Vanita Bhogil

Others

4.3  

Vanita Bhogil

Others

श्रीमंती

श्रीमंती

4 mins
654


 आज मकर संक्रात,, 

 तीळ गूळ घ्या आणि गोड बोला...


   हा तर!! काय झाले दुपारी सगळं घरातील आवरून सोसायटी मधील बायका आणि तीन,चार मैत्रिणी अश्या आम्ही दहा बारा जणी जवळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निघालोत. प्रत्येक जणी आपल्या श्रीमंतीचा जमेल तेवढा तोरा मिरवत होतोत. त्यात मी ही अपवाद नाही बर... भारी साड्या, दागदागिने, गजरे म्हणजे हवे तेवढे नटून घेतले होते,,, आणि साहजिकच आहे.. बायकांचा सण म्हटल्यावर एवढं तर होणारच न हो?? सगळ्या जणी मंदिरात गेलोत, देवाचा ववसा झाला, हळदीकुंकू, वाण अगदी सगळं व्यवस्थित झालं... मंदिराच्या सभामंडपात आमच्यासारख्या बऱ्याच जणींचा घोळका बसला होता ,, नथीच्या नखऱ्यापासून ते कानातील झुमक्यापर्यंत मान हलवून प्रत्येक जण दिखावा करत होती... सगळ्या एकमेकींना हळद कुंकू लावून वाण देत होत्या, कुणी विडे ही मंदिरात घ्यायला आणले होते... हे सगळं चालू होत. जवळपास एक तास गेला आमचा त्यातच...


 पण आम्ही मंदिरात गेल्यापासून पाहत होतोत मंदिराच्या एका बाजूला भिंतीला टेकून एक बाई बसली होती... आमच्या गोंधळात कुणाच तिच्याकडे लक्ष गेल नव्हतं की आम्ही मुद्दाम तिला दुर्लक्षित केल होत माहीत नाही... मला तिला बघून थोडं वेगळं वाटत होतं, मंदिरात आलेल्या प्रत्येक बाईकडे ती हसऱ्या नजरेने बघत होती, पण येणाऱ्या प्रत्येकीची नजर तिच्याकडे तुच्छतेने बघत होती. मला लगेच जाणवले. येणारी एखादी सोडली तर तिला कुणीच हळद कुंकू लावत नव्हते... तरी तिचा चेहरा प्रसन्न होता, मी थोडावेळ तिच्याकडेच बघत बसले, तिच्या अंगावरची साडी हिरव्या रंगाची जुन्या पद्धतीची म्हणजे कमीतकमी वीस वर्षे तरी, भरजरी काठ त्यावरची जरी काळपट पडलेली.


   साध्या कापडाचा ब्लाऊज, कानात नकली मोत्याची फुले, गळ्यात चार पदरी काळे मनी आणि दोन वाट्या( डोरले) बहुतेक तेवढेच सोन्याचे असावेत, हातात मात्र हातभार बांगड्या होत्या, आणि हो कपाळावर टिकली नाही तर मोठं लाल अगदी ठसठशीत कुंकू होतं... वय साधारण पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास असावं. आमच्यापैकी प्रत्येक जण आपल्याच तोऱ्यात होती, तिला हळद कुंकू लावन्यात कुणालाही रस नव्हता, तिचा तो प्रसन्न चेहरा बघून मला मात्र राहवलं नाही, मी सरळ माझ ताट घेऊन तिच्या समोर जाऊन बसले, तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अजूनच नितळ दिसत होती...


   मी तिला हळदी कुंकू लावले, वाण ओटीत घातले, तिनेही हळदी कुंकू लावले वाण दिले, माझ्या भांगात कुंकू भरू का म्हणून मला विचारले तेव्हा मी म्हणाले अहो विचारायचे काय त्यात, आज सुवासिनींचा दिवस आहे... मग तिने कुंकू भांगात भरले आणि भरताना म्हणाली जन्मोजन्मी सुवासिनी राहो तुम्ही... तिच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात आसव उभे राहिले, केवढं मोठं दान तिच्या तोंडून मला मिळालं होतं... मी तिच्या शेजारीच बसले, आता येणारी प्रत्येक जण मला हळदी कुंकू लावायची आणि तिच्या बाजूला असल्यामुळे तिलाही इच्छा नसली तरी लावाव लागायचं... आमचा ग्रुप मात्र वेगळ्याच दुनियेत मिरवत होता. थोडी गर्दी कमी झाली तसं मी त्या बाईला विचारलं! कुठे राहता तुम्ही, तिने जवळच्या बैठी चाळवजा घराकडे हात करून म्हणाली इकडे आहे घर माझं... मनात आलं, बहुतेक घरची परिस्थिती बेताचीच असावी.

मग मी विचारलं, तुमची मुलं आणि मिस्टर काय करतात? त्यावर त्या बाईच उत्तर ऐकून मला माझीच लाज वाटू लागली.

    त्या म्हणाल्या, माझा मुलगा आणि मुलगी दोघेही डॉक्टर आहेत, आणि आमचे हे सरकारी दवाखान्यात कंपाऊंडर आहेत... मला तिचं आश्चर्य वाटलं.

मुलं एवढी शिकली आणि या बाईच्या अंगावर साधी नीटशी साडीदेखील नाही? खोटं बोलत असावी.

  मग पुढे मी म्हणाले, मुलं डॉक्टर आहेत मग तुम्ही फ्लॅटमध्ये का राहत नाहीत.

  त्यावर तिचं उत्तर मला निरुत्तर करून गेलं...

  ती म्हणाली ताई मुलांनी स्वतः कमवून शिक्षण घेतलं, आमची तेवढी ऐपत नव्हती पण त्यांची जिद्द होती ती देवाने पूर्ण केली. आता दोन्ही मुलं गावी असतात. 

   मी.. गावी का??

  अहो आमचं गाव डोंगरात आहे, तिथं दवाखाना, हॉस्पिटल याची काहीच सोय नाही. म्हणून मुलांनी ठरवलं, आपल्या गावातच छोटंस हॉस्पिटल उभं करू म्हणजे गावातील गरीबांनापण सेवा देता येईल. आम्ही इथे आहोत कारण आमच्या यांची रिटायरमेंट अजून बरेच वर्ष बाकी आहेत, गावी हॉस्पिटल बनवायला यांनी कामातून कर्ज काढून मुलांना दिलं आहे ते ही फेडायचे आहे, म्हणून इकडे राहावं लागतं आहे. आता मुलांचं हॉस्पिटल चांगलं चालू आहे, त्यातून आलेल्या पैशातून मुलं गावातील गरीब, गरोदर बायांची बाळंतपण (सिझर) याकरिता बाहेरच्या डॉक्टरची फी भागवतात. उरलेल्या पैशातून गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात.


मला हे ऐकून विश्वासच बसत नव्हता.. आतापर्यंत जिला मी सुद्धा गरीब समजत होते ती मनाने कितीच श्रीमंत होती...  


  आपली श्रीमंती तिजोरीपुरती मर्यादित असते पण अश्या लोकांची श्रीमंती आपल्या कितीतरी तिजोऱ्या रिकाम्या केल्या तरी कमावता न येण्यासारखी असते. तिचं ते बोलणं ऐकून मी निःशब्द झाले.


   मैत्रिणी निघाल्या, तशी मी ही निघाले, मंदिराबाहेर आल्यावर, सगळा ग्रुप मला म्हणू लागला, काय गं तू एवढ्या बायका सोडून त्या बाईजवळ का जाऊन बसलीस? एकजण म्हणाली ई... ई... कशी होती ती बाई, साधा एक दागिना नव्हता की नीट साडीदेखील नव्हती अंगावर...


मी मात्र आता निघताना स्वतःला खूप गरीब समजत होते, पाय जड झाले होते, कोणती श्रीमंती मिरवतोय आपण हेच कळत नव्हतं. खरंच आपण एवढे खालच्या पातळीवर कसे जाऊ शकतो, कुणाच्या दागदागिने आणि कपड्यावरून त्याला तुच्छ समजतो. खरी श्रीमंती कशात आहे हे आपल्याला कधी कळतच नाही.


का कळून न कळण्याचं आयुष्यभर नाटक करत असतो? प्रत्येक जण आज स्वतःच्या श्रीमंतीचा डंका पिटत असतो, आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो. मला मात्र आज खरी श्रीमंती समजली,  तिजोरीच्या श्रीमंतीपेक्षा कितीतरी पटीने मनाची श्रीमंती मोठी आहे.


Rate this content
Log in