Vasudev Patil

Others

3  

Vasudev Patil

Others

पंचक

पंचक

34 mins
1.0K


पाचच्या सुमारास कुंपनाला लागुन असलेल्या जाई-जुई व गारवेल मधून येणाऱ्या थंडगार हवेत लिंबाच्या सावलीत झोपलेल्या चव्हाण सरांची झोप हलगीच्या आवाजानं चाळवली.सकाळ सत्राची शाळा बाराला सोडत जेवण आटोपून वाचन करता करता ते नुकतेच झोपले होते. तोच अचानक हलगीचा ठराविक चालीचा आवाज कानावर रेंगाळू लागला.गुरुजी उठत गेटबाहेर येऊन स्टॅण्डवर उभ्या टाळक्यांना इशारानंच विचारते झाले. 

"काही नाही गुरुजी,तात्याराव नेहेतेंच्या हवेलीतला जायाजी गेला!त्याचीच हलगी बडवली जातेय.एका दृष्टीनं बरंच झालं.तो तर सुटलाच पण वच्छा ताई नी सुंता बाईसाहेबांचा ही जाच कमी झाला!"

'जायाजी' नाव ऐकताच सदा गुरुजी भानावर आले.त्यांनी लगोलग शाळेत येत हात पाय तोंड धूत कपडे बदलवत ते हवेलीकडे निघाले.

 हवेलीत गर्दी जमलेली असली तरी मरण घरी असणारी रडारड जाणवते तशी नव्हतीच.वच्छा ताई महा मुश्कीलीनं लहेर घेत घोगऱ्या आवाजात हेल काढत होती.सुंता मॅडमचा तर आवाजच येत नव्हता.हवेलीच्या जोत्यावर उतरल्या चेहऱ्यानं सयाजीराव भावाच्या दु:खानं शांत बसला होता. तोच दत्ता भटाकडंनं आलेला महादबा सयाजीच्या कानाशी लागत हळू आवाजात कुजबुजला.

"सया बापू आपला जया पंचकात सदगती झालाय. आज शनिवार चंद्रदेव कुंभ व मीन राशीत असल्यानं पंचक योग असल्याचं भटाचा दत्ताजी म्हणतोय.आणि विधी करावा लागेल असं ही सांगतोय".

दत्ता भटाचं नाव ऐकताच सयाजीची नस तडकली.आठ दहा दिवसांपासून ज्या हालचाली घडत आहेत त्यात हा दत्ताच पुढारपण करतोय हे आठवताच सयाजी कडाळला.

"त्या दत्त्या भटाला ठेंगा समजत नाही.कसला उठलाय पंचक बिंचक नी कंचक! माझ्या जयाप्पा जाचातून मुक्त झालाय नाही करायचा विधीबिधी!"

महादबा नमतं घेत त्यास समजवत "बापू ऐक जरा डोकं शांत ठेव,दु:खाचं तोंड आपलं!नी विधी म्हणजे काय तर पाच कणकेचे बाहुले घडवून अग्नीडाग देताना दहन करायचे एवढंच .त्यात काय जातंय."

"महादबा! नाही सांगितलं ना.नाही म्हणजे नाही.पाच बाहुल्यानं काय बला टळणार ?त्या दत्ताला म्हणावं पाच काय दहा बाहुले जाळू आम्ही पण त्यानं जया परत येण्याची हमी घे म्हणावं!" सयाजी संतापत फुत्कारला.

"आरं बापू तसं नाही पण जुनी जाणती म्हणत्यात की पंचकात माणुस गेला तर पाचदा त्याची पुनरावृत्ती होऊन त्याच्या जवळची माणसं नाहकच बळी जातात.म्हणून धोका पत्करण्यापेक्षा विधी केलेला बरा."

महादबा व गावातली जुनी टाळकं सयाजीला समजावत होती पण सयाजी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

सदा चव्हाण सर एका कोपऱ्यात बसले होते.मध्यंतरी सयाजीचं लक्ष सदा गुरुजीवर गेलं.तरी सयाजीराव रागानं धुमसत आपल्या कडं पाहत आहेत असंच गुरूजींना वाटलं.कारण ही तसंच होतं. 

 दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत गावाजवळील नदीवर बांधल्या जात असलेल्या धरणाकडं जयाजीला सयाजीनं चार वर्षाच्या आपला पुतण्या बाल्यास कडेवर घेत भडाग्नी दिला.साऱ्यांनी पुन्हा विनवत पाच कणकेच्या गोळ्यांना जयाजीच्या चितेत छातीजवळ ठेवायला लावलं.पण सयाजीनं दत्ता चा उध्दार करत कणकेचे गोळे लाथेनं तुडवले. ज्वाला आकाशात झेपावल्या.तिकडं दत्ता भटाला हे समजताच "आता नेहेतेंच्या कबिल्यात किती सुतक लांबतं याचं काही खरं नाही.व पाच जाणारे बळी कोण हे ही सांगता येत नाही.सुक्काळीच्यांनो येणारा परिणाम भोगायला तयार रहा!त्या सयाजीनं जे केलं ते चांगलं नाही केलं."

 गावात विशेषता नेहेतेंच्या भाऊबंदकीत भितीचं वातावरण पसरलं.

 दुपारनंतर पडल्या पडल्या सदा गुरुजींना महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवला.त्यातल्या त्यात विरंगुळत ते मागं मागं घुसू लागले.

सातारहून एवढ्या लांब नोकरी स्विकारून या 'तारणी'त आपण आलो.शाळा फार रया गेलेली.आधीचे दोन्ही सहकारी निवृत्तीला आलेले .म्हणून नुसतं आलेला दिवस ढकलणं.ना पट ,ना उपस्थिती ना काही. सदानं फिर फिर फिरून एकेक पोरं जमवली.साऱ्यांचं एकच पालुपद ठरलेलं."गुरूजी का एवढा आटापिटा करता,शाळा धरणात तर बुडणार मग का उगाच ध्याई करता जिवाची एवढी!"

"आरं बाबांनो धरण होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत तर पाठवा पोरांना.नी धरणात ही इमारत बुडेल शाळा नाही बुडणार काही.ती तर कुठं तरी बांधली जाईलच.मग शिकलेलं कुठं वाया जाणार."

 त्यात शिक्षण प्रवाह बदलला, डिजीटल चं नविन वारं आलं.प्रशासन लागलं गुरूजींमागं.लोकवर्गणी गोळा करा ,स्वत: टाका ,फिरा काहीही करा पण शाळा डिजीटल करा.नुकतीच रुपडं धरू पाहणारी शाळा सोडून हे नविनच फ्यॅड आलं नी सदा गुरूजी वयस्कर व उमेद हरलेल्या सहकाऱ्यांना घेऊन गावात फिरू लागले.पण लाखाचा प्रश्न.देणार कोण.फिरुनही हाती काहीच लागेना.कुणीतरी वच्छा ताईंना भेटायचं सुचवलं.

सदा गुरुजींनी वच्छाताईंची भेट घेण्यासाठी हवेली गाठली.

"कोण हवंय?" अंगणात उभ्या सयाजीनं गुर्मीतच विचारलं पण काही ऐकण्याआधीच घाईत निघून गेले.

साठी पार केलेल्या वच्छा ताईंनं सदास बसवून चहापान करत ऐकून घेतलं.

"ताई तात्यारावांच्या स्मर्णार्थ काही मदत करता आली तर पहा.पुण्याचं कामही होईल व तात्यांचं नावं ही"

"गुरुजी ! जाणारा जे द्यायला हवं होतं ते सोडून भरपूर देऊन गेला व जाच ही लावून गेला.तरी असो.शिक्षणासाठी आलात मी विन्मुख करणार नाही.पण तरी मी सुनिताला विचारते नी मग ठरवते"

"ताई लवकर करता आलं तर पहा!वरून सारखा तगादा आहे म्हणून"

"गुरूजी मग तुम्ही जिल्ह्याला जरी तिला भेटलात तरी हरकत नाही.माझी ना नाही पण तिला एक शब्द विचारावा तर लागेल!"

सदा सरांचं अनायासे जिल्ह्याला प्रशिक्षण लागलं.ते गेले.हा विषय डोक्यातून तात्पुरता बाजूला झाला.

 प्रशिक्षणात दोन दिवसानंतर नाश्ता करतांना एक चेहरा सारखा आपल्याकडं पाहतोय याची सदा सरास जाणीव झाली.ते नजर जाताच नजर वळवू लागले पण पुन्हा त्यांचीही नजर जाऊच लागली. संध्याकाळी प्रशिक्षण सुटलं .

"जरा थांबता का!आपण सदा चव्हाण का?"

आपल्या नावाचा उल्लेख होताच सदा सर बावचळले.

"हो.का?"

"नाही तसं काही नाही पणं तुम्ही तारणीला आहात ना! ते आमचं गाव.व ताईंचा निरोप होता की..."

"अरे हो.आपण सुनिता मॅडम का? आलं लक्षात." सदा सर आता बेफिकीर झाले. 

"तुम्ही असं करा परवा हवेलीवरच या. मी पण येतेय तारणीला .मग ताईंसमोरच वर्गणीचं बोलू"

"मॅडम , ताई तर मदत करणार आहेतच फक्त तुमची परवानगी हवीय त्यांना"

"सर तुमचं डिजीटल क्लास होईल एवढी मदत खचितच करेन मी! पण तरी ताईंच ठरवतील! म्हणून या परवा.नी तेवढीच पुन्हा भेट ही होईल त्या निमीत्ताने!"

सदा सरांना नजर का शोधत होती ते कोडं उडघडलं पण तरी ताई या बयेचं नाव सांगता तर ही बया ताईंचं नाव सांगत आहे.मदत देणार की नुसती टोलवा टोलवी साठी आपणास ..!

   प्रशिक्षण आटोपून सदा सर हवेलीवर पुन्हा गेले. या वेळेस जोत्यावर बाज पडली होती व बाजेवर नुसता हाडाचा सांगाडा किंवा अस्थीपंजर देह म्हणावा तसा पडलेला होता.अंगावरचं मांस पूर्ण क्षिणलेलं.

तोच हा जयाप्पा ज्याला आपण पहिल्यांदाच तेव्हा बघितलं.

"काय दिना मास्तर !काय काम वैगेरे करता की नाही का नुसत्या चकाट्या पिटत घरं धुंडाळता!" हाफत हाफतच जयाप्पाने सोबत असलेल्या दिनकर गुरूजीवर हल्ला चढवला.

"अप्पा ताईंना भेटायचं होतं म्हणून आलोय!" नरमाईंनं दिनकर गुरूजी उत्तरले.

सदा गुरूजींना राग आला पण तितक्यात सुंता मॅडम हसतच बाहेर आल्या.

"या बसा!" म्हणत त्यांनी खुर्च्या मागवल्या.ताईपण आल्या.

"दिना मास्तर काय काम ते तरी सांगशील की नाही?" जयाप्पा खोकल्याची उमळ दाबत विचारता झाला.

"अप्पा वर्ग डिजीटल करायचाय.त्यासाठी तात्यांच्या स्मरणार्थ मदत हवीय!"

"अरे मग थोडं थांबा ना.तात्याच्या नावानं वर्ग होईल.पण थांबलात तर माझ्या स्मरणार्थ ही सुंता आख्खी शाळाच डिजीटल करेल .फक्त काही दिवस कळ मारा ना!"

 सदा सरांना ऐकूनच गरगरायला झालं.क्षणात सारं वातावरण बदललं.सुंता मॅडमांच्या कपाळावर आठ्याचं जाळं पसरलं.ताईंना मेल्याहून मेल्यागत झालं.सदाला उठावं का थांबावं हेच कळेना. दिनकर गुरूजी तर मारक्या बैलागत सदाकडं पाहत 'यालाच सुधारणाचा मोठा पुळका आला होता.घे आता.' या बेतानं खाऊ की गिळू करू लागले.

ताईंनं कोंडी फोडली.

"गुरूजी जयाप्पाचं बोलणं मनावर घेऊ नका.एका वर्गाचं बजेट काढा व तितकी रक्कम घेऊन सुनिता ला मदतीला घेत साहित्याची खरेदी करा"

 सदा सर उठले.

सदा सरांना सारं आठवताच एका अर्थानं जयाप्पा गेला हे बरंच झालं.असा विचार करत ते उठून बसले.पण मनातले विचार काही थांबेतना मग त्यांनी चहा घेत दत्ता भटांचं घर गाठलं.

"गुरूजी,नेहेते खटलं आता सुतकातून लवकर मोकळं होणारच नाही.लिहून ठेवा.पाच बळींची पुनरावृत्ती जया करेलच.या सयाजीस पाच बाहुले जाळण्यात काय अडचण होती?आता हा भोगणारच" गेल्या गेल्या दत्ताजीनं तोंडाचा पट्टा सुरू केला.

"गुरूजी मी सांगतोय हा मेला तो जया जिवंत असेपर्यंत साऱ्यांना छळला तर पंचकात मेल्यावर काय सोडणार?"

 नी दत्ता भटानं जयाचं पुराण सुरू केलं.

 त्यांनी जया व सयाबाबत इत्यंभूत कथन केलं.

वच्छाताईंनी जयाजीला दत्तक घेत सुंताला सून म्हणून आणलं.पण हा जया पक्का बदफैली व व्यसनी.सुंताबाई हळदीच्या अंगानं परतली ती दोन तीन महिने आलीच नाही.याला ही सुंता नकोच होती.पण वच्छी काकीची जमीन मिळावी म्हणून यानं होकार दिलेला.दारूत तर्र राहणाऱ्या दोन्ही भावास खूपच चरबी होती.सालगड्याच्या भाकरी शेतात द्यायला जातांना घोड्यावरून फेकायचे हे!अन्नदेवतेचा घोर अपमान.शिवाय मजुरांनाही घोड्यावर बसूनच लाथेनं तुडवायचे.पण नियतीनं बदला घेतलाच.लग्नानंतर दोन महिन्यातच किरकोळ आजारी पडल्याचं निमीत्त झालं.ताप उतरेच ना.साऱ्या तपासण्या झाल्यावर डाॅक्टरांना शंका आली व चाचणी पाॅजीटिव्ह आली.जयास एड्सचं निदान झालं.तो तर हादरलाच पण वच्छा ताईपण.सुंताला मात्र काहीच फरक पडला नाही.ती येतच नव्हती.पण तिचीही मजबूरी नी नाक घासत तिला यावं लागलं.बाल्या झाला.पण आता चार पाच वर्षात सुंतानं जयाला फडकूच दिलं नाही.जया दिवसेंदिवस क्षिण होत गेला.असा जयाजी जाण्याचीच सारी वाट पाहत होते.पण जो जितेपणी साऱ्यांना नडला तो मेल्यावरही पंचकात गेल्यानं नडेलच .

भटाकडंनं सदा गुरुजीला बरच काही नविन कळालं.सदा गुरूजी शाळेत आले व जेवण करून सुंता बाईचाच विचार करत झोपले.दुसऱ्या दिवशी दहा वाजत नाही तोच शाळेत दत्ता भट धापा टाकतच आले.

"सदा गुरू,मी सांगितलं होतं ना! लेका हो पंचक आहे विधीवत अत्यं विधी करा.पण दिडशहाणे ऐकत नाही.भोगा म्हणावं आता!"

"सदाला काय झालं समजेना.

"अहो दत्ताजी झालंय तरी काय ते तर कळू द्या!"

"काय होणार आणखी! जयाजीचा मुलगा 'बाल्याला ' झोळीच्या दोराची फाशी लागली व पोरगं गेलं.नेहेते खटल्याचं सुतकं लांबलं.पंचकाचा पहिला बळी!"

"काय! बाल्या गेला?पण फाशी लागली म्हणजे नेमकं काय?"

सदा सरांना धक्काच बसला.

.

.

"सदा सर एवढ्यात बिचकू नका.अजुन तर असे चार धक्के झेलायचेत तारणीला! नी नी तो बाल्या जयाचा नव्हताच! त्याचा तोंडावळा नीट निरखून पाहिला का कधी?"

दत्ताजी धक्क्यावर धक्के देत राहिले.


Ssssssssssssssssssssssss


 सकाळी सकाळीच दत्ता भट आपलं तंदुल पोट सांभाळत सांभाळत हवेलीवर वच्छा ताईची भेट घेण्यासाठी पळाला.बाल्याला जाऊन आज दोन दिवस झालेले.जयाप्पा व नंतर बाल्या गेल्यानं घरात गर्दी होतीच.वय झालेल्या वच्छा ताईंस जयाचं नाही पण बाल्याचं खूप दु:ख वाटत होतं.बाल्याचं झोळीच्या दोराचा फास लागून जाणं हा धक्का सुंताबाईस अजुनही सहन होत नव्हता.नावास कुंकवाचा धनी असलेला जयाप्पा गेल्यानं सुंताबाईस सुटल्याची भावना होती पण बाल्याचं जाणं तिला उध्वस्त करत होतं.बाल्याचं जाणं तिला आपण 'अंतूची' अपराधी असल्याचं अधोरेखीत करत होतं.अंतू!.. ,अंतू....! कुठं गेला असावा?

" ताई !,ताई! " ताईला हळू आवाजात बोलवत घाईत आलेल्या दत्तानं कोपऱ्यात बोलावलं.

ताईनं गुडघ्यावर हाताचा जोर देत उठत त्याला सुंताच्या खोलीत नेलं.

" ताई अंतूचा तपास लागला.मुलानं कंपनीतून त्याचा नंबर मिळवत त्याच्याशी बोलला ही.आपला अंतू गवसला." एका दमात दत्तानं ताईच्या कानात कुजबुजत सांगितलं.

'अंतू ' नाव ऐकताच खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दोन दिवसांपासून एक ही अश्रू न गाळता दु:ख तसच साठवून बसलेली सुंता विचलीत होत तिच्या गालावर कुणालाच न दिसणारे अश्रू ओघळले.

"दत्ता नीट व सविस्तर सांग बाबा.कुठाय माझा लेक अंतू? आता तर त्याशिवाय तरणोपाय नाही बाबा." वच्छा ताई थरथरत कुणी ऐकणार नाही या धोऱ्यात कळवळली.

 जयाप्पाची तब्येत खालावत असतांनाच सयाजीच्या हालचाली वाढत होत्या.म्हणून सदा सर व दत्ताची मदत घेत महिन्यांपूर्वीच वच्छा ताईनं मृत्यूपत्र करायचं ठरवलं होतं.सदा सरांचा जवळचा नातेवाईक पुण्यात वकील होता. व दत्ता भटाचा मुलगा ही पुण्यात होता.म्हणून वकीलाकडं सदा सर व दत्ताजी महिन्यांपूर्वीच गेले होते. सारी बोलणी आटोपून परतत असतांनाच रेल्वेस्टेशनजवळील फुलाच्या दुकानासमोर गाडी थांबली.फुलवाल्यांनं घाईत उठत "सरोदे साहब अभी माला लगा देता" म्हणत उठत त्यानं फुलमाळ दिली.गाडी निघाली.गाडीत बसलेल्या व्यक्तीवर नजर जाताच दत्ता भट उडालाच.

"आरं पिना बाळा या गाडीत आपला अंतू आहे बघ! थांबव थांबव गाडी" दत्ताजी गाडीमागं धावत ओरडू लागला.पण गाडी निघून गेली.तोच रेल्वेस्टेशन मधून दत्ता शेठच्या गाडीची उद् घोषणा झाली.पिनानं वडिलांना "मी करतो तपास तुम्ही चला तोवर" सांगत फुलवाल्याकडं चौकशी केली. फुलवाल्याचं कायमचं कटमर असल्यानं त्यानं सविस्तरपणे माहिती असलेली जुजबी माहिती दिली.अंतू सरोदे 'कनस्ट्रक्शन' मध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याची माहिती मिळताच पिना वडिलांकडं आला पण तोपावेतो गाडी सुरू झाली होती. त्यानं धावत धावत मी पुर्ण माहिती काढून कळवतो एवढं सांगत निरोप घेतला. दत्तानं परत आल्यावर वच्छा ताईस ही माहिती कळवली होती.पण नंतर कोणती कन्स्ट्रक्शन नाव माहित नसल्यानं माहिती मिळेना दत्ता भटाचा पिना दररोज फुलवाल्याकडं जाऊ लागला.पण त्या दिवसापासून अंतू फुलवाल्याकडं आलाच नाही. आणि मग नेमकं दत्ता भटास मुलानं अंतूचा तपास लागल्याचं कळवलं होतं .नेमकं एक महिना अंतू सांगलीकडच्या साईडवर होता.सह्याद्री पर्वतात साईड असल्यानं रेंज ही नाही. व फुलवाल्यास नंबर ही माहित नव्हता.तिथलं काम आटोपताच तो परत आल्यावर फुलवाल्यानं पिनाशी त्याची गाठ घालून दिली.अंतूनं पिनाला पाहताच पुन्हा त्या कडवट आठवणी नकोच म्हणून बोलणंच टाळलं. त्यानं त्याला उडवून लावत सरळ निघून गेला. पण अंतू माग काढत त्याची कन्स्ट्रक्शन व नंबर मिळवत वडिलांना कळवला होता. दत्ता तेच सांगण्यासाठी वच्छा ताईकडं आला होता.

 वच्छा ताईंनं एकातांत दत्ता मार्फत नंबर लावला. सुरूवातीस दत्ता बोलला.

"अंतू पोरा... !"

"कोण?"

"पोरा मी ..मी.. भट ..दत्ता भट...तुला पिना भेटला .पण तू .."

"कोण? माफ करा राॅंग नंबर " म्हणत फोन कट केला गेला.

दत्ता भटानं पुन्हा लावला. 

" एक मिनीट फक्त ऐकून घे मग तू हवं तर कट कर वा उचलू नकोस पण ऐकून तर घे" म्हणत दत्तानं वच्छा ताईकडं फोन दिला.

" अंत्या....अंतू.... " गळा दाटला ,आवाज थरथरला.

"......."

" अंतू बोलू नकोस हवं तर मावशीसोबत पण ऐकून तर घे!"

" बोल...?" अंतूचा प्रथमच बोल घुमला.

" चार पाच वर्षात एकदाही फिरकला नाहीस. ठिक आहे पण आता या तुझ्या मावशीचा भरोसा नाही पोरा. मला माहितीय मी तुझी अपराधी आहे. पण माझ्यासाठी नव्हे तर निदान सुता साठी तरी एकदा तारणीत ये"

" बरं ठेवू का फोन मला दुसरं ही कामं आहेत" सुंताचं नाव निघताच तिकडंनं घाई होऊ लागली.

" लेका ऐक, जया गेला.नी ज्याला तू पाहिलं नाही.....असा बाल्या ...बाल्या ही गेला. नी आता......" वच्छा ताईचा स्वर भरून आला.बोलणं मुश्कील झालं.

" जाणारे गेलेत. त्याच्याशी मला कसलंही देणंघेणं नाही...जिथं आपल्यांनीच मला उभा जाळला त्यात दुसऱ्यांसाठी मी का दु:खं करत जळावं?"

"अंतू एक ..एकदा तरी येना तारणीस.नमाझ्यासाठी नाही पण जी हळद लावुनही उजळली नाही.तुझ्यासाठी जी अजुनही.... त्या सुंतासाठी तरी.....पाया पडते मी" वच्छा ताई रडत थरथरू लागली.

" माझ्यांनीच मला जितेपणी जाळलंय.मी पुन्हा त्या जगात पाऊलही ठेवणार नाही.आणि एक पुन्हा फोन ही करु नकोस " म्हणत फोन बंद झाला.

कोपऱ्यात सुंताच्या काळजात भावनाचा महापूर आला.'बाल्या तू जरी राहिला असता तरी मला दुसरं कोणी नको होतं' मनातल्या मनात आक्रोश सुरू झाला.

वच्छा ताईस सयाजीच्या हालचाली पाहून स्वत:ची नाही पण सुंताची काळजी वाटू लागली.म्हणून काही ही करून अंतूनं यायलाच हवं असा तिनं विचार करत भले स्वत: पुण्यास जाण्याचा विचार केला. दत्ता भटाला तिने गुपचूप परत पाठवलं.पण तरी या गोष्टी सयाजीला कळाल्याच.त्याच्या डोळ्यात आग पसरली.आपण एक एक काटा काढतोय तर आणखीनच अडचणी वाढतायेत.त्यानं पुन्हा पुढच्या चाली आखल्या.

.

.

कात्रज परिसरात आलिशान फ्लॅटमध्ये दुपारी लवंडूनही अंतूस झोप येईना.त्यानं उठत काॅफी बनवली.काॅफीचे घोट घेता घेता ' हळदीचा डाग' हे वच्छला मावशीचं बोलणं छळू लागलं. आख्खं आयुष्यच छिन्न विछीन्न करून कुठल्या डागाची गोष्ट करता हेत हे? काॅफीचे घोट तो खाली ढकलू पाहत होता पण काॅफी घशात उतरेना.

 तो आपल्याभोवतीच जणूकाही घरघर फिरू लागला.मावशी मामा, सुंती, जया, सया , तात्याराव, काशीराव त्याच्या सोबत गोल गोल फिरू लागले .जणू काही लहानपणी सुंतीसोबत आपण लपाछपी खेळतोय.सालीनं आपली जिंदगीचीच चिलम तंबाकू करून टाकली. नी मावशी म्हणतेय जया गेला तू येऊन जा.का जाऊ मी? अरे हा मावशी काय बोलली? बाल्या गेला....? बाल्या आला तर मग हळदीच्या डागावर बसलीय ...हे कसं मग? की...?

जाऊ दे पण मी जाणार नाही.

तो पलंगावर आडवा झाला नी आयुष्यपट खोलू लागला.

 .

.

  न कळत्या वयात आई वडिल गेले.मामानं आणलं. पहिलं लग्न मोडलेली वच्छी मावशी आपणास सांभाळू लागली. एक दोन वर्षांनी लहान सुंती व अंतू दोन्ही मामी मावशीच्या मांडीवर ' वारणी'त खेळू लागलो, वाढू लागलो.

 पट बदलला.तारणीतील मोठे शेतकरी तात्याराव नेहेतेची पहिली पत्नी वारली.मुलबाळं नसलेले श्रीमंत असलेले तात्याराव दुसरा घरोबा शोधू लागले.

 वारणीत मामाकडं बोलणं घातलं.वच्छी मावशी दुसऱ्या लग्नास तयार होतांना धूर्त मावशीनं थोराड तात्यारावांना अट घातली. जर मूलबाळ झालं तर ठिकच पण पोट पिकलंच नाही तर माझ्या बहिणीचं पोरकं लेकरू 'अंतूस' दत्तक घ्यावं लागेल. थोराड तात्यारावाच्या मनात बसलेल्या वच्छीमावशीसमोर तात्याराव तयार झाले.

 वच्छी मावशी वारणीहून तारणीस आली.अंतू सुंतीबरोबर वारणीत शिकू लागला.एक एक पायरी चढत जिल्ह्याच्या काॅलेजात जाऊ लागला.

तात्यारावांना मुलबाळ झालंच नाही.मग मावशीनं अंतूस तारणीलाच ठेवलं.नी तात्यारावांना अंतूस दत्तक घेण्यासाठी लकडा लावला.लग्न करतेवेळी होकार देणाऱ्या तात्यारावांनी वय झालं नी विचार पालटवले.

 चाळीस एकराचं रान होतं.मात्र भाऊ काशीनं त्याच्या हिश्याचं चाळीस एकर विकत विकत व्यसनात सट्टा,जुगार, पत्त्यात सारं उडवलं.काशीस जया व सया दोन मुलं ती ही तशीच उर्मट व मग्रूर. पण तात्यारावांचा जीव भाऊ व पुतण्यात अडकू लागला.सरतेशेवटी रक्तच ते.रक्तासाठी धडपडू लागलं.पण वागणूक पाहून वच्छा मावशी त्यांना फटकू देईना.वाद वाढले.तात्यारावांनी अंतूलाच घेऊ असं झुलवत ठेवत तीस एकराचं रानं वरच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेत जयाच्या नावावर केलं.तात्यांनी गावात अंतूस दत्तक घेतोय अशी हूल उठवत दत्तक विधानाची तयारी चालवली.वच्छी मावशी भुलली.त्याच गडबडीत तात्यांनी अंधारात ठेवत सह्या घेत तीस एकर जयाच्या नावावर केलं.मात्र दहा एकर वच्छी मावशीच्या नावावर करून ठेवलं. बिंग फुटलं.मावशी चवताळली.पण तो पावेतो साऱ्या कायदेशीर बाबी उरकल्या होत्या. मावशीला उपायच उरला नाही. तीस एकराचं रान जयाच्या नावावर जातय म्हटल्यावर मावशीनं मग निर्णय बदलत जयालाच दत्तक घेण्याचं ठरवलं.

 पण.. पण.. तारणी, वारणीत राहता राहता अंतू व सुंती एक होणार होती किंबहूना मामा व मावशींनीच त्यांना एक केलं होतं पण ती एवढी एकरुप होतील हे मामा व मावशीस उमगलंच नाही.मावशीनं आधीच अंतूला दत्तक घेणार व सुंतीला सून करणार हे नातं पक्कं केलेलं.म्हणून मामा व मामीची काहीच हरकत नव्हती. अंतू तारणीतून अपडाऊन करत इंजिनिअरींग करत होता तर सुंती वारणीहून अपडाऊन करत बी.एड करत होती त्यावेळेसच बालपणाची प्रित बहरली.मावशी व तात्यारावांचे दत्तक वरून वाद चालू असतांनाच तात्याराव ह्रदयविकारानं गेले.मग क्रियाकर्म आटोपताच तीस एकर जातच आहे मग मावशीनं घाई करत स्वत:हून जयास दत्तक घेतलं.अंतूस सुंती द्यायला तयार असणारा मामा बिथरला.जया तीस एकराचा मालक मग अंतू भाचा असला तरी काय करायचं? त्यानं वच्छाताईस सपशेल नकार देत जयासाठी सुंती करत असेल तर ठिक अन्यथा अंतूस मी देणार नाही असं साफ सुनवलं व अंतूस वारणीस येण्यास मज्जाव केला.तात्याराव गेले, तीस एकर रान गेलं म्हणून मावशीला स्वत:विषयीच अनिश्चीतता वाटायला लागली.मग तिनं विचार केला.आपल्या नावावरचं दहा एकर अंतूस देता येईल पण तीस एकराचा मालक जयाला मुठीत ठेवायचं तर मग सुंती जयालाच देऊ.जया सुंतीचं लग्नाचं पक्कं झालं.कफ्फलक होत चाललेले जया सयांना तीस एकर रान ,शिवाय त्यावर सुंतीसारखी सुस्वरूप मुलगी म्हणजे सोने पे सुहागा! ते एका पायावर राजी झाले.कारण त्यांना मावशी सहजासहजी जमिन देईल अशी त्यांना शाश्वती नव्हतीच. काकांनी नावावर केली पण मावशी जर कोर्टात गेली तर वांदे होऊ नयेत म्हणून अंतू व सुंतीचं माहित असूनही जयानं विरोध न करता लग्न तर करू मग नंतर पाहू असा विचार करत लग्नास तयार झाला.

 सुंतीस आपलं लग्न जयाशी ठरवलं जातय हे कळताच ती बिथरली.तिनं वडिलांना साफ डुरकावत नकार दिला.भले अंतूस जमिन मिळो वा ना मिळो पण मी अंतूला सोडणार नाही.तिस एकर सोडून अख्खी पृथ्वी जरी जयाकडं असेल तरी जया मला नको. अंतूला तर जमिनीशी काहीच देणंघेणं नव्हतं.त्याला स्वत:वर विश्वास होता. पण तो काही च बोलू शकत नव्हता.कारण न कळत्या वयात आई वडील गेल्यावर मामा व मावशींनी आपल्यास सांभाळलं.मग आपण त्यांना कसा विरोध करणार? पण तरी सुंतीशिवाय आपण जगूच शकत नाही म्हणून त्यांनं मावशीस व मामास हात जोडून विनवलं.

 मावशे तुझी जमीन तू जयाला सोडून भिकाऱ्याला जरी दिली असती तरी मला त्याचं काही सोयर सुतक नाही.व वाईट तर मुळीच वाटत नाही.कारण तो तुझा अधिकार आहे.पण लग्नाआधी तू सुंतीलव मला मांडीवर घेतलंय तेव्हापासुन तू जे नातं लावलंय ते तोडू नकोस! नी मामा मला आई वडील आठवत नाही.तु नी मावशीच माझं सर्वस्व आहात माझ्यावर विश्वास ठेवा.मी सुंतीला सुखी ठेवेन."

मामा मामी एक ही शब्द बोलेनात.

"अंतू यांना ठरवू देत .तू घाबरू नको.मी तुझ्याशिवाय कुणाला च स्विकारणार नाही.का पाया पडतोय तू यांच्या" सुंती फुत्कारत बोलली.

मामा मामी मावशी सुन्न.कुणीच काही बोलेनात.अंतू मनातून हादरला. त्याला कळून चुकलं की मामा जमिनीसाठी तर मावशी म्हातारपण सुरक्षित करण्यासाठी आपल्याला बलिदानाच्या वेदीवर चढवणारच. तो विदीर्ण काळजानं उठला व मळ्यात निघाला. नंतर काही वेळानं सुंतीही मळ्यात आली. 

  आंब्याच्या झाडाखाली झोपलेल्या अंतूला उठवू लागली.

" सुंती तुला ही ते मनवतील."

"चल उठ माझ्याकडं इलाज आहे.मग वडील आत्या गपगुमानं लग्नास राजी होतील"

 त्या राती अंतू सुंती मळ्यातच मुक्कामाला थांबली. अंतू बिनघोर झाला.

  पण तरी ही पुढच्या चार दिवसांत शेवटच्या वर्षाचा निकाल घेण्यासाठी अंतू जिल्ह्याला गेला त्याच दिवशी सुंतीचं लग्न मंदिरात जयाशी झालं.अंतू उध्वस्त झाला. वारणीत येताच त्याला मामा मामी व सुंती दिसली नाहीत .तो तारणीत परतला तर हळदीच्या अंगानं जया पाठोपाठ सुंती मंदिरातून उतरतांना दिसले. मामा मामीनं जयाला नकार कळवण्याच्या निमीत्तानं सुंतीला तारणीला नेलं.जया, सया , मावशीनं आधी तयारी करूनच ठेवली होती. सुंतीला कळताच ती जयाला तोंडावर धुडकावू लागली.पण मामा मामीनं मावशीनं हातात ईखाची कुपी घेत सुंतीला लग्नासाठी धमकावलं. तीन जीव जातील त्यापेक्षा .....बस्स तिथंच सुंती कचरली.नी....

 .

.

 अंतू उठला.बाहेर फिरायला गेला.त्यानं कडवट आठवणी झटकल्या.जया जावो की कुणीही जावो परत तारणीत परतायचं नाही म्हणजे नाही. असं त्यानं पक्कं केलं. त्यानं नंबर चं सीम बदलवलं.

 दोन तीन दिवसानंतर ' सना कन्स्ट्रक्शन' मध्ये बाॅसनं अर्जंट मिटींग लावली. अंतू काॅन्फरन्स हाॅलमध्ये प्रवेश करण्याआधी मागे त्याला बाहेर गेटवर भटाचा पिना दिसला.त्याची नस तडकली. तो तसाच आत निघून गेला.

बाॅसनं अजंती धरणाची रेंगाळणारी साईडबाबत साऱ्यांना सुनावलं. 

"मि. अनंत सरोदे आपण या साईडवरची जबाबदारी सांभाळा.कारण तुमच्या शिवाय ती साईड स्पिड पकडत नाही आहे.लवकरात लवकर तुम्ही पुण्याहून निघा."

अंतूला अजंती धरणाचं नाव ऐकताच तारणी आठवली.कारण तारणीच्या जवळच हे धरण बांधलं जातंय म्हणून मागेही तो सांगलीच्या साईडवर मुद्दाम निघून गेला होता.पण आता मात्र टाळणं शक्य नव्हतं.मिटींग संपताच बाहेरनिघणाऱ्या अंतूकडं पिना पळतच आला.

"अंतू दादा! वच्छा ताई (मावशी) गेली.तुझा फोन डेड येतोय.म्हणून मी आलोय.

.

.

.

" सुक्काळीच्या सयाजीला तेव्हाच सांगत होतो,जया पंचकात गेलाय विधी कर!पण नाही ऐकलं.आता भोग म्हणा फळं.बाल्या गेला,वच्छा ताई गेलीय आता अजुन तीन कोण?"

तिकडं दत्ता भट सदा सरांजवळ बडबडत होता.पण दत्ता भटाला तरी

 कुठं माहित होतं की बाल्या वच्छा ताई गेली की कुणी पाठवलं?

कुणी..?

कसं..?

का..?


Ssssssssssssssssssssssss


दुपारी तीनला भर उन्हात वच्छा काकीस सयानं अजंती धरणाकडं नदीच्या काठावर भडाग्नी दिला. चडचड करत लाकडं पेटली.महादबानं त्यात मीठ व राॅकेलची भर घालताच ज्वालांनी वच्छा ताईच्या कलेवरास घेरलं.कपाळमोक्ष होताच.आठवड्यातच तीन वेळा येऊन घायकुतीला आलेले नातेवाईक परतू लागले.सयाजी खालमानेनं गर्दी मागोमाग गावात आला.गाव दर्ज्याच्या समोरील लिंबाची डहाळी एकानं उडी मारत तोडली.परतणारी माणसं लिंबाचं पान तोंडात घेत तोंडं कडू करू लागली.सयाजीनं घरी येत स्नान केलं. एक दोन घास कडूमडू करत उष्ट तोंड केलं व वर हवेलीच्या तिसऱ्या मजल्यावर गेला.दार बंद करत त्यानं कपाटातून बाटली काढत कालपासून दवाखाना पोलीस स्टेशनला चकरा मारण्याचा थकवा काढू लागला. नशा चढू लागली तशी डोळ्यात लाली पसरू लागली.त्याला नारू मामाची सुंती दिसू लागली.तोच त्यानं हातातला ग्लास चिरेबंदी भिंतीवर फेकून मारला.

" दत्त्या तु मला छान मदत करतोय !

तू जया पंचकात गेलाय हे सांगितलं नी माझ काम सोपं होतंय.म्हणून मी विधी केलाच नाही.नाहीतर पाच बाहुले ठेवायला मला काय अडचण होती.पण मला तीच तर संधी आहे.माझं काम बिनबोभाट होतंय.पण तरी त्या वच्छीनंतर सुंती व त्या सदा मास्तरड्यानं घोळ केलाच व नाहक वच्छीकाकूचं कलेवर फाडावं लागलं.पण काय मिळालं 'बाबाजी का टुल्लु'.म्हातारीचं हार्टच खरोखर फेल झालं तर डाॅक्टर काय रिपोर्ट देईल" सया मनातल्या मनात खूश झाला.

सयाला सारं सारं चित्र स्पष्ट दिसू लागलं.

 तात्याराव ,आपला काका भोळा.त्याचा जीव भावात व आम्हा पुतण्यात अडकला. त्यानं काकीचं काही एक न ऐकता तीस एकराचं रान जयाला दत्तक घेत नावावर केलं.पण काकी ही कमी चालू नव्हती .तिनंही खेळी करत त्या अंत्याला वाऱ्यावर उडवत ऐनवेळी सुंतीला सून करून खेळी केली.

 ' सुंती!, सुंती!.. ' त्यानं आख्खी बाटलीच तोंडाला लावत घटाघटा रिचवली.

  जया सुंतीला खेळवायला गेला पण नियतीनं जयाशीच खेळ केला. जयाला एड्सचं निदान झालं.सुंती त्या आधीच तीस एकरास वारस लागलेली.जयानं तिला वा तिनं जयाला स्पर्शही न करता आयतीच मालक बनली. शिवाय नाही जया तर आपण आहोत या खुशीत आपण तिला राजी करण्यासाठी जिल्ह्यातल्या संस्थेत नोकरी लावून दिली.पण आपणास काय मिळालं? रित्या राती. पोरगं झालं त्यावेळेस आपणास कोण खुशी झाली.आपल्या भावास वारस मिळाला म्हणून.आपण जयास मिठी मारत गावात तमाशा ठेवला.पण जयानं जेव्हा आपणास हा आपला वारस नाही .काळजावर विस्तव फिरला. आणि मग बाल्या समोर आला की अंत्याची सुरी कलेजा चिरू लागली.

 जया दिवसेंदिवस ढासळू लागला.बाल्या वाढू लागला.सुंती जिल्ह्याला नोकरी करू लागली.काकांनी भरभरून दान देऊनही काकीच्या चलाखीनं आपली झोळी रितीच राहणार, आपला सातबारा तर आपण आधीच विकून कोरा केलेला.आधी आपण काकीस गोडीगुलाबीने सुंतीकडून पंधरा एकर आपल्या नावावर करायची विनंती करू लागलो. पण काकीनं सुंतीकडं बोट करत आता माझ्या हातात काहीच नसल्याचं सांगत वाटाण्याच्या अक्षता लावल्या.सुंतीला दाणे टाकुनही सुंतीनं जयाला जवळ केलं नाही तर आपल्याला तर ती नागिणीगत पाहू लागली.मग आपण काकीमागे तिच्या नावावर असलेलं दहा एकर तरी आपल्या नावावर करावं म्हणून गळ घातली .तर काकीनं ते अंतू आला की मी ते त्याला देणार असल्याचं स्पष्ट केलं. आधीच बाल्या काळजात शूळ उठवी त्यात अंतूचं नाव निघताच आपण ही लाल झालो.

" काकी ही इस्टेट माझी नसली तरी माझ्या आजोबाची आहे म्हणजे ती कुणाही ऐऱ्यागैऱ्यास न जाता ती मलाच मिळायला हवी.आणि बऱ्या बोलानं देत नसाल तर या सया शी गाठ आहे!" धमकी देताच काकी गारठली.काकी व सुंती अंतूस शोधू लागल्या.पण अंतू मिळना.काकी दत्त्या भटामार्फत कट शिजवू लागली.त्यात ते सदा मास्तर डिजीटल च्या देणगी निमीत्तानं सुंतीजवळ घिरट्या घालू लागलं.काकीनं त्या दोघांना लावून नाही अंतू सापडत तर तो पावेतो हे दहा एकराचं रान सुंतीलाच बक्षिसपत्र करू.सुंतीनं ते अंतू आला की त्यास परत करावं.किंवा बाल्यास ते आपोआप मिळेल अशी खेळी केली.आपला

 पाराच तापला.त्यातच जया गेला व दत्ता भटानं पंचकात गेला सांगताच आपण हे पंचकातील बाहुले ठरवले.

  'बाल्या.. ! ' याला पाहताच आपली नस तडकायची. त्या रात्री नातेवाईकाच्या लहान मुलाकरीता झोळी टांगलेली होती.बाल्या झोळीत झोपायचा हट्ट करू लागला. सुंतीनं " तू लहान आहेस का, झोळीत झोपायला?" म्हणून समजावलं.पण तो ऐकेना.काकीनं तिला शांत करत त्याला उचलत झोळीत झोपवलं.वरुन झोपेत पडू नये म्हणून झोळीभोवती ओढणी गुंडाळली.बाल्या झोपला.काकी त्याच्या जवळ झोपली.जिल्ह्याहून सुंती जेव्हा जेव्हा येई तेव्हा तेव्हा बाल्या आजीच्याच खोलीत झोपे.आजही सुंती तिच्या खोलीत गेली. आपण काकीस बी.पी.च्या गोळ्या द्यायला गेलो.तोच डोक्यात काहूर माजलं.हा अंतरात गुतलेला कंटक पंचकात काढायचाच! काकीस बी.पी.ची गोळी न देता खाली परतलो. व दुसरी गोळी आणली.काकीस जाऊन दिली.

" सया आताशी ही बी.पी.ची गोळीही असर करत नाही रे! झोपच येत नाही!"

" काकी, तू जयाचा कास धरला म्हणून झोप येत नसेल.शांत झोप, लागेल झोप!"

काकी झोपेच्या गोळीनं शांत झोपली. एक दोनच्या सुमारास आपण चोरपावलांनी काकीच्या खोलीत प्रवेश केला सारे कसे शांत पहुडले होते.खोलीत तर काकीचा उठण्याचा प्रश्नच नव्हता.बाल्याच्या मानेस फक्त पुढच्या भागात हातात रुमाल धरुन विळखा घातला.कारटं झोळीतच कोंबड्यानं फडफड करावी तसं फडफडलं नी निमालं.तसंच मान (हनुवटी) झोळीभोवती लपेटलेल्या ओढणीत अडकवून त्याला लोंबकवलं.जणू उतरतांनाओढणीत मान अडकून लटकलं असावं.मानेस विळखा घालतेवेळी कारटं चढ्ढीतच चिरकलं असावं.चढ्ढी भरलेली व ओली झाली होती.आता डोळ्यातला खून कमी होऊन काळजी वाटायला लागली.तसाच चोरपावलांनी खोलीत परतत सकाळ होता होता झपकी लागली.

सकाळी सुंती खोलीत गेली.तिनं पाहताच कोलाहल केला पण शांत विमनस्क अवस्थेत ती बाल्यापुढं बसली.रड फुटेचना.काकीला हलवून उठवण्यात आलं.

 बाल्याचं क्रियाक्रम उरकतांना आपण कोणत्या जन्माचं पाप फेडतोय असंच वाटत होतं.

  दत्ता भटानं अंतूचा तपास लागल्याची बातमी आणल्याचं कळताच उतरलेला पारा दुप्पट वेगानं सरकत चढला.ही थेरडी त्याला आणून उरलंसुरलं रानही त्याच्या घशात घालेल.घडतही तसंच होतं. लवकरात लवकर पंचक पुरा करायलाच पाहिजे.मग आपण क्रमात थोडा बदल केला. काकी तुला झोप लागत नाही! थांब तुला झोपवलंच पाहिजे.

अंतू येण्याआधीच.

   बाल्या गेला त्या दिवशी काकीची बी.पी.ची गोळी टळलीच होती. दुसऱ्या दिवशी साऱ्यांनी आवरा आवर केली. काकीच्या खोलीत बाल्या गेल्यानं काकी सुन्न झालेली असतांना अंतूचा तपास लागल्यानं मनात थोडी निर्धास्त होती.काकीजवळच बसलो सांत्वन करत. त्या दिवशी तिला गोळी देणं तर आवश्यक होतं. तिला बोलतांना धाप लागत होती.

 आज मात्र ती आपल्याला पाहून रागातच होती.

 हळुच गोळ्या ताब्यात घेतल्या. नी मग शाॅक द्यायला सुरुवात केली.कारण काकीस घडलेलं न कळवता मारण्यास मजा येईना. काकीच्या खोलीचं दार मुद्दाम उघडंच ठेवलं.

" काकी बाल्याचं वाईट झालं गं! पोरगं असं जायला नको होतं!"

" त्याचा सटीचा टाकच तसा असेल तर आपण काय करणार!" धाप टाकतच काकी मनातली अढी लपवत उत्तरली.

बाहेरचा कानोसा घेतला.

" काकी बाल्याला फाशी लागली नाही .मी नरडं दाबलं त्याचं!" अंधाऱ्यात डोळे विखार ओतत होते"

 थेरडीच्या धापा वाढल्या.ढांस वाढली.थरथर करत ती किंचाळली.

तोच आपण दार लोटलं.

" सया ! निष्पाप जिवाला का मारलं?"

" तो निष्पापच होता गं! पण त्याला पाहीलं की जयाची जिंदगीच कलम झाल्यागत वाटायचं.सुंती अंत्याची डहाळीचं कलम आपण जोपासतोय असंच! तरी वाढवलं असतं गं.पण ना सुंती तयार ना तू!. सारं रान त्याला देण्यात मला काय फायदा!"

" जया कुठं फेडशील रे हे पाप!" धापांनी आता परम सिमा गाठल्यानं थेरडी गोळ्याची डबी चाचपू लागली.

" काकी ऐक, गोळ्या माझ्याकडं आहेत.देईन मी तुला सावकाश पण घेऊन काय करशील.एरवी तुला मरायचंच आहे.नी हो सुंती आधी तू जाशील याची मला खंत वाटतेय! तू सुंतीचं सुतक धरायला हवी होतीस गं! पण त्या दत्त्याच्या मदतीनं तू किती आटापिटा करते आहेस म्हणूनच मला..."

आपण उठून काकीचा बाल्या करणार तोच सुंतीचं ऐकून वाढणाऱ्या धापांनी काकीस दगा दिला.'अंतू अंतू! ये ना!" म्हणत श्वास उखळला.

आपलं काम सोपं झालं.

 सकाळी बाल्याच्या वेळी न रडलेली सुंतीनं टाहो फोडला.

" आत्या......!"

 आपण डोळे चोळत उठलो.काय फालतूपणा हा! धड झोपू ही देत नाही! या सुंतीनं चार वर्षापासून झोप उडवलीच आहे नी आता पुन्हा वरून हा टाहो! आता पंचकातील पुढचं पान सुंतीच!"

.

.

.

संशय येऊ नये म्हणून स्वत:च पी. एम. करायला काकीस दवाखान्यात नेलं.ह्रदयानंच दगा दिल्यानं डाॅक्टराला काय सापडणार!


Ssssssssssssssssssssss  मावशी गेल्याच कळताच अंतूला गरगरायला लागलं.पाच वर्षांपासून सारं मागे टाकून आलेल्या अंतूच्या ह्रदयात आई च्या ठिकाणी मावशीच होती.लहानपणी मावशीनं आपली आभाळ होऊ दिली नाही हे त्याला आठवलं. त्यानं बाॅसला भेटत अजंती धरणाची साईडवर जाण्याचं पक्कं केलं व मावशीबाबतही कळवलं.

पिना व तो तारणीकडं निघाले. पण तो पावेतो बारा वाजले. मध्येच रस्त्याचं काम चालू असल्यानं व अपघात झाल्यानं ट्रफिक जाम झाली. दोन्ही बाजूस सहा सात किमीच्या रांगा लागल्या. तारणीस पोहाचणं शक्य वाटेना. तेथेच त्यांना मावशीस अग्नी देत उरकल्याचा फोन आला.आपल्यासाठी मावशीसथोडा वैळ तरी ठेवणारं तारणीत कोणीच नाही याचं अंतूला वाईट वाटलं व काळजात कळ उठली. सहा वाजेला रस्ता सुरळीत होऊन ते रवाना झाले.जिल्ह्यात यायला त्यांना दहा वाजले. पिनानं वडिलांना फोन केला.तारणीतलं वातावरण बघता व वच्छा ताई तर गेल्याच आहेत म्हणून सुंतीला विचारत दत्ताजीनं त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी सुंतीच्या घरीच रात्र काढायला लावली.

 सकाळी नऊ वाजता अंतू तारणीत आला. पाच वर्षात हवेलीत बरेच बदल जाणवत होते. जी हवेली आपली होती ती आता परकी भासत होती.सज्जात खुर्चीवर रांगेत जया, मावशी व लहान मुलाचा फोटो ठेवलेला.अंतूला मावशीचा फोटो पाहताच कालवून आलं.वय झालं असलं तरी आईसारखं सांभाळणाऱ्या माऊलीचं अंतिम दर्शन होऊ शकलं नाही याचंच वाईट वाटलं. त्यानं कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रितीनं डोळ्यात तरळणारे थेंब पुसले.लहान मुलाचा फोटो पाहताच त्याला अचंबा वाटला.अंदाजानं हा सुंतीचा मुलगा हे त्यानं ताडलं पण आपल्या वालेट मध्ये असलेल्या लहानपणी मावशीनं यात्रेत काढलेला आपलाच फोटो ठेवलाय असंच त्याला वाटलं.आपणाशी साधर्म्य?

सया जवळ बसलेला पण अवाक्षर बोलला नाही.अंतूला आपण उगाच आलो की काय असंच वाटू लागलं.तोच दत्ताजी व सदा सर आले.त्यांना पाहताच सयानं उठत अंगणाकडं पचकन थुकलं. अंतूला आतून बोलावणं आलं.तो आत जाऊ लागताच दत्ताही मागोमाग उठत जाऊ लागला.

" भटजी बसा! आत तुमचं काय काम! त्याचे जुने संबंध असल्यानं तो आत चाललाय, तुमचं कोण आहे आत एवढं लगबगीनं जायला?" सयानं विखार ओकत बोलताच दत्ताजी वरमला.

 अंधाऱ्या खोलीत सुंती बसलेली.अंतूला पाहताच बांध फुटला. अंतूस तो बांध जयासाठी वाटला.पण सुंतीलाच माहित असावं तो बांध नेमका बाल्या साठी होता की अंतूसाठी की मावशीसाठी की तिच्या अस्थिर जिवनासाठी? बराच वेळ तसाच गेला.अंतूला पाच वर्षात पुलाखालून इतकं पाणी वहावं की रडणाऱ्या सुंतीचं सांत्वन कसं करावं हे आपणास कळू नये,याचं आश्चर्य वाटलं.

  "अंतू.....!"

"............"

" आलास खूप चांगलं झालं.आता निवांत थांब.खूप काही सांगायचंय तुला.इथं खूप काही घडतंय! आता या घडीला सांगणं गरजेचं असलं तरी इथल्या भिंतीला देखील कान आहेत. मी लवकरच भेट घेतेच तुझी जिल्ह्याला घरी.तरी दत्ताजी व सदा सरांना भेट .ते सांगतीलच तुला"

" आता सांगण्यासारखं काय राहिलंय हिच्याकडं! जे होतं ते सारंच संपवल्यावर!"अंतू मनात चरफडला.

क्षणीक अंतराळ त्याला युगासमान भासू लागला.लवकर सुटका व्हावी म्हणून मुलाच्या दु:खाचं सांत्वन करण्यासाठी सुंती जवळ येत अंतूनं हात हातात घेतला.पाच वर्षात प्रथमच असा परपुरुषाचा स्पर्श तिला जाणवला.दुष्काळात थोड्याशा थेंबानं भुईत मृदगंध दाटावा तसाच. 

 अंतूला तिथं थांबणं अवघड वाटू लागलं.दत्ताजीनं सदा सरांसोबत त्याला आपल्या घरी नेत जेवणाचा आग्रह केला.वच्छाताईची इच्छा व जमिनीबाबत करावयाच्या साऱ्या बाबी सांगितल्या.

"अंतू पोरा! सुंतीवर अन्यायच झालाय रे! हळदीच्या डागावर ती बसलीय.नी आता तर तिच्या आयुष्यात पोकळीचं विवरशिवाय काहीच नाही.

अंतूचा श्वास वाढू लागला.जीव गुदमरू लागला.जमीन, सुंती या बाबीत त्याला आता अजिबात स्वारस्य वाटेना.या साऱ्या गोष्टी त्यानं पाच वर्षांपूर्वीच पुसून टाकल्यामुळं हो ला हो करत तो तेथून केव्हा निसटावं याच विचारात होता. त्यानं रजा घेत तिथूनच चार पाच किमी अंतरावरील अजंती साईडवर गाडी दामटली. साईडवर तीनेक वर्षांपासून काम चालू होतं.तेथे कंपनीनं निवासासाठी क्वार्टर्सची सोय केली होतीच. ज्यु. इंजिनीअर्स ना घेत त्यानं सारी साईड पाहत माहिती घेतली धरणाखाली व बॅक वाटरखाली जाणाऱ्या क्षेत्राचे वाद चालू होते.लोकांना भरपाई अधिक हवी होती शिवाय पुनर्वसन या सारख्या सरकारी बाबी होत्या. त्या सरकारी अधिकारी पाहतच होते.पण त्यामुळं यांच्या कंपनीस काम करण्यात अडथळे होत होते.त्यानं सारे डिटीयल्स घेत अंधार पडायच्या आत तेथून पुण्याकडं रवाना झाला. प्रवासात त्याच्या डोक्यात सुंती, मावशी, सया, जया, बाल्या थैमान घालू लागले.ड्रायव्हर गाडी सुसाट पळवत होता. त्याच वेगान तो विचार चक्र पळवत होता. मावशीनं फोनवर

' हळदीचा डाग' व 'बाल्या' हे सांगितलं तेव्हा त्याला मावशीचा संताप आला होता.एकीकडं हळदीवर बसलीय नी दुसरीकडं मुलगा बाल्या गेलाय हे त्याला परस्पर विरोधी वाटत होतं. पण आज खुर्चीवर ठेवलेल्या फोटोत त्याला बालपणीचा अंत्या दिसला. त्यानं ड्रायव्हरला लाईट सुरू ठेवायला सांगत खिशातलं वालेट बाहेर काढलं. मावशी यात्रेत घेऊन गेली होती तेव्हा तिनं हौशेनं सुंती व आपला फोटो काढला होता. सुंतीचं जमलं नी तो त्यानं दोन तुकडे करत ठेवला होता.त्याला आपल्या फोटोत बाल्या दिसू लागला.म्हणजे ....खरचं हळदीच्या डागावर बसलीय. त्यानं फोटोचं दुसरं सुंतीचं तुकडं कप्प्यातून काढलं.परकरातली सुंती अंधुकशा प्रकाशात त्याला दिसताच आजचा तो थंड स्पर्श त्याला जाणवला. व दुपारचं दत्ता भटजीचं बरळणं आठवलं."पोरा तु पण अजुन एकटाच आहेस व आता सुंती ही... विचार करा दोघे.

एकत्र या.जया गेला नी मावशीनं पण तेच ठरवलं होतं. "

पहाटे पुण्यात येताच तो गाढ झोपला.

 दिवसा त्यानं बाॅसची भेट घेत साऱ्या बाबी स्पष्ट करत साईडवरील सरकारी अडचणीबाबत सांगितलं. तो दिवस व रात्र पुण्यात थांबून त्यानं साऱ्या अडचणी सोडवत रात्री आठच्या सुमारास तो अजंती साईडवर परतला. दोन दिवसाच्या धावपळीत त्यानं त्याचा पर्सनल मोबाईल पाहीलाच नव्हता.कंपनीचा हॅण्डसेट ठेवत त्यानं बंद केलेला मोबाईल चार्जिंगला लावत आॅन केला. तर त्यावर दत्ताजी, सदा सराचे बरेच आलेले काॅल दिसले. त्याला संताप आला.आपण टाळतोय तर हे लोक पुन्हा आपल्याला ओढू पाहतायेत. त्याला थकवा जाणवत होता म्हणून त्यानं तो पुन्हा बंद केला.

 तोच साईडवरच्या माणसानं तारणी गावातले दत्ताजी व सदा सर दुपारी येऊन गेल्याचं कळवलं. अंतूनं थोडी रिचवत जेवण घेतलं व थकव्यानं व सततच्या धावपळीनं झोपणं पसंत केलं. झोपता झोपता आठवणीचा धूर धुराडा करू लागला.

   ' सुंती आपल्यापासून दूर झाली नी आपण नंतर आयुष्यात कुणाला जवळ न करण्याचं ठरवलं.आपणास वाटत होतं की आपणच त्याग करतोय! पण जयाशी लग्न करूनही ती पण तशीच राहिली तर मग ती पण....

पण मग तिनं लग्नास होकार द्यायलाच नको होता त्यावेळेस!' अंतू विचारातच झोपू लागला. सकाळी जाऊ या व सुंतीला भेटूच या.आता साईडवरच रहायचंय तर मग भेटता येईल.शिवाय त्या दिवशी ती काही तरी सांगणार होती व नंतर भेटते असंही बोलत होती. तो घोरू लागला. तोच क्वार्टर्सच्या पत्र्यावर ताड ताड आवाज सुरू झाला.मार्च महिना.अचानक बेमोसमी पाऊस व वादळ सुटलं. टपोऱ्या गारा बरसू लागल्या. पावसानं व टपोऱ्या गारानं अजंती काठावरील शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू खलास होऊ लागला.शेतात गव्हाच्या लोमीचा पसारा मातला.अर्ध्या तासातच जिकडे-तिकडे धूळधाण झाली. गारा थांबल्या व नंतर वादळ निमत पाऊस ही थांबला.

 तोच अंतूला कुणीतरी दार ठोठावल्याचा आवाज आला. अंतूची पावसानं चाळवलेली झोप उघडली. एवढ्या रात्री कोण? दत्ताजी तर नसावा? या वेळेस तरी नको तो.

दरवाज्याची टकटक वाढतच होती.अंतूनं धुंदीतच दार उघडलं. दारात सुंतीला पाहताच तो चक्रावला.

" सुंती तू? नी असल्या अवेळी?" अंतू बुचकळल्यागत विचारता झाला.

" येणं गरजेचं होतं रे अंतू! तुझी खूप वाट पाहिली मी ! पण नाही आलास तू मग काय करणार!" दाराआड ओलिचिंब सुंती उत्तरली.

" ये आत,पावसातच आलीस ओली झालीयेस!"

" अंतू आत नको.तूच बाहेर ये! खूप काही सांगायचं बाकी राहिलंय रे! आज सारं सारं अपुरं सांगायचं, बोलायचं , करायचं आहे.बाहेरच जाऊ जरा चल!"

" अगं पण बाहेर अशा अपरात्री फिरणं बरं नव्हे!" धुंदीत असला तरी अंतूचा मेंदू काम करीत होता.

" अंतू वेळ कमीय ना रे! ऐक चल बाहेरच! किती वर्षात असा एकांत मिळतोय!"

अंतूला नकार द्यावासा वाटत होता.पण एवढ्या रात्री आली म्हणजे नक्कीच गंभीर काही तरी असावं.दत्ताजी, सदा सर ही बोललेच होते व येथल्या घटना ही तशाच घडल्यात.असा विचार करत बूट चढवत तो बाहेर निघाला. 

  बाहेर पाऊस थांबल्यानं आभाळ निरभ्र होतं.रजत पिवळा गोलाईस आलेला चांद मावळतीस झुकला होता.पावसानं हवेत गारठा वाढला होता.चांदण प्रकाशात पांढऱ्या साडीवर ओलेती सुंती अधिकच खुलून दिसत होती. सुंती पुढं धरणाची वाट पकडत तारणीकडं निघाली.धरणातून खोदाईमुळं अनेक वाटा फुटत होत्या त्या पार करत ती शेतमळ्याच्या वाटेला लागली.सुंती पुढे चालतेय व अंतू तिच्या मागोमाग.महादबा नेहेतेचं पिंपरीवालं रान लागलं.अंतूनं पाच सहा वर्षानंतर ही ते ओळखलं. पिंपरणीखाली सुंती उभी राहिली.

" अंतू! बस ! तुला आठवतंय मळ्यातली ती रात्र!"

सुंतीनं अंतूचा हात हातात घेतला.

अंतूस त्याचा स्पर्श शेवाळल्यागत लागला. तो शहारला.

 " सुंती अशा वेळी असं फिरणं योग्य नाही.कुणी पाहिलं तर नाहक?"

" अंतू! पाच वर्षांपासून थांबलेय मी तुझी वाट पाहत! फक्त दु:ख एका गोष्टीचं वाटतंय की आपल्या बाल्यास नाही वाचवू शकले रे!"

"....." अंतूला कळूनही काही उमगेना.

" अंतू! तुला वाटत असेल मी लग्नास संमती का दिली? पण मावशी,आई-वडीलाच्या हातातील विषाची बाटली व सया जयानं तुलाच उडवण्याचा घातलेला घाट यानं माझ्यासमोर पर्यायच उरला नाही.पण तरी मी पण बदला घेतलाच.जयाला फिरकूच दिलं नाही.व नंतर तर नियतीनंच त्याला ......" सुंतीचा शेवाळलेला हात अंतुच्या साऱ्या देहावर शहारा उठवू लागला.

" अंतू कसक फक्त एकाच गोष्टीची वाटते रे! त्या हरामी सयाची पाच वर्षात किती तरी वेळा वासनांध नजर मागोवा घेत होती. तरी त्याची तकद झालीच नाही.पण त्याचा बदला घेता नाही आला रे......! "

" काय केलंय त्यानं?"अंतूचा भाव केव्हा बदलला हे त्यालाही कळलं नाही. 

सुंती उठली व पिंपरणीच्या मळ्यातून चालत तारणीकडं चालू लागली.उलट दिशेनं येणारा वारा तिच्या ओलेता अंगाचा धुमार गंध अंतूस पूर्वीसारखाच धुंद करू लागला. पण तोच एकदम हवा पलटली व कुजका उग्र दर्प उठला.पिंपरणीवरची वटवाघळं उठबस करू लागली.घुबडं विचीत्र घुत्कारू लागली.

" अंतू! त्या सयानंच आत्या... ,'आपल्या बाल्यास मारलं.नी....नी...!"

 " नी काय गं सुंती? सांग ना?" अंतू मागं मागं जात सुंतीला विचारू लागला.

" अंतू सयाला जिता नाही सोडायचा! म्हणूनच तर घ्यायला आलेय मी बघ तुला! येशील ना माझ्यासोबत! एकटी मी नाही घेऊ शकत रे बदला!"

"सुंती ,घाबरू नकोस मी आलोय ना आता! तो आता तूझं काहीच करू शकणार नाही!"अंतू त्वेषानं उद्गारला.

चांद कलायला लागला.उगवतीला तांबुस सिमाकी आभा डोकावू लागली.पिंपरणीवर रानातून परतणारी वटवाघळं लटकण्यासाठी गर्दी करू लागले. तोच सुंतीच्या मागं मागं चालणाऱ्या अंतूस परत उग्र दर्प झोंबला.

" अंतू चल मला उशीर होतोय ,जाते मी.पण येशील ना? वाट पाहीन मी!एकटी आहे रे मी!"

"सुंते आलो ना मी आता जा तू सकाळी येतोच मी हवेली वर!"

 नंतर धुंदीतच अंतू फिरत राहिला व हवेलीकडं चालू लागला.

तारणीत हवेलीवर पहाटे मागच्या परसात सालदार गड्यास आडाकडं उग्र दर्प जाणवल्यानं त्यानं वहिवाटात नसलेल्या आडात डोकावून पाहिलं. वास तिथनंच येत होता.त्यानं सकाळ होताच सयाला सांगितलं.सयानं अचंबा दाखवत त्याच्यासोबत डोकावून पाहिलं व सालदार गड्यानं बोंब ठोकली. सुंतीचं फुगलेलं प्रेत वर काढण्यात आलं.सारं शेवाळलेलं व कुजायला सुरूवात झालेलं. बोंब ऐकताच सारी तारणी गोळा झाली.सदा सर दत्ता भट आले .दोन दिवसांपासून तारणीत सुंती गायब झाल्याची कुजबूज होतीच .आज त्या कुजबुजीला विराम मिळाला.

नेमक्या त्याच वेळी अंतू हवेलीसमोर आला.त्याची धुंदी खुलली.आडाजवळच्या सुंतीच्या फुगलेल्या देहास पाहताच त्याला 

'मी वाट पाहतेय' हे वाक्य आठवलं.शेवाळलेला हात आठवला. उग्र दर्प आठवला नी तो थरथरत, खाली पडला..

.

.

कुणाला कळू न देता सयानं आधीच मिसींग केस दर्ज केलीच होती.

आठ वाजताच पोलीसगाडी व अॅम्ब्युलंस आवाज करतच हवेलीसमोर आल्या.

भटानं सदा सरांच्या मदतीनं अंतूस उठवत बसवलं. " पोरा तुला किती फोन केलेत पण तू उचललाच नाही व नंतर फोनच बंद येत होता.

" सदा सर ! पंचकातला तिसरा बळी गेलाय!" दत्ता भट कुरकुरला.


Ssssssssssssssssssssssss  दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातल्या दैनिकात ' पती व मुलाच्या वियोगानं पत्नीची विहीरीत उडी घेत जिवनयात्रा संपवली' अशा मोठ्या ठळक मथळ्यात बातमी आली.मावशीचा पी. एम . रिपोर्ट उच्च रक्तदाबानं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू'

असा आल्यानं व सुंतीबाबत कुणीच तक्रार न केल्यानं पोलीसांनी सुंतीच्या कलेवराचं पी. एम.करत नंतर सया व अंतूचे वैय. जाबजबाब घेतले.सयानं 'सुंती पतीच्या व मुलाच्या जाण्यानं एकटी पडली होती व दु:खानंच हे पाऊल उचललं असावं' असा जबाब दिला. तर अंतूला रात्रीचं "अंतू ! मी एकटी आहे,मी सयाला एकटी नाही मारू शकत.तू येशील ना मला भेटायला ?" हे आठवताच त्यानंही दत्ता व सदाचं काही एक न ऐकता सयाप्रमाणंच जबाब दिला. कुणी तक्रारच केली नाही म्हणून व प्रथमदर्शनी आत्महत्याच वाटत असल्यानं पोलीसांनी पि.एम. नंतर प्रेत अत्यं विधीसाठी ताब्यात दिलं.अत्यविधी आटोपताच अंतू क्वार्टरवर न जाता हवेलीवर थांबला.सया चक्रावला.त्याला वाटलं अंतू गरबड करेल.पण त्या दिवशी अंतू शांत पणे वावरला. दुसऱ्या दिवशी क्वार्टरकडे जातांना दत्ता भटजी व सदा सर त्याला भेटायलाआले.त्यांना

 " सवडीनं व सबुरीनं घ्या घाई नको. रात्री क्वार्टरवर या भेटायला " एवढंच कुणाला ऐकू जाणार नाही असं पुटपुटत निघून गेला. दत्ता भट संताप करू लागले. अंतू तक्रार का करत नाही ? का हाच सयाला मिळाला असा संशय त्याला निर्माण झाला.

 सया दुसऱ्या दिवशी ही पोलीश स्टेशनात गेला. अधिकाऱ्यांना गुप्तपणे भेटला. कारण अंतू बोलला नाही अजून पण पुढे बोलणार नाही याची शाश्वती नव्हती व भट? तो शांत राहणार नाही म्हणून अधिकाऱ्यांना भेटला व खूश करू लागला.व नंतर पंचकातील दोन.....! त्याचा ही त्याला बंदोबस्त करायचाच होता व तोही लवकरच. 

 अंतूनं क्वार्टरवर येत दिवसभर पडणंच पसंद केलं.

' अंतू मी वाट पाहतेय रे! येशील ना! एकटी आहे रे मी!' आठवलं. व महादबाच्या मळ्यातील पिंपळाच्या झाडाखालील शेवाळलेल्या हाताचा शेवाळलेला स्पर्श , उग्र दर्प त्याला आठवला.सात वाजता तो उठला व बाहेर येत धरणावर चालणारं थंडावलेलं काम पाहू लागला.जिकडं तिकडं फापटपसारा पडलेला.जेसीबी, टंपर ट्रॅक्टर उभे होते.काही तुरळक तेलगू कामगाराची कबिले पत्र्याच्या शेडमध्ये होते.लोखंड,ग्लडर, सिमेंट दोर ,नारळाच्या दोऱ्या काहीबाही पडलेलं होतं.त्याची नजर दोरावर गेली. अंधार पडायला सुरूवात झालेली. तो आत परतला.साडेदहाच्या सुमारास सुंतीच्या आठवणीनं महादबाच्या पिंपळाच्या मळ्याकडं निघाला......

तेलगू कामगाराचं कुत्रं त्याला पाहताच जोरजोरात भुंकत विव्हळू लागलं.

 रात्री जिल्ह्याहून निघतांना

     " सयाजीराव आमच्याकडनं बिनघोर असा! आम्ही स्वत:हून आडात डोकावणार नाहीत फक्त त्या अंतूस व भटास कसं सांभाळायचं ते तुमचं तुम्ही बघा!" असं आश्वासन मिळताच टल्ली झालेला सया तारणीकडं निघाला. बाल्या, काकी, सुंती यांच्यावेळेस ही तो असाच टल्ली होता.व आजही ...असा टल्ली झाल्यावर त्याला आपला मेंदू अधिक तल्लख होत असल्याचं तो जाणून होता. म्हणून त्यानं परस्परच तारणीत हवेलीत न जाता क्वार्टरवरच जाण्याचं ठरवलं. धरणाच्या कामावर त्याचे तीन जेसीबी ट्रॅक्टर, टंम्पर चालूच होते. त्या करीता त्यानं पेट्रोल व डिजेलचे ड्रम भरून जीपमध्ये ठेवले. पेट्रोलपंपाजवळ टिकाव, फावड्याचे लाकडी दांड विकणारा माणूस पडलेला दिसला. सयाच्या मनात काही तरी तरळलं. आपल्या टिकावचा दांड परवा आपण विहीरीत फेकला.त्त्याला हसू आलं. चला हाच दांड आजही वापरायचा असा विचार त्यानं करत त्यानं त्या माणसाकडंनं दांड मांगितला.

" साहब अभी सुबह आव इतनी रात हो गयी "

तरी समोरच्या गठ्ठ्यातून त्यांन दांड उचलत त्याच्या अंगावर पैशै फेकत निघाला.गाडी तारणी जवळ करू लागली. 

अकराच्या सुमारास तो तारणीच्या फाट्याच्या आसपास आला. आकाश परवाच्या बेमोसमी पावसानंतर स्वच्छ होतं.पण हवेत गारपिठीनं गारठा वाढला होता. आकाशातला चंद्र त्याच्या गाडीसोबत पळतच होता. अंगातली चढत असल्यानं तो विचार करू लागला.आख्ख चाळीस एकर रान नदीपासून लांब असल्यानं रानातलं एक चास ही धरणात बुडणार नाही. फक्त आज अंतूला बुडवावं लागेल.धरण तर होणारच,मग गाव उठलं तरी आपलं रान शाबूत.मग सुंतीसाठी थांबलो होतो पण आता मस्त लग्न उरकू. 

गाडी फाट्याजवळ येताच त्यानं गावाकडच्या फेऱ्यानं जाण्यापेक्षा महादबाच्या मळ्याकडनं कच्च्या रस्त्यानं गाडी टाकली. धरण जवळ येऊ लागलं. महादबाचा मळा आला. रस्त्यापासून थोड्याच अंतरावर विहीर होती.सयानं गाडी थांबवली.त्याला पिंपळाखाली कुणी तरी बसलेलं दिसलं.तो उतरला व त्यानं " कोण आहे रे ? " म्हणून आरोळी ठोकली.

" मी अनंत सरोदे"

"अरे अंतू तू? नी इथं काय करतोय या वेळेला?" सया प्याला असला तरी कचरलाच.

" कोण सया का? काही नाही उदास वाटत होतं व सततच्या शहरी वातावरतात राहून असं मोकळं वातावरण ही मिळत नाही म्हणून आलो धरणाकडंनं फिरायला.

सयाची भिती कमी झाली.त्यानं मनातल्या मनात ' जिसे हम ढूंढ रहे थे गली गली...' म्हणत विहीरीकडं निघाला.तोच त्याला अंतूपासून पिंपळाच्या झाडामागं काही तरी झपाट्यानं सरकल्याचं जाणवलं. 

" अंतू काही तरी हललं का रे?"

" कुठं काय? काहीच नाही"

अंतू शांत बसुन बाटली खाली करत होता.

" बस सया.खूप वर्षांनी असं मोकळ्या वातावरणात आलोय.घे थोडी"

सया नं तरी आजुबाजुला पाहीलंच. कारण काय सांगावं भट व सदा सराची काही चाल असावी.

"बस रे सया काय पाहतोय असं बावचळल्या सारखं!" अंतूनं त्यास भरवसा भरला.

" अंतू काकी, सुंती,जया गेल्यानं आता कशातच भरवसा वाटत नाही रे!"

सयाला माहित करायचं होतं की यानं तक्रार का केली नाही ? का हा सुंती व मावशीवरील राग विसरलाच नाही लग्नाबाबतचा?

" सया, मला सुंती काकीबाबत काहीच वाटत नाही.कारण त्यांनी मला दुखवलंच होतं, ते तर तुला ही माहित आहे.

सयाचे डोळे चमकले.त्याला हायसं वाटलं.अंतूनं ग्लास खाली करत सयाला दिला.सया आधीच टल्ली होता.

" अंतू तुला सांगू का? सुंतीनं तुलाच काय पण आमच्या जयाला ही फसवलं"

" बरोबर सया! ती गेली चांगलंच झालं"

आता मात्र सया खुलला.

 कारण अंगातली ही चढलीच होती

" अंतू भावा तू एक कर आता हे धरण पुर्ण कर नी इथंच रहा.तुला मी काकीच्या नावाचं दहा एकर देतो."

" सया मला शेत नको रे.मी खरं तर येणारच नव्हतो पण यांना मरतांना पहायचं होतं मला,म्हणून आलो मी!"

" अंतू...मित्रा,.. भावा... तुच आता माझा ..जया.. तू ऐक ..त्या भटाचं ऐकू नको... नी तुला सांगतो...शू..शू.. कुणाला सांगू नको... त्या सुंतीला....मी .. मीच मारलं.."

अंतूच्या डोळ्यात आग उतरली.

" सया छान केलंस.तिला तसंच हवं होतं.पण कसं मारलंस रे सया! ती तर आडात कुदली ना?"

अंतूनं पुन्हा ग्लास भरून दिला.

" अंतू आडात ती कशाला कुदेल! त्या रात्री तो भट व मास्तर तिला भेटायला हवेलीमागं आले.सोबत त्यांनी कोणाला तरी आणलं होतं.बहुतेक वकील असावा. मागच्या अंधारात काही तरी कागदं चाळली त्यांनी.माझा हराम चढला.भट व मास्तर गेले.नी ती परत हवेलीच्या मागच्या दाराकडं येऊ लागली.मी टिकावचा दांड मोकळा केला.ती मागचा दरवाजा लावण्यासाठी पाठमोरी फिरली नी घातला जोरानं दांड.डोक्याच्या मागच्या बाजूस बसताच एकाच दणक्यात सुंती लाथा झडकायला लागली.तशीच खांद्यावर घेतली नी फेकली मागच्या आडात.आडातल्या ठेवणीवर डोक्यावर आदळत फपकन आडात पडली"

अंतुच्या हातातला ग्लास फुटला.त्याला शेवाळलेला हात ,उग्र दर्प आठवला.नी तोच दर्प पुन्हा सुटला.

आता पर्यंत आधी टल्ली झालेला सया अंतू देत असलेली दारू पितच नव्हता पण आहे त्या पेक्षा जास्त टल्ली असल्याचं भासवत होता.त्याला अंतूला इथं लोळवायचं नव्हतं.धरणावरच नेऊन काम करायचं होतं.तोच दर्प सुटताच " अंतू कसला घाण वास येतोय रे! चल उठ भावा आता धरणावरच जाऊ!" 

सया त्याला उठवू लागला.

अंतू व सया गाडीत बसत धरणाकडं निघाले.

.

.

पण त्या आधी बराच वेळेपुर्वी दत्ता भटानं सदा सराला घेत धरण गाठलं होतं.धरणावर क्वार्टरचं कवाड लोटलेल्या अवस्थेत होतं. अंतू जवळच्या आॅफिसच्या कॅबीनसमोर चार एक खुर्च्या टाकून अंगणात बसलेला होता. दत्ताजी व सदा सर त्याच्या जवळ बसले.

बसताच कालपासून संतापलेल्या दत्ताजीनं अंतूवर फायरिंग सुरू केली.

" अंतू काय चालवलंस तू? तू त्या सयावर फिर्याद का गुदरली नाहीस.आम्ही इतक्या दिवसांपासून तुला जमीन मिळावी म्हणून मरमर करतोय नी तू खुशाल कालपासून त्या सयाला मिळालास?"

" दत्ताजी बसा आधी.दम खा जरा. काही गोष्टी कशा असतात माहित आहे का? शिकार झपटायची असेल तर चार पावलं मागे जाऊन मोठी उडी घ्यायची असते!"

" अरे पण तुला काय वाटतं? सुंती आडात उडी टाकून मेली असं? नाही तिला या सयानंच मारलं असावं.कारण आम्ही भेट घेऊन वकीलामार्फत जमिनीचं सारं व्यवस्थीत केलं होतं रे.नी त्याच रात्री ती गायब होते नी नंतर....."

दत्ता भट रडू लागले.

तिकडं तेलगू कामगाराचं कुत्रं क्वार्टरकडं तोंड करून एकसारखं विव्हळतच होतं. तोच उग्र दर्प घुमला नी दोन काळ्या मांजरीचं जवळच भांडण सुरू झालं. सदा सरांनी खडा उचलत मांजरीना उसकारलं.

" दत्ताजी मी त्या सयाला सोडणारच नाही.पण माझ्या पद्धतीनं. तुम्ही निवांत असा"

तोच महादबाच्या मळ्याकडंच्या वाटेनं जीप येतांना दिसली.तारणीत जीप दुसरी कुणाचीच नव्हती.दत्तानं चांदण्यात दुरुनच ओळखली.

" ही तर सयाची गाडी आहे.या वेळेस हे इकडं कसं तरफडलं.जेसीबीसाठी आलाय की आपल्या मागं?" सदा व दत्ता घाबरले.

 दत्ताजी तुम्ही तिकडं अंधारात लपा लवकर.त्यानं पाहिलं तर विचका होईल.पळा पळा लवकर .मी पाहतो त्याला.

दत्ताजी व सदा सर क्वार्टर मागं अंधारात लपले.

.

.

 जीप उभी राहताच अंतू उतरला.

" अंतू तू चल मी हे ड्रम उतरवतो नी मग येतो.थोडी पिऊ नि मग हवेलीवर जाऊ.तू पण हवेलीवरच थांबायचं आता"

अंतू उतरला व क्वार्टरकडं जाऊ लागला. पण उतरतांना त्यानं गाडीतला टिकावचा दांड हातात घेतला. सयानं अंतू दूर जाताच डिझेल खाली उतरवलं .पेट्रोलचा एक ड्रम गाडीत तसाच राहू देत एक गाडीत आडवा केला. 

आता फक्त अंत्याला इकडं आणून बसवायचं नी मग धमाकाssss करायचा.

अंधारात दबा धरून बसतांना अंतू गाडीकडून आला की गाडीत बसला हे दत्ताजी सदाला समजलं नाही.

सया अंतूला गाडीत आणण्यासाठी हाका मारू लागला.

" अंतू चल डिझेल उतरवलं गेलं!"

दत्ताजीला उमजेना आल्या आल्या हे बेणं अंतूला का बोलवतोय.

अंतू येत नाही व दिसत नाही म्हणून सया क्वार्टरकडं आला.त्यानं लोटलेलं कवाड आत ढकललं नी तो जागेवरच चिरकला. वरच्या अॅंगलला दोर बांधून अंतू झुलत होता.जीभ व डोळे बाहेर आलेले.नी कोपऱ्यात खुर्चीवर टिकावचा दांड घेऊन दुसरा अंतू बसलेला.सयाला खालची जमीन ओली झालेली ही कळत नव्हती. क्षणात हत्तीचं बळ एकवटून त्यानं मागं फिरत सुसाट पळ काढला पण तोच गाडीजवळ मागून अंतूनं मारलेला दांड डोक्यात खणकला.सया गाडीजवळ आडवा - भुईसपाट झाला. मागून दत्ता व सदा सर अंधारातून पाहू लागले. अंतूनं सयाचं मानगुट पकडत त्याला गाडीत बसवलं नी जवळ पडलेल्या नारळाच्या दोऱ्या उचलून‌ गाडीत त्याला जखडलं. सया गयावया करू लागला.

 तोच उग्र दर्प सुटला नी मांजरी क्वार्टरमध्ये जोरजोरात आरडू लागल्या. सदानं खिडकीतनं अचानक मांजरीच्या आवाजाकडं डोकावलं नी त्याला धाप लागली.तो आकांडतांडव करत दत्ताजीला हातानं ओढत खिडकीकडं पहायला लावू लागला.दत्ताजी अंतू सयाला गाडीत बांधतोय तेच पाहत होता.सदा सरानं त्यांचं बखोट धरलं नी त्यांनीही खिडकीत डोकावलं. आतला झुलता अंतू पाहताच त्यांची ही बोबडी वळली. कोणता अंतू खरा? मध्ये लांबलेल्या जिभेनं झुलणारा की सयाला दांडानं आडवा करणारा?

तोच तिकडं अंतूनं गाडीत आगकाडी दूरूनच फेकली असावी.मोठा धमाका होत गाडी जळत होती..... सया भरिताचं वांगं शेकोटीत जळून तेल गळावं तसा भाजून गळत होता.अंतू सुंतीचा शेवाळलेला हात हातात घेत महादबाच्या मळ्यातील पिंपळाकडं निघाला. धमाक्यानं धरणावर असलेले किरकोळ तेलगू मजूर व इतर कर्मचारी अधिकारी डोळे चोळतच उठले. पहाट व्हायलाच आली होती.एकच गलका उडाला...

   सदा सर सकाळ होईपर्यंत बेशुद्ध होऊ लागले. दत्ताजीनं त्याला शुद्धीवर आणत " सर घाबरू नका.पंचक पुरा झाला." सयाच्या पंचकातला तिसरा व पाचवा बळी वाचला होता व जयाला लागलेला पंचकच पूर्ण होत होता. दत्ता भटानं उसासा टाकत " बेणं सया पंचकातही आग (पेट्रोल )घेऊन फिरत होतं! मग जळणार नाही तर काय होणार!" सदा सरांना बजावत धीर दिला.

 काही काळातच धरण पूर्ण झालं. पाणी अडवलं गेलं. त्याआधीच तारणी उठली. शाळा ही स्थलांतरीत होऊन सरकारी ताब्यात गेलेल्या तात्याराव नेहेतेच्या चाळीस एकर रानात तारणी व शाळा नविन जोमानं बहरली. सदा सराच्या मनातील सुंतीबाईचं स्थान अंतूसाठी संगमरवराप्रमाणे आरसपानीच राहिलं.


Rate this content
Log in