विवेक द. जोशी

Others

4.5  

विवेक द. जोशी

Others

"एका कवीची गोष्ट'

"एका कवीची गोष्ट'

21 mins
2.0K‘‘वेडी गं वेडी... अगं हे सर्व यश तुझ्यामुळे दारी आलंय’’

पुढे ठरल्याप्रमाणे प्रकाशन समारंभ झाला. काव्यसंग्रहास चांगली प्रसिध्दी मिळाली...! राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला... !

पुरस्कार घेताना कवीने हा पुरस्कार जोडीने घेऊ म्हणून.... पुरस्कार घेण्यासाठी मला स्टेजवर बोलविले.

‘‘हा पुरस्कार तुझाही आहे राधिका, लवकर ये. हा पुरस्कार घे’’

तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. तेव्हा कवी म्हणाला,

‘‘हम अल्फाजों को ढूँढते रह गये

और वो आँखों से गजल कह गये’’

मी राधिका एका कवीची गोष्ट सांगतेय. या पुरस्काराच्या पाश्र्वभूमीवर ही गोष्ट सांगणे निश्चितच मला गरजेचे वाटत आहे.

माझं लग्न आशयशी ठरलं होतं. घरात आनंदाचं वातावरण फुललं होतं. पुढे तिन महिन्यानंतर वाङ्निश्चय (साखरपुडा) झाला. तेव्हा आशय पनवेलला बँकेत नोकरी करीत होता. मी राधिका रमाकांतराव राजवाडे रा. तळेगाव (जि. पुणे) येथील द्वारकापुरीत आई, वडील आणि भावंडांसह राहत होते. मी घरी असताना एके दिवशी सुंदर लिफाफ्यातून एक पत्र आलं. मी पत्रामागील पत्ता पाहिला. त्यावर लिहिले होते, आशय वाईकर, पनवेल, जि. रायगड. मी आतुरतेने पत्र उघडले. ‘‘पुढील रविवारी तळेगावला येतोय. आपण बाहेर फिरायला जाऊ या. मोकळेपणाने गप्पा मारता येतील.’’ असा काहीतरी मजकूर होता. त्यापत्रात एक छान प्रेम कविता लिहिलेली होती... ! त्या कवितेखाली कवी आशय वाईकर पनवेल असे लिहिले होते. हे माझे भावी पती आशय लक्ष्मीकांतराव वाईकर ‘‘कवी’’ आहेत वाचून धक्काच बसला. कारण मी शाळेत आणि महाविद्यालयात अभ्यासाशिवाय कविता वाचलेली नव्हती. मला साहित्याची मुळीच आवड नव्हती. सध्या मी ज्या महाविद्यालयात बी.एस्सी. (मॅथ) करीत होते; त्या छत्रपती राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य विनायकराव देव हे मराठी साहित्यातील एक मोठे लेखक आहेत. एवढीच मला माहिती होती. देव सरांच्या कादंबऱ्या, कथा संग्रह आणि ऐतिहासिक पुस्तकांबद्दल मला आशय कडूनच माहिती मिळाली. ‘‘एकंदरीत तुमचे प्राचार्य सुप्रसिध्द कादंबरीकार, कथाकार आणि इतिहास संशोधक आहेत’’ असे आशय बोलताना सहज देव सरांबद्दल माहिती सांंगुन गेला. आमच्या लग्नाला तीन महिने अवकाश होता. माझ्या आणि आशयच्या भेटीगाठी वाढत गेल्या. प्रत्येक भेटीत तो मला साहित्य, साहित्यिक, वाचन आणि कवितांबद्दलच बोलत होता. मला खरं तर साहित्य या विषयात मुळीच गती नव्हती. मी विषयांतर करुन सिनेमा – गाण्यांबद्दल बोलण्यास आशयला भाग पाडीत असे. आशयला मराठी भावगीते तसेच हिंदी चित्रपट गीतांचीही आवड होती. मराठीतील नव्या जुन्या गीतकार, कवींसोबत हिंदीतील गुलजार, जावेद अख्तर, साहिर लुधियानवी इत्यादी गीतकार आशयचे आवडते होते. 

आशय वाईकर एक चांगला कवी आहे हे त्याने लग्नानंतर पाच कविता संग्रह प्रकाशित करुन सिध्द केले होते. त्याची साहित्याची जाण, साहित्याची आवड आणि माझे साहित्य विषयक अज्ञान, अनास्था यामुळे त्याचे आणि माझे वाद होत असत. लग्नानंतर ही सुट्टीच्या दिवशी सकाळचा चहा-नाश्ता झाला की आशय एका खोलीत स्वत:ला बंद करुन कविता लिहीत बसे. स्वत:च्या मनासारखी कविता लिहून झाल्याशिवाय तो मला बोलत सुध्दा नसे. तसेच त्याला घरात आवाज झालेला सुध्दा चालत नसे. तो लगेचच चिडत असे. आशय साहित्य आणि कवितेत खूपच रमला होता. 

मला त्यावेळी माझ्या भावाचे आणि धाकट्या बहिणीचे लग्न हेच विषय जिव्हाळ्याचे होते. माझ्या माहेरचा नातेवाईकांचा गोतावळा बऱ्यापैकी मोठा होता. तीन मामा, दोन मावश्या, एक आत्या आणि त्यांचा परिवार माझ्या माहेराशी एकरुप झालेला होता. खरं तर या सर्वांना मिळूनच आमचं एक कुटूंब झालेलं होतं. मामा, मावशी, जमीनदार, बागायतदार सधन होते. त्यांच्या मुलामुलींचे लग्नकार्य थाटामाटात करणे हाच विषय सतत चालू असे. एकाचे लग्न झाले की आता कुणाचा नंबर ? हीच चर्चा आणि लग्नाची कामं सतत सुरु असत. माझ्या मैत्रिणीचा गोतावळाही मोठा होता.

मला माझे नातेवाईक त्यांच्या मुलामुलींची लग्न या विषयी आशयशी खुप बोलावसं वाटायचं. आमच्या लग्नानंतर सुरुवातीच्या काळात आशय माझ्या माहेरच्या गप्पा खूप शांतपणे ऐकून घेतही असे अन् जमेल तेव्हढं बोलतही असे.

माझ्याशी बोलताना मला आशय खूपच स्वप्नील वाटायचा. तो मराठी – हिंदी गीतांबद्दल, कवी–कवयित्रीं बद्दल उदा. शांता शेळके, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर, ग्रेस, आरतीप्रभू अशा प्रकारच्या कवी आणि त्यांच्या कवितांबद्दल भरभरुन बोलत असे. तसेच गायक गायिका चित्रपटांच्या नायक नायिकांबद्दलही भरभरुन बोलत असे. 

गायक-गायिका लता मंगेशकर परिवारांची गाणी, किशोरकुमार, महम्मद रफी, मुकेश, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, येसूदास अन् गुलजार, साहिर लुधियानवी, गालिब, आनंद बक्शी, सागर सरहदी या शायरांबद्दल ही मनःपूर्वक बोलायचा. गाणी, गायक – गायिका, गीतकार, संगीतकार, चित्रपट हा आशय आणि माझ्यातील बोलण्याचा दुवा म्हणा किंवा कॉमन विषय असायचा.

तो त्याच्या घरातील व्यक्तींविषयी फार कमी बोलायचा. तसे त्याच्या घरचे सर्व चांगले खात्यापित्या घरचे होते. वडीलोपार्जित इस्टेटीच्या वादातून त्याचे चुलतमालत नातेवाईक दुरावले-दुखावलेही होते. असे काहीतरी तो बोलायचा. ‘‘लग्नकार्याला, सुख–दुखःला येतात एकत्र - हे ही नसे थोडके..’’ असे बोलून शांत बसायचा.

नातेसंबंधांचे विधिलिखित खूपच दैवी-विचित्र असते असे काहीतरी म्हणायचा..!

म्हणायचा, ‘‘राधिका, मी दहावीनंतर ग्रॅज्युएशन पर्यन्तचे शिक्षण हॉस्टेलवर राहून घेतले ! ग्रॅज्युएशन नंतर नोकरी लागली. मी माझे कुटूंब आणि कुटूंब संस्था या पासून जीवनात फारच लवकर दूर गेलो... मित्र, पुस्तक, साहित्य आणि गाणी हेच माझ्या कुटूंबाचे घटक झाले होते’’ !

माझ्या माहेरचे नातेवाईक जवळपास सर्वच नोकरीत असल्यामुळे त्यांचे चाकोरीबध्द आयुष्य झालेले होते. त्यामुळे नातेवाईकांचं आयुष्य एक ठराविक रुटीन आयुष्य होतं. त्याबद्दल काय बेलावं हा आशयला नेहमी प्रश्न पडू लागला. नेहमी प्रश्न पडू लागला.

माझ्या प्रमाणे माझ्या माहेरचे नातेवाईकही कौटूंबिक आयुष्यात रमलेले होते. लग्न, मुंज (व्रतबंध), बारशे, डोहळ जेवणाचे कार्यक्रम यातच रमलेले होते. लग्न, मुंज, त्यांची मुलं स्वत:चे घर हेच नातेवाईकांचे कौतुकाचे विषय आणि चर्चेचेही विषय असत.

त्यामुळे आशयला वारंवार प्रश्न पडू लागला, यांच्याशी काय बोलावं ? यामुळे नातेवाईक याविषयावरुन माझे आशयशी वाद होऊ लागले. नातेवाईकांना साहित्य, कला, अभिनय, संगीत या विषयात फारशी गती नव्हती. फार तर ते चित्रपट आणि टी.व्ही. वरील मालिकांबद्दल बोलत असत. विविध वाहिन्यांवरील मालिका अत्यंत लग्नाळू आणि घरगुती भांडणांनी बरबटलेल्या असल्यामूळे आशयला मालिकांत फारसा रस नव्हता.

तसा आशयला वाचन आणि लिखाणातून टीव्ही पाहण्यासाठी फारसा वेळ मिळत नसे. क्रिकेट, बातम्या कधी कधी गाणी या करीता आशय फक्त टीव्ही पाहत असे. तो ही फार तर अर्धा तास !

आशय कॉलेजात स्नेह सम्मेलनाच्या सांस्कृतिक स्पर्धात अग्रेसर होता. त्याच्या समकालीन मित्रमंडळात (उदा. पराग, समीर, धनंजय, चंद्रकांत इ.) बराच लोकप्रिय होता. १९८५ साली त्याच्या मूलचंदजी जेठा महाविद्यालयाच्या वार्षिकांकाचा तो मराठी विभागाचा संपादकही होता. त्याला कविता आणि निबंध लिखाणात सातत्याने पारितोषिके मिळत होती. त्यामुळे त्याचा खूपच आत्मविश्वास वाढलेला होता. त्या उलट माझा महाविद्यालयीन काळ कुटूंब, माझे नातेवाईक आणि मैत्रिणी यातच गेलेला होता.

आशयचे कला-साहित्य, कविता हेच विश्व आणि माझे कौटूंबिक विश्व, त्यामुळे आमचे विषय, विचार चर्चेसाठी कधीच जुळत नसत.

सुट्टीच्या दिवशी ठराविक अंतराने चहा घेत त्याचे लिखाण चालूच असायचे. लग्नानंतर त्याने मागील अनेक वर्षात लिहिलेल्या निवडक कवितांचा पहिला काव्यसंग्रह काढण्याचे मनावर घेतले. तो लिहित असताना मी त्याच्या खोलीत जाऊन काहीतरी नातेवाईक या विषयावरुन तावातावाने बोलले. आशय एव्हढ्या जोऱ्यात ओरडला, ‘‘बाहेर जा, गेट आऊट !’’

शांत रिमझिम पावसात विज कडाडावी अगदी तसेच वाटले. आमचं बोलणचं संपलं. तो फक्त कामा पुरताच बोलू लागला. रुटीन चालूच होते. आता माझी चार वर्षाची मुलगी कविता ही आशयच्या आणि माझ्या बोलण्यातील दुवा ठरली होती. त्याचं मन कविता संग्रहाच्या आणि लिखाणाच्या कामात गुंतलेलं होतं. मी खूप बोलण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा अबोला संपेना. जास्त समजविण्याचा प्रयत्न केला तर तो अधिक चिडत होता.

आमचा संवाद अधिक तुटक झाला. स्त्री मन, स्त्री स्वातंत्र्य या विषयी कवीमनाच्या आशयाला काहीचं वाटत नाही का ? असे मला वाटायचे ! स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती या विषयी त्याला अनेकदा बोलायला भाग पाडले. या विषयावर तो खूप चिडून बोलला... !

‘‘राधिका या देशात फक्त पैसा महत्वाचा झालाय, पैसा ! माणूस महत्वाचा नाही. तिथे स्त्री-मन, स्त्री स्वातंत्र्य या विषयाची ज्यांना गरज आहे, त्यांच्याच पुरते ते मर्यादित राहिलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्याशिवाय इतर स्वातंत्र्यांना काहीही अर्थ नसतो. तसेच चांगल्या कामासाठी कोणत्याही, कोणत्याही स्वातंत्र्याही गरज नसते.’’ जवळजवळ आशयने मला निरुत्तरच केले होते. पण हा विषय वाढवायचा म्हटलं तर अधिकच आमचा वाद वाढू शकला असता.

माझे आणि आशयचे संवाद जुजबी होत होते. तो फक्त कवी म्हणूनच माझ्याशी वागत होता. तरीही नव्याने लिहिलेल्या कवितेची पहिली श्रोता मीच असे. कवितेत काही चुकतं का ? काही शब्द खटकतात का ? हे आवर्जून तो विचारायचा व योग्य दुरुस्त्या स्विकारायचा सुध्दा.

२००० साली इंदूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाच्या सोहळ्यात त्याने त्याच्या पहिल्या ‘‘आठवणींच्या शब्दात’’ या कविता संग्रहाचे प्रकाशन सम्मेलनाध्यक्षांच्या हस्ते केले होते. त्याचे काव्यवाचन ही पार पडले होते. तो साहित्य, साहित्यिक आणि साहित्य सम्मेलनांवर भरभरुन बोलायचा. मी त्याचे ऐकून घेत असे. नाहीतर चिडला असता माझ्यावर... !

माझं तेच तेच बोलणं ऐकून तो चिडायचा. मी आई-बाबा, भाऊ भावजय त्यांची मूलं... बहिणींच्या संसारातील घडामोडी...... त्यांच्या नवऱ्यांचे स्वभाव– सवयी ! इत्यादी..... इत्यादी..... बद्दलच बोलत असे. तो पुन्हा चिडायचा म्हणायचा, ‘‘ही सामान्य नोकरी करणारी माणसं त्यांच्या आयुष्यात काहीही फारसं नाविन्य नसतं. टिपिकल रुटीन... त्यांचं आयुष्य... रेल्वेच्या रुळां सारखे असते’’ !

त्याचा पहिला कविता संग्रह (आठवणींच्या शब्दात...) मराठवाडा साहित्य सम्मेलनात विकल्या गेल्यावर आशयला खूप आनंद झाला होता. मी त्याला क्वचितच इतका आनंदी पाहिलं होतं. कवी म्हणून मी वाचकांना फारसा परिचीत नसताना माझा कविता संग्रह विकतोय... रसिकांची चांगला कवी म्हणून पावतीही मिळत आहे. कवी, लेखक आणि साहित्यिकांना हवं असतो नेम, फेम आणि पैसा !

मला आयुष्यात कुणाचं फारसं मार्गदर्शन लाभलं नाही. परिस्थिती आणि पुस्तकं वाचून घडलेला मी साधा माणूस आहे. तरीही मला चाकोरी बाह्य जीवन जगणाNया व्यक्तीचं खूप आकर्षण आहे. या व्यक्तींच्या जीवनाविषयी खूप कुतूहल आहे, हे त्याच्या आयुष्याचं मर्म त्याने कित्तेक वेळा बोलूनही दाखविले.

आशयला प्रवासाची खूपच आवड होती. तो अगदी सुरुवातीच्या काळात पुणे विभागात नोकरीला असताना, त्याने जवळपासची सर्व पर्यटनस्थळे पिंजून काढली होती. त्याने पुणे-मुंबई मित्रांसोबत मोटरसायकलवर खूप वेळा प्रवास केला होता.

त्याच्या कवितातून दु:खाच्या दाटा कमी अधिक गडद होत होत्या. त्याचे एक संगीतकार मित्र होते, ते आशयला आनंदीवृत्तीच्या कविता लिही असा सल्ला देत असत. आशयने आनंदी वृत्तीच्या कविताही खूप लिहिल्या, पण कवी आशय म्हणायचा, ‘‘दु:खाच्या दाटा शब्दचित्रित करणे आव्हानात्मक वाटते कारण त्यात विविधता आहे. पण माझ्या आनंदाच्या कविता एकसुरी तर वाटत नाहीत ?’’ असे तो मला सतत विचारीत असे.

‘‘मला कवितेतलं काही कळत नाही’’ हे माझे ठराविक उत्तर कवी आशयला आवडत नसे. मी या विषयावर खूप बोलावं, चर्चा करावी असं त्याला वाटत असे. पण मी साहित्या विषयी कधीच आस्था न दाखविल्यामुळे आशय खूप दुखावलेला होता आणि माझ्या माहेरच्या नातेवाईकांबद्दल आशयला फारशी सहानुभूती नसल्यामुळे मीही आतून दुखावलेले होते. त्यामुळे आमच्या संसारात सुसंवाद कमी वाद जास्त होऊ लागले.

कित्येक दिवस त्यांने अबोल्यात घालविले. नुस्ता घुम्यासारखा ‘नाही’ ‘हो’ ‘पुरे झालं’ ‘निघालो’ एव्हढेच शब्द बोलत असे ! मी कवीच्या वागण्याला कंटाळले होते.

सकाळी ऊठून त्याला बँकरचं रुटीन आयुष्य सुरु करावं लागायचं. बेसीन समोर उभं राहून समोरील आरश्यात झोपेतून नुकताच ऊठल्यामुळे वेडेवाकडे केस मन लावून भांगातून सारखे करायचा. संपलेल्या टूथपेस्टचा थेंब ब्रशवर येई पर्यन्त तो टूथपेस्टची ट्यूब डाव्या हाताच्या चिमटीत पकडून दाबत राहायचा. मी चहा झाला, चहा झाला अशी घाई करत असे.... तरीही हा पठ्ठ्या त्यांच्याच पध्दतीने कामे करीत असे. 

तो तोंडात ब्रश घालून टॉयलेटला जायचा. मग चहा, नंतर पेपर... दाढी, स्नान; कपडे कोणते घालावे यावरुन थोडा वाद व्हायचा, या पॅण्टवर हाच शर्ट हवा... या शर्टला ही पॅण्ट शोभत नाही. मला गबाळं राहायला आवडत नाही. माझा पब्लिक कॉन्टॅक्टचा जॉब आहेत. बँकेत अनेक स्तरातील खातेदार येतात. मला चांगले राहायलाच हवं. इत्यादी इत्यादी... ! घाईघाईने जेवण करुन मोटरसायकलने वेगाने बँकेत जायचा. एकदा त्याच्या अ‍ॅक्सिडेंटही झाला होता. नंतर कित्येक दिवस मी त्याच्या लेखनिकेच्या आणि केअरटेकरच्या भूमिकेत जगत होते. साहित्य, कला आणि संस्कृती या विषयी तो भरभरुन बोलायचा. इंग्रजी साहित्यातील कवी, लेखक, शास्त्रज्ञ हे त्याच्या कुतूहलाचे विषय होते. लिओ टॉलस्टायची ‘वॉर अ‍ॅण्ड पिस’ ही कादंबरी का जगप्रसिध्द झाली...? तसेच लिओ टॉलस्टाय आणि त्याच्या साहित्याचे तसेच जीवनशैलीचे वेगळेपण काय... ? या विषयी बोलणारे लोक त्याला आवडत. शेक्सपीयर अजूनही नाट्य क्षेत्रात ठसा का टिकवून आहे ? असे काही त्याच्या बोलण्यातून मला कळले. देशातील राजकारणाविषयी तो खूप उदासीन आहे. देशातील सत्तांतराने नोकरी करणाऱ्यांना फारसा फरक पडत नाही असे त्याला वाटत असत. राजकारणी हे फक्त त्यांची सत्ता टिकविण्यापुरते काम करतात असे त्याचे प्रामाणिक मत होते. 

मी खूपच घरगुती अन् हा ‘‘कवी’’, मी न पाहिलेल्या अन् न ओळखणाऱ्या साहित्यिकांबद्दल सतत बोलायचा. मला आशयच्या वागण्याचा उबग आलेला होता.

जीवन एका विशिष्ट कोषात गुंतवून-गुंतवून घेतल्यासारखे तो जगत होता. मी यंत्रासारखी संसारासाठी राबत असे. सर्व नातेवाईकांशी मीच स्नेहसंबंध टिकवून होते. त्या नातेवाईकांविषयी, ठीक आहे, हो, नाही, सध्या मला नातेवाईकांसाठी वेळ नाही, हेच सतत ऐकावे लागत असे अन् तो रहाटगाडग्या सारखी नोकरी करुन पुस्तकं, साहित्य, कवितेत रमत होता. कोणीतरी मुक्ता ठाणेकर या कवियत्री/लेखिकेचे खूप कौतुक करायचा. त्याच्याच कॉलेजात होती म्हणे.

त्यालाही त्याच्या साचेबध्द रुटीनचा खूप कंटाळा येत असे. तो त्याच्या एका आवडत्या शायरीच्या ओळी मला वारंवार ऐकवायचा -

 ‘‘और क्या मुझको मिला

मेरी मेहनत का सिला

चन्द सिक्के है मेरे हाथमें

छालों की तरह...’’

मी तुझी बायको, मुलगी... तुझे कुणीच नाहीत का ? मी चिडून बोलायचे... ! तो म्हणायचा आहेतनं, ‘‘माझ्या शरीराचे काळजाचे अविभाज्य भाग.... ! काळजाचे तुकडे !’’

तो कवी आहे. थोडा हळवाही. त्याला हिंसाचार गुन्हेगारीवरील चित्रपट फारसे आवडतही नसत... चित्रपट पाहताना कित्तेक वेळा मी त्याच्या डोळ्यात अश्रूही पाहिले. पण त्याला माझं मन नक्कीच समजत नव्हतं असे मला वाटायचे... ! त्याने जगण्याची, वागण्याची एक विशिष्ट पध्दत त्यांनी अंगीकारली होती.... तसा तो खुषीत असला की मला ‘‘बायको’’ नावाने हाक मारीत असे. त्याचा विनोद न कळल्याने त्याची आणि माझी खूप वेळा भांडण होत होती. ‘‘तुला विनोद बुध्दी देवाने कमी दिली आहे.’’ असे तो उघडउघड म्हणायचा... !

‘‘तुला विनोद कमी समजतो म्हणून तू प्रत्येक वेळी ‘‘असं कुठं असतं का ? असं कुठं असतं का ? सारखं म्हणत असतेस...’’ - असे टोमणे मारायचा.

बऱ्याच वेळा ‘कवीमाणूस’ म्हणून समजायचाच नाही. आयुष्यात काळजाला पडलेल्या पिळानं त्याच्या मनातील प्रेमाचा ओलावा आटला की काय असा मला प्रश्न पडत असे. जगात जे काही चाललं आहे. ते सर्व पैशासाठी चाललं आहे... हे त्याचं वाक्य ऐकून माझं मन विटलं होतं... !

‘‘अहो माणूसकी, धर्म, समाज, कौटूंबिक आयुष्य, नातेवाईक हे काय पैशासाठी आहे का ?’’

आशय म्हणायचा ‘‘माणूसकी, धर्म, समाज, कुटूंब, नातेवाईक या सर्वांचं व्यापारीकरण झालं आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा तो प्रतिष्ठित, चांगला ही जगाची धारणा झाली आहे.’’ हे विचार त्याच्या मनावर ठाम कोरले गेले होते.

त्याचे भारत देशावर खूप प्रेम आहे... ! या देशातील विविधतेतील एकता या विषयी तो कौतूकाने बोलायचा. त्याला संवेदनशील लोक आवडायचे. आशयला त्याच्या साहित्या विषयी बोलणारे, लिहिणारे, वाचणारे हे त्याच्यासाठी जगातील श्रेष्ठ लोकं आहेत असंच वाटायचं.

मला आशयने त्याच्या साहित्यिक मित्र आणि मैत्रिणीत फारसे गुरफटू नये असेच वाटत असे ! तो त्याच्या आवडत्या मित्र-मैत्रिणींशी एव्हढे... मोकळेपणाने बोलत असे की मी हिरमुसून जायची.

माझ्याशी एव्हढा मोकळा बोलला असता तर ? किती बरे झाले असते असे मला वाटायचे. मला त्याच्या परक्यांशी मोकळेपणाने बोलण्याचा खुप राग येतो.... तेव्हा तो चेष्टेने म्हणायचा ‘‘तुझ्याशी काय बोलणार ? तुझ्याशी बोलणे म्हणजे नातेवाईकांविषयीचं बोलावं लागेल... ? मी दहावीपासून घराबाहेर आहे... तसा मी फारसा कौटूंबिक वातावरणात वाढलो नाही. मित्रांनी, पुस्तकांनी, परिस्थितीने मला घडवलं आहे. एकदम Self Made Man आहे. मी माझ्या बुध्दीला पटतं तेच करतो.... इतरांना डिस्टर्ब न करता जीवनाचा आनंद घ्यायला शिकलो आहे...’’असेच खुप बोलत राहायचा ! ‘‘लोकांना जगण्याचं भान आलं की ते सुखी होतील’’ आत्ममग्न स्वभावामुळे आत्मकेंद्रीत जगणं त्याच्या वाट्याला आलेल होतं. आशयची निरीक्षण शक्ती दांडगी आहे आणि संवेदनाशीलही आहे. हे मला जाणवलं होतं. तो व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे, हे ही मला जाणवलं !

नातेवाईक आणि इतर व्यक्तिंच्या वागण्या-बोलण्याच्या शैलीतील वैशिष्टे चटकन् बोलून दाखवायचा पण कुणाशी बोलताना फारसं खोलात चौकश्या न करता अतिशय फॉरमल बोलायचा, ‘‘हो का’’, असं का’’ ‘‘हो का’’ इत्यादी इत्यादी... !

जानीसार अख्तरने लिहिलेल्या ओळी त्याला खुप आवडायच्या.... यह इल्म का सौदा, यह रिसाले, यह किताबे... एक शक्स की यादों को भुलाने के लिए है...

‘'जिंदगी जिस को तेरा

प्यार मिला वो जाने

हम तो नाकाम रहे

चाहनेवालों की तरह...’’

आशयाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मला विचित्रही वाटायची.... ! त्याने कवितात मन:पूर्वक ‘हरवलेले’ आणि ‘गवसलेले’ प्रेम भरभरुन चित्रित केले असले तरी.... ‘प्रेम’ आणि ‘देव’ या संकल्पना जगातील उदात्तिकरण झालेल्या सर्वात मोठ्या संकल्पना आहेत. सद्य परिस्थितीत ‘प्रेम’ आणि ‘देव’ मानवी जीवनाची दोन चाकं आहेत असे आशय सांगत असे. जगात ज्याला ‘प्रेम’ आणि ‘देवाची कृपा’ लाभेल तो जगातील सर्वात सुखी व्यक्ती असेल हे आशयचे संसारिकांसाठीचे ठराविक वाक्य होते. तो मला बोलायचा...

‘‘तुझं नेमकं दु:ख काय आहे ते सांगतो, घरगुती स्त्रियांचं एक स्वप्न असतं. ‘‘बायकोने नवऱ्याचं ऐकलचं पाहिजे तरच तो नवरा... ’’! असं प्रत्येक बायकोला वाटत असेलही पण या व्याख्येत मी बसत नाही... हेच तुझं दु:ख आहे, राधिका !’’ असाही बोलायचा ! 

‘‘तुझं इथचं चुकतं राधिका, तू मला आजमावतेस. माझ्या बुध्दीशी एक अदृश्य वर्चस्वाची स्पर्धा कळत-नकळत करीत आहेस. तू छोट्या-छोट्या गोष्टींच्या श्रेयासाठी भांडत असतेस... ! तुझा न्युनगंड... कमीपणाची भावना तुझ्या... इरेस आणि इर्षेस कारणीभूत ठरते आहे. तू तुझ्याजागी ग्रेट आहेस. मी माझ्याजागी. कळत-नकळत तुलना करीत राहणं हा मानवी स्वभाव आहे’’.

‘‘आयुष्याच्या वाटा स्वत: निवडूनही त्या वाटांवर निष्ठेने चालत राहणे प्रत्येकाला शक्यच होतं असं नाही.’’ असंही तो सतत सांगायचा. ‘‘मी कुणाचेही अनुकरण करीत नाही. The Journey of the life is on own way.


हीच माझ्या जगण्याची वाट आणि व्याख्या आहे.’’ या विचारांवर आशय ठाम असे. 

जगण्यातील साचेबंदपणा आशयला आवडत नसे. तो त्याच्या कवितांतून, लिखाणांतून विविध वैशिष्ट्यपूर्ण जीवनाचे आणि भावभावनांचे पैलू, पदर आणि पापुद्रे उलगडून दाखवित असे.

‘‘संसारीक मध्यमवर्गीयांची एक विशिष्ट चाकोरीबध्द जीवनशैली रेल्वेच्या रुळासारखी झालेली आहे. या रुळांवरुन मनातील विचार, आयुष्याचे दिवस रेल्वे गाड्यांसारखे धडाधड येतात आणि जातात. त्या माणसांना कौटूंबिक जबाबदाऱ्यांची स्टेशन्स खुणावत असतात. सामान्य माणसांच्या सुखाच्या संकल्पना ही सामान्यच असतात...’’ असं आशय सतत सांगायचा.

‘‘सर्वांना, राधिका तुझ्या सकट... नातेवाईकांनाही माझ्याकडून भरभरुन प्रेम, वेळ हवा असतो... ! नि:स्वार्थ प्रेम ही उदात्त भावना... त्यागाशी सापेक्ष असल्याने... हे प्रेम पैश्याने मिळवता येत नाही...’’! असंही आशयला सतत वाटायचं. कवीच तो!

समोरच्या जुन्या मोठ्या इमारतींवर सांडपाण्याच्या पाझऱ्यांवर पिंपळाची छोटी छोटी कोवळी झाडं नुकतीच उगवलेली होती. त्याकडे बोट दाखवून आशय म्हणायचा, ‘‘राधिका, प्रेम हे प्रेमाच्या ओलाव्यावर फूलणारं नंदनवन आहे. आयुष्यातील सुखाची दरवळ आहे.’’

कवी - साहित्य, संवेदना, निसर्ग आणि मानवी मनांच्या गुहांत, भाव-भावनांच्या चढ-उतारात रमला होता. मानवी भाव-भावनांच्या तिर्थक्षेत्रांवर त्याच्या मनाच्या वाNया सुरु असायच्या. त्याच्यासोबत ‘‘मी राधिका, आशयची पत्नी, आशय सोबत कवी कल्पनांच्या तरीही निर्विकार जगात रमत नव्हते. माझ्यासाठी हा संसार कागदी फुलांची बाग वाटत असे. माझा माहेरचा आणि नातेवाईकांचा गोतावळाच मला रम्य वाटे... ! कवी सोबत जगणं फक्त जगणं होतं... !! कवी प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करीत जगत असतात. एव्हढं मला कवी सोबत राहून कळलं होतं.’’

संसाराच्या भावभावनांच्या एकान्त दालनात... किंवा भावभावनांचे संग्रहालय असलेल्या संसारातील प्रत्येक दिवस, या राधिकेला नवनवे अनुभव देत होता. मनाला धक्केही देत होता.

पंधरा वर्षाचा संसार झाला. एक मुलगी आणि एक मुलगा झाला. लौकिक अर्थाने जगाला माझा संसार खुपच सुखाचा वाटे. कार, फ्लॅट, नवरा साहित्यिक... एक मुलगी एक मुलगा !

कवीने सतत माझ्या पुढे पुढे करावं.. राधिका-राधिका करावं, हीच माझी प्रेमभुकेली भावना... मला दु:खी करीत असे.

कवी आयुष्यात खुपच नियमित होता. त्याचे कारण एकच कवीची नोकरी. नोकरीच्या वेळा पाळाव्याच लागायच्या. कवी नोकरी विषयी कृतज्ञ भावनेने बोलायचा... नोकरी ही मी माझ्या कर्तृवाने मिळविली. नोकरीने मला सन्मानाचं आयुष्य दिलं. चांगल्या मार्गाने पैसे कमवून जगणे आणि आपले छंद मनसोक्त जोपासण्यासारखं सुखही दिलं !

मला... म्हणजेच या राधिकेला कवीवर खूप हक्क बजावावा आणि त्याच्याकडून खूप प्रेम ओरबडून घ्यावं वाटायचं. हेच मला जमलं नाही म्हणून माझ्या मनात संसारात हरले; ही भावना वाढीस लागली होती. 

कवीला ऑफिस आणि संसार यातून साहित्यासाठी, वाचनासाठी, लिखाणासाठी त्याला वेळ मिळत नसे... त्याची चिडचिड वाढली... साहित्य क्षेत्रात मागे राहू या भितीपोटी... सतत साहित्य, पुस्तक, कविता आणि साहित्यिकांच्या विश्वात रमायचा. 

थोडा जरी वेळ कवीला मागितला की तो चिडायचा. ‘‘राधिका तुझं विश्व तू उभार आणि त्यात रमत जा. मी साहित्य विश्वात रमलो आहे.’’

आशयने जवळजवळ सामान्य माणसाचं जीवन नाकारलच होतं... नोकरी, लिखाण, वाचन आणि कार्यक्रम हेच त्याचं जीवन झालं होतं.

तो मुला-मुलीसोबत येता-जाता बोलत असे. त्यांना अभ्यासाच्या टिप्स् देत असे. कवी सतत पुस्तकं आणि लिखाणात रमलेला पाहून... आमच्या मुला-मुलीला अभ्यास कधीच बोजड वाटला नाही. ती दोघेही वर्गात प्रथम क्रमांकाने पास होत होती. मुलांचा स्वभावही जिज्ञासू आणि अभ्यासू झाल्याने ती दोघे ही मला भंडावून सोडीत असत... !

आम्ही सर्व कुटूंब भर हिवाळ्यात बेंगलोर, मैसूर, उटी, कुन्नूर पाहण्यासाठी प्रवासाला निघालो. प्रवासात कवीचे वाचन चालूच होते. अधूनमधून तो निसर्ग, भौगोलिक परिसर, भाषा, विविध परिसरातील लोकांचे राहणीमान या विषयी बोलत असे. मी ही त्याच्याशी चर्चा करीत असे... ! परंपरा आणि संस्कृतीच्या पठडीत विचार करणारी मी... ! माझे विचार त्याला न पटले की तो बोलायचा, ‘‘कुण्या जगात वावरताय... जग कुठे गेले आहे... ! काळ, भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्धता ही कारणे समाजाचे, आचारविचार, राहणीमान आणि भाषा सर्वच बदलत असतात. जगात विविध भागात, देशात राहणारे लोक याला अपवाद नाहीत.’’ दक्षिणेतील हिरवीगार कंच भात शेती, बांधांवरील नारळाच्या झाडांच्या रांगा, सुंदर रस्ते, मलय पर्वतांच्या डोंगर रांगा... त्यात मावळणारा सूर्य हे नयनरम्य दृष्य मला मोहवित होते... ! कवी म्हणाला, ‘‘राधिका तुला रोजच्या दैनंदिनीतून सुटका झाल्यासारखं वाटत असेल.’’


‘‘का ? तुला वाटत नाही का ?’’

‘‘होय... आयुष्यातील दैनंदिनीचा कधी कधी कंटाळा येतो... तेव्हा प्रवास, पर्यटन मन प्रसन्न करण्यासाठी चांगले असते.’’ आशयचा मूड बरा पाहून मी कित्तेक दिवस माझ्या मनात ठसठसणारा विषय म्हणजे मुक्ता ठाणेकरचा विषय काढला... !

‘‘कवयित्री, लेखिका मुक्ता ठाणेकरचे तू फारच कौतुक करीत असतोस. तुझ्यासाठी ती ग्रेट आणि आम्ही संसार सांभाळणाऱ्या एकदम टिनपॉट का...?’’

‘‘ मुक्ता ग्रेटच आहे पण मी गृहिणींना टिनपॉट वगैरे असं कधीच समजत नाही. संसाराची जबाबदारी सांभाळणाNया गृहिणी घरोघर असतात... त्यांच्या परीनं त्या ग्रेटचं असतात... पण पुरुषी वर्चस्व नको म्हणून मुक्ताने आयुष्यभर एकटीनेच राहायचा निर्णय घेतला’’

या राधिकानेही बोलून घेण्याची संधी सोडली नाही.

‘‘तुम्ही पुरुष संसारासाठी राबणाऱ्या स्त्रियांची मनं ओळखत नाहीत. त्यांना संसारात, घरात, समाजात प्रतिष्ठा लाभत नाही... हेच गृहिणींचे दु:ख आहे...’’

आशयने... रेल्वेच्या खिडकीतनं मला बाहेर पाहायला सांगितलं... त्याने नारळाच्या झाडांच्या रांगाकडे पाहा म्हणून सांगितलं...

‘‘बघ, त्या नारळांच्या झाडांच्या रांगांकडे... रांगेतील नारळाची झाडं एक सारखी आहेत का ?’’

‘‘हूं ! एका ओळीत शेतकऱ्याने लावलेली असली तरी काही उंच झालीत आणि दोन-चार आजुबाजूस गेलीत.’’

‘‘करेक्ट... ओळीत असलेली उंच आणि सरळ वाढलेली झाडं गृहिणींसारखी आणि आजुबाजूस गेलेली नारळाची झाडं म्हणजे संसाराची सुरक्षित सरधोपट वाट नाकारलेल्या इतर स्त्रिया किंवा ज्यांना त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्या वाट्याला आलेलं आयुष्य समज. ज्यांनी निरनिराळ्या क्षेत्रात त्याचं करीअर घडविलं... त्या निश्चितच कौतुकास पात्र आहेत. प्रत्येक स्त्रीला तिच्या कुवतीनुसार, परिस्थिती आणि

बुध्दीनुसार कशात करीअर करायचं ते ठरवूनच त्यासाठी त्यांना झोकून द्यावं लागतं तेव्हाच स्त्री स्वत:चे करीअर किंवा समाजात वेगळे स्थान.. निर्माण करु शकते. ’’

‘‘म्हणजे संसारिक स्त्रिया या कॉमनच म्हणताय....’’

‘‘तसं समज पण कुटूंबाची प्रगती, लौकिकामूळेच... या कुटूंबातील संसारिक स्त्रियाचं अनकॉमन... असामान्य... ठरतात... !’’

‘‘मुक्ता ठाणेकरला विविध पुरस्कार मिळाले. साहित्य अकादमीचेही पुरस्कार तिने मिळविले. साहित्यातील फेलोशिपही मिळवली. वयाच्या ४५व्या वर्षी मुक्ता ठाणेकर मराठीतील जनमान्य प्रस्थापित साहित्यिक झाली होती...’’

‘‘होय... त्यासाठी ती फक्त पुस्तक, लिखाण, वाचन आणि चाकोरीबाह्य विचाराला जवळचं मानते.’’ 

‘‘आशय, तु आणि ती फोनवर सतत संपर्कात असतात’’ 

‘‘होय. तिच्या साहित्याचं आणि वेगळ्या जीवनशैलीचे आकर्षण आहे. पुरुषाच्या सोबतीशिवाय जगणं कठीण असतं ते आव्हान तिनं स्विकारलय... म्हणून साहित्य क्षेत्रात ती चर्चेचा विषय ठरली आहे. आजवर तिने सत्तावीस पुस्तकं लिहिलेली आहेत. कविता, कथा, कादंबऱ्या आणि काही पुस्तकांचे अनुवाद अन् मी कौटूंबिक मतभेद, भावकी भांडणं, आर्थिक विवंचना, नोकरी सांभाळून जेमतेम चार पुस्तकं लिहिली... मी कुठलंही पुस्तक पुरस्काराकरिता पाठविले नाही म्हणून मला पुरस्कारही मिळालेला नाही.’’

‘‘मघाशी बोललास... तू ! तुझ्या यादीत कौटूंबिक मतभेद, भावकी भांडणं, आर्थिक विवंचना, नोकरी या यादीत ‘संसार’ हा शब्द नाही घातलास... ’’

‘‘संसार’ अगं राधिका तो तूच सांभाळतेस.. !’’

‘‘अस्सं का... ?’’

राधिका मनातून सुखावली होती... !

‘‘बरं... मुक्ता ठाणेकर तुला साहित्य क्षेत्रात काही मदत करीत नाही का ?’’ मी आशयला विचारले.

‘‘नाही, ती तिचचं काय काय वाचलस... विचारीत राहते... माझे मत आजमावत असते. तिच्या लेखी मी अजूनही एक सामान्य कवी असेल पुरस्कार बिरस्कार न मिळालेला.’’

बेंगलोर आले. आम्ही उतरलो. प्रवासाने अंग आंबून गेलं होतं. अचानक झालेल्या चेन्नईतील चक्रीवादळाने वातावरण पावसाळी आभाळी झालं होतं. अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या... !

बेंगलोर मखमली सुंदर बागा, म्युझियम, इस्कॉन टेंपल... पाहून आम्ही म्हैसूर, उटी, कुन्नूरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या... 

कवी निसर्ग सौंदर्यात आणि नैसर्गिक देखाव्यात बुडून गेला होता. हे पाहा... किती सुंदर... काय स्वच्छता... काय सुंदर बागा... मधेच कवीला गाणी, शेर शायरी सुचायची... !

माणसं सुगंखसारखी असावीत ती नजरे समोर नसली तरी त्यांच्या कर्तृत्वाचा, अस्तित्वाचा सुगंध दरवळायला हवा. अस काही बाही बोलायचा ! कधी कधी मला संदर्भच लागत नव्हते. कवीला... स्वप्न आणि स्वप्नांना कवी खुणावित असावेत. आमचे आठ दिवस बेंगलोर, म्हैसूर, उटी, कुन्नूरला थंडीच्या कडाक्यात गेले. झाडांवर, हिरवळीवर स्तब्ध पक्ष्यांकडे पाहून कवीने.. बागेत बसल्यावर प्रश्न विचारला...

‘‘या पक्षांना थंडीचा त्रास खूप होत असेल... बिचारी किती कुडकुडत असतील...’’ !

कवीच तो, पक्षी, फुलांची या माणसाला काळजी. माझ्या मनाचा याला विचार करता येत नाही का ?

असं मी बोलले तर... कवी म्हणायचा, ‘‘तु खुप सुखात आहेस. तुझं दु:ख एव्हढचं की मी नातेवाईकांसाठी फारसा उपलब्ध नसतो. चला. पनवेलला पोहचायची तयारी करा.’’ दोन दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही पनवेलला पोहचलो. आमचं रुटीन सुरु झालं. कवीची बॅन्केची नोकरी, माझं रुटीन, मुला-मुलींची शाळा, कोचिंग क्लासेस, होमव इत्यादी... !

कवी बँकेतून परतल्यावर रोज रात्री तास दोन तास लिखाण, वाचन करीत असे. कवीने त्याच्या लिखाणाच्या टेबल समोरील भिंतीवर एक पोट्र्रेट लावलं होतं. त्यावरील कवी गुलजारजींच्या ओळी होत्या.

‘‘ काँच के ख्वाब है, बिखरे हुए तन्हाई में

ख्याब टूटे ना कोई, जाग ना जाये देखो

जाग जायेगा कोई ख्वाब तो मर जायेगा । ! ’’ - गुलजार 

कवी त्याच्याच तंद्रीत... स्वप्नातच जगत आहे. मार्च महिना, त्याला माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नाला सुट्टी मिळाली नाही. आला नाही. नातेवाईकांची किती बोलणी खावी लागली मला... ! सख्ख्या मेहुण्याच्या मुलीच्या लग्नाला कवी उपस्थिती लावू शकला नव्हता.

आधीच बँकवाल्यांना सुट्ट्याची परवड त्यात मार्च महिन्याची तरफड !

‘‘ ‘तुला समज कमी आहे.’ हे म्हणणे किंवा लिखाणाच्या टेबलासमोर मान खाली घालून बसणं... माझ्यासाठी सारखेच होते.’’

तो, त्याची ठरलेली वाक्य बोलणार मला माहीत होते.

MY LIFE IS THE JOURNEY ON OWN WAY DONOT DISTURB !

अधिक समजाविण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला तर'' Get out, leave me alone’ जोराने ओरडून सारं अपार्टमेन्ट डोक्यावर घ्यायचा.

कित्येक दिवस आमचं बोलणं तुटक व्हायचं. नि:शब्दता घरात थैमान घालायची. मुलगा-मुलगी मोठी झाली होती. ‘आई-बाबा तुम्ही भांडू नका’ असं मुलं ओरडून सांगू लागली. रडू लागली. तो ही टेबलावर समोर खाली मान घालून रडला...

त्याच्या अश्रूंच्या थेंबांनी त्याने लिहिलेल्या कवितेतील ‘सुखाचे’ हा शब्द धुसरपणे मिटत होता. हे दु:ख मी कुणालाही सांगू शकत नव्हते. मी बाथरुम मध्ये जाऊन मनसोक्त रडले.

कवीने बाथरुमचा दरवाजा ठोठावला. मी टॉवेलने चेहरा पुसून दरवाजा उघडला. चेहरा पुसण्याच्या बहाण्याने चेहरा झाकून दुसऱ्या रुममध्ये गेले. तो ही चेहरा धुवून... मुलगा आणि मुलीला... ‘‘चला आज आपण बाहेर जेवायला जाऊ या. आईस्क्रीम खायचे का...’’ वगैरे वगैरे बोलू लागला ! त्या रात्री आम्ही बाहेर जेवायला गेलो. आशय दुखावेल असं मी काहीच बोलायच नाही असं ठरवलं !

साहित्य, कला, मुक्ता ठाणेकर, गुलजार, नवे चित्रपट या विषयांवर बोलत राहिले. त्याने जेवताना स्वत:ला चिमटा घेवून पाहिला. दोन तीन वेळा... !

कवी म्हणाला, ‘मी स्वप्नात आहे का’ ? 

एकंदरीत बाहेरील जेवणाचा कार्यक्रम वादाशिवाय पार पडला. मुलंही खुष झाली !

कवीने त्याच्या लिखाणाच्या टेबलासमोरील भिंतीवर कवी गुलजारजींच्या हिंदी कवितेच्या चार ओळींचे आणखी एक छोटे पोट्रेट लावले. त्या ओळी होत्या -

‘‘तुमसे जब बात नहीं होती किसी दिन

ऐसे ही चुपचापसा गुजरता है, ये सुनसान सा दिन

एक सिधी सी बड़ी लंबी सड़क पे जैसे साथ-साथ चलता हुआ’’

रुटीन दिवस जात होते... कवीचं लिखाण वाचन चालूच होतं... !

त्याच्या पाचव्या आणि महत्वाकांक्षी कविता संग्रहाच लिखाण चालू होतं... त्याच्या या पाचव्या कविता संग्रहाचे शिर्षक होतं.... ‘‘काळजात दडलेले शब्द...’’

त्याच्या पहिल्या कविता संग्रहाचे नावं होते ‘आठवणींच्या शब्दात’ दुसऱ्याचं शिर्षक होतं... ‘आणि ओली पाने’, तिसऱ्याचं ‘दु:खाचे ढग’, आणि चौथा कविता संग्रह होता ‘सुखाचे सोबती’ आणि आता हा पाचवा कविता संग्रह ‘काळजात दडलेले शब्द’ लिहिणे चालू होते.

दिवस रेंगाळल्या प्रमाणे जात होते... !

उन्हाळ्यात हिरवळ वाळल्यावर पिवळसर करडे रंग उगाच उदासीने मन व्यापून टाकतात. अशी भावना मनभर पसरली होती. अतिशय संथ चाललेल्या रेल्वे गाडी सारखे दिवस जात होते. कवीचा ठराविक दिनक्रम चालू होता अन् माझाही...!

एके दिवशी दुपारी रिकाम्या वेळी कवी बॅन्केत गेल्यावर मी राधिका त्याच्या खुर्चीत बसले... !

यावेळी कवीने लिखाणाच्या टेबल समोरील भिंतीवर आणखी एक नवे पोट्रेट लावलेले आढळले. यावेळी त्याच्यावरील ओळी... एक छोटी कविता होती... भालचंद्र नेमाड्यांची.

 ‘‘दु:खाचा अंकुश असो सदा मनावर

हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो.

चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत.’’

सतरा वर्षाच्या संसारात मी कधी नव्हे ते कवीच्या खुर्चीत बसले होते.

माझं मन मला म्हणत होत... ‘राधिका, या खुर्चीत बसलीच आहेस तर कर कवीला मदत.’ मी कवीला फोन केला. ‘तुम्ही रफ लिहिलेल्या कविता फेअर करु का?’ तिकडनं तो बोलला, ‘‘अगं, मी स्वत:ला चिमटा काढून पाहतोय... कर की फेअर... तुझाही रिकामा वेळ चांगला जाईल’’ कवी रात्री लिहायचा. मी दुपारी त्याच्या कविता फेअर लिहित असे. असा क्रम साधारणत: तीन महिने चालला... कवीत नखशिखान्त बदल झाला होता. तो राधिका राधिका करीत होता. या कविता संग्रहाच

शिर्षक बरे आहे ना ? वाह ! छान फेअर केलस... ! काही कवितांत तू केलेली शब्दांची अदलाबदल... खूपच सुंदर ! तू सूचविलेला शब्द बदल खुपच सुरेख आहे’

या राधिकेलाही आता खूप हुरूप आला होता. पन्नास कवितांची निवड मी स्वत:, या राधिकेने करुन प्रकाशकाकडे आगामी कविता संग्रह पोहचविला... ! खरं तर... त्याने लिहिलेली अर्पण पत्रिका मला खटकली होती. अर्पण पत्रिकेत आशयने लिहिले होते... ‘ज्यांच्यामुळे मला कविता लिहित राहावं वाटलं, त्या मुक्ता ठाणेकरांना...’! हा काव्य संग्रह अर्पण - कवी आशय वाईकर....

माझं मनं खट्टू झालं होतं. आयुष्यात काय काय नशिबाचे भोग आहेत असं वाटू लागलं. एकदा लग्नबंधनात अडकलं कि हिन्दू धर्मात पर्यायच नसतो. काढा आता जन्म याच्याच सोबत ! म्हणूनच स्त्रिया स्त्री मुक्ती... स्त्री स्वातंत्र्य वगैरे वगैरे ओरडत असाव्यात !

या राधिकेनं काळजावर दगड ठेवून, सारं सहन करीत कवीच्या पाचव्या ‘काळजात दडलेले शब्द’ या काव्यसंग्रहाची प्रुफं तपासली. त्याच्या मर्जीनुसार सुंदर मुखपृष्ठ करुन घेतलं. एका प्रसिध्द कवीची प्रस्तावना घेतली... !

सारं काही कवीच्या मर्जीने चालू होतं. माझं मन खट्टूच होतं.

पारिजातकाचे झाड एकीने लावायचे, त्याला रोज पाणी घालायचे आणि त्याची फूले दुसरीच्या दारात पडायची... ? असच माझ्या नशीबात आहे असं वाटू लागलं... ! कवीची स्वारी मात्र हवेतच होती.

पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, कार्यक्रम पत्रिका, प्रमुख पाहुणे, निमंत्रण पत्रिका... यातच तो गुरफटला होता... कवीला दुखवायचे नाही म्हणून जळता निखारा काळजावर ठेवून मी दिवस ढकलत होते...!

माझ्या मनात ‘‘काळजात दडलेले शब्द’’ काव्यसंग्रहाची अर्पण पत्रिका सतत सलत होती...

‘‘ज्यांच्यामुळे मला कविता लिहित राहावं वाटलं त्या मुक्ता ठाणेकरांना... अर्पण’’ - कवी आशय वाईकर.

अन् ही राधिका कोणीच नाही ? मी आसवांना वाट मोकळी करुन दिली.

एके दिवशी बँक संपल्यावर आशय दारातूनच.... ओरडत घरी आला. ‘‘राधिका बघ, रधिका बघ... ‘काळजात दडलेले शब्द’ कविता संग्रह आणला. मी हिरमुसलेलीच, किचन मध्ये होते.... मी ओले हात पुसले. सुंदर मुखपृष्ठ असलेल्या ‘‘काळजात दडलेले शब्द’’ कविता संग्रहाची अधाशीपणाने आधी अर्पण पत्रिकेचे पान उघडले... आणि माझे डोळे आनंदअश्रूंनी डबडबले... 

अर्पण पत्रिकेत कवीने लिहिले होते....

‘‘जिच्यामुळे मी ‘‘काळजात दडलेले शब्द’’ हा पाचवा कविता संग्रह रसिकांच्या हाती देऊ शकलो त्या सौ. राधिका आशय वाईकरांना.... मनःपूर्वक अर्पण...’’!

‘‘हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी....? आशय आश्चर्यचकित झाला. 

‘‘अर्पण पत्रिका का बदललीस....’’? मी आशयच्या खांद्यावर डोकं टेकवून ओक्साबोक्सी रडायला सुरुवात केली.

‘‘वेडी गं वेडी... अगं हे सर्व यश तुझ्यामुळे दारी आलं’’

पुढे ठरल्याप्रमाणे प्रकाशन समारंभ झाला. काव्यसंग्रहास चांगली प्रसिध्दी मिळाली....! राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला....!!

पुरस्कार घेतांना कवी ने हा पुरस्कार जोडीने घेऊ म्हणून... पुरस्कार घेण्यासाठी मला स्टेजवर बोलविले.

‘‘हा पुरस्कार तुझाही आहे राधिका, लवकर ये, हा पुरस्कार घे’’

तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. तेव्हा कवी म्हणाला,

हम अल्फाजों को ढूँढते रह गये

और वो आँखों से गजल कह गये’’ 
Rate this content
Log in