कातरवेळ
कातरवेळ
अशाच एका कातरवेळी आम्ही दोघं खूप गप्पा मारत बसलेलो.
तीन दिवसांच्या कडाक्याच्या भांडणानंतरचा अबोला आजच सुटला होता. अगदीच प्रेमाच्या गोष्टी नाही पण समजूतदारपणा दाखवून सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढणं, एकमेकांना समजून घेणं असं सगळं गोड गोड सुरू असताना.... अचानक फेसबुकचं एक नोटीफिकेशन आलं.... दोघांनाही...!
" ती " ने टॅग केलेल्या तिच्या कथेचं नोटीफिकेशन....!
" ती " कोण...?
" ती " म्हणजे कधीतरी ह्याच्यात गुंतलेली, ह्याच्यावर एकतर्फी प्रेम करणारी, ह्याची कधीकाळी असलेली मैत्रीण.
नाही नाही.... मला अजिबात वाईट वाटत नाही... माझी या सगळ्याला काहीही हरकत नाही... विषय जरा वेगळाच आहे...
तर....
तिला माझा फार राग....
का...?
एकतर्फी प्रेमाचा हाच एक वाईट परिणाम...! आपण ज्याच्यावर एकतर्फी प्रेम करतो त्याचं जर दुसऱ्या मुलीवर प्रेम असेल तर त्या मुलाचा राग करायचा नाही...पण त्या मुलीचा राग नक्की करायचा जिच्यावर त्याचं प्रेम आहे.... अगदी जन्मोजन्मीची वैरीच असावी असा राग....
हे तसच काहीसं....
तर....
एकमेकांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास असल्याने त्या पोस्टचा आमच्या दोघांवर फार परिणाम झाला नाही... पण काळजी आणि भीती वाटली तिची... आणि आमच्या नात्याचीही....
बऱ्याच अडचणी सुरू असताना, आम्हाला दुसरी कुठलीही अडचण नको हवी होती....
कारण अशा मुली काहीही करू शकतात... कुठल्याही थराला जाऊ शकतात.... यावर माझा ठाम विश्वास...
मान्य, मी ही मुलगीच आहे... पण...
अनुभव बोलतात हो, अनुभव बोलतात.... !!
एकतर्फी प्रेम जेवढं त्याग वगैरे शिकवतं ना तसच ते राग, द्वेष, इर्षा, बदला हे ही शिकवतं.
फार काही विशेष नाही..
पण ती नेहमीच त्याच्याकडे असलेल्या अत्यंत नाजूक पण खोल जखम असलेल्या भावनिक गोष्टीवर मारा करायची....
ती गोष्ट म्हणजे त्याच्याकडे नसलेली त्याची " आई "....!
तो त्याबाबतीत खूप हळवा आहे.
आपण कधीच न पाहिलेली आई, कधीच तिचा आवाज न ऐकलेली आई त्याला आठवली की त्याच्या डोळ्यांतून घळघळ पाणी वाहतं... अगदीच तो एकटा पडतो तेव्हा.... कासावीस होऊन रडत असतो... वेड लागल्यासारखं वागतो....
पण ही बया, त्याच आईवर लिहीत असते नेहमी.
हे पहिल्यांदाच नाही तर अशा कितीतरी कथा लिहून लिहून ती टॅग करत असते... मुद्दाम ... त्याने वाचावं आणि त्याने भावनेच्या भरात तिच्याशी बोलावं म्हणून...
आणि तेच तो वाचतोही,
घाबरत का होईना, वाचतो...
त्याला त्रास होतो. खूप त्रास होतो...
मला हेच कळत नाही...
आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याला त्रास होईल असं कसं वागू शकतो...?
किंवा त्याच्या सगळ्यात नाजूक भावनांचा वापर करून खेळ करू, इतक्या खालच्या पातळीवर कसे जाऊ शकतो...?
ती कथा आम्ही दोघांनीही वाचली... वेगवेगळ्या वेळेस....
दोघांच्याही तोंडून एकाच वेळी एकच वाक्य बाहेर आलं....
" मला धडधडतंय रे...!!"
मग बाकीचे विषय राहिले बाजूला आणि सुरू झालं बोलणं याच एका बयेवर.....
" ही मुलगी घातक आहे. अशीच वागत राहिली तर एक दिवस माझा खून करेल नाहीतर स्वतः मानसिक रोगी होऊन बसेल... माझ्या संसारात असे अजुन किती विघ्न पार करायचे आहेत...? " तो वैतागलेल्या, भांबावलेल्या, घाबरलेल्या स्वरात म्हणाला....
मी त्याला धीर देत... माझा त्याच्यावर असलेला विश्वास दाखवत त्याला म्हणाले, " नको घाबरूस, अशा एक नाही हजार आल्या ना तरी मी तुझा हात सोडणार नाही. तुझ्यापर्यंत पोहोचण्या आधी तिला माझा सामना करावा लागणार... आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
तू कुठेच चुकला नाहीस, हे मला माहितीये रे.....
तिला आपल्या लग्नाविषयी सगळं माहित असताना सुद्धा ती मुर्खासारखी वागतेय...
यात तुझी काहीही चूक नाही...
मी आहे सोबत कायम...! तुझा हात घट्ट धरून...!"
घाबरलेला तो अगदी लहान मुलासारखा माझ्या कुशीत शिरला...
" तूच मला सांभाळ " असं म्हणत..! अन् शांत झाला... घट्ट बिलगून होता कितीतरी वेळ..
यापेक्षा सुंदर कातरवेळ कुठली असावी....माझ्यासाठी...!!
जेव्हा एक संकट त्याच्या डोक्यावर उभ राहतं आणि तो फक्त आपल्यावर विश्वास टाकतो....
ते संकट दुःख, अश्रू घेऊन आलं होतं...
पण तेच आमच्या दोघातलं नातं अजूनच घट्ट करून गेलं....
आमचं नातं, त्यातला विश्वास असाच घट्ट होणार असेल ना तर
असे संकटं घेऊन येणारी कातरवेळ मला कायम हवी....
माझा राजस मनातून खंबीर होण्यासाठी...!!
आमच्या नात्याची गाठ अजूनच घट्ट होण्यासाठी...!!
अशाच एका कातरवेळी ती दोघं प्रेमाची झुळूक अनुभवताना, अचानक मोठं मोठं वादळ आलं....
पण खरं सांगू....
त्या वादळाने त्यांचं नातं अजूनच घट्ट केलं...