सुख म्हणजे नक्की काय असतं?
सुख म्हणजे नक्की काय असतं?


आज त्याचा फोन आला... फोन आल्या आल्या रूममधला गोंधळ उगाच त्याला ऐकू जाऊ नये..आणि आम्हाला नीट बोलता यावं म्हणून मी बाहेर गेले... तर तो म्हणतो....
" तू मस्त बाल्कनीत उभी आहेस ना आता..?"
" हो रे.... रूममध्ये गोंधळ आहे..."
" मोकळ्या केसांत छान दिसतेस.."
( मी इकडे तिकडे बघत होते...)
" आहे ग मी तुझ्याच जवळ..."
" पण कुठे आहेस. ? बघतोयस का मला तू... ?"
" हो... तुला मी दिसत नाहीये का..?"
( मी लगेच इकडे तिकडे बघायला लागले...)
" नको बघुस इकडे तिकडे.... दिसणार नाहीच मी तुला.."
( चेहरा पाडत, वर आकाशाकडे पाहिलं... आणि त्या चंद्राला बघून " काय रे हा..?" विचारलं )
" आता त्या आकाशाकडे बघू नकोस.... आणि त्या चंद्राशी अजिबात बोलू नकोस... आणि हो त्या ताऱ्यांना तर काहीच विचारू नकोस..."
( मी स्वतःशीच बोलले आश्चर्याने... " काय...!" )
" स्वतःशीच मनात काय बोलतेस... मी आहे ना.. माझ्याशी बोल..."
" अरे पण.... तुला कळतं कसं रे मी नक्की आता काय करतेय ते...?"
( तो फक्त हसला...)
मी म्हणाले.." आता म्हणशील ना..? ती वाऱ्याची झुळूक आली ना त्यात ही मला शोधू नकोस...
त्या रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात ही माझा चेहरा पाहू नकोस... "
शब्द कापत तो म्हणतो...
" मी का उगाच काही म्हणू...
कारण तू तेच बोलली आहेस, जे तू केलं आहेस... हो ना...?"
मी परत हसले छान...
" हसलीस ना... हेच हवं होतं... अशीच हसत राहावीस तू.. एवढंच मनापासून वाटतं....
मी तिकडे जवळपास नाहीच कुठे मुळी.... त्यामुळे मला इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करू नकोस..."
" मग..? तुला हे सगळं कसं जाणवलं, जे मी केलं...."
" तुझी शांतता मला ऐकता ही येते...
तुझ्या टिंबांची भाषा मला वाचता येते....
अन् तुझ्या तुझ्या श्वासांचे आरोह अवरोह मला अनुभवता येतात...
मग सांग आता, मी तुझ्यापासून दूर आहे की जवळ...?"
मी फक्त हसले.... मनापासून हसले....
सुख म्हणजे नक्की काय...?
तर माझ्या आयुष्यात त्याचं " असणं " हेच सुख....!!