प्रेरणा
प्रेरणा


एका अंधार्या खोलीत त्या खोलीच्या मधोमध एका जुन्या खुर्चीत मला त्या खुर्चीला माझे हात - पाय बांधून बसविलेले होते. अगदी एखीद्या चित्रपटात एखाद्याचे अपरहण केल्यावर बसवितात तसे. फरक फक्त एकच होता ते म्हणजे माझे तोंड बंद केलेले नव्हते. मी मनसोक्त ओरडू शकत होतो पण तरीही मी शांत होतो. त्या खोलीत माझ्या आणि अंधारा व्यतिरीक्त तिसरे कोणीच नव्हते. अचानक त्या खोलीचा दरवाजा उगडला खोलीत जळत्या मेनबत्तीसह पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक सुंदर स्त्री आत आली तिचा चेहरा पांढर्या ओढणीने झाकलेला होता तरी मेनबत्तीच्या प्रकाशात दिसणार्या तिच्या डोळ्यांवरून मी तिच्या अप्रतिम सौंदर्याची कल्पना करू शकत होतो. माझ्या समोर एक टेबल आणि त्या पलिकडे आणखी एक खुर्ची असल्याचे आता मला मेनबत्तीच्या अंधुक प्रकाशात दिसले होते. माझ्यासमोरच्या टेबलावर मेनबत्ती ठेऊन ती माझ्या समोरच्या खुर्चीत महाराणीसारखी आरामात बसली आणि काहीश्या रागीट स्वरात पण गोड आवाजात मला प्रश्न केला, ‘ कसा आहेस निलेश ? तिच्या प्रश्नाला मी भित- भितच उत्तर देत म्हणालो,’ मी ठिकच होतो आतापर्यंत ! पण तू कोण आहेस ? ते तुला काय करायचय ? तू माझा कैदी आहेस मी तुझ अपहरण केलेले आहे त्यामुळे तू फक्त मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दे उलट मला प्रश्न विचारू नकोस. समजल ! असं बोलता बोलता ती मधेच उटली आणि माझ्या खुर्चीच्या मागे जाऊन तिने माझ्या गालावरून आपले दोन्ही हात खाली मानेच्या दिशेने नेले क्षणभर मला वाटले की ही आता माझा गळा दाबते की काय ? पण तसे काही तिने केले नाही तिचे हात बर्यापैकी नाजूक होते त्या नाजूक हाताने तिने माझ्या दोन्ही गालावर एकाच वेळी चापट मारली ! प्रेमाने मारली की रागाने ते काही कळत नव्हते. त्यानंतर बर्यापैकी जोर - जोरात हसत अगदी सुर्पनकेसारखे हसत ती पुन्हा माझ्या समोरच्या खुर्चीत येऊन बसली. क्षणभर त्या खोलीत स्मशान शांतता पसरली. त्या शांततेचा भंग करीत तिने मला पुन्हा प्रश्न केला निलेश ! मला आता तरी ओळखलस का ? मी मानेनेच नकार दिल्यावर ती म्हणाली’ ‘तुला बोलता यावं म्हणून मी तुझ तोंड उघडं ठेवलेले आहे. खाऊ खाण्यासाठी नाही ! बरं खाऊ वरून आठवल मी तुझ्या आवडीचे चॉकलेट आणलेय तुझ्यासाठी ! तुझे तोंड गोड करायला. तिने जागेवरून उटून एक चॉकलेट माझ्या तोंडात कोंबले ते चॉकलेट खरोखरच माझ्या आवडीचे चॉकलेट होते. मी ते चॉकलेट चघळताना माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. माझ्या वर्गातील एखाद्या मुलीने तर माझे अपहरण केले नाही ना ? शाळेत असताना माझी माझ्या वर्गात शिकणार्या बर्याच मुलींशी दुश्मनी होती. इतक्यात ती पुन्हा म्हणाली,’ चॉकलेट खाऊन तुझे तोंड गोड झालेले असणार पण फार आनंदी होऊ नकोस कारण लवकरच ते कडूही होणार आहे. जेंव्हा मी तुझी पापे एक - एक करून तुझ्यासमोर उलगडून ठेवणार आहे तेंव्हा ! आज जगासाठी तू महात्मा आहेस , एक असामान्य माणूस आहेस, तुझं चारित्र्य निष्कलंक आहे एखाद्या कोर्या आगदासारखा, चंद्रावरही डाग असतो पण तुझ्या चारित्र्यावर नाही पण हे सारे जगाच्या दृष्टीत आहे. माझ्या नजरेतून पाहशील तर तुझ्यासारखा नालायक, पाषाण हृदयी आणि दृष्ट माणूस दुसरा नाही. तू असा गुन्हेगार आहेस ज्याला जगाच्या न्यायालयात गुन्हेगार म्हणून उभं केलच जाऊ शकत नाही त्यामुळे तिथे तुला शिक्षा मिळण्याची शक्यताच नाही. तू गुन्हेगार आहेस हे आज कोणीच मान्य करणार नाही पण तू तुझे डोळे उगडे ठेऊन गुन्हे करतोस अगदी बेमालुमपणे ! आज मी तुला तुझ्या त्याच गुन्हयाची शिक्षा देणार आहे. ती पुन्हा खर्चीवरून उटली आता तिच्या हातात छान गुलाबाचे टवटवीत फुल होते. माझ्या जवळ येताच तिने ते गुलाबाचे फुल हळुवारपणे माझ्या गालावरून फिरविले आणि नंतर ते गुलाब उलटे पकडून त्या गुलाबाचे काटे माझ्या उघड्या दंडावर टोचले त्यामुळे किंचित रक्ताचे थेंबही बाहेर आले. किंचित वेदनाही झाल्या. मी माझ्या आयुष्यात ज्या वेदना सोसल्या होत्या त्या समोर या वेदना गिनतीतच नव्हत्या. पुन्हा आपल्या खुर्चीत बसत ती म्हणाली, ‘ गुलाबाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. हा गुलाब तू जिच्या जिच्या हातात दिला अथवा जिने जिने हा तुझ्या हातात दिला तिला तिला या गुलाबाचे काटेच रुतले आणि एक अनोळखी वेदना सहन करावी लागली. तुझा चेहरा कमालीचा भोळा, तुझे वागणे अतिशय सज्जन माणसासारखे आणि तुझे बोलणे निरागस बाळासारखे आहे. तू समोरच्यासाठी तसा होतोस जसा त्याला तू हवा असतोस ! म्हणूनच तू कित्येकांसाठी आकर्षण ठरतोस आणि तेथेच कित्येकांचा विश्वासघात होतो. तुझा चेहरा एक सांगतो. तुझे डोळे दुसरंच सांगतात, तुझ्या मनात काही तिसरंच सुरू असते आणि आश्चर्य म्हणजे प्रत्यक्ष कृतीत मात्र चौथेच येते. त्यामुळे तुझ्या प्रत्येक कृतीत एक गुन्हा दडलेला असतो. तुझ्या आयुष्यात घडणार्या संभाव्य घटनांची तुला अगोदरच चाहुल लागते आणि मग तू त्या घडणार्या घटनांची दिशा बदलण्याचा निरर्थक प्रयत्न करतोस त्या प्रयत्नात तू कित्येकांचा त्यांच्याही नकळत बळी देतोस पण तरीही त्यांना असेच वाटत राहते की तु त्यांच्यासाठी त्याग केलास आणि त्यांच्या दृष्टीत तू महानच असतोस ! तुझ्या सभोवतालचे तु जितक्या दुरचा विचार करू शकतोस तितक्या दूरचा विचार करू शकत नाहीत म्हणूनच तू स्वतःला त्यांच्यासमोर आपल्या बुद्धीच्या जोरावर महान सिद्ध करण्यात यशस्वी होतोस हा ही एक गुन्हाच आहे. जगाच्या न्यायालयात या गुन्हयाला शिक्षा मिळण्याऐवजी तुला मानसन्मान मिळतो. त्याचाच मला राग येतोय. इतके बोलून झाल्यावर तिने माझ्यासमोर एक कागद आणि पेन ठेवला आणि मला म्हणाली, ‘ आता या कागदावर एक प्रेमपत्र लिही ! तुझ्या आयुष्यातील कोणत्याही एका प्रिय व्यक्तीला. मला पाहायचं तुला प्रेमपत्र लिहिता येते की नाही ? त्यावर मी मनातल्या मनात म्हणालो, ‘ हल्ली अपहरण करतेही प्रेमात वेडे झालेले असतात की काय ? पण माझे हात बांधलेले आहेत मी पत्र कसे काय लिहिणार ? माझा तिला प्रश्न ! तिने उटून माझा उजवा हात कोपरापर्यंत मोकळा केला मी प्रेमपत्र लिहायला सुरूवात केली चार - पाच ओली लिहल्या असतील तोच तिने ते पत्र हिसकावून घेतले आणि वाचून मला म्हणाली, ‘ तू अजूनही सुधारला नाहीस ज्याला प्रिय म्हणावं अशी एकही व्यक्ती तुझ्या आयुष्यात आलेली नाही. तुला तुझ्यासमोर आजही सारेच तुच्छ वाटतात. दुसर्यांना आपल्यासमोर तुच्छ समजण्याचा हा गुन्हा तू अजून किती वर्षे करीत राहणार आहेस ? तिने माझे गोड तोंड आता खरोखरच कडू केलं होत आणि माझा माझ्या मेंदूवरचा आणि रागावरचाही संयम सुटत चालला होता. कित्येक वर्षे अथक प्रयत्न करून मी माझ्या रागावर विजय मिळविला होता तो विजय आता मला पराजयात रुपांतरीत होताना दिसत होता. मला किंचित रागावलेले पाहून ती म्हणाली, ‘ निलेश ! हा राग आता तुला शोभत नाही अरे ! रागावर नियंत्रण ठेवणारे तुला आपला गुरू मानतात. तुझ्या रागावर नियंत्रण मिळविण्याच्या गुणामुळेच लोक तुला साधाभोळा समजून तुझा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना कधी कळतच नाही की तुझा फायदा उचलण्याच्या नादात त्यांनी स्वतःच किती मोठ नुकसान करून घेतले आहे ते. तुझ्याकडे अचाट बुद्धीमत्ता आहे त्याचा उपयोग तू कित्येकांच्या समस्या सोडविण्यासाठी करू शकतोस. एखादा चुकत असेल तर त्याला त्याची चूक सुधारण्यासाठी वेळीच मदत करू शकतोस. पण तू त्यांचीच मदत करतोस जो तुझी मदत मागतो. तू स्वतःहून कोणाचीच मदत करीत नाहीस. तुला लोकांना मदत करण्यात त्यांच्या चुका सुधारण्यात कमी रस असतो पण त्यांना त्यांची चुकीची काय शिक्षा मिळाली हे जाणून घेण्यात अधिक रस असतो. तुझ्यावर कोण प्रेम करत याच्याशी तुला काहीच देणे-घेणे नसते पण तुझे कोणावर प्रेम आहे हे तुझ्यासाठी फार महत्वाचे असते. तुझ्यावर कोणाचे जीवापाड प्रेम आहे हे तुला माहीत असतानाही त्यांना तू असच भासवत राहिलास की ते तुला लक्षातच आलेले नाही. कित्येकांना तू त्यांच्यावरील प्रेम आज ना उदया व्यक्त करशील या आशेवर झुळवत राहिलास. आता तो क्षण आला आहे जेंव्हा तू एकटा पडलेला आहेस तुझ्या आयुष्यातील सारे हिशोब तू चुकते केलेले आहेस. पण तुझा गुन्हेगारी मेंदू तुला अजूनही स्वस्थ बसू देत नाही तू आताही नवीन शिकार शोधण्याच्या प्रयत्नात आहेस. तुझ्या मेंदूला सतत खाद्य लागत एखाद्या राक्षसासारखे ! जे तुला सध्या मिळत नाही आणि म्ह्णूनच तू पिसाटला आहेस तुझे हे पिसाटलेपण दूर करण्यासाठीच मी तुझे अपहरण केलेले आहे. मी तसे जर केले नसते तर कदाचित लोकांचा माणूसकीवरचा आणि प्रेमावरचा विश्वास उडाला असता. तिने तिच्या चेहर्यावरची पांढरी ओढणी बाजुला केली. पाहतो तर काय माझी प्रेरणा साक्षात माझ्या समोर उभी होती. आता त्या खोलीतील अंधार दूर झाला होता आणि कित्येक वर्षानंतर माझा मेंदू हलका – हलका झाला होता. आता माझ्या बुद्धीच्या जोरावर जगासाठी विधेयक कार्य करण्यासाठी मला प्रेरीत करणारी माझी प्रेरणा प्रत्यक्षात माझ्या समोर उभी होती जी आता कदाचित कायमच माझ्यासोबत माझी सावली बनून राहणार होती...