शिल्पा
शिल्पा


त्या दिवशी सकाळी - सकाळी कोणीतरी गेल्याची बातमी कानावर आली. ती कुजबुज ऐकण्यासाठी मी झोपेतच माझे कान टवकारले असता दोन दिवसांपूर्वी शिल्पा गेल्याची बातमी कळली. शिल्पा कोणी लहान मुलगी नव्हती पंचविशीतील एक विवाहित स्त्री होती. आमच्या चाळीतील लहान- थोर सारेच तिला प्रेमाने शिल्पा या एकेरी नावानेच हाक मारत. मी व्यक्तीशः तिला फारसा ओळखतही नव्ह्तो कारण खासकरून अनोळ्खी व्यक्तीशी मी फारसा स्वतःहून ओळ्ख काढून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत नाही. तिची आमची ओळख झाली कारण सध्या आम्ही राहण्यासाठी या चाळीतील जे घर भाडयाने घेतले आहे. त्या घरात ती जवळजवळ चार वर्षे भाड्याने राहात होती. पण तिच्या घरमालकाने हे घर दुरूस्त करून जास्त भाड्याच्या आशेने आम्हाला भाड्याने दिले होते. त्यामुळे तिला नाईलाजाने बाजूच्या चाळीत दुसरे घर भाड्याने घ्यावे लागले होते. तरी मला व्यक्तिशः तिच्या बोलण्यावरून तिचा आम्ही सध्या राहात असलेल्या घरात जीव गुंतला असल्याचे बर्याचदा जाणवले होते.
माझ्या दृष्टीने ती एक भोळसट स्त्री होती. का कोणास जाणे लोकांप्रती अती सहानुभूती, प्रेम दाखविणार्या आणि स्वतःपेक्षा ही इतरांची काळजी अधिक वाहणार्या स्त्रिया माझ्या डोक्यात जातात. तशा दोन स्त्रिया आमच्याच घरात होत्या म्हणून असेल कदाचित. एक आमची आई आणि दुसरी आमची लाडकी बहिण. त्याबाबतीत मी थोडा कोडगा आणि कोरडा होतो. माझ्या ठायी मूर्खपणाला अजिबात थारा नव्हता. आमच्या मालकीच्या घराच्या जागी इमारत होत असल्यामुळे आमच्यावर कधी नव्हे ती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. पूर्वी कधीही भाड्याच्या घरात न राहिलेल्या मला व्यक्तिशः भाड्याच्या घरात राहणं ही एक प्रकारची शिक्षाच वाटत होती. आमचे जुने घर सोडतानाच मी मनाशी पक्क ठरवून टाकलं होतं दुसर्या जागी राहायला गेल्यावर तेथे कोणत्याही प्रकारचे नवे बंध निर्माण करायचे नाहीत आणि मी ठरविल्याप्रमाणे ते केले ही ! म्हणूनच मी शिल्पाकडे तटस्थपणे पाहू शकलो, तिचं निरीक्षण करू शकलो.
काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा शिल्पाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती तिसर्यांदा गरोदर होती. तिची दुसरी मुलगी जन्मानंतर महिन्याभरातच वारली होती. शिल्पाचं निरीक्षण करतेवेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली जगाच्या दृष्टीने ती भोळसट, स्वछंदी जीवन जगणारी एक अल्लड बाई असली तरी माझ्या दृष्टीने नाईलाजाने परिस्थितीपासून, समस्यांपासून पळणारी, जगण्यात फारसा रस नसलेली आणि स्वतःबाबत अत्यंत बेफिकीर झालेली किंचित भोळसट झालेली स्त्री होती. जी जगाला आपण किती सुखी आहोत हे दाखविण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करू पाहात होती.
शिल्पा गेल्याची बातमी आमच्या चाळीपुरती मर्यादित होती. तिच्या जाण्याची दखल कोणी गंभीरपणे घेतल्याची शक्यता तशी कमीच होती कारण सर्वांना ती लक्षात होती कारण त्यांनी सांगितलेली कामे तिने जरा ही का कू न करता निमूटपणे केलेली होती. शिल्पासारख्या स्त्रिया आपल्या देशात रोज हजारोंच्या संख्येने मरत असतात पण त्यांची दखल समाज कधीच घेत नसतो. शिल्पा अचानक कशी गेली? काहींच्या मते तिच्या जाण्याला तिचा गाढवपणा आणि हेकेखोर स्वभाव कारणीभूत होता.
काही दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दवाखान्यातून घरी आल्या आल्या ती थंडीच्या दिवसात थंड पाण्यात बादलीभर कपडे घेऊन धुवायला बसली होती, घरात सासू असतानाही. सासूचा तिच्यावर फार जीव नसावा आणि नवर्यालाही तिची फिकीर नसावी. त्यानंतर तिला ताप भरला तो वाढतच गेला. त्यानंतर तिला दवाखान्यात भरती करताच तासाभरात तिचा जीव गेला होता.
तिच्या दुसर्या मुलीला तिच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला होता. कारण ती मुलीला एकटीला घरात रडत सोडून बाहेर भटकायला जात असे. हे लोकांचे निरीक्षण पण वरवरचे. माझा जितका अभ्यास आहे त्यानुसार ती त्या मुलीच्या दुधाची व स्वतःच्या लहान मुलाच्या आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था नसल्यामुळे ती करण्यासाठी भटकत असावी. तिचा नवरा कामाला होता पण त्याला वेळच्या वेळी पगार मिळत नव्हता. जेव्हा मिळायचा तेव्हा तो घरभाडे आणि उसणवारी देण्यातच खर्च व्हायचा. त्यामुळे त्यांना एका मुलाचेच हट्ट पुरविणे शक्य नसताना तिच्यावर आणखी दोन बाळंतपणं लादण्यात आली होती. कदाचित तिच्या मनाविरूद्ध! तिला सारंच कळत होतं कारण ती बर्यापैकी शिकलेली होती. पण परिस्थितीची गुलाम झाल्यामुळे आणि आपल्या हातात करण्यासारखे काहीच नसल्यामुळे परिस्थितासमोर तिने अक्षरशः गुडघे टेकले होते. त्यानंतर आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे राहतो आणि आपल्यामागे लोक आपल्याबद्दल काय चर्चा करतात याबाबत ती बेफिकीर झाली होती. अत्यंत हुशार असतानाही आपण भोळसट आहोत हे जगाला पटवून देण्यात ती यशस्वी झाली होती. दररोज लोकांशी खोटं बोलण्याचा, हातात दमडी नसताना लाखाच्या बढाया मारण्याचा आणि पोटात अन्नाचा कणही नसताना ढेकर देण्याचा तिला कंटाळा आला होता. कदाचित तिला या सर्वांतून मुक्ती हवी होती पण नैसर्गिक...
शिल्पा गेली नव्ह्ती तर आपल्या समाज व्यवस्थेने तिचा बळी घेतला होता. आपल्या चांगल्या शिकलेल्या मुलीचा तिच्या पालकांनी स्वतःच मुंबईला घरदार नसणार्या अल्पशिक्षीत मुलाशी फक्त हुंडा दयायला नको म्ह्णून विवाह करून दिला होता, ज्याने स्वतःच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना एका मुलाला जन्म देण्याचा गाढवपणा केला होता. त्यात भर म्हणून त्याने बायकोला नोकरी करण्याची परवानगीही दिली नव्हती. शिल्पाने ही स्वतः स्वतःचं जीवनमान सुधारण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन केलं होतं कारण तिला नवर्याच्या विरोधात जायचं नव्हतं. शिल्पाने आमच्या चाळीत आपल्या गोड स्वभावाने लोकांना त्यांच्या छोट्या – मोठ्या कामात मदत करून त्यांची मने जिंकली होती. त्यामुळे प्रसंगी पोटाची खळगी भरण्यासाठी ती त्यांच्याकडे हक्काने हात पसरू शकत होती. तिचे ते हात पसरणे मला तिच्यासोबतच्या पहिल्या भेटीतच खटकले होते. तिच्या नवर्याचे गावी मालकीचे घर होते त्यामुळे स्वतःसोबत तिची फरफट करण्याची त्याला काही गरजच नव्हती. पण तो हे करीत होता कारण काय तर त्याला दोन वेळच गरमगरम जेवण मिळावं म्हणून. पण त्याची व्यवस्था ही प्रसंगी लोकांपुढे हात पसरून तिलाच करावी लागत होती. पण तरीही शिल्पा प्रचंड आशावादी होती त्याचे मला कौतुक वाटे. कारण हा आशावाद तिच्यात तिच्या शिक्षणामुळे आला होता. पण तरीही तिला जगण्यात फारसा रस राहिला नव्हता हे सत्य होतं.
तिच्या जाण्याला तो साधा ताप कारणीभूत नक्कीच नव्हता. ती गरोदर असताना तिच्या तब्येतीकडे केले गेलेले प्रचंड दुर्लक्ष त्याला कारणीभूत होते. आजही आपल्या समाजात पुरूषांकडून स्त्रियांच्या तब्येतीबाबत दाखविला जाणारा निष्काळजीपणा हा शिल्पाच्याच नव्हे तर शिल्पासारख्या हजारो स्त्रियांच्या अकाली जाण्याला कारणीभूत असतो. शिल्पासारख्या स्त्रियांची होणारी कुचंबणा समाजाला दिसत असते, ती दूर करण्यास समाज सक्षम ही असतो पण डोळ्यावर गेंडयाच्या चामडीचे झापडं घेतलेला समाज घोड्यासारखा समोरच पाहत राहतो. सतत चार वर्षे अगदी निमूटपणे समाजाचं ओझं वाहणार्या शिल्पाच्या जाण्याची समाजाने काय दखल घेतली तर एका चाळीतील दहा खोल्यांत तिच्या जाण्यावर दहा मिनिटे चर्चा झाली आणि त्यानंतर दहा - पंधरा दिवस निवांत गप्पा मारताना तिच्या जाण्याच्या कारणांवर पोकळ चर्चा झाल्या. त्या चर्चाही कालांतराने त्या चाळीतील हवेत विरघळून गेल्या.
आता तर शिल्पाच्या आठवणीही त्या चाळीतील हवेत विरघळून नष्ट झालेल्या आहेत आणि अनेक शिल्पा जशा या पूर्वी समाजमनाच्या विस्मृतीत गेल्या होत्या तशी आणखी एक शिल्पा विस्मृतीत गेली...