Karuna Gurav

Others

2  

Karuna Gurav

Others

आयुष्याचे प्रेरक

आयुष्याचे प्रेरक

5 mins
195


*आयुष्याचा पथ हा दुर्गम , अवघड , डोंगर - घाट*

 *गुरुविण कोण दाखविल वाट*


   प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतोच आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग तो लहान असो किंवा मोठा मी काहीतरी चांगले घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करीत असते . मनातल्या मनात त्यांना गुरूच मानते . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर , टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या - भेटणाऱ्या माझ्या असंख्य गुरुना शिक्षक दिनानिमित्त मी धन्यवाद देऊ इच्छिते ..


  पण काही गुरु हे जीवनाचे प्रेरक , शिल्पकार बनून जातात . आणि आपल्या जीवनाला वेगळाच आकार देऊन जातात . आयुष्यच बदलून टाकतात हे प्रेरक ...अशाच प्रेरकांना मी तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे . खूप दिवस झाले मनात विचार चालू होते . आपल्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे रूप देणारे गुरु . त्या गुरूंची आठवण कुठेतरी डायरीतल्या पानात जपून ठेवावी . पण योग येत नव्हता. आज शिक्षक दिनानिमित्त गुरूला शब्दरूपी गुरुदक्षिणा द्यावी , या निमित्ताने लिहिण्यास बसले खरे... पण कुठून सुरू करू आणि कुठे थांबू काही समजत नव्हते. या माझ्या गुरु विषयी लिहिताना शब्दही तोकडे पडत आहेत . 


 *हाती घेतली लेखणी*

 *गुरु महिमा लिहिण्या*

 *कौतुक त्यांचे कराया*

  *खाणी शब्दांच्या आठल्या*


 कोण जाणे , कोणास ठाऊक... पण शिंदे आडनावांच्या व्यक्तींनी माझ्या आयुष्याला वेगवेगळे पैलू पाडले आहेत . हा निव्वळ योगायोग मानावा की दैवी शक्ती हे मला माहित नाही . त्याच शिंदे गुरुजींना मी आज उलगडणार आहे .


प्रथम *मा. केशव शिंदे* सर.. मी दहावीत होते... बाळे ( तालुका उत्तर सोलापूर ) सारख्या ग्रामीण भागात मी शिकणारी .. मध्यमवर्गीय एका क्लार्कची मुलगी.. माझे राहणीमान ही साधे.. वडिलांना माझ्या बुद्धीची चुणूक लक्षात आल्याने त्यांनी मला केशव शिंदे सरांच्या सुयश क्लासेस , सोलापूर येथे दहावीच्या व्हेकेशन साठी मोठ्या आर्थिक अडचणीत असताना ही प्रवेश घेतला होता . मी सुरश क्लास जॉईन केला . क्लासमध्ये शहरी भागातील मोठ्या श्रीमंत घरातील मुले -मुली असायची . त्यांचे राहणीमान , पोषाख , बोलणे पाहून माझ्यात न्यूनगंड निर्माण व्हायचा आणि मी अबोल रहायची . असो ...केशव शिंदे सरांनी गणितात पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्यांसाठी गणित प्रश्नसंच बक्षिस ठेवले होते . माझा गणित विषय आवडीचा.. मी मिळवले पैकीच्या पैकी गुण ... तेव्हा त्यांनी मला तो प्रश्नसंच बक्षीस म्हणून दिले . तेव्हा सर्वजण माझे कौतुक करू लागले . सरांच्या या एका प्रेरणेमुळे माझा न्यूनगंड दूर झाला आणि आपणही शहरी मुलांच्या स्पर्धेत टिकू शकतो , हा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला आणि मी तेव्हापासून मोठ्या आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करू लागले . असे हे आत्मविश्वास निर्माण करणारे माझे शैक्षणिक क्षेत्रातील गुरु होय..


  नंतर मी जेव्हा शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेत सुरु झाले . पहिले पाच - सहा वर्ष चूल-मूलात व्यस्त होते . पण जेव्हा मी दोड्याळ ( अक्कलकोट ) शाळेत रुजू झाले तेव्हा मी वर्गात नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असे. पण सादरीकरण करत नव्हते. वर्गाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शैक्षणिक साहित्य , वर्ग सजावट , वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असे . माझ्या हा अध्यापनातील हातखंडा शाळेचे मुख्याध्यापक *श्री .हिराकांत शिंदे* सरांनी हेरला आणि शाळेत येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला माझा वर्ग दाखवू लागले . यामुळे माझा अध्यापनातील , व्यावसायिक क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला . याच प्रेरणेतून मी माझ्या व्यावसायिक क्षेत्रात खूप मोठी प्रगती साधली .. हे झाले व्यावसायिक क्षेत्रातील गुरु..


  अशाच प्रकारे यशाचे एक-एक टप्पे मी सर करत होते . अक्कलकोट तालुक्यात पहिल्यांदाच बालसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते . त्यावेळी नियोजन समितीत मी होते . याच वेळी *श्री. कृष्णा शिंदे* सरांनी आनंद घोडके सरांचा काव्यप्रेमी शिक्षक मंच मध्ये मला सामील करून घेतले . आणि या ग्रुपच्या माध्यमातून माझ्यातील कवी - लेखक जागा झाला .माझ्या व्यक्तिमत्वाला लेखणीचा साज चढला . आज लेखणी माझी जीव की प्राण आहे . हे झाले माझ्या साहित्य क्षेत्रातील गुरु..


 आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्याची साधना करण्यास शिकविणारे दयानंद महाविद्यालयाचे (ycmou b.ed ) केंद्र समन्वयक *मा. के.जे. शिंदे सर* .. आयुष्य जगावं कसं ? राहावं कसं ? वागावं कसं ? हे कृतीतून शिकवणारे व्यक्तिमत्व .. सडसडीत देहयष्टि , हसतमुख चेहरा , डोळ्याला लावलेल्या चष्मा , सदैव उत्साह- तत्परता -कामात मग्नता ...तरीही चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसणार नाही . सकाळपासून - सायंकाळपर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावपळ करणारे , क्षणाक्षणाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणारे , कणाकणाने ज्ञानामृत पाजणारे ...एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच *मा. शिंदे सर* .... शिंदे सरांकडे पाहूनच खरंतल आदर्शाची व्याख्या करावी , असे त्यांचे व्यक्तिमत्व... स्वावलंबन , ज्ञानलालसा , पर्यावरण प्रेम , निसर्गाप्रती आपुलकी , माणसातील माणसाला जपणारे ज्ञानयोगी होय . मी बी.एड ला प्रवेश घेतला . संपर्क सत्र सुरू झाले. वेळ सकाळी साडेसात. आम्ही अक्कलकोटचे विद्यार्थी सव्वासात वाजता महाविद्यालयात पोहोचायचो . महाविद्यालयात एक -दोन शिपायांना बरोबर घेऊन धावपळ करणारे एकमेव व्यक्तिमत्व तिथे दिसायचे ते म्हणजे शिंदे सर .. परिपाठाची संपूर्ण तयारी करण्यापासून संपर्क सत्र संपेपर्यंत प्रत्येक घटकाचे , वेळेचे , अध्यापनाचे काटेकोर नियोजन करायचे . त्यांच्या कामातील व्यवस्थितपणा- टापटीपपणा- काटेकोरपणा खरंच घेण्यासारखा होता . 

   अहो पीएचडी धारक असून अतिशय हुशार व्यक्तिमत्व असून अजिबात गर्व मोठेपणा नाही . नम्रता या अलंकाराने त्यांचे व्यक्तिमत्व सजले होते . अध्यापनातील हातखंडा तर भारीच .. अध्यापनात चैतन्य निर्माण करणारे , अध्यापनातील बारीक-सारीक त्रुटी कशा पद्धतीने दूर करायच्या हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकविणारे , प्रत्येक चांगल्या गोष्टीचे मनातून कौतुक करणारे , कुटुंब व नोकरी यांच्यातील दुवा हळुवारपणे सांभाळण्यास सांगणारे , प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व ....यांच्या विषयी लिहावे तेवढे कमीच आहे . त्यांच्या प्रेरणेतूनच मी B.ed दोन वर्ष सचिव म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली . आणि यातूनच माझ्या नेतृत्व गुणांचा परिपोष झाला . यांच्यामुळेच आदर्श नेतृत्व कसे असावे ? याचे धडे मला मिळाले . नेतृत्व करत असताना नियोजन , आयोजन , अंमलबजावणी याविषयीचे मार्गदर्शन लाभले आणि यामुळेच आज माझ्यात नेतृत्व गुणांचा परिपोष झालेला दिसून येतो . यशस्वी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र देणारे , नेतृत्व - कर्तृत्व जोपासायला लावणारे हे माझे गुरु आहेत ...


   आणि अशातच शैक्षणिक कार्य चालू असताना सामाजिक कार्यात मला स्थान देणारे *श्री. अण्णा शिंदे* अखिल गुरव समाज मंडळाचे सर्वेसर्वा... श्री अण्णा शिंदे सरांनी मला सोलापूर जिल्हा गुरव महिला आघाडी उपाध्यक्ष पद देऊन सामाजिक कार्याची धुरा हाती सोपवली . 


   अशाप्रकारे शैक्षणिक , व्यावसायिक , साहित्य , आध्यात्मिक , सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शन करून आयुष्याला विविधरंगी पैलू पाडणारे पाचस्तंभ आहेत . खरे तर यांच्याविषयी लिहिण्यास शब्दही अपुरे पडतात . पण *Thank a Teacher* या उपक्रमांतर्गत या शिंदे गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा केलेला प्रयत्न आहे . आज पर्यंत मार्गदर्शक म्हणून लाभलेले हे शिंदे गुरुजी ...आणि पुढील काळात माझ्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी भेटणाऱ्या शिंदे गुरूंजींना माझे मनःपूर्वक वंदन.....


Rate this content
Log in