Anushree Dhabekar

Others

2  

Anushree Dhabekar

Others

सोशल मिडीया शाप की वरदान

सोशल मिडीया शाप की वरदान

3 mins
66


सोशल मीडिया हा विषय म्हणायला जेवढा सोपा आहे. तितकाच समजून घ्यायला क्लिष्ट आहे. सोशल मीडिया म्हणजे सामाजीक माध्यम ज्यातून विचाराची देवाणघेवाण करता येते. 


मी लहान होते, तेव्हा घरी साधा वर्तमानपत्र सुध्दा येत नव्हता. टिव्ही तर दूरची गोष्ट. पण, सोबतिला खूप सवंगडी होते. शाळा सुटली का खेळायला आई आवर्जून बाहेर पाठवायची. क्रिकेट सारखे खेळ खेळायला मुले मुली एकत्र गोळा होत होती. तेव्हा बिल्डिंगची रांग दिसत नव्हती. आणि काँक्रिटचे रस्ते दिसत नव्हते. एकत्र कुटुंब पद्धती बहुतेक प्रत्येक घरी होती. त्यामुळे बहीण भावंड खेळायला मिळत होते. शाळेच्या दप्तरात पुस्तकाचे ओझे नव्हते. म्हणून कधी पाठदुखी पाहिली नाही. गृहपाठ राहायचा. तो सुध्दा शाळेतील शिक्षक विचार विनीमय करून देत होते. आज या सराचा गृहपाठ जास्त आहे, तर मी उद्या देणार. बालपण अश्याप्रकारे मजेत गेले. पैसा कमी आणि समाधान जास्त. हळूहळू जीवण शैली बदलू लागली. प्रत्येकाजवळ पैसा हा थोडा तरी गरजेपेक्षा जास्त येत आहे. घरात सुखसोई वाढल्या. हम दो हमारे दो ही संस्कृती आली. पुढे जाऊन आता एकच पुरे असे कुटुंब दिसत आहे. एक अपत्य म्हटलं की लाड सुध्दा तेवढेच अधिक होते. प्रत्येक व्यक्तीजवळ आता स्मार्ट फोन आहे. म्हणे जीवण शैली उंचावत आहे. पण, खरंच आज आपण समाधानी आहोत कां? हा प्रश्न तेवढाच महत्वाचा. 


आज नेटवर्कचे जाळे इतके पसरले आहे की आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. सकाळी सूर्याचे दर्शन घेण्याऐवजी मोबाईलवर व्हाॅट्सॲप पहिले पाहतो. सूर्याचे कोवळे किरण आपल्याला मिळत नाही. पण, डी व्हिटॅमीनची कमतरता वाढून अस्थिरोग, डोळ्याचा आजार वाढलेला आहे. शेजाऱ्यांना गूड मॉर्निंग, गूड नाईट हे सुध्दा आपण मॅसेजद्वारेच सांगतो. म्हणजे आपला संवाद हा तुटत आहे. कानाची ऐकण्याची शक्ती कमी होताना दिसत आहे. शाळेतील मुलांना होमवर्क सुध्दा मोबाईल पाहून पूर्ण करावे लागते. यासाठी जवळपास प्रत्येक घरात वायफाय लावण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेटवर्क पोहचावे, म्हणून टाॅवर उभारल्या जात आहे. परंतु, यामुळे रेडियेशनचे प्रमाण वाढत आहे. त्याचा दुष्परिणाम सर्वात जास्त पक्ष्यांवर होत आहे. 


आजच्या युगात सोशल मीडिया आपल्या जीवणाचा एक भाग झाला आहे. यामुळे आपण एका सेकंदात विचारांची देवाणघेवाण करत असतो. आपल्याला जगाच्या पाठीवर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींची माहिती तात्काळ मिळते. सोशल मीडियामुळे ब-याच चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्याचा फायदा मानवाला प्रगती पथावर नेण्यास होऊ शकतो. परंतु, त्याचा गैरवापर सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 


मीडियावर दाखविण्यात येत असणारी बातमी, ही खरंच खात्रीशीर आहे कां? याचा सारासार विचार होताना दिसत नाही. भरमसाठ ॲपच्या माध्यमातून समाजाचे शोषण होताना दिसत आहे. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांचे तर पुरेपूर माहिती नसतांना, गैरवापर होताना दिसत आहे. लहान मुलांना कमी वयात खूप माहिती मिळत आहे. पण, काही माहिती त्यांच्या कोमल मनावर वाईट परिणाम करणारी असते. त्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येतांना दिसत आहे. या माध्यमातून बहुतेक वेळा देशाची गोपनीय माहिती सुध्दा उघडकीस आल्याचे दिसून येते. आणि परकीय देश त्याचा गैरवापर करतात, तेव्हा देशाची सुरक्षा धोक्यात येते. 


मनोवैज्ञानिक यांच्या सर्वेक्षणानुसार सोशल मीडियाच्या खूप जास्त वापरामुळे युवा पिढीचे समाजात मिसळणे, एकमेकांचे सुखदु:ख समजून घेणे, जवळपास बंदच झाले आहे. घरी सुध्दा एकमेकांशी संवाद होत नाही. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होत आहे. आणि ते एकाकी जीवणाकडे वळल्याचे प्रमाण वाढले आहे. 


सोशल मीडिया हे शाप आहे का वरदान हे ठरवता येणे फारच कठीण काम आहे. कारण नाण्याच्या दोन्ही बाजू हे आपल्या ठिकाणी बरोबर असतात. सोशल मीडिया हे एक असे शस्त्र आहे. ज्याचा वापर करताना आपल्याला ठरवायचे आहे, त्याचा उपयोग हा आपल्याला शाप ठरणार की वरदान. 


Rate this content
Log in