स्वप्न लग्नाचे
स्वप्न लग्नाचे


शालू आई बाबांची आवडती लेक, शिंद्यांची एकुलती एक मुलगी. हुशार आणि कर्तबगार . मेहनतीने आणि कर्तृत्वाने ती इंजिनिअर झाली आणि नोकरी मिळवून स्वतःचे अस्तित्व तिने निर्माण केले. शालूने आई बाबांची तिच्या शिक्षणाची आणि नोकरीची काळजी मिटवली होती. आता बाबांना तिच्या लग्नाची काळजी लागली होती. तशातच मानेंच्या अतुलची तिला मागणी आली. अतुलही तिच्याच ऑफिसला तिचा सहकर्मी होता. सुस्वभावी आणि जिद्द असलेला अतुल शालूला योग्यच वर होता.
अतुलचे आई बाबा आणि बहीण शालूकडे येऊन त्यांनी शालूला मागणी घातली. स्थळ चांगले असल्यामुळे शिंद्यांच्या घरी खुशीचे वातावरण झाले होते. आणि पंडितांनी 20 एप्रिल ही तारीख काढली. लग्नाला आता 2 महिने बाकी असल्यामुळे सगळंच अगदी शांततेत होईल असा सगळ्यांनाच विश्वास होता. त्या दृष्टीने हॉल, स्टेज, लायटिंग, डेकोरेशन, सगळ्याचं बुकिंग झालं होतं. कॅटरर ही ठरला होता. मेनू पक्का झाला होता. पूर्ण चार दिवसांचं बुकिंग झालं होतं, लग्नाच्या पत्रिका छापून सगळ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना निमंत्रण पाठविण्यात आले होते. सगळे आनंदात सुरू होते. त्यातच टीव्हीवर चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोना संबंधातील बातम्या देशाची चिंता वाढवत होत्या.
पण शिंदे आणि माने परिवाराला प्रकरण किती गंभीर होईल याचा मुळीच अंदाज घेता आला नाही. लग्न समारंभासाठी सगळ्यांचेच पैसे देऊन झाले होते आणि सगळे 20 एप्रिलचीच वाट बघत होते.
तशातच पंतप्रधानांनी 20 मार्चला एक दिवसाचा जनता करफ्यू जाहीर केला आणि, सगळ्यांनाच एका भीतीच्या लाटेत लोटले. परत 21 दिवसांचा लॉकआऊट डिक्लेअर झाला तो 14 ला संपणार होता, तोच एक आता आशेचा किरण होता. पण देशात कोरोनाच्या बधितांची संख्या वाढतच होती. त्यामुळे लॉकडाऊन परत वाढेल याचा सगळ्यांनाच अंदाज आला होता आणि झालेही तसेच. लॉकडाऊन 3 मे पर्यंत परत वाढवण्यात आला, आणि लग्न समारंभावर पाणी फिरले. झालेला संपूर्ण खर्चच वाया गेला होता. सगळ्यांना फोन करून काही पैसे परत मिळण्याची थोडी आशा निर्माण झाली. परंतु शालू आणि अतुल या दोघांनी पाहिलेले त्यांचे आयुष्याचे स्वप्न... ते तर अर्धेच राहिले होते. आता दोघेही परिस्थिती सामान्य होण्याची वाट बघत आहेत. त्याशिवाय पर्यायच नाही.