Vasudev Patil

Others

3.4  

Vasudev Patil

Others

रसवंती भाग सहावा

रसवंती भाग सहावा

10 mins
638



      भाग::-- सहावा


 धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर गजनशेठनं आपल्या नविन बंगल्याची घरभरणी सुरु गेली.नाशिकहून दहा ब्राह्मण आणुन पुजा सुरू केली.अख्ख्या बालेवाडीच्या गाव दरवाज्यास दोन दिवस (घेरेकट) टिळा लावण्यात आला.पहिल्या दिवशी महाराष्ट्रीयन तर दुसऱ्या दिवशी राजस्थानी सुग्रास जेवणाच्या पंक्ती उठल्या . विक्रांतला दिवाळीच्या सलग तीन दिवस सुट्या मिळाल्यानं तो गज्जनशेठच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणा म्हणुन बालेवाडीतच मुक्कामाला थांबला.कार्यक्रमात मात्र तो नावाला व सनाचाच खास पाहुणा झाला.सना त्याची पाठ सोडेना तर तो सनाची पाठ सोडेना.सनाचं ते राजस्थानी पेहेरावातलं रूप ,त्यावर महाराष्ट्रीयन छबी त्याची सुदबुध हरवत होतं. गजनच्या घरची सारी घरभरणीत व्यस्त असल्याने त्यांच्याकडे कोण कशाला पाहील. 

 नरक चतुर्दशी ला एक आणखी खास घटना घडली.गजनच्या अंगणातला चरखा जो असलम भंगार म्हणून घेऊन गेला होता,तो त्यानं रंगरंगोटी करत, आॅयलिंग, ग्रिसींग करत विक्रीला ठेवला. तालुक्याच्या ठिकाणापासून चार किमी अंतरावर तालुक्याचं रेल्वेस्टेशन होतं.रेल्वेस्टेशनवर गफूर मियाॅचं नाश्त्याचं हाॅटेल होतं.त्या गफूर मियाॅनं हा ऊसाचा चरखा विकत घेऊन हाॅटेल समोर रसवंती टाकली. हा गफूर मियाॅ सुरूवातीला रेल्वेत पेरू, केळ, भेळ,वडे असं काही बाही विकायचा.पण अल्लाची मर्जी खफा झाली की काय रेल्वेत टोपलं घेऊन चढतांना तोल गेला व रेल्वेत दोन्ही पाय गमावून बसला.नंतर कुबड्या आल्या.शहरातील सेवाभावी संस्थेनं कर्ज देत याला रेल्वे स्टेशनजवळ हाॅटेल टाकून दिलं. याच गफूर मियाॅनं त्याच हाॅटेलसमोर हा चरखा विकत घेऊन नकळत नरक चतुर्दशीच्या दिवशी रसवंती सुरू केली.दुपारची रेल्वे गेली व गर्दी थोडी कमी झाली.शेजारची झांजरवाडीच्या गजानन पाटलाची लाकुड कटाईची मील (साॅ मील)बंद करत कारागीरांनी सुटी केली.आज दुपारपासुन चार पाच दिवस दिवाळीची मील बंदच राहणार होती. सर्व बंद करत कारागिरांनी गफूर मियाॅच्या रसवंतीच्या उद्घाटनाचा रस घेतला.पण गफूर मियाॅला रसवंतीतून विचीत्र आवाज ऐकू येऊ लागले.त्यानं आपल्या बेगमला ऐकायला लावलं.

"तुम्हारे चार आणे सटक गये है!दिनको भी भंग पि लेते हो और कुछ भी बकते हो"बेगमनं गफूरला उडवलं.त्यानं ही मग मनातून झटकत पुन्हा तुरळक गिऱ्हाईक काढू लागला.पण चरख्याच्या चाकातून त्याला रडका आवाज, लहान मुलाची घशाची खरखर, 'पाणी , पाणी' असले चित्र विचीत्र आवाज येत असल्याचं जाणवतच होतं. पण आपणच 'सैतान' बोललो तर रसवंती तर बंद होईलच पण आपलं आधीचं हाॅटेलवर ही परिणाम होईल म्हणून तो गप राहत रसवंती चालवतच होता.सायंकाळी त्यानं रसवंती बंद करत तो घरी जेवायला निघून गेला.

 गच्च अंधाराला सोबत करायला चांदण्या निघाल्याची ग्वाही वाऱ्यानं दिली.रात्रीच्या गाड्यांवर जाण्यासाठी खेड्यावरचे लोक स्टेशनावर येत.काही नाश्ता , जेवण करत; तर काही थंडीपासून बचाव करण्यासाठी चहा घेण्यासाठी गफूरच्या हाॅटेलावर येत. गाडी गेली की मग काही वेळ हा गजगाजला कमी होई.पुन्हा सुरु होई.म्हणून नेहमी प्रमाणे गफूर मियाॅ दोन नोकरांना रात्री ठेवी.तो फक्त तेथे झोपजाग करत लक्ष ठेवत असे.पण दिवाळ सणामुळं नोकर येणार नसल्यानं आज त्यालाच जागावं लागणार होतं.तो आला पण रसवंतीचा चरखा पाहताच त्याच्या अंगावर काटे उभे राहिले.भट्टी पेटवत त्यानं चहा ठेवला.व तो भजे काढायच्या तयारीला लागला.पण त्या आधीच रेल्वे स्टेशनाचा सारा परिसर भज्यांच्या वासानं घमघमायला लागला.गफूरच्या तर नाकाची दररोज बसुन बसुन संवेदनाच मेली होती तरी त्याला तीव्र घमघमाट जाणवला.त्यानं कुबड्या बाजुला करत भजे काढले. दोन तीन गिऱ्हाईक आले त्यांना चहा देत तो बसला.बाहेर रातकिड्यांचा किर्र्र्र आवाज सुरू झाला.शांतता पसरली.तोच सुपर फास्ट गाडीची दुरुन शिटी वाजली नंतर आवाज वाढवत गाडी आली तसा सारा परिसर धडधडू थडथडू लागला.आली तशी गाडी गेली. आता बाराचीच गाडी येणार असल्यानं थोडी शांतता पसरली.दिवाळसणाची गर्दीही कमीच होती.एक भटकं कुत्रं आलं त्यानं समोरच्या लिंबाच्या झाडावर पाय तिरपा करत वर उचलला.तोच गफूरनं त्याला 'हाड' म्हणत हुसकावलं.कुत्रं दूर जात गफूरच्या भट्टीच्या गरम राखेच्या ढिगाच्या आडोशाला गरमीत पायात डोकं घेऊन बसलं. गफूर गल्ल्यावर बसत अंधारात पाहू लागला.समोर चरखा अस्पष्ट दिसताच त्याला पुन्हा भिती वाटली.तितक्यात कडुनिंबाचं झाड वाऱ्यानं हाललं व राखेत बसलेलं कुत्रं शेपटी , कान टवकारत समोरच्या दिशेला तोंड करकरून जोरात भुंकू लागलं.गफूर मियाॅचा सैतानावर विश्वास ठेवायचा प्रश्नच नव्हता. पण तरी "हाय अल्ला क्या आफत है!ये साला कुत्ता कहिका कायकू इतना भौक रहा!" म्हणत आधाराला उभ्या असलेल्या कुबड्या त्यानं हाताशी घेत होशीयार झाला.आता कुत्रं तोंड हळूहळू फिरवत चरख्याकडं करत भुंकू लागलं व जोरजोरात रिसडून कातावून मागेपुढे धावू लागला.गफूर आता कुबड्यांवर उभा झाला. तोच त्याला चरख्याजवळ आपल्यासारखाच कुबड्यावर उभा असलेला माणूस दिसला. गफूरच्या कुबड्या लटपटू लागल्या.तो थरथरू लागला.

"रसवंती सुरू करायचीय मला!माझी शालू पाणी आणायला गेलीय!येईलच आता.पण एक बरं झालं तुम्ही चरखा इथं आणला!" तो आपल्यासारखाच दिसणारा कुबडीवाला बोलला.

गफूर काय समजायचं ते समजला तो माणूस चरख्यावर टाकलेलं कलतान काढू लागला.तोच गफूरनं आपल्या नसलेल्या टांगा कुबडीवर लांब लांब फेकत स्टेशन जवळ केलं व स्टेशनावरच्या सलिम ला गाठत घर गाठलं. दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या दवाखान्यात बेगमनं त्याला अॅडमीट केलं. नाडीचं गणित बिघडलेलं, ब्लड प्रेशर काहीच्या काहीच, डाॅक्टर्स गोंधळून निदानापर्यंत पोहोचलेच नाहीत तोच तो पाणी पाणी बरळत बरळत कोमात गेला.

 नरकचतुर्दशीच्या दिवशी आख्ख्यी बालेवाडी राजस्थानी पंगत खात असतांनाच मी उद्या रात्री नाशीकला जाणार हे सनानं चॅटद्वारे विक्रांतला कळवलं होतं. बालेवाडी हून तालुक्याच्या रेल्वेस्टेशनवर मी माझ्या गाडीनं तुला सोडू का? असं विक्रांतनं तिला विचारलं. समोरच मोबाईल घेऊन सना मध्येच विक्रांतकडं पाहत होती.सनाची भेदक नजर, मादक हास्य विक्रांतला लाळ घोटायला लाचार करत होतं. त्याचं लाचार होत विचारणं तिला हास्यास्पद वाटत होतं. 

"नाशिकपर्यंत यायचं असेल तर ये.नुसतं रेल्वे स्टेशनवर काय कामाचं". सना डोळ्याच्या कोपरानं लाडीक पाहत सांगू लागली.

"तू साथीला असलीश तर नाशिकच काय मी स्वर्गातही येईन"विक्रांतची गाडी फूल रेस पकडत होती.

"बघू उद्या तू कसा येतोस पोहोचायला!"सनानं विक्रांतला दिलखेचक पणे डिवचलं.

 अमावास्येला दुपारी निघतांना विक्रांतनं गजनची रजा घेत "गजन, चल निघतो मी, आज रात्री मला तालुक्यावरनं रेल्वेनं नाशिकला जायचंय"सांगितलं.

"साहेब आमचे पाहुणेही रात्रीच तालुक्यावरून रेल्वेनं सुरत व्हाया बिकानेर जाणार व सना नाशिकला निघणार आहे."

"अरे मग मी झांजरवाडीला जाऊन सायंकाळी परत येतो.हवं तर माझ्या गाडीनं रेल्वे स्टेशनवर येऊ दे!"

"नको साहेब आपणास कशाला उगीच त्रास!"

"गजन, परकं समजतो का मला?,का विश्वास नाही?"

"नाही साहेब तसं मुळीच नाही.उलट आपणास त्रास नको म्हणून मी तसं म्हटलंय"

"मग मी रात्री आठला येतोच.तयारी करून ठेव पाहुण्यांची" सांगत विक्रांत झांजरवाडीत परतला.गावातून त्यानं त्याच्या काही जिन्नसा घेऊन गाडीत दडवल्या. कानाच्या पाळीत , अंगावर 'बाॅस नं. 6' परफ्युम लावला. रात्री आठला तो निघाला. निघतांना "मी नाशीकला जातोय,गाडी साॅ मीलमध्येच ठेवतो "

असं सांगत साॅ मीलची ज्यादाची चाॅबी घेतली.बिकानेर जाणाऱ्या पाहुण्यांना दहाला रेल्वे होती तर सनाला बाराला.विक्रांतनं गजनच्या बंगल्यासमोर साडे आठलाच गाडी उभी केली.सना व पाहुण्यांनी तयारी केलीच होती.नऊला गाडी निघाली.गजन सोबत येत होता पण विक्रांतनं त्याला 

'तू धावपळीत थकलाय ,आराम कर' सांगत त्याला थांबवलं.बालेवाडीत घरोघर दिवे चढले होते.बारकी पोरं फटाके, बार, भुईनळे, फुलबाजे लावत होते.विक्रांतनं सनाला पुढे बसवत बाकी लोकांना मागच्या शीटवर बसवत गाडी काढली.

बालेवाडीहून तालुक्याला जायची वाट नदी काठाकाठानंच होती.एका बाजुला नदी तर दुसऱ्या बाजूला दिड दोन पुरूष वाढलेले व रसानं कांडं भरलेल्या ऊसाचे फड. अंधारात लाईट फेकत गाडी पळू लागली.बाहेर थंडी पडलेली.त्यात बागाईत, पाटस्थळ त्यामुळे थंडी अधिकच बोचरी पण गाडीत जाणवत नव्हती.विक्रांतनं मधला लाईट घालवत गाडी दामटू लागला.गिअरवरचा हात अंधारात इकडे तिकडे फिरू लागला.मुलायम गार हात लागताच शोध थबकू लागला.सना !काश!आधी भेटली असती तर?तरी अजूनही वेळ गेलेली नाही.दहानंतर बारा यात दोन तास सवड रेल्वे स्टेशनवर.गाडीच्या वेगानं त्याचे मनही भराऱ्या मारू लागलं. तोच ऊसाच्या फडातून दोन बिबटे(बहुतेक नर मादी)व एक छोटंसं पिलू ऊसाच्या फंडातून निघून रस्त्यावर आडवं झालं.गचगच करकर ब्रेक दाबत गाडी उभी राहिली.बिबट्या कावऱ्या बावऱ्या नजरेनं पाहत नदी दिशेनं पळाले. विक्रांतनं तशी गाडी पळवली.बिबट्या दिसताच सनाचा हात आपसुक विक्रांतच्या हातात विसावला होता.पण त्याचीच पाचावर धारण बसल्यानं त्यानं याकडं दुर्लक्ष करत बिबट्याकडं लक्ष ठेवत गाडी काढली. गाडी स्टेशनला सी सी टि व्ही च्या मागच्या कॅमेरा कक्षातच उभी राहिली.साऱ्यांनी उतरत टिकीटं काढली.तोच सनाची गाडी दोन तास लेट असल्याची सनानं आॅनलाईन पाहिलं.विक्रांतला खूप आनंद झाला. सुरतेकडं जाणारी गाडी आली तसे बिकानेर जाणारे पाहुणे सवरत आपलं लगेज घेऊन गाडीत बसले.

गाडी जाताच विक्रांतनं सनाचा हात हातात घेत स्टेशनातून बाहेर पडत "तुझी गाडी यायला अजून चार तास अवकाश आहे तो पर्यंत जवळच इथं आमची साॅ मील आहे.तिच्या आॅफिसात जाऊन थोडा वेळ आराम करू"असं सनास सांगू लागला."

"माझी गाडी म्हणजे!तू पण येतोय ना नाशिक?"सनानं फिरकी घेत विचारलं.

"नाशिकला मी येऊन दिवाळीचे फटाके वाजवू का!मी कशाला नाशिकला येऊ!फक्त तुला सोडण्यासाठी यायचं होतं म्हणून निमीत्त सांगितलं मी!"

"असं का?मग निघा,मला सोडलं ना आता?जाईन मी एकटी!" सना जागच्या जागी थांबत म्हणाली.

"जातोय गं पण गाडीत तुला बसवेन मग मी जाईन"हसतच तो उत्तरला.

"चल साॅ मील मध्येच जाऊ तिथंच गप्पा करू"

गाडी त्यानं घेत गफूर मियाॅच्या हाॅटेलवर उभी करत साॅ मीलचं मेन गेट उघडलं.करकर आवाज होताच गफूर मियाॅ गल्ल्यावरून उठत ,

"काय विक्रांतराव असं रात्रीचं बऱ्याच दिवसात येणं केलंत?" हसत हसत म्हणाला.गेट उघडल्यावर विक्रांत हाॅटेल जवळ येत "मियाॅ खास नाही सहजच आलोय.आणि हा जिन्नस आणलाय बरं!" विक्रांतनं ही हसतच म्हटल्याचं गफूरला ऐकू आलं.

गफूर गल्ल्यावर बसला होता.चहाची किटली ज्या शेकडीवर ठेवली होती तिचा चरखा सात आठ वर्षाचं पोरगं खाली मान घालून हलवत होतं तर रसवंतीच्या चरख्यावरही हिवाळ्या रात्रीत इतक्या थंडीत एक बाई होती.विक्रांत गफूरला ओळखायचा पण ही बाई व मुलगा नविन होता.विक्रांतला वाटलं काम करणारे बदलत राहतात.म्हणून त्यानं गफुरला विचारता विचारता राहू दिलं.

 साॅ मिल मध्ये जिकडे तिकडे साग बाभूळ, लिंबाच्या झाडांचे मोठमोठाले गोल ओंडके पडलेले.लाखो ची मशनरी.चिरलेल्या पाट्या ,खांब ,कडे अस्ताव्यस्त पडलेले. लाकडाच्या भुशानं सारी जमीन आच्छादलेली.सारं मागे टाकत विक्रांतनं आॅफिस गाठलं.मागून गफूर येताच दोघांनी सामग्री काढत गफूरनं आणलेल्या दुधात कालवली.दोघांनी गटागटा दोन ग्लास मारले.

"सना तू काय घेणार?दूध की चहा?"विक्रांतनं विचारलं.

"विक्रांत मला इंडियन स्ट्रीट फूड खूप आवडतं.मग ते काहीही असो.बाहेर त्या हाॅटेलवरचे भजे आणले तरी चालतील.बाहेर ती बाई रस काढतेय तो ताजा रस ही आवडतो मला!"

"अगं सना काय तुझी आवड भन्नाट आहे!"विक्रांत मजा घेत म्हणाला.

तसं नाही रे नामांकीत माॅलमधलं चायनीज, इटालियन खाना पेक्षा आपल्या देशात रस्त्यावरच्या या खान्यात यांनी जी आत्मीयता मिसळली असती तीची चवच वेगळी"

"गफूर मियाॅ थंडी असली तरी मॅडमांना आत्मियता फ्लेवर ऊसाचा रस भजे आण बाबा,"विक्रांतला आता हूल बसू लागल्याने तो मिश्कील बोलू लागला.

"एक अट माझ्या सोबत तु ही घ्यायला हवं"सना लाडात येत म्हणाली.

गफूर दोन ग्लास बनवत बाहेर गेला.ऊसाचा रस व भजे दूध घेऊन आला.

सना आधी विक्रांतला रस देऊ लागली.रस देणाऱ्या सनाला पाहताच त्याला तिच्यात शालूची छबी दिसली.आपल्याला घोटा किक देतोय हे त्यानं ओळखलं.पण तरी त्याला आपण त्या रात्री मृत्यूच्या दारातून कसे परत आलो ,अन्यथा आज या आपल्या आॅफीसच्या भिंतीवरही आपला फुलमाळा टांगलेला फोटो राहिला असता या जाणीवेनं काटा उभा राहिला.

"शालू ,शालू तू नही तो सना ही सही"तो बरडू लागला.सनानं भरलेला ग्लास त्यानं बाजूला करत तिलाच दुधाचा ग्लास पाजू लागला.सनाच्या डोळ्याचा रंग बदलू लागला.विक्रांतनं सनाला धरत जवळ ओढलं.सना "सोड ,सोड!गफूर आहे!"म्हणत ओरडू लागली.विक्रांतला जास्तच चेव आला. तिकडं गफूरनं कुबड्या सावरत बाहेर निघत "साहब नजदिक स्टेशन है कोई सुन लेगा.मै मशीन शुरू कर देता हू" म्हणत मशीन सुरू केल्या.कटर मशीन सूं sss

घूं sss आवाज करत शांतता चिरत खाली फिरू लागल्या.विक्रांतच्या हातातनं निसटत हसत सना आॅफिसातून बाहेर पडत लाकडाच्या पसाऱ्यात आली.विक्रांतही "सना थांब, थांब!' म्हणत तिचा पाठलाग करू लागला.गफूरनं सुरू केलेल्या मशीनीभोवती सना व विक्रांत गोल गोल पळू लागले.विक्रांतला घोट्याची किक व हातात येऊ पाहणारी शिकार खेळवतेय म्हटल्यावर अधिकच चेव आला.कटर मशीनच्या पात्या जवळ सना उभी असतांना तो झपकन तिला पकडणार तोच गफूरनं कुबडीनं त्याचा पाय अडकवत खेचला.विक्रांत तोल जाऊन कटाईचं लाकुड ठेवावं तसा आडवा पडला. क्षणात त्याला गजा व शालूनं पकडलं.कारागिरानं लाकुड कटरसमोर सरकवत चिरावं तसा विक्रांत चिरला गेला. आधी दोन्ही पाय कमरेखालून चिरले मग दोन्ही हात.घोट्याच्या व मदनमंजिरी नशेत चूर विक्रांत अचानक जिवाच्या आकांतानं चित्कारत मिल डोक्यावर घेऊ लागला.

"शालू याच हरामीनं माणसं पाठवून माझे पाय तोडले होते गं!म्हणून याला असाच तोडण्यासाठी मी चरख्यासोबत फिरतोय तुझी वाट पाहत!" गफूर बनलेला गजा रडू लागला.

"गजा!यानं मलाच रस पाजत हुलकावणी दिली होती.याला मी रस पाजल्याशिवाय सोडणार नाही"

शालू डोळ्यातनं अंगार फुलवत बोलली.

विक्रांतचे हात व पाय मशीन भोवती पाट्या पडाव्यात तसे पडुन रक्ताच्या चिरकांड्या उडवत खालच्या भुशाला भिजवत होत्या मशीनवर त्याचं धड थूडथूड उडत होतं.शालूनं केस पकडत त्याच्या मुस्काटावर लाथ ठेवलेली होती.विक्रांत हलाल होणाऱ्या बकरासमान गरागरा डोळे फिरवत पांढराफटक होऊन पडलेला.

"शालू याला रस पाजून लवकर मारू नको.याच्या थोटक्या शरिराला सडून सडून मरू दे" गजानं सांगत विक्रांतच्या कापलेल्या पायाच्या बेचक्यात कुबडीचा ठोसा लगावला. विक्रांत जोरात विव्हळत पडल्या जागेवर उडाला.

"नको याला ठेवून उपयोग नाही "शालू लाथ मुस्काटावर दाबू लागली.

"आठवतंय का कुत्र्या मी मरतांनाच तुला सांगितलं होतं कि मरूनही तुला जिवंत सोडणार नाही"

"शालू, गजा एकच करा या पात्यानंच माझी मान छाटा पण आता माझे हाल करू नका"विक्रांतला ग्लानी येऊ लागली.तोच शालूनं ऊसाच्या रसाचा ग्लास उचलून वरुन त्याच्या तोंडावर धार लावली.पडल्या पडल्या तो रस प्राशू लागला.क्षणात त्यानं दम तोडला.

दोनला शिटी देत गाडी स्टेशनात उभी राहिली.

बलीप्रतिपदा झाली.यम द्वितीयेला स्टेशनात वारा भपकार नेऊ लागला .भपकार कसला व कुठून येतोय याचा जो तो नाकानं शोध घेऊ लागला.शोध साॅ मिलपर्यंत येत संपला.तो पावेतो मुटकुळ्यातून ...........

  पोलीस ताफा, श्वानपथक आलं.

बालेवाडी झांजरवाडी आली.

गजाननराव, मालविका आले.उरलं सुरलं जिल्ह्याला गेलं व पक्क गाठोडं झांजरवाडीला बांधून आलं व चावडीजवळून रात्री दहाच्या सुमारास मारोती, महादेवाच्या मंदीराजवळुन गाव दरवाज्यातून घाटावर जाळण्यात आलं.जिल्ह्याला जे काही काढलं होतं त्यात सायनाईड कुठुन व कसं आलं?साॅ मिल मध्ये रस, भजे कुठुन व कोणी नेलं याचा बरेच दिवस धांडोळा चालला.रेल्वेस्टेशन व साॅ मिलच्या कॅमेऱ्यातील फुटेज दहाला प्रवेश करणारे सना विक्रांत व गजनचे नातेवाईक दाखवत होते पण सव्वा दहाला एकटाच विक्रांत बाहेर पडल्याचं दाखवत होते.फुटेज मध्ये दोन पर्यंत सना रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये व फ्लॅटफाॅर्मवरच दिसत होती.विक्रांत एकटाच बाहेर पडला व सरळ मग साॅ मिलच्या कॅमेऱ्यातल्या फुटेज मध्ये मेन गेट उघडतांना व आत आॅफिसात दूध पितांना दिसत होता.मग बऱ्याच उशिरानं झोकांड्या देत नशेत फिरतांना दिसत होता. मग तो पात्यावर तोल जात पडत चिरला जातांना. 

जवळच्या हाॅटेल मालकवर संशयाची सुई गेली तर गफूर मिया नरक चतुर्दशी पासून दवाखान्यात कोमात पडलेला.बरीच शोधाशोध, तपास काथ्याकूट करत नशेच्या पदार्थातच सायनाईड कालवून व नंतर नशेत स्वत:च विक्रांतनं संपवल्याच्या निष्कर्षापर्यंत जेमतेम पोलीस यंत्रणा पोहोचली.

 पुढच्या चार पाच दिवसातच गफूर कोमातून बाहेर आला व नंतर बरा होत रसवंती हाॅटेल सुरु केली.

सनाला तर बालेवाडीला आपण गेलो, आडावर गेलो त्यापासून तर नाशीकला आलो पावेतोचं मधलं झोपेतून उठल्यागत काहीच आठवेना.

चावडी् जवळच्या पारावर मांजरी कुत्री आता येतात पण गुण्या गोविंदानं.पारावर बालेवाडीच्या लोकांच्या गप्पा आता पुन्हा पुर्वीसारख्याच रंगतात...


समाप्त.



Rate this content
Log in