Nilesh Bamne

Others

0.9  

Nilesh Bamne

Others

प्रेमाच्या वाटेवर ...

प्रेमाच्या वाटेवर ...

37 mins
3.5K


प्रतिभा संथ पावले टाकत विजयच्या खोलीच्या दिशेने चालत होती. खोली जवळ येताच प्रतिभाने खोलीचा दरवाजा हळूच आत ढकलला आणि क्षणभर ती स्तब्ध झाली. समोरच्या बिछान्यावर विजय शांत झोपलेला होता. त्याचा चेहरा नेहमी सारखाच आनंदी आणि टवटवीत दिसत होता. त्याचे लांब सडक काळे केस अंथरुणावर अस्ताव्यस्त पसरलेले होते. त्याचा एकूणच थाट परिकथेतील एखादा राजकुमार त्याच्या महालातील मखमली गादीवर झोपल्यासारखाच होता. नराहून प्रतिभेच्या मनात विचार आला याला जागं न करता असचं तासन - तास एकटक त्याच्याकडे पहात राहावं. पण आता ते शक्य नव्हतं कारण विजय आणि प्रतिभा यांच्यातील प्रेमाचं आणि मैत्रीच नातं आता बदललं होतं. आता ती त्याची वहिनी झाली होती. प्रतिभाने स्वतःला सावरले आणि ती विजयच्या बिछान्याच्या दिशेने चोर पावले टाकू लागली. पावलागणिक तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. विजयच्या जवळ येताच तिने चहाचा कप बेडच्या बाजूलाच असलेल्या टेबलावर ठेवला आणि तिने विजयच्या उघड्या दंडाला हळूच हात लावला आणि तिच्या मनात एक अनोळखी लहर निर्माण होऊन गेली. पण तिच्या अनोळखी स्पर्शाने विजय दचकून जागा झाला. त्याने डोळे उघडले तर प्रतिभा त्याच्याकडे कुतूहलाने पहात होती. स्वतःला सावरत विजय तिला म्हणाला, " वहिनी तू कशाला आलीस ?आईला पाठवायचं ना ?? नाहीतरी मी अलार्म लावलाच होता थोड्यावेळाने मी उठलोच असतो असाही ! चहा हातात घेत विजय प्रतिभाला धन्यवाद !! म्हटल्यावर प्रतिभा तिच्या खोलीत तिच्या नवऱ्यालाच अर्थात अजयला उठवायला गेली. अजयही बिछान्यावर विजयसारखाच शांत झोपला होता पण त्याच्याकडे मात्र एकटक पहात रहावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं. तिने त्याच्या जवळ जाऊन त्याला गदागदा हलवत अहो ! उठा ना म्हणत जाग केलं. झोपेतून जाग होताच अजयने प्रेमाने तिला आपल्या मिठीत भरून घेतले त्या मिठीतुन मोकळं होण्याचा तिने निरर्थक प्रयत्न केला. प्रतिभाच्या सासूबाईंनी प्रतिभाला स्वयंपाकघरातून हाक मारताच अजयने तिला आपल्या मिठीतून मोकळं केलं आणि ती साडी नीट करत स्वयंपाकघराच्या दिशेने धावली. सासूबाईंनी चहाचा कप भरूनच ठेवला होता तो त्यांनी तिला अजयला नेऊन द्यायला सांगितला. विजय नुकताच अंघोळ करून बाहेर हॉलमध्ये केस पुसत खुर्चीत बसला होता. तोच त्याची नजर समोरून चहा घेऊन येणाऱ्या प्रतिभावर स्थिरावली. तिच्याकडे बघता बघता त्याचा टॉवेल हातातून खाली पडला जो प्रतिभाने उचलून त्याच्या हातात देताच विजय धन्यवाद ! म्हणताच प्रतिभा लडिवाळ रागात त्याला म्हणाली, " विजय हे असं सारख उठसुठ आता धन्यवाद ! म्हणण्याची गरज नाही आता मी तुझी मैत्रीण राहिले नाही तर सख्खी वहिनी झाली आहे. त्यावर विजय आपल्या दोन्ही हाताने आपले कान पकडून गालात गोड हसत ओठातल्या ओठात सॉरी म्हणाला. त्यावर गालातल्या गालात हसत प्रतिभा तिच्या खोलीत गेली. अजय आंघोळ करून तयार होऊन बसला होता. तिने त्याच्या हातात कप देताच त्याने चहाचा एक झुरका मारला आणि कप प्रतिभाच्या हातात दिला प्रतिभानेही चहाचा एक झुरका मारून कप पुन्हा अजयच्या हातात दिला. अजय चहा पीतच होता इतक्यात त्याची आई आत येऊन त्याला म्हणाली, " अजय आज जरा लवकर घरी ये आणि प्रतिभाला घेऊन तुझ्या मामाकडे जा त्यांनी तुम्हाला जेवणाचं आमंत्रण दिले आहे . खरंतर आपल्या सर्वाना बोलावलं होत पण आज खूपच धावपळ आहे आणि बरीच कामे आटपायची आहेत. त्या निमित्ताने प्रतिभाची रमेश बरोबर ओळख होईल नाहीतर तो आपल्या वहिनीला पहायला खास काही आपल्याकडे येणार नाही. आई निघून गेल्यावर प्रतिभाने अजयला प्रश्न केला हे रमेश कोण ? त्यावर अजय म्हणाला, रमेश माझा मावस भाऊ आहे. अजय ऑफिसला निघताच प्रतिभा त्याला दरवाजापर्यत सोडायला गेली आणि टाटा करून सासूबाईंना स्वयंपाकात मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली दरम्यान विजयही तयार होऊन त्याच्या कामाला निघून गेला.

प्रतिभा सासूबाईंसह स्वयंपाक घरात असताना दारावरची बेल वाजली. प्रतिभाने धावत जाऊन दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच एका तरुणीने वहिनी म्हणत तिला मगर मिठी मारली. प्रतिभा खरं तर तिला ओळखत नव्हती पण ती वहिनी म्हणाली म्हणजे ती आपली नणंद आहे हे प्रतिभेच्या लक्षात आले होते तिला बसायला सांगून प्रतिभा स्वयंपाक घरात तिच्या सासूबाईंना बोलवायला गेली. सासूबाई बाहेर येताच मावशी म्हणत त्या तरुणीने त्यांना मिठी मारली ती मिठीतुन मोकळी होताच सासूबाई प्रतिभाला म्हणाल्या ही माझ्या बहिणीची मुलगी नीलम ! तुमच्या लग्नाच्या वेळी तिची बारावीची परीक्षा सुरु होती म्हणून नाही येऊ शकली लग्नाला ! तू बस तिच्या सोबत मी स्वयंपाकाच काय ते बघते. आणि हो नीलम आता जेवूनच जा ! त्यावर नीलमने मानेनेच होकार दिला. प्रतिभा निलमच्या समोरच एक खुर्ची घेऊन बसली आणि प्रेमाने नीलमला म्हणाली, काय बोलता नणंदबाई ? त्यावर नीलम म्हणाली तुम्हीच म्हणा वहिनीसाहेब ? त्यावर प्रतिभा नीलमला म्हणाली, काय मग ! बारावी झाल्यावर पुढे काय करायचा विचार आहे ? त्यावर नीलम विनोदाने म्हणाली माझा तर लग्न करून संसार थाटण्याचा विचार होता पण घरच्यांचा आग्रह म्हणून पुढे शिकायचं म्हणते. बरं वहिनी तू किती शिकलीस ? या नीलमच्या प्रति प्रश्नाला उत्तर देत प्रतिभा म्हणाली, मी बारावी नंतर नाही शिकले शिक्षण सोडून आता पाचएक वर्षे झाली. बरं तुझा आवडता विषय कोणता होता ? त्यावर प्रतिभा मराठी म्हणताच आश्चर्यचकित होत नीलमने पुन्हा प्रश्न केला त्यात काय असतं आवडण्यासारखं ? त्यावर प्रतिभा शांतपणे म्हणाली," कविता ! " त्यावर नीलम म्हणाली वहिनी तू कवयित्री वगैरे नाहीस ना ? त्यावर प्रतिभा म्हणाली, मला कविता लिहायला आणि वाचायला आवडतात छंद म्हणून ! आजच मी वर्तमानपत्रात रमेश जाधव यांची एक छान कविता वाचली. त्यावर नीलम उत्साही होत म्हणाली , कोणाची ? रमेश जाधवची ?? तो माझा दादा आहे म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे म्हणजे तुझा दीर आहे. हल्ली तो कोणाशी फारसा बोलत नाही पण तुझ्याशी नक्की बोलेल कारण तुम्ही समप्रेमी आहात ना ! बोलता बोलता नीलमचे डोळे दाटून आले. बोलता बोलता डोळे पुसत चेहऱ्यावर खोटं हसू आणत विषय बदलत नीलमने प्रतिभाला प्रश्न केला, तुमचा हनीमून कसा झाला ? त्यावर प्रतिभा तिच्या गालावर चापट मारत म्हणाली, लहान मुलांनी असे चावट प्रश्न विचारायचे नसतात ! तोच आईनी जेवायला यायचे फर्मान सोडले आणि तिघी मनसोक्त गप्पामारत जेवण आटपून टीव्ही पहायला बसल्या इतक्यात नीलमला फोन आल्यावर ती दोघींचा निरोप घेऊन गडबडीत निघून गेली. नीलम निघून गेल्यावर प्रतिभा आपल्या खोलीत जाऊन आडवी पडली असता तिच्या मनात विचार आला की रमेश भाऊंच्या बाबतीत सारेच इतके अस्वस्थ का आहेत ? मी त्यांचे बरेच साहित्य वाचले आहे किती नावाजलेले तरुण लेखक आहेत ते ! किती छान प्रेम कथा आणि कविता लिहितात त्यांच्या प्रत्येक कथेतील नायिका मनीषा तिच्याबद्दल त्यांना विचारायचय मला ! चला काय योगायोग आहे माझा सर्वाधिक आवडता लेखक माझा दीर आहे. आज संध्याकाळी मी त्यांना भेटले की मला माझ्या कितीतरी अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळतील...

प्रतिभा तिच्या सासूबाईसह रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होती. संध्याकाळी सहाच्या सुमारास विजय कामावरून येताच प्रतिभाच्या हातचा गरमागरम चहा पिऊन कोणालातरी भेटायला घराबाहेर निघून गेला. त्यानंतर रमेश येताच प्रतिभा तयार होऊन त्याच्यासह रमेशच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी गेले. अजयच्या मामा - मामीने रीती रिवाजाला साजेल असचं त्यांचं भव्य स्वागत केले पण नेमका तेव्हाच रमेश कोठेतरी बाहेर गेला होता. रमेशची बहीण सोनल आपल्या वहिनीला तिचं संपूर्ण घर दाखवायला घेऊन गेली. वरच्या मजल्यावर रमेशची खोली होती. त्या खोलीत रमेशचा एक छानसा फोटो होता तो पाहून तो रमेशचाच आहे याची प्रतिभाने सोनलकडून खात्री करून घेतली. निदान त्या फोटोत तरी रमेश राजबिंडा एखाद्या अल्लड मुलासारखा दिसत होता. एखाद्या मोठ्या लेखकाचा एकही भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याच्या खोलीत बरीच पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली होती. त्यातील एक कथासंग्रह प्रतिभाने हळूच उचलला अर्थात त्याचा लेखक रमेश जाधवच होता. त्या खोलीच्या भिंतीवर अनेक गौरव पत्रे दिमाखात डोलत होती. त्या खोलीच्या खिडकीतून समोरचा सर्व परिसर स्पष्ट आणि अतिशय मनमोहक दिसत होता. त्या खिडकीतून प्रतिभा बराच वेळ बाहेर पहात होती. अजूनही रमेशचा कथासंग्रह प्रतिभाच्या हातातच होता. तो मी घेऊ का वाचायला ? म्हणत सोनलची परवानगी काढली असता सोनल जवळ - जवळ तिच्यावर रागावलीच आणि तिला म्हणाली, वहिनी हे ही तुझेच घर आहे ! परवानगी काय मागतेस ? इतक्यात दारावरची बेल वाजताच दादा ! आला वाटतं!! म्हणत सोनल खाली धावली. तिच्या पाठोपाठ प्रतिभाही खाली उतरली. रमेश आपल्या समोर उभा आहे यावर प्रतिभाचा विश्वासच बसत नव्हता. रमेश प्रतिभाकडे पहात एकदाच हसला आणि त्याने अजयला प्रेमाने आलिंगन दिले आणि तो कपडे बदलायला गेला. तोपर्यत मामीने जेवण वाढायला घेतलं. जेवण झाल्यावर रमेश अजय आणि प्रतिभाला त्याच्या खोलीत घेऊन गेला त्याच्या खोलीतून आता रात्रीचा चंद्र आणि चांदण्या अगदी स्पष्ट दिसत होत्या. अजय रमेश सोबत गप्पा मारत असताना प्रतिभाने खिडकीतून बाहेर पहात असतानाच रमेशला प्रश्न केला , रमेश भाऊ तुम्ही आमच्या लग्नाला का आला नाहीत ? इथे घरीही कोणीतरी थांबायला हवं होत, हे ही एक कारण होत आणि मी खरं म्हणजे कोणत्याच कार्यक्रमाला हल्ली उपस्थित रहात नाही. इतकं बोलून तो गप्प झाला म्हणून त्याला पुन्हा बोलतं करावं म्हणून प्रतिभाने आणखी एक प्रश्न विचारला सध्या कोणत्या विषयावर लिहिताय ? आजच्या वर्तमानपत्रात तुमची प्रकाशित झालेले कविता वाचली ती फारच छान होती ! मला खूपच आवडली ! त्यावर रमेश म्हणाला, धन्यवाद प्रतिभा ! तुला वाचनाची आवड आहे हे ऐकून खूप बरं वाटलं , सध्या मी सामाजिक विषयावर एक कादंबरी लिहितोय ! या अशा अनेक विषयावर प्रतिभाने रमेशशी चर्चा केली पण एकदाही त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललेलं प्रतिभाला दिसले नाही. प्रतिभासोबतची त्याची साहित्यिक चर्चा छान रंगली होती. त्याला आत्मविश्वासाने बोलताना पाहून मामा- मामी, सोनल आणि अजयही समाधानी दिसत होते. रात्रीचे दहा वाजताच सर्वांचा निरोप घेऊन ते घरी आले तेव्हा विजय बाहेर सोफ्यावर टी. व्ही. पहात बसला होता त्याने प्रतिभाकडे पहात तिला प्रश्न केला काय वहिनीसाहेब भेटलात का तुमच्या रमेश भाऊंना ? बोलला का काही की त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले होते ? आज तुला भेटला तो रमेश एक सुप्रसिद्ध लेखक आहे आणि मी ज्या रमेशला ओळखत होतो तो माझा लाडका भाऊ आणि जिवाभावाचा मित्रही होता, अल्लड, विनोदी, उत्साही आणि टवाळखोर ! मला आताचा त्याचा पडलेला निरुत्साही चेहरा पहावत नाही म्हणून मी हल्ली टाळतो त्याला. हे विजय रागात बोलत होता पण त्याचे डोळे दाटून आले होते. ते पुसत प्रतिभा आणि अजयला शुभरात्री म्हणून तो झोपायला गेला. अजय आणि प्रतिभा कपडे बदलून बिछाण्यावर आडवे होताच प्रतिभाने अजयला प्रश्न विचारला की ही मनीषा कोण आहे ? त्यावर अजय मनिषा ती तुला कशी काय माहीत ? त्यावर प्रतिभा म्हणाली, त्यांचा प्रत्येक कथासंग्रह ते मनिषालाच अर्पण करतात म्हणून विचारलं ! त्यावर अजय म्हणाला, मनिषा आहे नाही होती . ती आता या जगात नाही. पाच वर्षांपूर्वी एक आजारपणात तीच निधन झालं. रमेशच तिच्यावर आणि तिचं रमेशवर जीवापाड प्रेम होतं. ती रमेशच्या समोरच्याच घरात राहायची हल्ली ते घर बंदच असतं. मनिषा रमेशहून दोन वर्षांनी लहान होती आम्ही सर्व एकाच शाळेत होतो. आमच्यात खूप घट्ट मैत्री होती ती अभ्यासात खूपच हुशार होती तरी ती अभ्यासात रमेशची मदत घेत असे. ते दोघे नक्की एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते मलाही नाही सांगता येणार ! दहावीत ती शाळेत पहिली आली होती शाळेत असतानाच तिच्या कविता वर्तमानपत्रात प्रकाशित होऊ लागल्या होत्या. कॉलेजात गेल्यावर तिचे लेखही प्रकाशित होऊ लागले. तोपर्यत विजय त्याच बी.कॉम.च शिक्षण पूर्ण करत होता. मनिषा एक नवोदित लेखिका म्हणून प्रसिद्धीस येत असताना रमेश तिचा फक्त चांगला वाचक होता. एक मोठी लेखिका होणं हे मानिषाच स्वप्न होतं. रमेश आणि मनिषा जरी एकमेकांच्या प्रेमात असले तर त्यांच्यात प्रेम हा विषय सोडून सर्व विषयांवर चर्चा व्हायची ! त्या दोघांची प्रेमकथा जगावेगळी आणि कोणाचीच नजर लागू नये अशीच होती. त्यांच्या प्रेमाला कधीच कोणाचा कसलाच विरोध नव्हता . उलट सर्वाना त्यांच्या प्रेमाचा हेवा वाटायचा . पदवीधर झाल्यावर विजय एका बँकेत कामाला लागला. रामेशवर तशी कोणाची खास जबाबदारी नव्हती त्यामुळे त्याने मानिषाशी तीच शिक्षण पूर्ण होताच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मानिषाही भयंकर खुश होती. पण त्यांचा आनंद कदाचित नियतीला मान्यच नव्हता एक दिवस अचानक मनिषा आजारी पडली आणि तिचा आजार दिवसेंदिवस वाढत गेला आणि एक दिवस अचानक तिने या जगाचा निरोप घेतला तीच अचानक जाणं रमेश सहन करू शकला नाही आणि कित्येक महिने तो भ्रमिष्ठा सारखा वागत होता हळू हळू तो सावरला पण आपलं हसू आणि आनंद तो कायमचा गमावून बसला...मनिषाच्या आठवणीत तो लिहू लागला. मानिषाच स्वप्न त्याने आपल्या हृदयात साठवलं आणि सुरु झाला त्याचा प्रवास एक प्रसिद्ध लेखक होण्याच्या दिशेने...आज त्याला प्रसिद्ध लेखक झालेलं पाहून कदाचित मनिषाही जिथे कोठे असेल तेथून पाहून नक्कीच खुश होत असेल...पण मला त्याची प्रसिद्धी नकोय मला हवाय त्याच्या चेहऱ्यावरील हरवलेला आनंद ! हे बोलतानाअजयचेही डोळे ओले झाले आणि प्रतिभाच्या डोळ्यातुन तर अश्रू टपटप गळू लागले. पण तिचे अश्रू रमेशच्या बाबतीत तिलाच एक आश्वासक आश्वासन देत होते. आपले ओले डोळे पुसत प्रतिभा हळूच अजयच्या कुशीत विसावली...

एके दिवशी प्रतिभा विजयच्या खोलीची साफसफाई करीत असताना तिला विजयला कविता नावाच्या कोणा मुलीने लिहिलेली प्रेमपत्रे सापडली. ती पत्रे फारच जुनी होती कदाचित विषय शाळेत असतानाची असावीत. ती पत्रे वाचताना प्रतिभाचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि तिचे अश्रू खाली जमिनीवर टपटप गळू लागले. ती स्वतःशीच म्हणाली, " विजय फार पूर्वीच कोणाच्यातरी प्रेमात पडला होता आणि मी उगाच त्याच्या प्रेमात वेडी झाले होते". आणखी शोधाशोध केल्यावर प्रतिभाला कवितांचा विजय सोबतचा एक फोटोही सापडला त्या फोटोतील कविता एखाद्या परीसारखी दिसत होती. पाहताक्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावे इतकी सुंदर आणि मनमोहक ! प्रतिभा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसून विजय आणि तिचा भूतकाळ आठवू लागली.

एका क्षणाला प्रतिभा विजयच्या प्रेमात इतकी डुंबली होती की तिला सगळीकडे फक्त आणि फक्त विजयच दिसायचा. विजय नेहमी गावी प्रतिभेच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या त्याच्या मावशीकडे जायचा तेंव्हाच प्रतिभा आणि त्याची ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीच रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीच्या झाडाला हमखास येणारं फळ म्हणजे प्रेम त्यांच्या मैत्रीच्या झाडाला ते लागलं पण ते फक्त प्रतिभालाच दिसत होतं. प्रतिभा विजयसोबत लग्न करण्याचे स्वप्न पहात होती पण विजयकडून तिच्या प्रेमाला अपेक्षित प्रतिसाद कधीच मिळत नव्हता. एक दिवस जेव्हा विजय आणि त्याच्या मावशीने मध्यस्थी करून प्रतिभाच्या आई वडिलांकडे अजय करीता प्रतिभाचा हात मागितला तेव्हा मात्र प्रतिभाची खात्री पटली की विजय तिला फक्त आपली एक चांगली मैत्रीण मानतो. विजयच आपल्यावर प्रेम नसलं तरी आपलं प्रेम आयुष्यभर आपल्या संपर्कात राहील म्हणून प्रतिभाने अजयसोबत लग्नाला होकार दिला होता. प्रतिभा विजयची वहिनी होऊन त्याच्या घरात आली. अजयचे नवरा म्हणून तिच्यावर जीवापाड प्रेम होते पण प्रतिभा मात्र त्याच्यावर हातच राखून प्रेम करीत होती. प्रतभाने कधीच मनापासून स्वतःला अजयच्या स्वाधीन केले नव्हते. एक पत्नी म्हणून ती अजयला पूर्णपणे अमर्पित नव्हती. विजयने काय ? कोणीच तिला कविताबद्दल काहीच सांगितले नव्हते. आता मात्र प्रतिभाच्या रागाचा पारा चढला होता. तिने कविताचे प्रेमपत्र आणि फोटो स्वतःकडे ठेऊन घेतले आणि संध्याकाळी विजय कामावरून येताच ते त्याच्या समोर आदळत ती म्हणाली, हे काय आहे ? त्यावर विजय थोडासा ओशाळत म्हणाला, वहिनी, अगं ! ही माझी मैत्रीण कविता, आमची लहानपणापासूनची मैत्री आहे म्हणजे आमच्यात प्रेम आहे. आमच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच माहीत आहे मला वाटत होतं तुलाही माहीत असेल, अजयने सांगितलं असेल ! पण तुझा राग बघता असं दिसतयं की तुला आजच समजलं ! सॉरी !!! विजयने कान पकडताच प्रतिभा म्हणाली, मग माझी माझ्या होणाऱ्या जाऊबाईंशी कधी ओळख करून देणार ? त्यावर विजय म्हणाला ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गावी गेली आहे आली की लगेच !

प्रतिभा आणि विजय यांच्यातील कविताबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या इतक्यात दारावरची बेल वाजली आणि प्रतिभाने धावत जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजात एक नाटकातील नायक उभा होता प्रतिभाला त्याच नाव आठवत नव्हतं. ती मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पहात होती इतक्यात विजय बाहेर आला आणि त्याने त्याला घट्ट मिठी मारून आत घेतले. त्याने प्रतिभासोबत ओळख करून दिली, हा माझा मावसभाऊ निलेश, माझ्या मावशीचा मुलगा अगं ! आपल्या नीलमचा भाऊ !! प्रतिभा निलेशला बसायला सांगून त्याच्यासाठी चहा - पाण्याची तयारी करायला गेली. चहा पिता - पिता विजय, प्रतिभा आणि निलेश यांच्यातील चर्चा रंगल्या. बोलता बोलता विजयने थट्टा म्हणून सहज विचारलं, काय म्हणतंय तुमचं नवीन नाटक ? त्यावर निलेश हसून म्हणाला, नाटक काय म्हणणार ? जे काही म्हणायचं ते तुमच्यासारखे सुजाण मायबाप प्रेक्षकच म्हणतील. सध्या कोणतं नाटक करताय यावर निलेश "प्रेमात कधी - कधी" म्हणताच विजय म्हणाला, वहिनी तुला सांगतो याच नाटक कोणत्याही प्रकारातील असो त्याच्या नाटकाच्या नावात प्रेम हा शब्द असतोच, प्रत्येक नवीन नाटकाच्या वेळी त्या नाटकातील नवीन नायिकेच्या प्रेमात पडतो आणि नवीन नाटक सुरु झाल्यावर तिला विसरतो. काय हो ? या प्रतिभाच्या अल्लड प्रश्नाला सावरत उत्तर देत निलेश म्हणाला, तू काय या विजयचं ऐकतेस तो तर साक्षात मेनकेलाही कवितासमोर असताना कुरूप म्हणतो. म्हणजे तुम्ही कविताला कुरूप म्हणताय ? प्रतिभाने टोला हणल्यावर निलेश म्हणाला , तसं नाही शेवटी प्रत्येक सुंदर गोष्टी मागे एक कुरुपता लपलेली असतेच ती सर्वाना दिसत नाही इतकंच ! बरं ! थट्टा पुरे हे घ्या तुमच्यासाठी माझ्या नवीन नाटकाचे पास ! नक्की या !! म्हणत निलेशने त्यांचा निरोप घेतला आणि तो जाताच प्रतिभा आपला मोर्चा विजयाकडे वळवत त्याला प्रश्न केला , काय करते काय आपली ही कविता ? त्यावर सावरत विजय म्हणाला, एका शाळेत संघणक शिक्षिका आहे. इतक्यात आई बाजारातून आल्यामुळे चर्चा अर्धवट राहिली. विजय उठून बाहेर निघून गेला आणि आई प्रतिभाला घेऊन स्वयंपाकघरात.

प्रतिभाचा एक मोठा गैरसमज दूर झाला होता. तिच्याकडून नकळत झालेल्या चुकीची तिला जाणीव झाली होती. लग्न झाल्यापासून आपण कोठेतरी अजयवर अन्याय केला असे तिला नराहून सारखे वाटत होते. त्यारात्री प्रतिभाच्या खऱ्या अर्थाने स्वतःला अजयच्या स्वाधीन केलं. आता ती अजयची खरोखरची अर्धांगिनी झाली होती. तानाने आणि मनानेही. असेच काही दिवस गेल्यांनंतर प्रतिभाची मावस बहीण रमा तिला अचानक भेटायला आली. तिला असं अचानक आलेलं पाहून रामाला खूप आंनद झाला. रमा नुकतीच पदवीधर झाली होती आणि एका वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून नुकतीच रुजू झाली होती. ती तिच्या वर्तमानपत्रासाठी एका मुलाखतीच्या शोधात होती. त्याच संदर्भात ती प्रतिभाशी बोलत असताना आई मध्येच म्हणाल्या , मी सुचवू का ? अगं ! तुला मुलाखत हवी ना ? मग ! आमच्या रमेशची घे ना ? त्यावर रमा कोण रमेश ? म्हणताच प्रतिभा म्हणाली , अगं ! तरुण लेखक विजय जाधव ! ते माझे दीर आहेत. अजयचे मावस भाऊ ! त्यावर उत्साही होत रमा म्हणाली, रमेश जाधव ! तुझे दीर आहेत ? आमच्या वर्तमानपत्रात त्यांचे लेख प्रकाशित होत असतात पण ते कधीच कोणाला मुलाखत देत नाहीत, मी त्यांची सर्व पुस्तके वाचलेत माझे खूपच आवडते लेखक आहेत ते, मुलाखत जाऊदे ! ती कोणाचीही घेता येईल पण विजय जाधवना भेटण्याची संधी मी नाही गमावू शकत. मला एकदातरी भेटायचं आहे त्यांना. त्यावर आई प्रतिभाला म्हणाल्या रमेशला फोन लाव आणि मी ताबडतोब भेटायला बोलवलंय सांग . प्रतिभाने फोन करताच पुढच्या मिनिटाला दारावरची बेल वाजली रमाने पुढे होत दरवाजा उघडला तर दरात एखाद्या नायकासारखा दिसणारा राजबिंडा पुरुष उभा होता. तो रमेश असावा याबद्दल रमला खात्रीच वाटली नव्हती पण प्रतिभाने रमेश भाऊ अशी हाक मारल्यावर तिची खात्री पटली. काय काम होत आत्या ! इतक्या तातडीने बोलावलस ? त्यावर आई म्हणाल्या, काही नाही रे ही रमा ! रामाने हाय ! म्हणत हात मिळवला, प्रतिभाची मावस बहीण आहे तिला तिच्या वर्तमानपत्रासाठी तुझी मुलाखत हवी होती . रमेश रामाकडे पहात रुक्षपणे म्हणाला , हं ! विचारा प्रश्न !

रमा: नुकताच तुमचा एक कथासंग्रह प्रकाशित झाला त्याबद्दल प्रथम तुमचे अभिनंदन ! त्या कथासंग्रहा बद्दल तुम्ही काय सांगाल

रमेश : धन्यवाद ! काही खास नाही माझ्या इतर कथासंग्रहासारखाच हा ही प्रेम कथांचा संग्रह आहे.

रमा: सध्या तुम्ही एक कादंबरी लिहित आहात ती कादंबरी कोणत्या विषयावर आधारित आहे?

रमेश : ती कादंबरीही एका प्रेमकथेवर आधारित आहे.

रमा : तुमच्या यापूर्वीच्या प्रत्येक कादंबरीतील नायिका कादंबरीच्या शेवटी मरते. या कादंबरीतील नायिकांची शेवटी मरणार का ?

रमेश : ते इतक्यात नाही सांगता येणार

रमा : तुम्ही विनोदी लिखाण का करत नाही

रमेश : विनोदी लिखाण करायला मुळात माणूस विनोदी आणि त्याहून अधिक आनंदी असावा लागतो मी तसा नाही म्हणून !

रमा : तुम्ही अविवाहित आहात ! तुमच्या प्रत्येक कथेतील नायिका मनिषा प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात आहे का ?

रमेश : मनिषा माझी प्रेयसी आज या जगात नसली तरी माझ्या हृदयातील तिची जागा मी कोणासाठीही रिकामी करणार नाही .

रमा : दुसरी जागा निर्माण तर करु शकता ना ?

रमेश : तशी शक्यता कमीच आहे

हे असे अनेक प्रश्न उत्तरे झाल्यावर धन्यवाद म्हणत मुलाखत संपली आणि रमेश जायला निघताच रमाने त्याचा हात धरून त्याला खाली बसवले आणि ती म्हणाली, आमच्या आवडत्या लेखकाबरोबर बसून चहा पिण्याची आम्हाला संधी नाही देणार ? रमेश खाली बसताच चहा पिता पिता त्यांच्यात घरगुती चर्चा रंगल्या मग सेल्फी वगैरे प्रकारही पार पडले. रमेश सोबत रमाही प्रतिभाचा निरोप घेऊन निघाली. प्रतिभा आणि आत्या त्यांना दारापर्यत सोडायला गेल्या. आत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कारण भल्या भल्याना अशक्य वाटणार काम रामाने सोप्प केलं होत रमेशला बोलतं केलं होतं, मोकळं केलं होत, त्याच्या चेहऱ्यावरून चोरीला गेलेलं हसू तिला परत मिळवून दिलं होत. प्रतिभा सहज आईंना म्हणून गेली रमेश आणि रमा जोडी किती छान दिसते नाही ! त्यावर आई म्हणाल्या, अगदी माझ्या मनातलं म्हणाली बघ ! आईने ओले झालेले डोळे पुसले. काहीतरी अचानक आठवल्यासारख्या आई प्रतिभाला म्हणाल्या , आज रात्रीच्या गाडीने मी आणि विजय गावी जाणार आहोत ! ह्याची तब्बेत थोडी बरी नाही आणि मी ही थोडे दिवस आराम करेन म्हणते , आता घराची काळजी नाही तू आहेस की सांभाळायला, विजय येईल चार - पाच दिवसात माघारी ! तसं ही कविता तिकडेच आहे म्हणजे त्याचाही जीव लागत नसेल इकडे. ठरल्याप्रमाणे आई आणि विजय त्यारात्री गावी निघून गेले. आता घरात प्रतिभा आणि अजय दोघेच आणि एकांत होता. त्यामुळे त्यारात्रीचा प्रत्येक क्षण ते दोघे मनसोक्त मनमुराद जगले...

आठवडा झाला तरी विजय काही गावावरून परत आला नाही. एका दुपारी प्रतिभा घरात एकटीच असताना दारावरची बेल वाजली प्रतिभाने धावत जाऊन दरवाजा उघडला तर दारात " मधुरा " तिची मोठी नणंद उभी होती. एक वर्षापूर्वीच तिने नवऱ्याकडून घटस्फोट घेतला होता आणि आता पुण्यातील एका सेवाभावी संस्थेत कामाला राहिली होती. प्रतिभाने लगेच तिच्या हातातील बॅग घेत तिला आत घेऊन दरवाजा बंद केला आणि त्या दोघी आत येताच मधुरा समोरचया सोफ्यावर बसली. प्रतिभा तिचे सामान आतल्या खोलीत ठेऊन तिच्यासाठी सरबत घेऊन आली. इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली प्रतिभाने दरवाजा उघडला तर दरात सोनल होती तिला आत घेत प्रतिभा सोनलला म्हणाली," आज बुवा ! तुम्हांला आमची आठवण कशी काय आली ? त्यावर सोनल स्वतःला सावरत म्हणाली, " अगं ! वहिनी मी बरेच दिवस तुझ्याकडे येते येते म्हणत होते पण अभ्यासातून वेळ मिळत नव्हता. आज कॉलेजला सुट्टी मारली म्हणून म्हटलं चला आपल्या लाडक्या वहिनीला जाऊन भेटूया. आले म्हणून बरं झालं मधुरा ताईचीही भेट झाली. तिचं बोलणं संपत न संपत तोच मधुराने सोनलला प्रश्न केला. आमचे लाडके बंधुराज कसे आहेत ? त्यावर सोनल थोड्या उत्साहात म्हणाली, दादा ! आता खूपच बदलला आहे, आता माझ्यासोबत पूर्वीसारख्याच मनसोक्त गप्पा मारू लागला आहे. म्हणजे तो आता माणसात येऊ लागला आहे. खरं म्हणजे मी त्याबद्दलच वहिनीला विचारायला आले होते. वहिनी! त्या दिवशी तुम्ही दादाला इकडे बोलावलत तेव्हापासून त्याच्यात हा बदल जाणवतोय ! काय जादू केलीत त्याच्यावर ? त्यावर प्रतिभा म्हणाली, काही जादू वगैरे केली नाही पण त्याच्यासोबत एक जादूगारीन गेली होती. त्यावर उत्साही होत सोनल म्हणाली ," त्या जादूगारणीच नाव "रमा " तर नव्हतं ना ? नाही ! हल्ली त्या रमाचा दादाला सारखे फोन येत असतात . तासन तास बोलत असतो तो तिच्याशी. आईतर त्या रमाचे सारखे आभार मानत असते आणि मनातल्या मनात तिला आशीर्वाद देत असते, आहे कोण ही रमा ?? मला तिला प्रत्यक्षात भेटण्याची खूप इच्छा आहे. त्यावर प्रतिभा म्हणाली , रमा माझी मावस बहीण आहे. तेवीस चोवीस वर्षाची आहे. पदवीधर झाल्यावर एक वर्तमानपत्रात पत्रकार आहे. तुझ्या दादाची सर्वच्या सर्व पुस्तके तिने वाचली आहेत. इतकंच नव्हे तर तिला मनीषाबद्दलही सर्व माहित आहे. तुझ्या दादाच्या ती प्रेमात पडली आहे तुझी वहिनी होण्याची तिची इच्छा आहे. पण तुझा दादा तिच्यासोबत फक्त आणि फक्त साहित्यावरच चर्चा करतो त्यामुळे त्यांच्या प्रेमाची गाडी पुढे सरकत नाही. आमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये तिचा फोटो आहे दाखवते नंतर तुला. हे सारं ऐकल्यावर मधुरा म्हणाली, रमा गोड मुलगी आहे. माझी चांगली मैत्रीण आहे मी बोलते रमेशशी आणि रमाशीही , रमेश माझा शब्द खाली पडू देणार नाही आणि आता त्याला या जगाचा सामना करावाच लागेल मनिषाला विसरून...रमा हीच त्याच्यासाठी योग्य जोडीदार आहे. रमचा फोटो पाहून तर सोनल खूप खुश झाली आपल्या मोबाईलमध्ये तिच्या फोटोचा फोटो काढून ती आनंदाने निघून गेल्यावर प्रतिभा मधुराचा हात हातात घेत तिला म्हणाली, ताई तुमच्यासारख्या सोज्वळ, प्रेमळ आणि सुंदर स्त्रीलाही नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याची वेळ यावी यावर विश्वास बसत नाही. त्यावर प्रतिभाचा हात आपल्या हातातून सोडवत जागेवर उभी रहात मधुरा म्हणाली, तुला दिसत तसं जग नाही आणि वाटतो तसा संसारही नसतो. आज स्त्री आकाशाला गवसणी घालत असली आणि कायद्याने स्त्रियांना कितीही अधिकार दिलेले असले तरी पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे अन्याय काही कमी झालेले नाहीत. स्त्रियांवर अन्याय न करणारे पुरुष समाजात तुरळक आहेत हे उघड सत्य आहे. आजही प्रत्येक पुरुष स्वतःला संपूर्ण पुरुष समजत असतो आणि ज्या काही कमतरता असतात त्या फक्त स्त्रियांमध्ये असतात असे समजत असतो. आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी मी आई होऊ शकले नाही म्हणून मला वांजोटी म्हणून हिनवत माझा नवरा माझा छळ करू लागला प्रसंगी मला मारझोडही करू लागला. एक दिवस आमच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि मला सारेच असह्य झाल्यावर माझा तॊल सुटला आणि रागाच्या भरात मी त्याला म्हणाले, मी वांजोटी नाही तू नामर्द आहेस मी आई होऊ शकते याची मला खात्री आहे कारण लग्नाच्या अगोदर मी एकदा गर्भपात करू झाली आहे माझ्या त्या मुलाचा बाप कोण होता माहित आहे तुझाच चुलत भाऊ महेश ! तुमच्या घरात साले सारे नामर्द भरलेत जे मर्द आहेत त्यांचा दुसऱ्यांच्या बायकांवर डोळे आहेत. त्यानंतर मीच स्वतःहून घटस्फोटासाठी अर्ज केला. मधुराचे हे त्वेशाने बोलणे ऐकताना प्रतिभाला घाम फुटला पण तरीही भीत भीत तिने महेश ? असा प्रश्न केलाच त्यावर स्वतःला सावरत मधुरा म्हणाली, महेश हो महेश ! महेशवर माझे शाळेत असल्यापासून प्रेम होते आमच्या प्रेमाला कोणाचाच कसलाच विरोध नव्हता. महेश दिसायला एखाद्या राजकुमारसारखा होता म्हणजे आहे. प्रेमात प्रियकर प्रेयसी जे - जे म्हणून करतात ते सारे आम्ही अनुभवले त्यातून मिळणारा प्रत्येक आंनद आम्ही उपभोगला. आम्ही लग्न करण्याच नक्की केलं होतं. महेश आणि माझ्यात एका नाजूक क्षणाला जे व्हायला नको ते झाले आणि मी गरोदर राहीले . पण ते वेळीच लक्षात आल्यामुळे आम्ही ते निस्तरले पण लगेच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या दरम्यान त्याच्या भावाचं लग्न झालं. प्रत्येक पुरुष लबाड असतो हे खोटं नाही महेशही लबाड निघाला इकडे मी त्याला सर्वस्व अर्पण केलेले असतानाही त्याने माती खाल्ली. त्याला त्याच्या वहिनीसोबत माती खाताना त्याच्या भावानेच पकडले आणि त्याचा गाजावाजाही केला. तीही महेश पासून गरोदर होती पण महेशच्या आईने सारी सारवासारव करून तिचा गर्भपात करून तिला महेशच्या भावाला स्वीकारायला भाग पाडले. मी मात्र भयंकर चिडले होते त्या रागाच्या भरात त्याच्यासोबत लग्नाला नकार दिला त्याच्या आईने ताबडतोब त्याचे नात्यातील एका मुलीशी लग्न लावून दिले. मी ही मग नाईलाजाने महेशच्या चुलत भावाशी लग्न केले जो नामर्द होता. नंतर कळले महेशचा भावही तसाच होता. आता मला वाटते मी तेव्हा महेशला लग्नाला नकार देऊन चूक तर नाही ना केली कारण या सगळ्यात विनाकारण फक्त माझाच बळी गेला. आता मला कळतंय जगाचा अभ्यास केल्यावर कित्येक गोष्टी वाटतात तितक्या सोप्प्या आणि दिसतात तितक्या साध्या नसतात.

मधुरा पुण्याला निघून गेल्यावर काही दिवसांनी रमा प्रतिभाला भेटायला आली असता तिने रमाशी तिच्या आणि रमेशच्या प्रेमाबद्दल चौकशी केली असता रमा म्हणाली, " रमेश मला रोज न चुकता फोन करतो, पण आमच्यात प्रेम या विषयावर सोडून बाकी सर्व विषयांवर चर्चा होते, मला तर आता हे सारं असह्य होतंय कधी - कधी वाटत एकदाचं काय ते विचारून एक घाव दोन तुकडे करून टाकावे पण नाही जमत कारण त्याच्यावर मी इतकं प्रेम करते की मला त्याच्यावर रागावणंही आता जमत नाही. त्याचं माझ्यावर प्रेम नसेल तर हरकत नाही पण निदान आमच्यातील मैत्रीचं नातं अबादीत राहावं म्हणून मी प्रयत्नशील आहे. त्याच्याशी रागाने नाही पण मैत्रीच्या नात्याने तरी या संदर्भात स्पष्ट बोलावं म्हणून मी त्याच्या घरी गेले होते, मला भेटून त्याच्या आईला आणि बहिणीला इतका आनंद झाला होता की कुठे ठेऊ आणि कोठे नको ! मला वाटतं मी रमेशच्या प्रेमात आहे हे त्यांना माहित असावं बहुतेक पण रमेश घरी नव्हता त्यामुळे सोनलने मला त्याच अख्ख घर दाखवलं तेव्हा मी रमेशच्या खोलीत मनिषाचा फोटो पहिला काय सुंदर मुलगी होती, पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावी इतकी ! रमेश कडून त्याने मनिषाला विसरण्याची अपेक्षा करणे हा गाढवपणाच ठरेल. मी इकडे येताना सोनलला सांगून आलेय, मी आज संध्याकालपर्यत प्रतिभाकडे आहे म्हणून ...पाहूया आता मला भेटायला इकडे येतो का ते ? तिचं बोलणं सपंत न सपंत तोच दारावरची बेल वाजली प्रतिभाने दरवाजा उघडला दरात रमेशला पाहून तिला प्रचंड आंनद झाला, ती त्यांच्यासाठी चहापाणी आणायला आत गेली असता , रमेश रमला म्हणाला," तू घरी येणार होतीस तर तसं अगोदर फोन करून सांगायचं ना , मी घरीच थांबलो असतो. माझ्याकडे काही खास काम होतं का ? त्यावर रागाने रमा म्हणाली, नाही ! मी इकडे सहज फिरायला आले होते तर म्हटलं तुझ दर्शन घेऊन जाऊया ! तिचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच रमेश म्हणाला अगं ! मी सोनाराकडे गेलो होतो एक भेटवस्तू आणायला ! कोणासाठी ? रामाने खोचक प्रश्न केला असता रमेश शांतपणे म्हणाला, कोणासाठी म्हणजे काय ? तुझ्यासाठी ! उद्या तुझा वाढदिवस नाही का ?? त्यावर रमा म्हणाली, माझा वाढदिवस माझ्याही लक्षात नव्हता तुझ्या बरा लक्षात राहिला , बरं ! काय आणलीस भेटवस्तू ? त्यावर रमेशने तिच्या डोळ्यासमोर अंगठी धरली असता प्रतिभा आतून बाहेर आली आणि तिने हे पाहिले आणि ती विनोदाने म्हणाली, हे काय रमेश भाऊ ही अंगठी देऊन रमला लग्नाची मागणी घालताय की काय ? त्यावर रमा किंचित लाजल्यावर रमेश म्हणाला, हो ! वहिनी !! खरंतर मी उद्या रमाच्या वाढदिवशी तिला ही अंगठी देऊन लग्नाची मागणी घालणार होतो पण रमाचा चढलेला पारा बघता ते मी आजच करतो तुमच्या साक्षीने ! आणि रमेश तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला म्हणाला, रमा माझ्याशी लग्न करशील ? पाणावलेल्या डोळ्यांनी रमा हो ! म्हणाली. त्यानंतर चहापाणी करताना प्रतिभाने रमेशला विचारणा केली की हा रमा सोबत लग्नाचा निर्णय अचानक कसा काय घेतला ? त्यावर रमेश म्हणाला," अचानक नाही ! मधुरा ताईने माझ्याजवळ रमाबद्दल चौकशी केली, तिच्या मनात माझ्याविषयी ओलावा आहे हे ही सांगितले, माझ्या हृदयातील मनिषाची जागा कोणी घेऊ शकणार नाही हे खरं असलं तरी ताईने मला रमासाठी एक वेगळी, स्वतंत्र तिच्या हक्काची नवीन जागा निर्माण करायला भाग पाडले. जीवन हे पाण्याच्या प्रवाहासारखे असायला हवे पण मनिषामुळे माझ्या जीवनाच्या प्रवाहाला कोठेतरी बांध घातला गेला होता. पण तो बांध रमाने हळूहळू फोडला . मी मनिषाला विसरणार नाही पण रमावर माझी पत्नी म्हणून अन्याय होऊ देणार नाही. रमा माझ्याशी संवाद साधत राहिली आणि मी तिच्या प्रेमात पडलो पण तिच्या मनात नक्की काय आहे हे माहीत नव्हते पण ताईने ते स्पष्ट केल्यावर मात्र मी रमाशी सरळ लग्न करण्याचाच निर्णय घेतला...कारण आता ती मलाच नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला हवी आहे. रमेश आता पुन्हा पूर्वीचाच रमेश झाला होता...रमा भयंकर आनंदी झाली होती तिला रमेश सोबत एकांतात मनसोक्त गप्पा मारायच्या होत्या म्हणून ती प्रतिभाचा निरोप घेऊन रमेशच्या पावलावर पाऊल टाकून निघून गेली...

रमा आणि रमेश निघून गेल्यावर प्रतिभा बिछान्यावर आडवी झाली इतक्यात दारावरची बेल वाजली. प्रतिभाने दार उघडलं तर दरात नीलम होती. तिला आत घेत प्रतिभाने दरवाजा बंद केला आणि तिला सरळ तिच्या खोलीत घेऊन गेली. आतल्या पलंगावर दोघीही डोक्याखाली उशी घेत आडव्या झाल्या. थोडी मान उंचावून प्रतिभा निलमला म्हणाली, आता कॉलेज सकाळचं असणार म्हणजे दुपारी तुमच्याकडे बराच निवांत वेळ असेल त्यातील एखादा तास ह्या बिचाऱ्या वाहिनीसाठी काढा म्हंटलं ! मला एकटीला घरात कंटाळा येतो आमच्या गावच्यासारख्या इकडे गंमती - जमंती नाहीत. त्यावर सावरून बसत नीलम म्हणाली, वहिनी सांगना तुझ्या गावच्या गंमती - जमंती त्यावर प्रतिभा म्हणाली, नीलम तू आमच्या गावचं घर पाहिलं नाहीस ? या घरा एवढं तर आमच्या घराचं अंगण आहे. घरात मोठं स्वयंपाकघर, चार प्रशस्त खोल्या, पडवीत मीठा झोपला आणि गच्ची, आमचं घर डोंगराच्या एका कडेलाच आहे. तेथून खाली डोंगराच्या पायथ्याला संथ वाहणारी नदी जिला बारमाही पाणी असते. नदीच्या कडेलाच शेकडो वर्षपूर्वीच्या लेण्या ज्या पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात. आमच्या घराच्या पुढच्या दरवाज्यातून उगवतीचा सूर्य आणि संध्याकाळी मावळतीचा सूर्य रोज दिसतो. आकाशातील चंद्र तो ही पाहता येतो रात्री काचेच्या झरोक्यातून. घरासमोर छोटीशी बाग त्या बागेत अनेक फुलझाडे आहेत आणि समीरच्या जागेतील आंबा फणसाची झाडे. आमच्या घरापासून थोड्या अंतरावर आमच्या गावाचे देऊळ आहे. त्या देऊलच्या परिसरात एक गोड पाण्याची विहीर आहे आणि आजूबाजूला शेकडो वर्षे जुनी वडाची झाडे आहेत. इकडे मुंबईत पाणी मोजून वापरावे लागते पण आमच्या गावी पाण्याला काही तोटा नाही. वाटेल तेव्हा त्या पाण्यात जाऊन एक डुबकी मारून मनसोक्त पोहण्याचा आनंद घ्यायचा आणि पोहण्याचा कंटाळा आला की गळ टाकून मासे पकडत राहायचे. आणि पकडलेले मासे मनसोक्त खायचे ! पूर्वी विजय जेव्हा त्याच्या मावशीकडे गावी यायचा तेव्हा तो ही यायचा माझ्यासोबत मासे पकडायला. तो पाण्याला फारच भित्रा होता मी त्याला पोहायला शिकवून त्याची पाण्याची भीती दूर केली. आमच्या गावाच्या टेकडीवर एक फार जुने शंकराचे मंदीर आहे. तेथे जाऊन आम्ही तासन - तास गप्पा मारत बसायचो. विजय आणि माझ्यात जमलेल्या गट्टीमुळेच विजयच्या मावशीने मध्यस्ती करून अजय करीता माझा हात मागितला. मला इतक्या मोकळ्या वातावरणात राहायची सवय लागली आहे की इकडे माझा जीव गुदमरतो ! न राहून सारखी आई - वडील, गुर- ढोर, कोंबड्या, झाड, फुल वेळी, नद्या नाल्यांची साऱ्यांची आठवण येते. कधी एकदा त्या साऱ्यांना भेटते - पाहते असं झालं आहे. वहिनी तुला तुझ्या भावाची आठवण येत नाही ? निलमने अचानक प्रश्न केला. त्यावर हसून प्रतिभा म्हणाली, त्याची आठवण कशी येईल तो लहानाचा मोठा मुंबईतच काकांकडे झाला. आणि आता आमची भेट होते अधून मधून आणि रोज फोनवरही बोलतो की आम्ही! आमच्या काकांना एकच मुलगी आहे तिचं नाव प्रेरणा ! आमच्या दोघींच्या नावावरून आमच्या भावाचं नावं ठेवलं प्रणय ! प्रेरणा नुकतीच बी.ए. झालेय तिला अभिनयाची खूप आवड आहे. निलेश भाऊंना सांगून मी तिला एखाद्या नाटकात संधी द्यायला सांगणार आहे. थांब मी तुला प्रणय आणि प्रेरणाचा फोटो दाखवते. प्रणयचा फोटो पाहून नीलम फक्त जागेवर उठायची शिल्लक होती कारण प्रणय तिच्या कॉलेजात शिकत होता आणि एका कार्यक्रमात नुकतीच त्याची ओळख झाली होती. पण निलमने हे प्रतिभाला सांगण्याचा मोह आवरला आणि तिचा मोबाईलची रिंग वाजल्यावर ती प्रतिभाचा निरोप घेऊन निघून गेली आणि प्रतिभा बिछान्यावर आडवी झाली....

आता प्रतिभाच्या मनात विजय आणि कविताच्या लग्नाचा विचार घोळू लगला होता. ती स्वतःशीच विचार करत होती, " आता विजयला लग्नासाठी आग्रह करायला हवा ! कविता या घरात आली की मला कामात थोडी मदत होईल आणि माझा एकांतवास थोडा कमी होईल". इतक्यात दारावरची बेल वाजली प्रतिभाने दार उघडलं तर दारात चक्क कविता उभी होती. तिला आत घेत प्रतिभा म्हणाली, कविता तुला शंभर वर्षे आयुष्य आहे मी आता तुझीच आठवण काढत होते इतक्यात तू प्रत्यक्ष हजर झालीस. त्यावर कविता लडिवाळपणे म्हणाली , माझी आठवण यायला काही खास कारण ? त्यावर प्रतिभा चटकन म्हणाली, "तसं काही खास कारण नाही, मी विचार करत होते आता तुझ्या आणि विजयच्या लग्नाचा विचार करायला हवा ! बर ! त्याबद्दल तुला काय वाटतं ? त्यावर कविता म्हणाली, मला काय वाटणार ? मी तर एका पायावर लग्नाला तयार आहे पण विजय तयार व्हायला हवा ना ?? तो अजूनही स्वतःला लहानच समजतो. त्यावर तिला धीर देत प्रतिभा म्हणाली, मी समजवते त्याला पण तू अचानक आज विजय नसताना इकडे यावेळेला कशी काय आलीस ? त्यावर कविता म्हणाली, प्रतिभा ताई येत्या रविवारी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे त्याचेच आमंत्रण द्यायला आले होते. आता येतानाच रमेश आणि निलेश भाऊंकडे जाऊन आले , मी गेले तेव्हां रमेश भाऊ घरीच होते . त्यांनी आज माझी फक्त विचारपूस केली नाही तर माझ्यासोबत चक्क गप्पा मारल्या . माझा तर विश्वासच बसत नव्हता . नराहून हा चमत्कार कोणी केला म्हणून सोनलकडे चौकशी केली ते ती म्हणाली हा चमत्कार तुझ्या मावस बहिणीने म्हणजे रमाने केला आहे. प्रेमात किती ताकद असते नाही ते एखाद्याचं आयुष्य निर्जन वाळवंट करू शकते आणि फुललेली बागही करू शकते. लवकरच ते लग्न करणार आहेत म्हणत होती. निलेश भाऊ नाही भेटले पण नीलम भेटली ती म्हणाली, मी आत्ताच वहिनीला भेटून आली. कालच मी आणि विजय निलेश भाऊंच्या नवीन नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो नाटक संपल्यावर आम्ही एका हॉटेलात जेवायला गेलो तर सर्व लोक आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते. त्यांना त्याची सवय आहे पण मला अवघडल्यासारखं होत होत. मी आता येण्यापूर्वी विजयला फोन लावला होता, तो अर्ध्या तासात येतो म्हणाला, तोपर्यत आपण गप्पा मारू ! त्यांच्या गप्पा रंगल्या इतक्यात दारावरची बेल वाजली, कविताने धावत जाऊन दार उघडलं ! विजयने तिला अर्धवट अलिंगन दिल आणि बॅग टेबलावर ठेऊन तो ताजातवाना होऊन बाहेर आला तोपर्यत प्रतिभाने चहा - नाश्ता तयार केला चहा पिता - पिता प्रतिभाने लग्नाचा विषय छेडला असता, विजय म्हणाला, वहिनी तू म्हणत असशील तर मी कविताशी उद्याही लग्न करेन पण थांबावं म्हणतोय ! कदाचित कवितापेक्षा सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आली तर ? हे ऐकून कविता रागावली आणि पाय आपटत निघून गेल्यावर प्रतिभा म्हणाली, ही अशी थट्टा बरी नव्हे, त्यावर विजय म्हणाला, ती रागावली की अधिक सुंदर दिसते आणि ती काही गेली नसेल बघ पुढच्या मिनिटाला माघारी येईल आणि चक्क कविता माघारी आली आणि विजयला म्हणाली, चला महाराज येतायना मला घरी सोडायला ? त्यावर विजय प्रेमाने म्हणाला , जी राणीसरकार ! विजय कविताला तिच्या घरी सोडून माघारी आल्यावर विजय प्रतिभाला म्हणाला, वहिनी तू म्हणालीस ते बरोबर आहे आता मला कवितासोबत लग्न करायला हवं, मी दादाच लग्न होण्याचीच वाट पाहत होतो. आमचं प्रेम आहे वगैरे ठीक आहे पण समाज आजही प्रेमाकडे संशयाने पाहतो. आपण जिच्यावर प्रेम करतो तिला लोकांनी असं संशयाने पाहणे मला योग्य वाटत नाही. लोकांच्या नजरा चुकवत प्रेम करण्यात एक मजा असते पण एका मर्यादेपर्यत ! त्यानंतर प्रेमाला नात्याची वेसण घालावीच लागते. आता आपण बोलू प्रतिभाच्या घरच्यांशी आणि मग ठरवू आई - बाबा गावावरून आल्यावर काय ते ! इतक्यात विजयचं मोबाईल खणखणला आणि तो बाहेर जायला आणि अजय घरात यायला एक गाठ झाली. सोफ्यावर बसता - बसता अजय प्रतिभाला म्हणाला, प्रतिभा उद्या तुझे काका - काकी , प्रणय आणि प्रेरणा आपल्याकडे येणार आहेत आपल्याला भेटायला ! आज त्यांचा तसा फोन आला होता आणि हो रात्रीच्या जेवणाला थांबव त्यांना एकत्रच जेवू खूप दिवसांनी मस्त गप्पा मारू ! हे ऐकून प्रतिभाला खूप आंनद झाला. रात्री झोपता -

झोपता ती उद्या स्वयंपाक काय करायचा याचा विचार करत होती आणि तो विचार करत करतकरतच ती अजयच्या कुशीत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी प्रतिभाचे काका- काकी प्रणय आणि प्रेरणा घरी आले त्यांनी प्रतिभासाठी बऱ्याच भेटवस्तू आणल्या होत्या. ते दुपारचं जेवण करूनच आल्यामुळे ते सर्व प्रतिभाशी निवांत गप्पा मारत होते गप्पा मारता - मारता प्रतिभाने प्रेरणाला तिच्या नाटकाच्या छंदा विषयी विचारले असता ती म्हणाली, मला आयुष्यात एकतरी व्यवसायिक नाटक करायचे आहे. त्यावर प्रणय मध्येच म्हणाला भले ते नाटक डब्यात गेले तरी चालेल. त्यावर प्रेरणा म्हणाली, गेलं तर जाऊदे तुझं काय जातंय ? त्यावर प्रणय म्हणाला, माझं नाही जाणार पण माझ्या भावोजीचं जाईल ना ? नाहीतर दुसरा कोणी तुला घेऊन नाटक करणार नाही ! त्यावर प्रेरणा रागावून त्याला मारायला उठली असता प्रणय येथे जवळच माझा एक मित्र राहतो त्याला भेटून येतो म्हणून निघून गेला. त्यावर प्रेरणा म्हणाली, हा नक्कीच मित्राला नाही मैत्रिणीला भेटायला गेला असेल ! त्यावर काकी म्हणाल्या, तो जाऊदे त्याचं वय आहे मैत्रिणी फिरविण्याचं आणि तुझं लग्नाचं ! विषयाला जोडून प्रतिभा म्हणाली, काकी प्रेरणासाठी एखादा मुलगा पहिला आहे का ? मुलगे हजार भेटतील पण हिला पसंत पडायला हवा ना ! तूच बघ आता तुझ्या या लाडक्या बहिणीसाठी एखादा राजकुमार ! गप्पा मारता - मारता स्वयंपाक तयार झाला, त्या दिवशी अजय लवकर घरी आला, विजय त्याच्या ठरलेल्या वेळी आणि प्रणयही त्याच्या मित्राला भेटून वेळेत आला . जेवणाची ताटे वाढायला घेतलीच होती इतक्यात दारावरची बेल वाजली तर दरात निलेश उभा होता. प्रतिभाने त्याची ओळख करून देण्यापूर्वीच सर्व त्याला एक अभिनेता म्हणून ओळखत होते पण तो प्रतिभाचा दीर आहे हे माहीत नव्हते. प्रेरणाने तर चक्क पुढे होऊन त्याच्याशी हात मिळविला. प्रतिभाने खूपच आग्रह केला म्हणून तो त्यांच्यासोबत जेवायला थांबला आणि जेवता - जेवता प्रतिभा निलेशला म्हणाली, निलेश भाऊ आमची प्रेरणा चांगली अभिनय करते कॉलेजात तिने अनेक नाटकात कामे केली आहेत एखादं व्यावसायिक नाटक तिला करायचं आहे तुमच्या ओळखीने काही झालं तर बघाणा ! बस ! काय वहिनी तू शब्द टाकलास, मी तो खाली पडून देईन का ? माझ्या नवीन नाटकात मी तिला संधी देतो तीही मुख्य नायिका म्हणून उद्यापासून नाटकाच्या तालमीला ये ! बाकी मी फोनवर सांगतो !!! हे ऐकून प्रेरणा जाम खुश झाली कारण तिच्या स्वप्नातील नायक तिच्या इतक्या जवळ होता. प्रतिभालाही खूप आनंद झाला. खूप गप्पा - टप्पा झाल्यावर ते माघारी निघाले असता सारेच त्यांना गाडी पर्यत सोडायला गेले. प्रेरणा निलेशला प्रेमाने शुभ रात्री म्हणाली आणि गाडीत बसता-बसता टाटाही केला...

रविवारी कविताच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेकरिता निलेश त्याची बहीण नीलम, रमेश त्याची बहीण सोनल, अजय- प्रतिभा आणि विजय एकत्र गेले. कविता त्यांचीच वाट पाहत उभी होती. कविताने प्रतिभाची ओळख तिच्या आई- वडिलांशी आणि तिच्या लहान भावाशी स्वप्नीलशी करून दिली. कविताचे आई - वडील प्रतिभाला खूपच प्रेमळ वाटले त्यांच्यासोबत तिच्या छान गप्पा रंगल्या . रात्री पूजेचा महाप्रसाद घेऊन ते सर्व निघाले वाटेत रमेशने सर्वाना आईसक्रीमच्या गाडीवर आइसक्रीम खायला थांबवले. त्यावेळी आईसक्रिम खाताना अजय आणि विजयचे डोळे पाणावले कारण पूर्वी ते तिघे मानिषासोबत रात्री गप्पा मारत भटकताना नेहमी याच गाडीवर आईसक्रीम खायचे. रमेशच्या डोळ्यातून तर अश्रू टप टप गळत होते पण सावरले त्याने स्वतःला. निलेश मात्र स्तब्ध होता. सर्वांनी विषय बदलत वेगळ्या विषयावर बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता निलेशच्या घराजवळ आले आणि त्याच्या आग्रहाखातर त्याच्या घरी गेले. काका मावशीला त्या सर्वाना एकत्र पाहून खूप आनंद झाला खास करून रमेशला . रमेशला पाहताच मावशी म्हणजे रमेशची आत्या म्हणाली, काय रमेश तुझं लग्न ठरलं ? दादा कालच बोलत होता, प्रतिभाची मावस बहीण आहे ना ? म्हणजे नक्कीच तिच्यासारखी रूप आणि गुणवान असेल यात शंका नाही तरीही तिला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे . घेऊन एकदा मला भेटायला . त्यावर रमेश म्हणाला, आत्या तू म्हणालीस आणि मी नाही म्हणालो असं झालंय का कधी ? उद्याच घेऊन येतो ! त्यावर सर्व मनमुराद हसले निलेश आणि निलमला त्यांच्या घरापर्यत सोडून घरी आल्यावर प्रतिभा स्वतःशीच विचार करत होती. स्वप्नील आणि सोनल मध्ये काही असेल का ? नाही पूजेत ते सारखे एकमेकांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यात बऱ्यापैकी मैत्री आहे त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले नसेल ना ? हल्ली प्रेम म्हटलं की प्रतिभाला धडकीच भरते.

दुसऱ्या दिवशी प्रतिभा एकटीच घरी असताना सोनल आणि नीलम एकत्र तिला भेटायला आल्या. तिघी एकत्र बसून टी. व्ही. पहात असताना निलमने मध्येच विषय काढत प्रतिभाला प्रश्न केला.वहिनी मध्यंतरी तुझे काका काकी आले होते ना घरी ? त्यावर प्रतिभा चटकन म्हणाली, माझा भाऊ प्रणय आणि बहीण प्रेरणा पण आली होती. तू प्रणयलाओळखतेस ना ? त्यावर नीलम अडखळत म्हणाली हो ! पण तो तुझा भाऊ आहे हे मला माहित नव्हते. आम्ही कॉलेजच्या कार्यक्रमात एकत्रच निवेदन करतो. वहिनी ! प्रणय तुझा सख्खा भाऊ आहे ? स्वप्नीलचा खास मित्र आहे. आणि स्वप्नील तुझा !! प्रतिभा मध्येच म्हणाली. त्यावर नीलम आणि सोनल भांबावल्या असता प्रतिभा म्हणाली, मी काही आकाशातून नाही पडले, सगळं कळतं मला फक्त एक सांगते ते लक्षात ठेवा मैत्रीच्या झाडाला हमखास लागणारं फळ म्हणजे प्रेम असते पण तरीही ते फळ डोळे झाकून न खाता डोळसपणे खायला हवे ! यापुढे मला मैत्रीण समजून जे आहे ते मोकळ्या मनाने वेधडक बोलत जा ! अशी लपवाछपवी करायची काही गरज नाही !! प्रेम करा पण प्रेमासाठी त्याग कारायचीही तयारी ठेवा. तुमच्या दोघींची निवड योग्यच आहे म्हणून त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेऊ नका ! पुरुष लबाड असतात हे न नाकारता येणार सत्य आहे त्यामुळे आपले प्रेम कोणी आपल्याकडून हिसकावून तर घेत नाही ना ? यावर आपलं बारीक लक्ष असायला हवं ! प्रतिभाच्या रुपात नीलम आणि सोनलला एक चांगली मैत्रीण भेटली होती त्यांना त्यांचं मन मोकळं करायला. नीलम आणि सोनल निघून गेल्यावर प्रतिभा स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना दारावरची बेल वाजली आणि ती हातातील पाण्याचा लोटा हातात घेऊनच दरवाजा उघडायला बाहेर आली असता दरात त्या लोट्यातील पाणी सांडले . प्रतिभाने दार उघडला तर दरात विजय होता. दार उघडून प्रतिभा माघारी जाताना त्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि ते पाहून विजयने तिला आपल्या मिठीत सावरले नेमकी तेव्हाच कविता तेथे आली आणि अर्धवट उघडया दरवाज्यातून तिने हे दृश्य पाहिले आणि तिचा भंयकर मोठा गैरसमज झाला ती काही न बोलताच तेथून माघारी फिरली. त्यांनतर विजयने सहज गडबडीत असल्यामुळे चार- पाच दिवस कविताला फोन केला नाही पण यादरम्यान तो प्रतिभासोबत बाजारात खरेदी करताना मात्र तिला दिसला त्यामुळे तिचा संशय अधिक बळावला. कविता आता हे आठवू लागली की पूर्वी विजय जेंव्हा जेंव्हा गावावरून यायचा तेंव्हा तो प्रतिभाची भरभरून स्तुती करायचा, प्रतिभाने असं केलं, प्रतिभाने तसं केलं, प्रतिभा बरोबर इकडे फिरलो तिकडे फिरलो, तिकडे असं झालं वगैरे , त्याला प्रतिभासोबत लग्न करायचे नव्हते पण संबंध मात्र ठेवायचे होते म्हणून त्याने प्रतिभा आणि अजयच्या लग्नात पुढाकार घेतला. मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा प्रतिभाचा चेहरा कसा बदलला होता. पूजेला आले तेंव्हाही प्रतिभा विजयच्या शेजारी बसली होती. तिच्यासोबत इतक्या गप्पा मारत होता जणू काही मी तिथे नव्हतेच ! गावी मला तेंव्हा मी म्हणाले माझ्यासोबत चल तर नाही म्हणाला , मी अजून चार पाच दिवस राहीन म्हणाला पण माझ्या मागून लगेच दुसऱ्या दिवशी आला पण दोन - चार मला भेटला नाही. तशी ती प्रतिभा दिसायला माझ्यापेक्षा सुंदर नसली तरी कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडावा इतकी सुंदर ती नक्कीच आहे. या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचा म्हणून कविताने विजयला भेटायला बोलावले आणि तो काही बोलण्यापूर्वीच ती भडाभडा ओखली त्यावर रागाने विजयने तिच्या श्रीमुखात लगावली आणि निघून गेला. पण झाल्या प्रकाराबद्दल विजयने प्रतिभाला काहीच सांगितले नाही. प्रतिभाने विजय जवळ त्याच्या आणि कवितांच्या लग्नाचा विषय काढताच त्याने तिला टाळलं ! हे लक्षात येऊन प्रतिभाची खात्री पटली कि नक्कीच विजय आणि कविता मध्ये भांडण झालं आहे. प्रतिभाने परस्पर फोन करून कविताला भेटायला बोलावलं , कविताही भेटायला आली तर प्रतिभाला लंगडत चालताना पाहून कविता म्हणाली , ताई लंगडतेस का ? त्यावर प्रतिभा म्हणाली , आठवडा झाला लंगडतेय ! त्यादिवशी स्वयंपाक करत होते विजय आला म्हणून दरवाजा उघडायला धावले तर हातातील लोट्यातील पाणी दरात पडले माघारी फिरताना पाय घसरला आणि मी पडले काही मिनिटे तर मी बेशुद्धच झाले भानावर आले तेव्हा कळले की विजयने त्याच्या मिठीत मला सावरले होते पण पाय मुरगळायचा तो मुरगळलाच ! हे सारं ऐकल्यावर आपण किती मोठी चूक करून बसलोय हे कविताच्या लक्षात आले तिला तर राडावेसे वाटत होते पण तिने सावरले स्वतःला . प्रतिभाने तिला विचारले विजय आणि तुझ्यात काही बिनसलं आहे का ? त्यावर कविता नाही तर ! तो काही म्हणाला का ? त्यावर प्रतिभा म्हणाली, तसं नाही तुमच्या लग्नाचा विषय काढला की तो टाळाटाळ करतो म्हणून !! त्यावर कविता मन खाली घालून म्हणाली हो ! आमच्या थोडं वाजलं होत पण आता ठीक आहे मी माफी मागेन त्याची चुकी माझीच होती हवे तर मी त्याच्यासमोर कान पकडेन ! इतक्यात दारावरची बेल वाजली कवितेने पुढे होत दार उघडले तर दरात विजय होता. विजयला पाहून प्रतिभा स्वयंपाक घरात गेली पण कविताला अश्रू अनावर होत ते तिच्या गुलाबी गालावरून खाली टप तटप गळू लागले, कविता तिचे दोन्ही कान हाताने पकडून त्याला सॉरी म्हणाली असता, विजयने काही न बोलता तिला आपल्या मिठीत घेऊन शांत केले आणि म्हणाला, माझेही चुकलेच मी तुझ्यावर हात उचलायला नको होता, तू जे पाहिलेस ते पाहिल्यास कोणाचाही गैरसमज होऊ शकतो हे मला लक्षात यायला हवं होत. जेथे प्रेम असतं तेथे संशही असतोस ! इतक्यात प्रतिभा चहा नाश्ता घेऊन येताच दिघेही सावरले. कविता निघून गेल्यावर प्रतिभा विजयला म्हणाली आज तुमचे आई बाबा गाववरून येणार आहेत मग तुझ्या आणि कविताच्या लग्नाचं ठरवून टाकू ! त्यावर विजयने मानेनेच होकार दिला आणि तो बाहेर निघून गेला. थोड्यावेळाने अजय घरी आला तो तयार होऊन बाहेर पेपर वाचत बसला आणि प्रतिभा आतल्या खोलीत होती इतक्यात दारावरची बेल वाजली, दरात प्रेरणा उभी होती तिला आत घेत प्रतिभाला हाक मारत अजय म्हणाला, प्रतिभा ! बाहेर ये ! आमची मेहुणी आलेय भेटायला ते ऐकून प्रतिभा लगबगीने बाहेर आली आणि तिला मिठीत घेतले आणि म्हणाली, आज अचानक कशी काय आलीस ? त्यावर सोफ्यावर बसत प्रेरणा म्हणाली, मी माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचे पास घेऊन आलेय तुमच्यासाठी ! निलेशनेही दिले असते पण हे माझे स्वप्न होते म्हणून मी आले . आता जेवूनच जा ! प्रतिभा म्हणते न म्हणते तो प्रेरणा त्यांचा निरोप घेऊन घाईत निघूनही गेली. विजय आणि कविताच लग्न ठरलं होत त्यापूर्वीच रमेश आणि रामच लग्नही ठरलं होत पण रमेश आणि रमाचे लग्न अगोदर व्हावे यावर सगळ्यांचे एकमत झाले . रमेश आता पूर्ववत झाल्यामुळे आणि त्याच्या भोवती प्रसिद्धीचा वलय वाढल्यामुळे त्याच्या जुन्या मैत्रिणी त्याच्या अधिक जवळ येऊ पहात होत्या त्यामुळे त्याच रमाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होत. रमाला मनिषाची जागा घेणं खूप अवघड होत पण रमाची जागा आता कोणीही घेऊ शकली असती. रमा आणि रमेशच्या लग्नात रमचा लहान भाऊ गणेश सर्वांची व्यवस्थित उठबस करत होता तोही एक उत्तम कवी होता आणि दिसायलाही सुंदर होता. या लग्नात प्रणय आणि नीलम यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसत होती, सोनल मात्र स्वप्नीलला थोडी टाळत होती. विजय आणि कविता नवरबायकोसरखेच सगलीकडे वावरत होते. येणाऱ्या पाहुण्यांच्या नजरा स्थिरावल्या होत्या त्या निलेश आणि प्रेरणावर कारण सध्याची नाटकाच्या क्षेत्रातील ती सर्वात आवडती जोडी झाली होती मध्ये मध्ये त्यांच्यातील प्रेमाच्या प्रसारमाध्यमात रंगवल्या जात होत्या. पण त्या फक्त चर्चा नव्हत्या ! त्या दोघांच्या प्रेमाला कोणाचाच विरोध नव्हता. निलेश आणि प्रतिभाचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी त्यांच्यात वाद व्हायचेच त्याला कारणीभूत होती शलाका विजयच्या नवीन नाटकातील त्याची सह- अभिनेत्री !

विजयच्या लग्नाची तारीख जवळ येताच प्रतिभाची धावपळ वाढू लागली तिच्या मदतीला सासू - सासरे आणि मधुरा होतीच ! विजयच्या लग्नात अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते त्यात घरातच इतके प्रसिद्ध लोकं होती. या लग्नात कवितांची चुलत बहीण श्रद्धा उपस्थित होती. तीही कवितासारखीच रूपवान आणि गुणवान होती. गणेशने तिच्याशी ओळख करून घेतली होती. आता त्यांच्यात छान गट्टी जमली होती. विजय आणि कविता मधुचंद्राला निघून गेल्यावर अचानक निलेश आणि प्रेरणाने कोर्टात लग्न केले आणि एक भव्य मेजवानी दिली. त्या मेजवानीत प्रणय - नीलम, स्वप्नील - सोनल , गणेश - श्रद्धा, या प्रेमाच्या नवीन जोड्या उदयाला आल्या होत्या.)

अजय - प्रतिभा, विजय - कविता, निलेश - प्रेरणा आणि रमेश - रमा ही चारही जोडपी आता संसारात रमली होती. त्यांच्या हृदयातील प्रेमाची जागा आता हळूहळू व्यवहाराने घेतली होती. ते मनाने आणि बुद्धीने आता प्रगल्भ झाले होते. त्यांच्या वाटयाचे प्रेम आता जरून झाल्यामुळे त्यांना आता प्रेमाबद्दल फार आपुलकी राहिली नव्हती. लग्नानंतर एकाच वर्षात कविता गर्भवती राहिली तिने एका सुंदर मुलाला

जन्म दिला त्याच नाव ठेवलं ओमकार ! हा ! हा ! म्हबत तो दोन वर्षाचा झाला पण प्रतिभा आणि अजयला मात्र ती गोड बातमी मिळणार नव्हती. दोष अजयमध्येच होता. विजयने हे फार मनाला लावून घेतले नाही कारण विजयच्या मुलाला तिने आपला मुलगा कधीच मानला होता. रमाला आणि प्रेरणाला इतक्यात मुलं नको होती त्यांना त्यांच्या क्षेत्रात भरीव काम करायचं होतं. प्रणय त्याच्या काकांचा व्यवसाय सांभाळू लागला होता नीलम त्याच्या मदतीला होती. आता त्या दोघांचं लग्न ठरल्यात जमा होतं. काही दिवसात ते उरखलही त्यामुळे आता स्वप्नील - सोनल आणि गणेश - श्रद्धा यांनाही लग्नाचा विचार करणे भाग पडले. निलेशने त्याच्या ओळखीने स्वप्नीलला एका मालिकेत काम मिळवून दिले पण तेथे त्या मालिकेची निर्माती त्याच्या प्रेमात पडली आणि आपल्या भविष्या प्रति आशावादी असणाऱ्या स्वप्नीलने सोनलचा विचार न करता तिच्याशी अचानक लग्न केलं आणि सोनलच्या स्वप्नांची राख झाली. या धक्यातून सावरायला सोनलला खूप वेळ लागला पण ती सावरली, कविता आणि विजयलाही त्यामुळे खूप मनस्ताप झाला.

अजय आणि प्रतिभा लग्नाला सहा वर्षे झाली. मुलंबाळ नसलं तरी ते एकमेकांच्या सहवासात सुखी होते. अशात एक दिवस नीलम प्रतिभाला भेटायला आली. तिच्या आणि प्रणयच्या लग्नाला आता तीन वर्षे झाली होती. त्यांनाही मुलबाळ होत नव्हतं म्हणून प्रणय जो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा तोच तिला त्रास देऊ लागला होता. याबद्दल तिने घरी कोणालाच काही सांगितले नव्हते. पण प्रतिभाला तिने सारे सांगण्याचे ठरवले होते. म्हणून ती माहेरी आली हाती. ती प्रतिभाला म्हणाली, वहिनी माझ्यात काहीच काहीच कमतरता नसताना मला विनाकारण त्रास देतो. वैद्यकीय तपासणी करून घे तर ते ही नाही माझ्यावर पुरुषी राग काढत असतो आता हे सारे मला असह्य होते आहे. दुसऱ्या दिवशी प्रतिभाने प्रणयाला बोलावून घेतले आणि त्याला खडसावून विचारले असता तो म्हणाला, हो ! मी नीलमला मुलं होत नाही म्हणून त्रास देतो कारण तिने मला खुशाल घटस्फोट द्यावा आणि दुसरं लग्न करावं ! मी माझी वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे . मी कधीच बाप होऊ शकणार नाही. प्रत्येक स्त्रीच आई होणं हे स्वप्न असतं तिचा अधिकार असतो म्हण ! आई न होण्याचं तुझ्या वाट्याला आलेलं दुःख तिच्या वाट्याला येऊ नये म्हणून करतो मी हे ! त्यावर प्रतिभा त्याला म्हणाली, कोण म्हणालं तुला मी सुखी नाही म्हणून आणि लग्न काय फक्त मुलं होण्यासाठी करतात असं नाही . लग्न आपल्या जीवनाच्या अंतापर्यँत आपल्यावर जीवापाड प्रेम करणार कोणीतरी असावं म्हणून करतात. मुलं ही फक्त जीवनाचा एक भाग असतात. जीवन नसतात. तुम्हाला जर मुलंच हवंय तर ते अनाथाश्रमातून दत्तक घेता येईल की ! नीलमला आपल्यापासून दूर करण्याचा विचार सोडून दे ! आतल्या खोलीतून हे सारं ऐकणारी नीलम बाहेर नीलम बाहेर येऊन रडत रडत ती प्रणयला मिठी मारून म्हणाली, मला आई नाही झाले तरी चालेल पण तुझी बायको म्हणवून घेण्याचा माझा अधिकार काढून घेऊ नकोस ! काही दिवसांनंतर प्रेरणाने जुळ्या मुलांना जन्म दिला त्यातील एक मुलं तिने नीलम आणि प्रणयला दत्तक देऊन आपल्या भावाचा आणि नंदेंचा संसार सावरला. यादरम्यान मधुरालाही हवा तसा जोडीदार मिळाला होता तिचा पूर्व इतिहास माहित असलेला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला पण तिने ती मुलगी प्रतिभाकडे सोपवली कारण ते दोघेही नवरा बायको सामाजिक कार्यात व्यस्त होते. प्रतिभाला आता मुलाची कमतरता कधीच भासणार नव्हती. रमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला तिचे नाव मनीषा ठेवले. सोनलनेही एक छान मुलगा शोधून त्याच्याशी विवाह केला. गणेश आणि श्रद्धा त्यांच्या क्षेत्रात बऱ्यापैकी स्थिरावले आणि लग्न करून मोकळे झाले...आता या कथेतील सर्वांचाच प्रेमाच्या वाटेवर सुरु केलेला प्रवास थांबला होता म्हणून ही वाट कधीच मोकळी राहणार नव्हती...


Rate this content
Log in