Karuna Gurav

Others

4  

Karuna Gurav

Others

मँडम , जादूचे पाणी आणले का?

मँडम , जादूचे पाणी आणले का?

6 mins
224


      खूप दिवस झाले विचाराने डोक्यात थैमान घातले आहे. वर्ग 100% प्रगत करायचा , हे ध्येय निश्चित असताना , काही विद्यार्थी मात्र मला साथच देत नव्हते. *त्यांच्याविषयी खोल विचार करून मी त्यांच्या अधिकच प्रेमात पडले* त्यातल्या त्यात *पूनी* म्हणजे वर्गाचा महामेरुच. *पूनी* माझी पहिलीची विद्यार्थीनी ... तिचे मूळ नाव वेगळे आहे ..पण कुणीच तिला तिच्या नावाने बोलत नसत.. सर्व वर्ग , शाळा एवढेच काय  अख्खा गाव तिला पूनीच म्हणायचा..पूनी साऱ्या गावात प्रसिद्ध होती.. यावरूनच समजले असणार पूनी कशी होती?? पहिलीला पूनीचा प्रवेश झाला. प्रवेश घेताना आईचा पदर धरून आलेली पूनी... पदराआडून मला बघून हसायची.... वर्गातील इतर मुलांना चिडवायची...कधी नाक वर करून चिडवणे तर कधी डोळे वटारून रागाने बघणे चालूच... प्रवेश फाँर्म लिहिपर्यंत तिचे हे चाळे सुरुच होते.. वरून तिची आई म्हणाली , " मागील वर्षी अक्कलकोट ला प्रवेश घेतला होता पण पूनी कधीच शाळेला गेली नाही "... झाले .... पूनीविषयी थोडीफार कल्पना मला आली....तिची चंचलवृत्ती लगेच लक्षात येते.. माझी नजर चुकवून स्वतः काही केले नसल्याचा अविर्भाव दाखवत पूनी वर्गात बसली.. बसली खरे पण गप्प नाही.. शेजारच्या मुलीला चिमटा काढूनच... आणि वरून मी काही केले नाही , असे ठासून सांगितले... पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी... अजून कुणाचाच स्वभाव , वर्तन मलाच समजले नव्हते.... मग मी काय निर्णय घेणार ??? मलाच समजले नाही.. रडणाऱ्या मुलीची समजूत काढत तो विषय मीच बाजूला केला.... *तेव्हा पूनीची तिरकी खून्नस नजर माझ्या नजरेतून सुटली नाही* पहिल्याच दिवशी तिच्या स्वभावाची ओळख झाली...


 मग काय?? समोर बसण्यासाठी इतरांचे दप्तर मागे फेकणे ....चिमटा काढणे....चिडवणे , डवचणे ....खोडया करणे चालूच झाले.... आता मात्र मी पूनीला पुरती ओळखू लागले..


 ती इतरांना त्रास देऊ नये , म्हणून मी तिला माझ्याजवळ बसवू लाघले. तर पूनी खाली बसण्याएवजी ती सतत टेबलावर हात ठेवून मी काय करते , हे न्याहाळत असे..जणू माझं निरीक्षणच करायची...माझी साडी , केशरचना , माझ्या बांगड्या याचं तोंडभरून कौतुक करायची... माझं लिखाण, माझं वागणं - बोलणं सर्वकाही टक लावून न्याहाळायची... यामुळे तिची व माझी गट्टीच जमली... *लेकरानं आईजवळ घुटमळावे तसे ती माझ्याजवळ घुटमळायची*.... पूनीशी माझे नातेच निर्माण झाले आहे....


    आता तर पूनीची ओळख इतर शिक्षकांनाही होऊ लागली . पुनी परिपाठाला स्वतःचे गुण दाखवायचीच...राष्ट्रगीताला कधीही स्तब्ध उभा राहत नसे. तिला कितीही सांगा , ती मात्र खुशालचेंडू प्रमाणे उभी असायची.. परिपाठात कोण काय करतंय ? याकडेच तिचे लक्ष... मौन असताना तर *पुनी एक डोळा बंद करून उभ्या असलेल्या बगळयाप्रमाणे एका डोळ्याने आजूबाजूला पाहायची* .. माझी नजर जाताच पटकन डोळे बंद करून सोज्वळ रूप धारण करायची...आणखी काही वेळाने लगेच एक डोळा उघडायची.. परिपाठाला रोज कोणत्यातरी शिक्षकांचे बोलणे खायचीच.. बोलणे सुनावल्यावर थोडावेळ पूनीचा चेहरा बघण्यासारखा होई... जणूकाही तिच्यावर अन्याय केल्यासारखा चिडका चेहरा करायची ..


  कधी शांत न बसणारी पुनी.. वर्गात तरी कशी शांत बसेल??? वाचन घेताना खाड खाड आवाजात सारे वाचून दाखवायची... पण लिहायला सांगितले की पुनीला काय व्हायचे देव जाणो... मग ती काहीतरी कारणे सांगून वर्गातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायची...कधी तहान लागली तर कधी नंबर एक... अनेक कारणे शोधायची.. निरीक्षणावरून हे माझ्या लक्षात आल्यावर पाणी पिण्यास , बाथरूमला जाण्यास मी तिला सोडायचे टाळू लागले... तर ती दोन नंबरचे कारण सांगत तोंड वेडेवाकडे करायची ...जणू काही तिला खुपच घाई असल्यागत.... वर्गातच घाण होईल अशा अविर्भावात.... माझा नाईलाज व्हायचा आणि तिला बाहेर सोडण्या पलीकडे मला पर्यायच नसायचा.... लिखाणाला कंटाळा करणारे पुनी संविधान मात्र मोठ्या आवाजात खाडखाड म्हणून दाखवायची... वाचायला येत असल्याच्या आवेशात पाठ्यपुस्तक समोर धरून संविधान प्रास्ताविक वाचल्याचा आनंद व्यक्त करायची ...सर्वजण पुनीच्या तक्रारी दिवसभर सांगायचे..कधी कुणाला चिडवली..तर कधी कुणाला मारली... कधी कुणाला भांडली तर कधी कुणाचं काय घेतलं... अनेक तक्रारी ऐकावे लागायच्या.... आता मात्र पुनीच्या तक्रारी ऐकून मला ही रोजची सवय झाली होती ...काही काही वेळेस तिचा रागही यायचा ...मी रागानं पाहिलं की गरीब गाई सारखी मान खाली घालून बसायची ...


खरं सांगू अभ्यासात रस न दाखवणारे पुनी ...वर्ग झाडायला झाडू कुणाला देत नसायची.. झाडणे हे तिचे आद्यकर्तव्यच झाले होते... वर्गात एखादा कागद दिसला की कागद फाडणाऱ्या मुलाला रागाने लाल होऊन बघायची... छान नाक मुरडायची... तावातावाने रागवायची आणि कागद कचरापेटीत नेऊन टाकायची... मुलाने कागद कसा टाकला , हे मोठ्याने मला सांगायची .. पूनी म्हणजे स्वच्छतेची चालतीबोलती यंत्रणा आणि हि यंत्रणा कधीकधी स्वतःच कचरा करायची ...( नकळतपणे) ...


   आणखी एक गोष्ट मला आजही त्याचा निकाल लावता आलेला नाही... ही गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या की पुनीने पेन घेतलं , वही चोरली... पूनीने पुस्तक घेतलं... कुणाचं काय तर कुणाचं काय .. म्हणून मी एक युक्ती केली... संपूर्ण वर्गाला सांगितलं की माझ्याकडे असे जादूचे पाणी आहे की ते पाणी शिंपडतातच व्यक्ती खरं बोलतो आणि उद्या मी ते पाणी घेऊन येणार आहे... त्यानंतर कोण पेन , वही पुस्तक घेतले आहे हे मला नक्की समजेल... दुसरा दिवस उजाडला.. माझी गाडी शाळे समोर येताच ..पूनी पळत पळत आली आणि मला विचारायला लागली ... मॅडम पाणी आणलं का??? मी काल सांगितलेले विसरून गेले होते ...कसलं पाणी हे माझ्या लवकर लक्षातही आले नाही... पण पुन्हा आठवण करून दिली की मॅडम जादूचे पाणी घेऊन आलात का ??? तुम्हाला चोर पकडायचा आहे ना !! मी म्हटलं , " हो ".. मी घेऊन आले पाणी..परिपाठ झाल्यानंतर सर्वांच्या अंगावर पाणी शिंपडणार आहे.. वर्ग भरला , सर्व विद्यार्थी आले आणि सर्वांचा एकच गलका... मॅडम , जादूचे पाणी आणलं का ?? सर्वांचा आत्मविश्वास बघून मला वाटलं, की यापैकी कोणीच काहीच केलेलं नसणार... म्हणून आपलं पाणी हे खोटे ठरु नये , म्हणून मी ते जादूचे पाणी शिंपडायचे टाळलं आणि सांगितलं की पुढच्या वेळेस नक्की आणणार आहे .... पूनी मात्र जीव भांड्यात पडल्यागत शांत झाली.. माझी खात्री पटली कि पूनीच अपराधी आहे.. पण सर्व विद्यार्थ्यांसमोर काही न सांगता मी पूनीला जवळ घेऊन चोरी करु नये , हे समजावून सांगितले.. तर त्या वस्तू चुकून माझ्या दप्तरात आले आहेत , असे सांगून पूनीने सुटकेचा निःश्वास सोडला.. त्यानंतर पूनी कुणाच्या कोणत्याच वस्तू घेतली नाही..


आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की पूनीला वडिलांचं नावंच माहिती नव्हतं... वडील ही संकल्पना तिला माहिती नव्हती.. वडिलांचं प्रेम , माया, वडिलांच्या जबाबदाऱ्या या पासून पूनी अलिप्त होती.... वडील नावाचं वृक्ष तिला कधी सावली दिलं नव्हतं..तिची आई तिचा सांभाळ करी... तिच्या आईकडून समजलं की ती पोटात असतानाच तिचे वडील तिला सोडून निघून गेले... जन्मताच बाप म्हणजे कोण हेच तिला कळत नाही... तिचं सगळं पालन-पोषण तिची आईच करायची.. आई पण सतत कामात व्यस्त ..दिवस-रात्र कष्ट ....आईची सतत धावपळ... यामुळेच पूनी कडे दुर्लक्ष झाले... म्हणूनच की काय *पूनी प्रेमासाठी आसुसलेली होती* सतत माझं प्रेम मिळवायचा खटाटोप करायची ...कधी प्रेमाने हात धरायची तर कधी साडीचा पदर ....कधीकधी डोक्याला डोके लावून फोटो काढायची तर कधी मला टेकून उभे राहायची... वर्गातील इतर मुली माझ्या जवळ आलेल्या तिला चालायचं नाही... जणू काही मी म्हणजे तिची स्वतःची प्रॉपर्टी ...मुलींना रागावून बाजूला सारायची आणि म्हणायची , " मॅडमला निवांत बसू द्या . सरका बाजुला ." पूनी कितीही खट्याळ असली तरी मला आवडायची... कारण ती खुप हक्काने बोलायची ....


पूनीने एकदा कहरच केला. मधल्या सुट्टीत पळत पळत आली आणि मला हिरवेगार कच्चे बदाम हातात देऊन माझ्यामागे लपली. मांजर जसे चोरून दूध पिऊन शांत बसते , त्याप्रमाणे कावऱ्याबावऱ्या नजरेने पूनी बसली.. तेवढ्यात शेजारच्या मावशी पूनीला रागवतात आल्या आणि पूनीचा हात धरून ओढू लागल्या .. लगेच मी पूनीला जवळ घेतलं आणि कारण विचारलं तर कळालं की पूनीने त्यांच्या झाडाचे बदाम न सांगताच  आणले होते ..मी पुनीची बाजू घेऊन बोलत असताना , त्या म्हणाल्या की *पूनी खूप खट्याळ आहे ...सर्वांना शिव्या देते ...छेडते , भांडते ...पूनीविषयी तक्रारी ऐकून घेतले आणि पूनीला मी सॉरी म्हणण्यास सांगितले ...तर राग डोळ्यात भरून नाईलाज म्हणून जीवावर पूनीने स्वारी म्हटले... त्यानंतर पूनीने पुन्हा त्या टेबलावरच्या बदामाला हातही लावला नाही ...बदाम घेण्याची परवानगी देऊन तिने त्या बदामाकडे पाहिले सुद्धा नाही...याला पूनीचा स्वाभिमान म्हणावं की राग .. पण पूनीचा राग म्हणजे लोण्यासारखा ...मग लगेच वितळतो ...


पण एवढे मात्र खरे की पूनीकडूनच  मी खूप काही शिकले ..हक्काने इतरांना आपलंसं करणं ...कोणतेही काम करताना न लाजणे ...आलेला राग लगेच विसरणे... तिचं ते निरागस प्रेम मला दिवसेंदिवस अधिक जवळ घेऊन जात होते ...पूनीला प्रगत करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे..वाचण्याचा प्रयत्न करणारी पूनी , लेखनात तिला कसे प्रगत करायचे ?? हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे...


  पुनश्च..........नंतर


Rate this content
Log in