपल पाहून जेम्स व अॅना हरखून गेले होते.
अधूनमधून खुरमुरे खात होते. हिरवी गार गर्द वनश्री, पहाडातून सळसळणारे छोटे – छोटे धबधबे .... या सर्वात रमलेल्या जेम्स आणि अॅनाला सायंकाळचे पाच केव्हा वाजले हे कळलेच नाही.
एव्हाना बसस्टॅण्डजवळील गावाचा पोळा ऐन रंगात आला होता. औरंगाबादला परतण्याकरिता जेम्स आणि अॅना बसस्टॅण्ड थांबले होते. गाईडने अद्यापपर्यंत त्यांना सोडले नव्हते. समोरुन जाणाऱ्या पोळ्यांच्या रंगीबेरंगी बैलांच्या मिरवणुकीबद्दल गाईड सविस्तर माहिती जेम्स आणि अॅनाला सांगत होता. सुशोभित बैलांच्या मिरवणुकीकडे दोघेही मोठ्या उत्सुकतेने पाहत होते.
अॅना लहान मुलीप्रमाणे आनंदाने उड्या मारीत होती. ``गॉड बूलक्स गॉड बूलक्स’’ असे ओरडू लागली. जेम्स पोळ्यांच्या रंगीबेरंगी झुलीतील बैलाचे फोटो काढीत होता. गाईड पोळ्याबद्दल हळूहळू माहिती सांगत होता. त्यांच्या तोंडून नाईस !..... हाऊ नाईस ! शब्द बाहेर पडत होते.
मुख्य पोळ्याच्या बैलांच्या मिरवणुकीनंतर छोट्या मुलांचा बालपोळा म्हणुन वासरांची मिरवणूक खूपच आकर्षक व मजेदार वाटत होती. बाळ पोळ्यातील मुलं पारंपारिक गाणी म्हणत होती.
शिंगे रंगविली
बाशिंगे बांधली
चढविल्या झुली ऐनेदार
राजा परधान्या रतन दिवाण्या........
रंगीबेरंगी रंगविलेली वासरे आणि आणि त्यांचे रंगीत गोंडे, रंगीत झूली, जेम्स आणि अॅनाला खूपच आवडल्या. त्यांनी गाईड मार्फत बेलांचे रंगीत गोंडे मागवून घेतले. बॅगमध्ये व्यवस्थित ठेवले. त्यांनी गाईडच्या हातावर शंभराच्या दोन दोन नोटा ठेवल्या. त्या दोन नोटा पाहून गाईड खूप खुष झाला. गाईडने त्यांना सॅल्यूट केला. बस स्टॅण्डवरील स्टॉलवर कोल्डिंक जेम्स आणि अॅना पित होते. ``आर ऑल बुलक्स गॉड टूडे ?’’ अॅनाने जेम्सला विचारले. पुन्हा दोघे पोळा पाहण्यात रमले. ``यस इंडिया इज मल्टी कल्चरल कन्ट्री’’ जेम्स उत्तरला. औरंगाबाद जाणार बस आली. ते बसमध्ये बसून औरंगाबादला आले. दोघांनी विशिष्ट समाधानाने एकमेकांकडे पाहून स्मित केले. हॉटेलवर आल्यावर ते प्रवेश झाले.
रात्री जेवण करीत झालेल्या पर्यटनाबद्दल ती दोघे चर्चा करीत होते. जेवण संपवून विश्रांतीसाठी त्यांनी बिछान्यावर अंग सैल सोडले.....त्यांना काही क्षणातच झोपा लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अॅना व जेम्स जागे झाले. दोघांनी विशिष्ट समाधानाने एकमेकांकडे पाहून स्मित केले. `गुडमॉर्निंग......!’ `गुडमॉर्निंग......!’ म्हणून त्यांनी एकमेकांना अभिवादन केले. दोघेही अंथरुणातून बाहेर आले. जेम्स बाथरुमध्ये गेला, फ्रेशहोऊन आला. हातातील टूथब्रश नॅपकीनने कोरडा करीत होता. खोलीत अॅना बैलांचे गोंडे बांधून आनंदाने नाचत होती. समोरील आरशात पाहत होती.
शिंगे रँग्वीली
बॅशिंगे बांधली
चढविल्या झुल्ली ऐनदाँर
रॉजा परधान्याँ..........
रॅतन दिवान्या........
जेम्सनेही बैलांचे गोंडे बांधले. तोही गाऊ लागला.......
रॉजा परधान्याँ..........
रॅतन दिवान्या........