नानू ..
नानू ..
भाग:--तिसरा
बाणाईच्या अंगाचा थरार उडवणाऱ्या व तात्याच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या रात्रीच्या प्रसंगानं दिवसभर दोघांना नानूची सारखी सय येऊ लागली.आतापर्यंत अपघातानंच नानू गेलाय या भ्रमात असणाऱ्या तात्या, आक्काला नानूचा खून झालाय हे ऐकून धक्काच बसला. तरी पण वसंता व वासंतीनं का व कसं मारलं असावा हे उमगेना.दिवसभर त्याच तंद्रीत दोन्ही बापलेक वावरू लागले.का हे पातक केलं असावं बरं ?यात नानू तर अनाथ पोर ,कुणाचं काय वाईट करणार बिचारा? मग तात्यांना नानू आपल्या जिवनात कसा आला हे आठवू लागलं.
.
.
.
साधारण आठ-नऊ वर्षांपूर्वीची वारी त्यांना आठवली.वारी चालत चालत वाखरी जवळ करत होती.लाखोचा समुदाय जेथे जागा मिळेल तेथे पांडुरंगाचं नामस्मरण व जयघोष करत मुक्कामाला थांबलेला.पावसाला सुरूवात झालेली. दिवसभराच्या प्रवासानं तात्या चूर झालेले.रस्त्याच्या कडेलाच आडोशाला कोरडी जागा पाहत पथारी टाकलेली.झोपेतच रात्री दोनेक वर्षाचं मूल त्याच्या कुशीत विसावलेलं.कोवळ्या ओलाव्याच्या स्पर्शानं तात्यांना जाग आली.मूलं तर आईला बिलगावं तसं तात्याला बिलगलेलं.तात्यांना इवल्या हाताची मिठी सोडवेच ना.त्यांनी पोराला कुशीत घेत आजूबाजूला त्याच्या आईचा शोध घेतला.आजुबाजुचे वारकरीही जागे झाले.बोलता बोलता व शोध घेता सकाळ झाली पण पोराच्या आई-वडीलांचा थांग लागेना.पालखीतल्या वारकऱ्यांनी कसून शोध घेऊनही तपास लागेना.जवळच्या ठाण्यात त्यांनी कळवलं पण पोलीसांनी तक्रार नोंदवून घेत तात्यांचा पूर्ण पत्ता व नंबर घेत मुलास अनाथालयात ठेवायची तयारी केली.पण तात्यांना काय वाटलं कुणास ठाऊक विठ्ठलानंच आपल्या कुशीत मूल पाठवलं असावं .भगवंताचाच कौल. त्यांनी आपल्या सहचारिणी कडं पाहिलं.नजरे नजरेत मूक संमती झाली.त्यांनी विणवणी करत हात जोडले."साहेब मुलाला अनाथालयात ठेवण्यापेक्षा माझा पूर्ण पत्ता व नंबर दिलाच आहे मी.जर पोराच्या आईबापाचा तपास लागला तर मी लगेच पोरास हजर करून त्यांच्या हवाली करेन .पण तपास लागत नाही तोपावेतो सांभाळतो आम्ही त्यास".
साहेब माणुसकीचा होता.त्यानं ही पाहिलं चुकून पोर हरवलं असतं तर एव्हाना मिसींग केस दाखल झालीच असती.मुद्दाम कुणीतरी टाकलेलं हे पोर अनाथालयात जाण्यापेक्षा म्हातारा नेक दिसतोय. वारकऱ्याच्या घरात पोराची आबाळ होणार नाही. त्यांनी साऱ्या बाबींची शहानिशा करत महाराजाच्या हवाल्यानं पोरास तात्यांकडं सोपवलं.वारीत ज्ञानबाचं गवसला म्हणून ज्ञानू(नानू)स त्यांनी विठोबाला भेटत सलवाडीत आणलं.कोणा धर्माचं, कोण्या जातीचं काहीच सोयरसुतक न बाळगत वारकऱ्यांचा वसा चालवत दोन मुलानंतर ही तिसरं मूल म्हणून 'नानूस' त्यांनी माया दिली.विठोबा व बाणाई ही सख्ख्या भावागत नानूस जपू लागले. पण दोन वर्षांपूर्वी तात्यांची सहचारिणी गेली व तात्यांनी आपल्या मोठ्या मुलाचं,विठोबाचं लग्न जमवलं.सून म्हणून संगमनेरची वासंती घरात आली व नंतर काही महिन्यातच बाणाईला ही उजवत सनावदला बिदा केलं.दहा अकरा वर्षाचा होईपर्यंत नानूला जाणवलंच नाही की आपण कोण! पण आईचं जाणं,बाणाईचं सासरी जाणं व वासंती चं येणं या साऱ्या घटना अचानक व लगोलग घडत गेल्या.आता पर्यंत नानू सहावीला जात खळ्यातल्या बारीकसारीक कामास विठोबाला, तात्यांना मदत करू लागला होता.गाई-म्हशींना घरून पेंढ घेऊन खळ्यात जाणं,दुधाच्या बादल्यांची ने-आण करणं,वासरं सोडत गाईंसोबत स्टॅण्डवर नेणं अशी कामं तो करू लागला.
वासंतीचं माहेर संगमनेरचं.एके दिवशी विश्वासराव आपल्या मुलीला भेटायला सलवाडीत आले. तो पावेतो नानूचं प्रकरण त्यांना माहित नव्हतं.पण लग्नापासूनच विठ्ठलराव व नानूत एवढं वयाचं अंतर त्यांना सलतच होतं. नविन संबंध म्हटल्यावर विचारणं त्यांना संयुक्तिक वाटेना. जेवण आटोपल्यावर त्यांनी गप्पा मारतांना मुलीजवळ पृच्छा केलीच.वासंतीनं नानू दिर असला तरी सख्खा नसल्याचं सांगताच नाव विश्वासराव असलं तरी पक्का पाताळयंत्री असणाऱ्या विश्वासरावांच्या मनात लगेच अनेक विचार व खुमारी तरळली. म्हणजे ठरवलं तर आपली पोर पंधरा एकराची नव्हे तर तीस एकराची मालकीण होऊ शकते हे त्यांनी ताळलं.त्यांनी नंतर खळ्यात व्याह्यांसोबत झोपतांना नानूचा विषय छेडलाच. तात्यांनी मोठ्या फुशारकीनं नानू आपला मुलगा नाही तर वारीत गवसलाय पासून तर आपण कसा सांभाळ करतोय,व कसा गुणी आहे ,पोटच्या पोरासारखाच! सारं सारं कथन केलं.विश्वासरावांनी हळूच मग व्याह्यास व्यवहार सांगितला.
"तात्या कसं असतं तुम्ही वारकरी म्हणजे भूतदया असलेली माणसं
.तुम्ही नाही असा विचार करणार तर कोण करणार!होत्या त्या परिस्थितीत तुम्ही केलं ते पोराला परिसस्पर्शच म्हणावा.पण तात्या जग रहाटी फार वेगळी आहे.तुम्ही येथपावेतो नानूस सांभाळलं हेच खूप.आता नानू सजाण होऊन तुमच्या इस्टेटीत दावा करत नाही त्या आधीच त्याला आता एखाद्या अनाथालयात दाखल करा.कारण तो आता त्याचा त्याचा राहू शकतो"
तात्यांना नानूबाबत असलं काही तरी वंगाळ सांगणारा प्रथमच भेटला होता.दुसरा कोणी असता तर तात्यांनी मुस्काटात वाजवत उठवलं असतं.पण विश्वासराव पडले व्याही!नाजुक नातं शिवाय नवं नातं.तात्यांनी आलेला घाम जिरवत "विश्वासराव नानूस मिठीत घेतलं तेव्हाच तो या काळजाचा तुकडा झालाय.त्याला आता नियतीही वेगळं करू शकत नाही. राहिला प्रश्न मिळकतीचा तर पांडुरंगाच्या कृपेनं नानू घरात आल्यापासून च्या काळानंतरच ती दुप्पट झालीय.त्याचा शेर मला पांडुरंगानं दिलाय.नी माझा विठा ही आपल्या या लाडक्या भावास देण्यास कुचराई करणार नाही."
तात्याच्या सडेतोड उत्तरानं विश्वासरावानं विषय पालटवत विराम दिला.
तद्नंतर विठा वासंतीसोबत संगमनेरला गेला तेव्हा विश्वासरावानं तेच फासे पुन्हा टाकले.पण विठानं ही विश्वासरावांना हवं असलेलं दान दिलंच नाही.
"आबा तात्यांनी नानूस आश्रय दिला असला तरी मला तो भावापेक्षाही जवळचा वाटतो.राहिला दावा करण्याचा प्रश्न तर तात्यांनी आधीच सारी जमीन दोन हिश्यात वाटणी करत वारस लावलेत".
विश्वासरावास तात्यापेक्षा जावयाचा जास्त संताप आला.त्यांनी आपलीच जिभ तोडातल्या तोंडात दातानं रक्त येईपर्यंत दाबली. 'वारकऱ्याचं पोर वारकऱ्याचाच गुणाचं' समजून घेत निदान आपली वासंती तर अजुन आपल्या गुणाची आहे म्हणून त्यांनी वासंतीच्या डोक्यात हवा भरली.शिडात हवा भरल्यावर वेगानं नावेनं किनारा गाठावा तसंच वासंतीबाबत झालं.
"पोरी तो नानू कोणत्या जातीचा?,कोणत्या धर्माचा?,कुणाचा?काहीच ठावठिकाणा नाही.अशास आश्रय देऊन वाढवणं इतपत ठिक पण आपली संपत्तीच देणं हा शुद्ध मूर्खपणा आहे.तू तूझ्या नवऱ्यास शिकव किंवा निदान तू तरी याबाबत काही तरी ठरव."
वासंतीच्या मनात नानूबाबत आग चेतवली गेली.
तात्यांना हे सारं आठवलं.पण विश्वासराव,वसंता वा वासंती नानूचा खून करतील इतपत त्यांना पटेना. पण कसा केला हे अजुनही त्यांना समजेना तात्यांची मती गुंग होऊ लागली.
सायंकाळी रमेशरावांनी मांत्रीकास आणलं.त्यानं सारं घर,अवतीभोवती फिरत नजरेखाली घातलं.गाठोड्यातून काहीबाही काढत ध्यान लावलं. पुन्हा चौफेर फिरला.तूर्तास काही धोखा नसल्यास सांगत तो निघून गेला.त्या रात्री तात्यांना नानूनं पुन्हा यावं असं भरपूर वाटलं.कारण त्या शिवाय खूनाचा उलघडा होणारच नव्हता.पण नानू दिसलाच नाही.
रमेशरावांनी मांत्रिकास आणून घोळ केला म्हणून दुसऱ्या दिवशी तात्यांनी अचानक निर्णय घेत बाणाईला घेत सलवाडीस निघायचं ठरवलं.बाणाई ,रमेशराव तात्या सलवाडीस गाडीनं निघाले.गावाबाहेर गाडी येताच बाणाईला अस्वस्थ वाटू लागलं.तिनं गाडी थांबवायला लावत ती खाली उतरत कोरड्या उचक्या देऊ लागली.तिला मळमळल्या सारखं जाणवू लागलं.तात्यांनी गाडीतली बाटली काढत पाणी दिलं.पोरीला दिवस गेल्याचं त्यांनी ताडलं.रमेशरावांची भिती जाऊन ते लाजले.लगेच थोडी तरारी आल्यावर ती मागच्या शीटवर बसत तात्यांना पुढं बसवायला लावलं.गाडी सुरु झाली.बाणाईला परवा येतांना जसं जाणवत होतं गाडी थांबल्यापासून अगदी तसंच जवळ कुणी तरी बसल्यागत जाणवू लागलं.पण आता भिती मात्र कमी वाटत होती.तात्यांनाही समोरच्या आरशात बाणाईजवळ कुणी असल्या सारखं थरथरतं दिसल्यागत भासवू लागलं.
गाडी सलवाडीत आली.साऱ्यांना उतरवत रमेशरावांनी गाडी खळ्यात उभी केली.
तात्यांना नानूबाबत जाणवून घ्यायचं होतं तरी त्यांनी झाल्या प्रकाराबाबत वाच्यता करायची नाही असं आधीच रमेशराव व बाणाईला त्यांनी बजावून ठेवलं होतंच.
विठानं आल्या आल्या सखा दाजी गेल्याचं तात्यांना सांगितलं. वासंती संगमनेरहून आलेल्या आपल्या वसंता भाऊजवळ बसलेली होती.ती चहा ठेवायला उठली. वसंता, वासंतीला पाहताच बाणाई व तात्यांची नस तडकली.
रात्री पाऊस असुनही तात्या घरी न झोपता खळ्यात झोपायला गेले.विठानं सखा दाजी असा गेला म्हणून म्हणा किंवा पाऊस म्हणून तात्याला नाही सांगितलं.पण तात्यांनी ऐकलंच नाही.म्हणून विठानं सोबत म्हणून वसंताला खळ्यात पाठवलं.तो का कू करू लागला.त्याला पहाटे लवकर गावाला निघायचं होतं.
क्रमश: