Karuna Gurav

Others

3.6  

Karuna Gurav

Others

श्रीमंत कोण

श्रीमंत कोण

3 mins
11.7K


 मे महिना सुरू होता... सकाळच्या दहा साडेदहाची वेळ.... सूर्यनारायण चांगलाच तापला होता ... बाहेर डोकावून पहाणेसुद्धा त्रासदायक वाटत होते... अशातच कोरोना महामारीने आख्खा जग त्रस्त होता ....संचारबंदी, लाँकडाऊन , जनता कर्फ्यू यामुळे बाहेरचा भाजीपाला आणणे शक्यतो टाळत होतो... पण पोटोबा काय गप्प बसतो व्हय ? पोटोबाला शांत बसवण्यासाठी जिभेचे नखरे पुरवावेच लागतात... मग काय आवश्यक भाजीपाला हवाच... टोमॅटो संपले होते.... झणझणीत आमटी करायची होती.... या विचारात असताना खालून आवाज आला ...." टोमॅटो , वांगी "......आवाज ऐकून मी गॅलरीत गेले .... " टोमॅटो कसं दिलं ? " .....असं वरूनच विचारले .. आवाज ओळखीचा असल्यागत तो चटकन वर बघितला ... किडमिडित शरीरयष्टी असलेला सतरा - अठरा वर्षाचा तरुण , तोंडाला रुमाल बांधलेला ( कोरोना मुळे ) , सायकल चालवून धाप लागल्यागत , थकलेला असूनही आनंदाच्या नजरेने , आपुलकीच्या नजरेनं डोळ्यात स्मित हास्य घेऊन मला बघत होता.... माझी ही नजर त्याच्या डोळ्यात खिळली.... आणि कुणीतरी ओळखीचा व्यक्ती आहे , ही जाणीव झाली... क्षणार्धात तो मुलगा म्हणाला , " मॅडम , कशा आहात ? " ... मी सहजच उत्तर दिले " मजेत ".... तेवढ्यात टोमॅटो घेत असलेल्या शेजारच्या वहिनी म्हणाल्या , " मॅडम , टोमॅटो खूपच छोटे- छोटे आहेत .. बाजारात याहून छान दहा रुपये किलो आहेत.." पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी खाली आले .. कारण मला ती व्यक्ती कोण आहे , हे जाणून घ्यायचे होते ...मी त्या वहिनींना खाली उतरच म्हणाले , " *बाजारात जाऊन कुठलातरी भाजीपाला आणण्यापेक्षा ग्रामीण भागातून आलेला हा ताजा भाजीपाला परवडतो* ." " आता पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचे " ..... त्या टोमॅटो नको म्हणून निघून गेल्या ... मी त्या मुलाला पुन्हा विचारलं , " टोमॅटो कसं ".तो म्हणाला , " मॅडम , दहा रुपये किलो ." त्याला न राहून अजून त्याने विचारलं , " मॅडम , मला ओळखलं का ?" .....मी सहजच म्हणाले , " नाही रे " ....लगेच उत्साहाने तो म्हणाला , " मॅडम , मी शुभम ....तुमच्या वर्गातील शुभांगी चा भाऊ ...." असं म्हणत.... त्याने तोंडावरील रुमाल काढला ...तेव्हा चटकन लहानपणीच्या शुभमची छबी माझ्या नजरेसमोरुन तरळुन गेली ... आणि जिज्ञासा पोटी मी चौकशी करू लागले ... " तुझं शिक्षण काय झालं आहे ? शुभांगी काय शिकत आहे ? शिक्षण कोठे चालू आहे ? " या चौकशा संपल्यानंतर कोरोना जनजागृती म्हणून काळजी कशी घ्यायची , यावर चार गोष्टी सुनावल्या ... ( शेवटी शिक्षकाची जात आमची )...


  या सर्व मनसोक्त गप्पा नंतर पुन्हा मी म्हणाले , " अर्धा किलो टोमॅटो दे " .... त्या वहिनींच्या सांगण्याप्रमाणे खरच टोमॅटो खूपच छोटे , रस नसल्यागत होते...( पण माझा विद्यार्थी , त्याला हातभार लागावा , म्हणून घ्यावे अर्धा किलो टोमॅटो असा विचार केला ...) मला मात्र पाच रुपये तरी वाचवायचे , हा विचार मनात घोळत होता ...... पण त्यांनी काटा न करतात माझ्या हातातून भाजीची टोपली घेतली आणि टोपली भरून टोमॅटो , वांगी भरली ... " अरे , किती देतोस ? मी फक्त अर्धा किलो म्हणाले " ...असं माझं तोंड चालूच होतं.... तोपर्यंत त्यांने जवळपास दोन ते अडीच किलो टोमॅटो , एक किलो वांगी माझ्या टोपलीत भरली होती.... मी म्हणाले , " अरे , मी हातात दहा रुपयेच घेऊन आले आहे . थांब , उरलेले पैसे घेऊन येते .." असे म्हणत दहा रुपये त्याच्या कॅरेटमध्ये ठेवले आणि तडक उरलेले पैसे आणण्यासाठी वर निघाले.... तोपर्यंत तो ओरडत होता , " मॅडम , असू द्यात.... पैसे नको , मॅडम,  पैसे नको ...." मी वरून खाली येईपर्यंत तो टोपली शेजारच्या वहिनी कडे देऊन सायकलवर निघाला होता.... " टोमॅटो, वांगी ..... " म्हणत मी मात्र अधाशासारखा त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे टक लावून पाहत होते ... विचारचक्र सुरु झाले एवढ्या उन्हात सायकलवरून भाजी विकताना मला मोठ्या मनाने जवळपास 40 ते 45 रुपये ची भाजी फुकट देतो .... मग श्रीमंत कोण ? ....

( सर्व शेतकरी वर्गाला सलाम... शेतातील माल हाताने भसाभसा भरून देतात.... तेव्हा फायद्याचा विचार करत नाहीत..)


Rate this content
Log in