Vasudev Patil

Others

3  

Vasudev Patil

Others

फितुर आभाळ

फितुर आभाळ

11 mins
1.0K


हणमंतरावानं मुद्दामहून रंजन व मिराचं लग्न सोनेवाडीत धुमधडाक्यात ठेवलं. हळदीचा डिजे सोनेवाडीत घुमू लागताच बाजीचं काळीज तिळ तिळ तुटू लागलं. हळद लागलेली मिरा त्याला पाहवेना.

  लग्न होऊनही रंजनला कानाखाली निघालेला आवाज आठवला की कान सुन्न होत असल्याचा भास होई.नी मग त्याला बाजी आठवे. त्यात हणमंतरावही दुलबाला नेस्तनाबूत कसं करता येईल याच फिराक मध्ये होता.त्याचं व रंजनचं सुत जुळायला वेळ लागला नाही.हणमंतराव जळगावला परतताच त्यानं रंजनकरवी धनाच्या नावावर असलेलं चार एकर रान जे संताच खेळत होता त्यावर रंजनचं ट्रॅक्टर आणत ताबा बसवला.बाजी मिराच्या लग्नापासून नातेवाईकाच्या गावाला निघून गेला होता.रंजनचं ट्रॅक्टर येताच संताला आधी धनानं पाठवलं असेल असं वाटलं.त्यानं धनाला काॅल करत विचारणा करताच "मला माॅलसाठी पैशाची गरज होती म्हणुन माझी जमिन मी रंजनला गहाण ठेवलीय" असं त्रोटकपणे सांगत फोन कट केला. संताच्या कानात 'माझी जमीन' हेच शब्द घोळू लागले.त्याचं पित्त खवळलं व त्यानं घरी येत संतापात हातवारे करत दुलबाच्या कानावर हा प्रकार टाकत मोटार सायकल काढत धनास याचा जाब विचारण्यासाठी जळगाव गाठायचं ठरवलं.झाल्या प्रकारानं दुलबा,जना ही भांबावली.

 "त्या हरामखोरास फक्त माझ्यासमोर आण.मग मी पाहतो त्याची जमीन कशी!"दुलबाचं भान सुटलं व विठ्ठलाचा निस्सीम भक्त असलेल्या दुलबाच्या तोंडातून शिव्या बाहेर पडू लागल्या.संतानं गाडी काढताच परिस्थीतीचं गांभिर्य ओळखून जनाही बालाला व सुमीला दुलबाकडं ठेवत सोबत निघाली.सुमी आईचा पदर धरत सोबत जाण्यासाठी आकांत करू लागली तर बाला बापाच्या पायाला लागला.जणू त्यांना कायमचं सोडून जाणाऱ्या आपल्या आईबापास एकटं जाऊ द्यायचंच नव्हतं.पण पुढील परिणाम ठाऊक नसल्यानं व वतन जाऊ पाहतंय या विचारात संतानं बालाला जोरानं भिरकावत 

" मुकाट्यानं इथंच मर", सांगत गाडीला किक मारली.बाला रडत रडत "बाबा!,बाबा!,मला पण येऊ द्या" म्हणून टाहो फोडत होता तर सुमीनं जनाला घट्ट मिठी मारली होती. जणू आपल्या आई-बाबांचा कायमचा दुरावा त्यांना कळून चुकला असावा. दुलबानं रडणाऱ्या नातवांना सांभाळत "आरं संता!, आधी बाजीला फोन कर व त्याला ही बोलव" म्हणुन विनवू लागला.पण तो पावेतो जनाला मागे बसवत संता निघालाही होता.

हे असं काही तरी होणारच याची हणमंतराव ,धना व रंजनला कल्पना होतीच. मात्र त्यांना खरी भिती बाजीचीच जास्त होती. झालंही तसंच संता जळगावला पोहाचण्याआधीच बाजीच्या मित्रानं बाजीला फोनवरून 'रंजननं तुमच्या शेतावर ताबा बसवलाय' म्हणुन कळवताच त्यानं आधी 'विकलेल्या शेतावर का?' विचारलं.

पण त्याऐवजी आपलं उरलेलं शेत जे धनाच्या नावावर आहे त्यावर ताबा बसवल्याचं ऐकताच हे होणारच होतं कारण धनाची नियत त्याला आधीच कळाली होती पण तो आपला भाऊ आहे त्याचं आपण नंतर पाहू पण रंजन व हणम्या मामाला आधी गाठू म्हणून बाजी संता आधीच जळगावला पोहोचला.पण तो पावेतो रंजन व हणमंतराव सुरक्षित ठिकाणी दबा धरून बसले.

बाजीला घरी धना, राधा व मिराच दिसली.

"भावा किती स्वार्थी निघालास!कर्ज काढून बाईला नोकरीला लावलंस,त्यानंतर आपल्या वाटणीचं शेत जसंच्या तसं ठेवत भोळ्या भावांचं शेत विकत माॅलही काढला,नी आता आपल्या वाटणीच्या शेतावर ताबा बसवलास?व्वा!"बाजीची नजर आग पाखडू लागली.

"बाजी काहीही बरडू नकोस!हा माॅल आपल्या सर्वाचाच आहेस व त्याचा विस्तार करण्यासाठीच मी रंजनकडं ते शेत गहाण ठेवलं फक्त..." धना गुर्मीत बोलला.

तोच क्षणात त्याचं छाताड पकडत बाजीनं मुस्काटात वाजवत

"हरामखोर लाज नाही वाटत एवढं होऊनही हे नाटक करतांना" बाजी लालबुंद होत वीज कडकडावी त्या आवेगानं व त्वेषानं कडाळला.

धना उंदरासारखं तोंड करत त त फ फ करू लागला.तोच राधा संतापत धनाच्या पुढे उभी राहत असतांनाच मिरा ही पुढं आली. दोन्ही बहिणी बाजीला धक्काबुक्की करू लागल्या.बायांवर हात उचलण्यास बाजीचं मर्दानी मन कचरलं .बाजी मागं सरकत धनाला बाहेर ओढू पाहत रंजन व हणम्या कुठं लपलेत विचारू लागल. बाजीला मागे सरकल्याचं पाहताच दोन्ही बहिणींना चेव आला. त्यात मिरानं बाजीच्या छाताडाला हात घालत दुसऱ्या हातानं बाजीच्या गालावर वाजवली.आता मात्र बाजीची सटकली त्यानं मिरेला दूर ढकललं त्यात राधेचा पाय मिरेच्या साडीवर असल्यानं मिरेची साडी सुटू लागताच बाजीनं साडी अंगावर टाकत तेथून काढता पाय घेत रंजन व हणम्याला तुडवतोच आज सांगत निघाला.त्याला वाटलं रंजन व हणम्या मामा रांजणेवाडीला वा सोनेवाडीला असतील.तो तिकडं निघाला.तोच राधा मिरेनं रंजनला सारं कळवताच त्यानं त्याच अवस्थेत त्यांना पोलीसाकडं पाठवत हणमंतरावास ठाण्यात पाठवत तो धनाकडं परतला त्याचवेळी

संता व जना धनाच्या माॅलच्या पायऱ्या चढत होते.संता धनाला हा काय प्रकार म्हणून जाब विचारू लागला.तोच राधा ,मिरा ,हणमंतरावही बाजीवर विनयभंगाची केस दाखल करत परतले.

धना आपल्या मोठ्या भावाला समजावू लागला .

"दादा, माॅलसाठी आणखी भांडवलं भरपूर लागणार असल्यानं मी जमीन रंजनरावास गहाण ठेवलीय दुसरं काही नाही ,नी बाजी व तु पण हा धिंगाणा घालत आहेत.बाजीनं तर मिरेच्या अब्रूवरच..."

त्याला मध्येच थांबवत "धना!, जमीन गहाण तू कुणाला विचारून ठेवली?निदान बा ला तरी एक शब्द विचारावंस नाही वाटलं तुला?" संता रागानं बेफाम होत विचारू लागला.

"धनाजीरावांना त्यांची जमीन गहाण ठेवायची होती ती ठेवली.कुणाला विचारायची गरज काय", धना ऐवजी हणम्या मामा मध्येच बोलला.

"मामा ,मध्ये तोंड खुपसायचं नाही,मी धनाला विचारतोय"आता संता लालेलाल होत होता.

"कुणाला विचारायचं म्हणजे?ज्या बापानं, भावांनी याची बाई लावतांना वीस लाख कर्ज काढून कचाकचा मोजले,माॅल काढतांना त्यांची जमीन विकली त्यांना का विचारलं नाही"संता आता बेफान झाला होता.

"मामा ,धनादादा याचं काय ऐकून घेताय एवढं जे आहे ते स्पष्ट सांगाना"रंजन रागानं पाहत बोलला.

"भावा-भावाच्या भांडणात इतर दलालांनी बोलायचं काम नाही"संता त्वेषानं बोलला.

"संताजी ऐक,तुम्हाला अकलाच नसल्यानं आधीच तुम्ही जमीन घालून बसलात तुमच्या नावावरची.आता धनाजीरावांची जमीन कितीही आटापिटा केला तरी मिळणार नाहीच.तुम्हास जे करायचं ते करा पण आधी त्या बाजीचा मी काटा काढतो त्यानं मिरेच्या अब्रूवर हात टाकलाय.एस. पी माझ्या ओळखीचे आहेत.शिवाय त्या आधीच मी त्याचं कांड करणार"रंजननं थेट धमकी दिली.

"रंजन हे तुला महागात पडेल.आम्ही पण आमच्या आईचं दछध पिलंय.तुमच्यात ताकत असेल तर शेतात औतच काय पण पायचठेवून पहा नाही तंगडं तोडून हातात दिलं तर नावच सांगणार नाही"

"आधी त्या बाजीला वाचव मग शेताचं पहा"रंजन कडाडला.

"बाजी!मरणाशिही बाजी ज्याची तो बाजी!वाघ आहे तो!तुझ्यासारख्या दहा कोल्ह्यानाही लोळवेल तो.त्याची चिंता मला नाही तुम्हीच करा.आजपासुन शेतात कसे येतात तेच पाहतो मी! "सांगत संतानं जनाला उठवत गाडी काढली.

 बाहेर येताच त्याला बाजीचं बोलणं आठवलं.आपण मागं जमीन विकून मुर्खपणा केलाय.भावानंच दगा दिलाय आपल्याला.पण आता जे झालं ते.आधी बाजीला वाचवलं पाहिजे.बाजी वाचला म्हणजे काही काळानंतर आपला वचपा तो काढेनच.त्यानं गाडी साईडला उभी करत बाजीला काॅल केला.

तोच तिकडनं बाजी बोलू लागला.

"दादा तुला मी जमीन विकायचं नाही सांगत होतो तू तेव्हा ऐकलं नाहीस नी आता धना, रंजन हणमंतराव सारे बदललेत"

"बाजी तू आता कुठं आहेस भावा आधी ते सांग नी जिथं असशील तेथून गायब हो.कुठं ही जा.दोन चार वर्ष इकडं फिरकूच नको.त्यांनी तुझ्यावर विनयभंगाची केस दाखल केलीय.पोलीश मागावर असतील शिवाय तोहणम्या व रंजनही काही बरं वाईट करतील".

"दादा ,जमिनीचं काय?"

"ते मी पाहीन!त्याला मी समर्थ आहे,तू फक्त गायब हो.आणि तूर्त आम्हासही संपर्क करू नको"

"दादा त्या रंजनची तू काळजी करू नको.त्याला उभा फाडीन मी.पण तुम्हाला सोडून मी कुठंच जाणार नाही".

"बाजी पोलीस तुला शोधत असतील तू ऐक माझं भावाकुठं तरी निघ.नंतर वातावरण शांत झालं कीये हवं तर"

रंजनची नाही पण

बाजीला पोलीसांची भिती वाटू लागली.

त्याच स्थितीत त्यानं ट्रकला हात दिला नी तोनिघून गेला पण आपण कुठं जात आहोत हे त्यालाही माहीत नव्हतं.

संता आपल्याला सख्ख्या भावानं फसवलं याच विचारत सोनेवाडीकडं गाडी चालवत होता.मागं बसलेली जना ही आता पुढं काय या विचारातच रडत होती.एव्हाना अंधार पडायला सुरूवात झाली.व पावसानं दिवटीजोहार घालावा तसा पडत झोडपायला सुरूवात केली .पडणाऱ्या जोराच्या पावसाबरोबर वारा ही तडाका देऊ लागला.झाडं वाऱ्यानं व पावसानं घिरट्या घेऊ लागली.तसं जनानं संताला गाडी थांबवायला लावली.पण संध्याकाळचा हा पाऊस थांबणार नाही हा लवकर व पोरं घरी वाट पाहत असतील म्हणून संता वारा पाऊस झेलत,समोरची कमी झालेली वाहनं टाळत गाडी घराकडं दामटू लागला.सोनेवाडी आता सात आठ किमी दूर राहिलं असावं.दोन्हीही थंड पाण्यानं काकडू लागली.समोरून डोळ्यावर पडणारा वाहनाचा प्रखर प्रकाश टाळत संता गाडी दामटतच होता.तोच आड रस्त्यानं समोरून एक ट्रक समोर बऱ्याच अंतरावर मुख्य रस्त्यावर चढला.तीव्र प्रकाशझ्योतात संताला काय होतंय कळायच्या आत गाडी पुढच्या चाकात अडकवत दूरपर्यंत फरफरट नेली गेली.जनाची कवटीच चेचली गेली तर संताच्या पोटावरनं चाक गेलं.ट्रक उभा करत रंजन हणम्या खाली उतरले .अंधारात संतानं आवाज ओळखला नी शुद्ध हरपली.दोन्ही गेल्याची खात्री होताच कुणी येण्याच्या आत त्यांनी पोबारा केला.

रात्री दहाला सोनेवाडीत एकच धावपळ उडाली.मिळेल त्या वाहनानं जो तो जळगावचं सिव्हील गाठू लागला.गाडीतून दुलबाला ही नेण्यात आलं.सकाळी पी.एम करून प्रेतं सोनेवाडीत आणण्यात आली.अज्ञात वाहनावर गुन्हा नोंदविण्यात आला.

दुलबाच्या डोळ्यात आसवाचा टिपूसही ओघळेना.अंगणात प्रेत येताच आई-वडील असल्याचं कळताच बाला व सुमीनं गावाचं काळीज कापणारा हंबरडा फोडला.नी मग नातवांना रडतांना पाहतांना दुलबानं टाहो फोडला.भिंतीला डोकं आपटत जनी व संताच्या नावानं दुलबानं साऱ्या लोकाच्या काळजाला पिळवटून टाकणारा आकांत मांडला.धना व राधा नाटक भासणार नाही असा आलाप करत होते.लोकांनी बाजीचा मोबाईल रात्रीपासून ट्राय करत होते पण लागता लागेना म्हणून शेवटी निर्णय घेत बालानं आपल्या आई-वडिलांना भडाग्नी दिला व आपणास आई बाबा घेऊन गेले असते तर किती बरं झालं असतं !आता आपलं काय?या वेदनेनं अजाण बाला केसं तोडत स्मशानभूमीत लोकांचा रोखलेला संयमाचा बांध फोडू लागला.

 पाच दिवसात सारं आटोपतं घेताच हणमंतराव चार चौघात दुलबानं नातवासोबत धनाजीरावाजवळ जळगावला चलावं म्हणून बोलू लागला.पण दुलबा निर्वीकार खालीमुंडी घालून बसू लागला.वपन झालेल्या गोट्यासहीत भकास चेहऱ्यानं बाला आपल्या आजोबाच्या मांडीवर बसून सुन्या फितूर आभाळात आपलं भविष्य शोधू लागला.सुमीला तर तेही शोधण्याची जाणीव येण्या इतपत वय नव्हतं.

किसना व सोजरताई दुलबाला हिम्मत देऊ लागले.बाजीचा शोध सुरूच होता. दहा दिवसांत धना व राधा जळगावला परतली.किसनानं त्यांना दुलबास आम्ही नंतर पाठवतो सांगत समजावलं.पण दुलबानं त्यांना जातांना थरथरत विचारलंच"धन्या खरं सांग त्या दिवशी माझा संता व जनी तुझ्याकडंच आली होती.काय झालं नेमकं?"

धना खाली मान खालत रडू लागला.राधाखोटी आसवं आणत "दादा व ताई संताप करत होती पण यांनी जमीन फक्त गहाण ठेवलीय .ते ही आपल्या माॅलसाठी असं समजवत जेवण खाऊ घालत निरोप दिला.बाजी दादानं धूमाकूळ घालून मिरेवर जो प्रकार केला त्याबद्दल त्यांनी खेद करत त्याला समजावतो असं सांगत निघाले नी काळानं ..."रडू लागली.

पण दुलबानं हे साफ खोटं असल्याचं सांगत धनाला धारेवर धरलं. किसना मध्ये पडत "दुलबा याबाबत बाजी आल्यावर आपण बोलू.आता अशा प्रसंगात नको"सांगत दुलबास शांत केलं.

दुलबा नातवांना सांभाळत किसनाकडंचं दोन घास गिळत बाजीची पाखरागत वाट पाहू लागला.पण बाजी काही येईना .तशी दूलबाची हिम्मत खचू लागली.महिने दोन महिने जाताच त्याचं मन आता बाजीबाबत ही नको ते विचार करू लागलं.त्यांना बाजी नाही आलाच तर बाला व सुमीचं काय?आपण उतरती माती!,या पोरांचं पुढं काय?"म्हणून चिंता भेडसावू लागली.सरते शेवटी धना आपला पोरगाच. ही पोरं बाजी येई पर्यंत त्यांच्या मायेला लावलीच पाहीजेत.आता त्यांचा सांभाळ तोच करेल.म्हणून संता गेल्यानंतर चार महिन्यातच त्यांनी मागचं सारं विसरत माघार घेत बाला व सुमीला घेत जळगाव गाठलं.पण त्यांना कुठं माहित होतं की तिथं ही या पोरांसाठी आभाळ फितूरच होतं व पुन्हा त्यांना इथंच परतावं लागणार होतं.

 धना व राधानं अजुन प्रकरण गरम आहे , शिवाय शेतीसाठी आपल्याला सोनेवाडीत जावंच लागेल म्हणून गावात बभ्रा नको दुलबा व पोरांना ठेवलं.पण पंधरा दिवस महिना होत नाही तोच त्यांच्या झळा पोरांना व दुलबास बसू लागल्या.पंधरा दिवसात दुलबा व मुलांची सोय माॅल मागं असलेल्या रखवालदाराच्या खोलीत करण्यात आली.दुलबाला वाटलं निदान तिथं पोरांना घुटन तरी होणार नाही.त्यांनी काही एक बोलता आपला बिस्तरा उचलत पोरांना घेत निघाले.पण या ठिकाणी आल्यावर त्यांना जेवणवेळेवर मिळेना.दुलबाला आपली फिकर नव्हती पण कोवळी पोरं भुकेने व्याकुळ होत त्यानं ते सैरभैर होत.त्यांनी या गोष्टी धनाच्या कानावर घातल्या.पण धनानं हो ला हो केलं व निघून गेला.त्यानंतर दुलबाला व बालाला माॅलवर विविध काम सोपवली गेली.दुलबास रिकाम राहण्यापेक्षा बरं म्हणून त्या ही गोष्टीस विरोध नव्हता.पण त्यांनी बालास शाळेत घालावयास लावलं.

तर राधेनं स्पष्टपणे नकार देत सुनावलं.

"बालाला शाळेत घालण्यापेक्षा माॅलवरच लहानपणापासुन राहू देऊ.जेणेकरून तो सारा व्यवहार शिकेल व पुढे माॅल सांभाळेल"

पण माॅल सांभाळण्याची ही दिवास्वप्न असून पोरास ढोरासारखं राबवलं जाईल हे दुलबानं ओळखलं.त्यांनी त्या वेळी काही एक न बोलता जवळची नगरपालिका शाळा शोधली व बालाचं नाव दाखल केलं.राधा व धनानं हे कळताच तणफण केली.

बाला ,दुलबा माॅलमध्ये पॅकींगचं काम करत बाला शाळेत जाऊ लागला.जेवण मिळालं नाही की माॅलमधल्या वस्तू थोड्याफार खाऊ लागला.एक दिवस असंच तोंडात त्यानं शेंगदाणे टाकले.हणमंतरावांनी हे पाहताच तोंडावर बुक्की मारत 

"कारे! चोरून वस्तू खातांना लाज नाही वाटत का?" वरून रूबाब करू लागला.

तोंडातल्या शेंगदाण्यावर बुक्की पडताच बालाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं व गाल, ओठ फरफर सुजले.तो जोरात किंचाळत रडू लागला.दुलबानं त्यास कवटाळत "हणमंतराव चोर कुणाला म्हणतोस? या अजाणत्या पोरानं खाण्याची वस्तू खाल्ली म्हणून का?अरं त्याच पोराच्या काका बाबाची सारी इस्टेट चोरणारी अवलाद तुझी!हा सारा डोलारा त्याच चोरीवर उभा झालाय तुमचा!आणि वरून त्याला चोर म्हणता!लाज नाही वाटत?त्याचं खात आहेत निदान त्याला पोटापुरतं तरी खायला घाला.तो कशाला चोरून खाईल? "दुलबा लालेलाल झाला होता.त्याचं ते रूप पाहून हणमंतरावानं तेथून काढता पाय घेतला.धनानंही चुप राहणं पसंत केलं.मग बरेच दिवस धनानं राधाला सांगून वेळेवर जेवण द्यायला लावलं.

दुलबा माॅलमध्ये राबत नातवांना वाढवू लागला व बाजीची वाट पाहू लागला.पण अंधाऱ्यारात्रीत चांदण्याकडं पाहत काय आपलं वैभव होतं नी काय झालं. या विचारांनी तळमळत ते देवाला बाजीला लवकर पाठवण्याचा धावा करु लागले.

महिन्या मागून महिने जात होते.ना धड पोरांना कपडे, धड पोटाला खाणं!पण दुसरीकडं जायचं कुठं या विचारानं दुलबा दिवस काढत होता.दिड दोन वर्ष झालं असेल.हे असंच आपण सापाची अवलाद वाढवत राहिलो तर पुढं जाऊन ते डूख धरतीलच या विचारानं रंजन व हणमंतराव पुढच्या तयारीस लागले.

सकाळी सकाळीच कार नं रंजन हणमंतराव व मिरा आली.बाला व दुलबा कामात होते. रंजननं खुर्चीवर बसत बुट काढू लागला.तोच त्याला बाला दिसला.तो गालात हसला.बाजी आठवून त्याची नस तडकली. त्यानं बालाला बोलावलं.पायातला एक बुट काढत त्याला पुसायला लावला.बाला फडकं शोधत बुट पुसू लागला.पण नेमकं फडकंच खराब असल्यानं बुट साफ झालाच नाही.हे पाहताच रंजननं दुसऱ्या पायानं बुटासहीत बालाच्या तोंडावर लाथ मारली ."तुझ्या बापानं तरी कधी असा बुट साफ केला होता का?" तो गरजला.

लाथ तोंडावर बसताच दात ओठात घुसला व बाला रक्तबंबाळ झाला.पोरगं ग्लानी येऊन खाली पडलं.वरून त्याच बुटासहीत तो पडलेल्या बालाच्या पाठीवर उभा राहिला. तरी जवळ असलेला धना एक शब्दही बोलेना.दुलबा काय समजायचा ते समजला.ज्या अर्थी धना काही बोलत नाही म्हणजे ही पोरं त्यांना इथं नकोत.आज लाथ मात पाठीवर उभा आहे उद्या आपण नसल्यावर....? पोट भरण्यापेक्षा जीव वाचवणं महत्वाचा असा विचार करत त्यांनी बालाला उठवलं. सुमीनं तर जमीनच ओली केली व भितीनं रडत आजोबाला बिलगली.

त्यांनी पोरांना घेतलं व स्टेशन गाठलं.त्या ठिकाणी नळावर पोरांचं सुजलेलं तोंड धूऊन चहा पाजला.फलाटावर कित्येक गाड्या येत जात होत्या.दुलबा विचार चक्रात हरवला.कुठं जायचं?पोरांना वाचवायचं कसं?बाजी आलाच नाही तर?समजा आपल्याला अचानक काही झालं तर या पोरांनी कुणाकडं ?त्या पेक्षा यांची कायमची सोय लावत आपण ही....

त्यांनी पक्क ठरवलं.गाडीची ये जा सुरुच होती.येणाऱ्या गाडीत त्यांना गुंता सोडवणं सोईचं वाटलं. दुलबा उठला.समोर दूर गाडी येतांना दिसत होती.बाला व सुमी फलाटाच्या चमकणाऱ्या फरशीवर मस्त लोळत होती.त्यांना आपला आजोबा असल्यावर काहीच घोर वाटत नव्हता.गाडी जवळ येऊ लागली.तसा दुलबा घाईनं उठला."चला पोरांनो पटकन! गाडी आली,उठा"

"बाबा बसा ना काय घाई!जाऊ सावकाश ना"

बालाच्या या बोलानं दुलबा कचरला तो बसला नी येणारी गाडी निघून गेली.

त्याला पोरांची छिन्नविछीन्न चेहरे दिसू लागले.मन माघार घेऊ लागले.माघार घेणाऱ्या मनाला पुन्हा प्रश्न पडू लागला.मग यांना घेऊन जायचं कुठं?त्यावेळी दुलबास आपलं गाव आठवू लागलं.किसन, सोजर आठवली.आपलं विठ्ठल दैवत आठवलं.आपण ,आपल्या गावानं किती अनाथ मुलांना आसरा दिलाय?मग आपल्या नातवांना आसरा मिळणार नाही का? शिवाय एक एकर रान आहेच संताच्या नावावर.मग का हा अघोरी विचार?

दुलबानं दोन्ही नातवांना कवेत घेतलं व सोनेवाडीकडं, आपल्या किसनदा कडं निघायचं ठरवलं.


क्रमश:



Rate this content
Log in