ती आणि फक्त ती
ती आणि फक्त ती


तिचं वागणं कधीच तिच्या लेखणीसारखे नव्हते.. तिच्या लेखणीतून तिचे शब्द फार काही बोलायचे पण ती मात्र अडगळीतल्या पुस्तकांसारखी बंद होती.. ना तिला कोणी पाहायचे ना तिला कोणी विचारायचे.. पण जसं पुस्तकात एक गोष्ट लपलेली असते तशी तिच्या आयुष्याची गोष्ट तिच्या आतमध्ये दडलेली होती.. जी वादळे निर्माण करायची तर कधी भयाण शांतता.. पण त्या पुस्तकाला वाचणारे असे कोणीच नव्हते.. ते एक कोड होते जे समजतच नव्हते तर सोडवणे तर दूरची गोष्ट..
कदाचित यामागे काही कारण असेल.. पण पुस्तक गप्प होतं ना मग कशी कळणार.. गोष्ट..
एकदा माळा झाडून काढताना ते गप्प पुस्तक मिळालं. त्या पुस्तकाला पण वाटले मला वाचणारे कोणीतरी मिळाले ज्याची त्या पुस्तकाला गरज होती.. जसं जसं एक पान पालटले तसा तसा तो वाचक त्या पुस्तकात गुंतत गेला.. जशी जशी पानं उलटायची तसा तसा वाचक थक्क व्हायचा.. काही वेळाने थेंब अलगद गालावरून ओघळला आणि पुस्तकावर पडला.. नाही नाही म्हणता ओढ लागली गोष्ट ऐकण्याची.. हातची कंपने पावत होती अश्रू वाहत होते पण पुस्तक आपली गोष्ट सांगतच होते..
अखेर गोष्ट संपली आणि ते पुस्तक त्याच्या आयुष्यातील सर्वात खास पुस्तक बनले..