Rajani Bhagwat

Others

3  

Rajani Bhagwat

Others

तिला काय हवयं?

तिला काय हवयं?

8 mins
216


थोडेसे चिडून आणि खूपसे व्यथित होऊन तो म्हणाला,"इथून पुढे तुला सर्व काही पहिल्यासारखे मिळेल पण तुला जे हवंय ते तुला कधीच मिळणार नाही". तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून,अन तिच्या तोंडावर बेडरुमचा दरवाजा आपटून तो निघून गेला.


थिजलेल्या मेणासारखी ती त्या दरवाज्याकडे बघत उभी राहिली.डोळ्यात जमा झालेले अश्रू तिकडेच थोपविण्याचा प्रयन्त करत तिने कपटाचा आधार घेतला अन वाढलेले पोट सांभाळत बेडवर विसावली. यावेळी गरोदरपणात तिची थोडी काळजी घ्यावी लागेल असे डॉक्टरांनी मागच्या महिन्यात रुटीन चेकअप मध्ये सांगितले होते.पण आज तिच्याच कर्माचे फळ म्हणून या अश्या अवस्थेत ती एकटी होती .या अश्या मानसिक अवस्थेत ती प्रसन्न तरी कशी राहू शकत होती तरीही सतत अश्रू ढाळणे, ती कटाक्षाने टाळत होती.पण डोक्यातले विचार तिला काही टाळता येत नव्हते, आता ही,"इथून पुढे तुला सर्व काही पहिल्यासारखे मिळेल पण तुला जे हवंय ते तुला कधीच मिळणार नाही". या त्याच्या वाक्याचाच ती विचार करीत होती.खरंच काय हवंय तिला त्यापेक्षाही काय हवं होतं तीला म्हणून देखणा नवरा,एक गोंडस मुलगा असूनही ती त्याच्याकडे ओढली गेली .त्याचा इतकी आहारी गेली की ,या सर्वांचे परिणाम काय होतील याचा विचार सुद्धा तिने केला नाही.


लहानपणापासूनच ती खूप मनस्वी होती.पल्स पेक्षा इम्पल्स वर जगणारी,इतकी हुशार समजूतदार असून या एका बाबतीत ती कशी चुकली. का .?...का .?...का.?... तिने त्या इम्पल्स चा एवढा विचार केला की या सर्वांचे दूरगामी परिणाम काय होतील ,याचा सारासार विचार ही तिने केला नाही. सुरवातीला काही गोष्टींची जाणीव तिला झाली नाही पण लक्षात आलं तसे तिने स्वतःला सावरण्याचा प्रयन्त केला.मोठ्या निकराने तिने त्याला समजून सांगितले आणि कायमचा त्याचा निरोप घेतला.त्याचा निरोप घेऊन ती स्वतः च्या घरट्यात परतली आणि कर्म-धर्म संयोगाने तिच्या नवऱ्याची बदली दुसऱ्या राज्यात झाली.तिच्या दृष्टीने हे बरंच झाले होते,आता ती पूर्ण वेळ मुलगा,नवरा यांच्यावरच आपले लक्ष केंद्रीत करणार होती. त्यावेळी नेमके हेच तिला हवे होते की आणखी काही ,हे सांगणे तिच्यादृष्टीने तेवढेच अवघड होते जेवढे आज होते.


नेमका त्याचवेळी मोबाईल वर आईचा कॉल आला,तिला कॉल घेण्याची खूप इच्छा होती पण काय सांगणार होती ती आपल्या पालकांना.कसं सांगणार होती त्यांचे सर्व संस्कार तिने धुळीला मिळविले होते आणि आज केवळ तिच्यामुळे त्यांची मान खाली गेली होती.केवळ तिच्यामुळे कुणालाही उलटून न बोलणार तिचा नवरा त्यांना अपशब्द बोलू लागला होता.एवढेच नव्हे तर त्याने तिच्या मोबाईलवर कॉल रेकॉर्डर अँप ठेवला होता आणि माहेरी कॉल करायला सक्त मनाई केली होती.त्यामुळे तिची खूपच कोंडी झाली होती.माहेर आता दुरावले ,आणि हे सर्व तिच्याच कर्माचे फळं होते याचे तिला खूप दुःख होत होते.


माणसाच्या आयुष्यात कसं असते ना एखादी गोष्ट अथवा गुपित जगासमोर आणायचा प्रयत्न करतो तर ते जमतेच असे नाही परंतु एखादे गुपित आपण लपविण्याचा आटोकाट प्रयन्त केला तर ते जगासमोर आल्यावाचून राहत नाही.झाले ही तसेच तिच्या नवऱ्याला या गोष्टींची माहिती मिळाली व त्याने तिला या सर्वांचा जाब विचारला.


सुरवातीला खूप घाबरून गेली ती ,स्पष्टीकरण तरी काय देणार होती. कसं सांगणार होती ती की ,तिला त्याची कंपनी आवडायची.एकाच क्षेत्राचे असल्यामुळे किंबहुना तो अधिक बुद्धिमान आणि अनुभवी असल्याने बराच वेळ ते एकत्र घालवित होते. सुरवातीला तिलाही या गोष्टींची जाणीव नव्हती की, त्याच्या मनांत तिच्याबद्दल काही वेगळे भाव ही असू शकतात.परंतु ज्या वेळी ही गोष्ट तिच्या लक्षात आली त्यावेळी ,काहीही विचार न करता तिने अगदी नकळत पणे त्याच्या भावनांना प्रतिसाद दिला होता.


कसे सांगणार होती ती की,काय भारावल्यासारखे दिवस होते ते ,त्याचे वागणे एकदम साधे होते.नेहमी आदरयुक्त तिच्याशी बोलणे ,तिच्या आग्रहाखातर त्याने नंतर तिला दोघे असताना एकेरी नावाने संबोधने सुरू केले होते.कसे सांगणार होती ती,तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कोण कौतुक होतं त्याला.एखाद्या गोष्टीवर त्याच्याशी अगदी तासनतास ती बोलू शकत होती.


अश्या बहुश्रुत व्यक्तींबद्दल तिला पहिल्यापासूनच खूप आकर्षण होते.नंतर नंतर तो त्याच्या घरातील काही समस्या तिच्याशी बोलून विचारविमर्श करू लागला. एकमेकांबद्दल छोट्या मोठ्या गोष्टी ते आता सहजपणे बोलु लागले होते.


त्याचं वागणं ,बोलणं आणि लॅविश राहणीमान याची तिला भुरळ पडली होती.त्याच्या शी भावनिक नातं निर्माण झाल्यावर तिला कळलं होतं की तो खूप हळवा आहे.तिला अजूनही आठवतं ,तिच्या डोक्यांत खूप उवा झाल्या होत्या अगदी अचानक आणि बरेच शॅम्पू वापरूनही त्याचा त्रास कमी होत नव्हता.त्यावेळी नवरा म्हणून तू या बाबतीत औपचारिक चौकशी पलीकडे काहीच केले नाहीस,पण त्याने न सांगताही तिचा हा त्रास ओळखला होता.एवढेच नव्हे तर ऑफिस च्या जवळच एका स्किन स्पेशालिस्टची माहिती मिळवून तिच्यासाठी अपॉइंटमेंट सुद्धा मिळवली.स्वतः जाऊन सर्व औषधे तिला आणून दिली होती.तिच्या मनातल्या बऱ्याचश्या गोष्टी न सांगताही त्याला कश्या कळायच्या हे तर आजपर्यंत न उलगडलेले एक कोडंच होते तिच्यासाठी.त्या दोघांच्या खानपानाच्या सवयी ही खूप वेगळ्या होत्या पण तिच्या हातच्या बनलेल्या प्रत्येक पदार्थ तो अगदी आवडीने खात असे.

स्वतःला मूल नव्हते याची खंत होती त्याला ,म्हणून हिच्या मुलावर किती जीव होता .त्याचा रुपात तो नेहमी स्वतःच्या मुलाला पाहत असे.त्याने अगदी गंभीरपणे खूप विचार करून ठेवला होता.तिच्याशी लग्न करण्याचा ,दुसऱ्या शहरात जाऊन सेटल होण्याचा.तिच्या मुलाचे पालकत्व ही तो स्वीकारायला तयार होता.त्याचे हे विचार ऐके दिवशी त्याने तिला बोलून दाखविले.त्यादिवशी ती त्याच्याशी नेहमीसारखे नाही बोलली.त्याच्या बोलण्यावर तिने खूप विचार केला ,पण तिला हे सर्व अशक्यप्राय वाटतं होतं.ह्या सर्वाचं ती काय स्पष्टीकरण देणार होती दोन्ही कुटुंबाना शिवाय तिच्या बाळावर तिचं खूप प्रेम होतं तो म्हणजे तिचं संपूर्ण जग होता आणि आता ,तिच्यासाठी ती त्याला त्याच्या खऱ्या वडिलांपासून,खऱ्या कुटुंबापासून कशी काय तोडणार होती.

तो तिला बोलला होता everything will be all right don't worry,people are destined to meet,so we meet to be part of each other's life. तो काळ तिच्यासाठी खूप कठीण होता,सतत तिच्या मुलाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता.तिच्या एका निर्णयावर त्याच भविष्य अवलंबून होतं. अखेर ती आणि तिच्यातली आई यात आई जिंकली आणि महत्प्रयासाने तिने त्याचा निरोप घेतला कायमचा.त्यावेळी तिला नेमकं काय वाटलं होतं ,हे तरी कुठे सांगता येणार होत तिला .


या वैचारिक श्रमानेही तिला खूप शिणल्यासारखे वाटतं होते.ती डोळे मिटून उशीला टेकून बसून राहिली.पण डोक्यातले विचारचक्र काही केल्या थांबत नव्हते,आता ती नवऱ्याचा विचार करत होती. तो खूप दुखावला गेला होता ,त्याचा विश्वास तिने तोडला होता त्याहीपेक्षा जास्त तिने तो बहुतेक कायमचा गमावला होता.मुलाकडे पाहून आपला राग आवरून त्याने तिला ,तिच्या अश्या अवस्थेमुळे घरात राहायची परवानगी दिली होती.


अपराधीपणाची भावना मनांत ठेवून आणि त्याचे उपकार मानून ती तिच्याच घरात अवघडुन राहत होती .दुःखी वर्तमान आणि अधांतरी भविष्यकाळ या मध्ये तिची खूपच कुतरओढ होत होती.या अश्या अवस्थेत किती वेळ गेला असेल कोण जाणे, तेवढ्यात तिचे लक्ष घड्याळकडे गेले.तिच्या मुलाची शाळेची व्हॅन यायची वेळ झाली होती.कसेबसे स्वतःला सावरत ती उठायचा प्रयत्न करणार ,तेवढ्यात दार आपटत स्वारी धावतच आता आली.


"ए मम्मी तू खाली का नाही आलीस घ्यायला ?"सॉरी हं सोन्या अरे मी येतच होते थोडा उशीर झाला उठायला.मम्मी पण तू आता का झोपली आहेस? आणि तुला माहीत आहे ,"मी आलो तेव्हा फक्त सेफटी डोर लोटलेले होते ,दरवाजा तसाच उघडा होता"."अरे देवा म्हणजे इतका वेळ दाराचे पण भान राहिले नाही तिला."ती मनातल्या मनात बोलली,सांग ना मम्मी,"बेबी त्रास देतो का ग तुला?"मला आजीने सांगितलंय मम्मी ची काळजी घे,तिला त्रास देऊ नको आता बेबी येणार आहे ना.


नाही रे सोन्या",त्याला अजून थोडा वेळ आहे."मग आज काय झालं शाळेत"?तिने त्याला विचारले, "कमिंग फ्रायडे ला आमची ड्रेस रिहर्सल आहे आणि शनिवारी फायनल स्नेहसंमेलन."उद्या ड्रेस मिळणार आहे डान्सचा.वाह छान चला आता फ्रेश हो जेवण आणते.मम्मी प्लीज काहीतरी छान बनव ना ग, किती दिवस झाले नुसती भाजी पोळी खाऊन कंटाळा आला आहे.त्याचा निरागस चेहरा पाहून तिला रडू आलं ,पण ती तरी काय करणार होती,गेले कित्येक दिवस ती घराबाहेर पडली नव्हती.त्याला भाजीपाला आणि वाण सामान व्यतिरिक्त काही आणायला सांगायची हिम्मतच होत नव्हती.रोजच्या जेवणा व्यतिरिक्त काही बनवायची हिम्मत होत नव्हती.सारखी भीती वाटायची की,वेगळं काहीतरी बनवलं आणि त्याचा मूड गेला तर,त्याने गैरसमज करून घेतला तर त्यापेक्षा नकोच ते जिभेचे चोचले. पण त्यामुळे मुलावर अन्याय होतोय हे ही तिला पटतं नव्हतं.


ॉ"मम्मी प्लीज मॅग्गी बनवतेस का?"त्याच्या या प्रश्नावर भानावर येत ती स्वयंपाक घरात गेली,अन डबे शोधू लागली.मॅग्गी शोधून तिने तयारी सुरू केली.थोड्याच वेळांत मॅग्गी चा सुगंध किचन मधून दरवळू लागला अन सोनू ही आपलं आवरून हॉल मध्ये येऊन बसला.त्याने टीव्ही सुरू केला अन आपले आवडते कार्टून बघण्यात मग्न झाला.तिने बाउल भरून मॅग्गी त्याच्या समोर ठेवली आणि सोफ्यावर बसून त्याचं दप्तर आवरू लागली.

कॅलेंडर उघडून आज काय नोटीस म्हणून वाचू लागली,स्नेहसंमेलनातील बक्षीस समारंभात आपल्या पाल्याची बेस्ट स्टुडिन्ट ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे तर कृपया पालकांनी वेळेवर कार्यक्रमाला यावे. अरे वाह सोनू तू मला आल्याआल्या सांगितलं नाही,"एका मुलाला ट्रॉफी मिळणार आहे."अभिनंदन माझ्या सोन्या,राजा बेटा असाच यशस्वी हो खूप मोठा हो"


मम्मी पण तुम्हा दोघांना बोलावलंय,पप्पा येतील का?हो येतील ना ,का नाही येणार तू इतकं छान यश मिळवलंय.अग पण ते तुला परवा बोलत नव्हते का ,"तुझ्यासोबत कुठेही जायची लाज वाटतेय मला","ते पहिल्यासारखे बोलत का नाही ग, नेहमी गप्प गप्प असतात." त्याच्या या बोलण्यावर ती भांबावली,खूप वाईट वाटलं तिला पण जरासं सावरून ती बोलली,"बाळा पप्पांना की नाही ऑफिस मध्ये खूप काम असतं त्यामुळे ते खूप टेन्शन मध्ये आहेत."पण मग ते असे का बोलले,"आता आपल्याकडे बेबी येणार आहे ना ,त्यामुळे मी खूप हळू चालते अन त्यांना पण हळू चालावं लागतं म्हणून ते असे बोलले." तू काळजी करू नको ,ते नक्की येतील.


"ए मम्मी माझ्या कार्यक्रमानंतर आपण हॉटेल मध्ये जाऊया का ग जेवायला?"तू विचारशील ना पप्पांना?हो सोन्या विचारेंन हं,पण आता तू मॅग्गी संपव बरं,जेवताना बोलू नये जास्त." तो पुन्हा आपल्या कार्टून मध्ये दंग झाला अन ही तिच्या विचारांत.घरातल्या वातावरणामुळे त्याचा मनोविश्वात पण खूप खळबळ सुरू होती.त्याच बालपण जपायला हवंय हे तिला खूप प्रकर्षाने जाणवलं.


आपलं खाणं संपवून ,तो बेडरूम मध्ये गेला त्याच्या पाठोपाठ ती ही गेली.त्याला कुशीत घेऊन झोपवू लागली,झोपतानाही त्याचे प्रश्न संपत नव्हते, ती जमेल तशी उत्तरे देत होती.शेवटी थकून तो झोपी गेलो.त्याच्या अंगावरचे पांघरून सारखे करून ,ती त्याचा शेजारी पडून राहिली.झोप येत नव्हती पणं प्रचंड मानसिक थकवा जाणवत होता.झोपलेल्या त्याचा निरागस चेहऱ्याकडे बघून तिला भरून येत होतं,आता मात्र तिने तिचे अश्रु अडविले नाही.थोडा वेळ रडून झाल्यावर ती शांत झाली.


      काय हवंय तिला?हे जरी तिला कळल नसले तरी, तिच्या बाळाला ती हवी आहे आई म्हणून ,पुढे जाऊन कदाचित नवऱ्यालाही ती हवी असेल त्याच्या मुलांची आई म्हणून.या विचाराने तिला थोडंस बरं वाटलं आणि आता इथून पुढे तिचं आयुष्य म्हणजे तिची मुले आणि त्यांचे पप्पा आणि तिचं कुटुंब बस्स बाकी काहीच नाही एवढं मात्र तिला कळलं होतं .तिला काय हवंय या पेक्षा ती तिच्या कुटुंबाला ती हवी आहे याच समाधान खूप मोठं होत.झोपलेल्या त्याचा निरागस चेहऱ्यावरून तिने मायेने हात फिरवला आणि त्याचा कपाळावर आपले ओठ टेकले.नंतर एक हात आपल्या पोटावर ठेवून झोपणार इतक्यात त्या बाळाने हलकेच पहिल्यांदा आपली चाहूल दिली. त्याच्या या कृतीने जणू ते तिच्या निर्णयाला दुजोरा देत होत.तिने मनोमन देवाचे आभार मानले व नवऱ्याशी बोलण्यासाठी मोबाईल हातात घेतला.


Rate this content
Log in